Login

साथ दे तू मला -भाग 8

HUSBAND WIFE LOVE STORY AFTER MARRIAGE .....

भाग  ८

       आता संयुने मनाशी पक्का निर्धार केलाच होता कि सकाळ झाली कि लगेचच माईंना तिच्या शिक्षणाविषयी सांगून टाकणार.

प्रवीण आणि प्रगतीने कितीही समजावून सांगितले तरी संयुला काही ते पटत नव्हते..

       उद्या माईंना काय काय बोलायचं कस कस समजावून सांगायचं असा विचार तिच्या मनात सुरु होता. सगळं खरं समजल्यावर माई कशा रिऍक्ट करतील? अशा विचारांनी संयुला रात्रभर झोप लागली नाही...

सकाळी संयु संधीच्याच शोधात होती कि कधी माई देवपूजा करून येतील आणि त्यांना सगळं खरं सांगून मी मोकळी होईल...

तेवढ्यात विकास लाईटबील घेऊन येतो.. माई पण तितक्यात पूजा करून हॉल मध्ये येतात.. माई विकासच्या हातातून लाईटबील हिसकावून घेतात नी त्याला विचारतात, “किती आलय बिल?”

विकास- “साडेपाच हजार…….!

वाड्याचं बिल आणि शेताचं बिल प्रवीणदादाकडं दिलंय !”

साडेपाच हजार लाईटबील ऐकून माईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली...

माई- “तरी मी सगळ्यांना सांगत होते, लाईट जपून वापरा…! पण ऐकत कोण..? तुम्हाला सगळ्यांना काय फरक पडतोय नाहीतरी..? माझा प्रवीण आहे ना मोकळा पैसे ओतायला..!”

सगळे खाली मान  घालून गप्प ऐकून घेत असतात...

माई- “विकास तू काय मला सांगू नको…. आतापासून लाईटबीलचे पैसे तूच द्यायचे...!”

 हे ऐकताच विकासच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडाला ... माधुरी पण किचन मधून पटकन बाहेर आली.. ती  काही बोलणार तितक्यात विकास तिला इशाऱ्यानेच शांत बसायला सांगतो..

माई- “जरा पडू कि कष्ट ! तेव्हाच कळलं किंमत मग आता बघा कशी बचत होईल लाईटीची...!”

प्रगती- “पण मी म्हणते एवढं बिल आलंच कस..?”

माई- “हम्म यालाच म्हणतात उलटा चोर कोतवाल को डाटे …….

म्हणजे तुम्हीच नासवा आणि तुम्हीच इचार!”

म्हण एवढं बिल कस आलं…!”

संयुला लाईटबील बघायचं असत. प्रगती माईकडून लाईटबील मागते..

माई “-हम्म.. आता तुला काय कळायचं यातलं? विकास एव्हडा शिकलेला असून त्याला कळंना..!”

प्रगती-“माई एकदा बघू तर!”

माई-“ हे घे धर लाव तुझं डोस्क !

प्रगती- “माई ,अहो हे एका महिन्याचं नाही.. लॉकडाऊन  सुरु झाल्यापासूनच आहे...!”

           सकाळी सकाळी माईंचा पारा चढला होता त्यामुळं आता जर का संयु त्यांना काही सांगायला गेली तर घरात महायुद्ध होणं बाकी होत .. परिस्थितीचा विचार करून संयुने माईंना आता काही न सांगेनच योग्य राहील असा विचार करून  तिथून  काढता पाय घेतला..

             आज पासून संयुला शेतात प्रवीणच्या मदतीसाठी जायचं होत. असं फर्मानच माईसाहेबांनी काढलं होत.. ठरल्याप्रमाणे संयु प्रवीणसोबत  शेतात जायला निघाली ....

शेतात पोहचताच तिला तिच्या एका मैत्रिणीचा साधनांचा कॉल येतो ..... संयु फोन रिसिव्ह करते..

साधना- “अगं काय संयु, किती वेळ झालं मी तुला कॉल करते……… !”

संयु- “अगं गाडी च्या आवाजाने रिंग ऐकूच नाही आली मला !

         बोलना एव्हडा अर्जेंट कॉल का केलास ?”

साधना – “अगं प्रिलिम एक्सामची डेट येईल लवकरच ! अभ्यास सुरु आहे ना तुझा?”

थोडं नाराजीच्या सुरातच संयु म्हणाली...

संयु- “नाही ग! काहीच अभ्यास नाही... पुस्तक पण बघायला भेटली नाहीत इतक्यात!’’

साधना- “वेळ खूप कमी आहे तुझ्याकडे !”

आजपासूनच लाग अभ्यासाला ...!”

बाकी जुजबी गप्पा झाल्यावर संयु फोन ठेवते ...

प्रवीण पण तिथेच उभा होता ... तो त्यांचं सगळं बोलणं ऐकत होता...

प्रवीण-“ कसली परीक्षा आहे ?”

संयु- “अहो मला लग्नाआधी एक परीक्षा द्यायची होती  पण .....

एवढं बोलून संयु मधेच थांबते ....

प्रवीण –“मग आता दे कि ती परीक्षा !”

संयु- “आणि मला नाही वाटत मला एक्साम देता येईल...!

त्यासाठी मला रोज अभ्यास करावा लागेल...”

प्रवीण –“तू शेतात तर रोज येणारच आहेस मग इथंच करायचा अभ्यास !”

           संयूचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता... प्रवीण एवढ्या सहजच हि गोष्ट मान्य करेन असा विचार संयुने स्वप्नातदेखील केला नव्हता...

संयु खूप खुश होते.. पण तेवढ्यात तिच्या मनात माईंचा विचार येतो... आधीच तिने माईंना तिच्या शिक्षणाबाबत काही सांगितले नव्हते आणि आता हे दुसरं खोटं....

अचानक  तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झालेला बघून प्रवीण पण चिंतातुर होतो...

प्रवीण-“का ग काय झालं?”

काय विचार करते आता?”

संयु-“ माईंचा विचार करते..!

त्यांना कळलं तर...”

प्रवीण- “माई काय शेतात येत नाहीत.. त्यामुळं तुला इथं काहीच अडचण येणार नाही.. तू अगदी निर्धास्त रहा !”

संयु- ‘‘पण त्यांना खरं काय ते सांगायला हवं !’’

प्रवीण –“हो सगळं सांगायचं पण आताच नको...!”

आता तू फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं..!”

           संयुला अभ्यासासाठी पुस्तके घेणं महत्वाचं होत आणि त्यासाठी तिला शहरात जावं लागणार होत

शेतातली काम उरकता उरकता प्रवीण हाच विचार करत असतो कि काय कारण काढून शहरात जावं...

त्याला एकट्याला जायचं असत तर काही अडचण नव्हती पण संयुला पण सोबत घेऊन जाण महत्वाचं होत...