साथ दे तू मला -भाग 4

SANYUCHI SWAPNE PURN KRNYASATHI PRAVIN SATH DEIL KA TILA?

               लग्नाआधी तर प्रवीणने संयोगिताला पाहिले देखील नव्हते . पण त्याला त्याच्या माईच्या निवडीवर पूर्ण विश्वास होता. उंच, सडपातळ बांधा, गव्हाळ वर्ण, मोठे टपोरे डोळे,नाजूक ओठ आणि लांबसडक केस अशा आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या संयुला लग्नात पहिल्यांदा बघताक्षणीच प्रवीण तिच्या प्रेमात पडला होता. लग्न करून ती जशी घरी आली तसे रोज तिच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू प्रवीणला कळू लागले होते. संयु त्याच्याशी जास्त बोलत नव्हती पण न बोलताच तिच्या मनातलं सगळं त्याला तिचे डोळेच बोलून दाखवत होते. 

        काल माईंनी जेव्हा संयुला स्वयंपाक करायला सांगितलं तेव्हा ती कमालीची अस्वस्थ झाली होती. ती रूममध्ये आली तेव्हा प्रवीणही रुममध्येच होता. त्याला तिच्या मनाची घालमेल कळली. संयु युट्युबवर रेसिपी बघत होती,पण मोबाईल वर रेसिपी बघणे आणि प्रत्यक्षात स्वयंपाक करणे यात खूप फरक असतो हे तिलाही जाणवत होते.

प्रवीण - "अगं संयोगिता, तू रात्री स्वयंपाकात काय बनवणार आहेस ते मलाही बघायचे आहे ! आणि तसही माई आता लगेच काय खाली येणार नाहीत तेव्हा आपण लगेच तयारीला लागू !"

आणि दोघांनी सगळी तयारी केली. प्रवीणला तर सगळा स्वयंपाक येतच होता.त्याने तिला तिखट मिठाचे पण नेमके प्रमाण आधीच काढून दिले होते. पुऱ्या बनवताना प्रगती संयुच्या मदतीला आली आणि स्वयंपाक देखील उत्कृष्ट झाला आणि संयुच्या मनावरचा ताणदेखील त्या दिवसापुरता गेला.

पण त्यादिवशी पुऱ्या तळताना ,

प्रगती-  "दादा, तुला तर सगळा स्वयंपाक येतो कि मग तू वहिनीकडून काय शिकायला आलास?"

प्रवीणची चोरी पकडली गेली होती आणि संयुदेखील आश्चर्यचकित झाली. संयूला कळले कि काही न बोलताही प्रवीणला तिच्या मनातलं सगळं कळत होतं !

प्रगती गेल्यावर संयु प्रवीणला म्हणाली, “आजचा स्वयंपाक करणे हि माझ्यासाठी एक परीक्षा होती, तुम्ही मला मदत नको करायला होती!”

 त्यावर

प्रवीण- "तू आणि मी काही वेगळे नाहीत,त्यामुळे तुझी परीक्षा हि माझी पण परीक्षा असणार. आपले लग्न झाले तेव्हाच आपण एक झालोत त्यामुळे आता तू स्वतःला एकटं समजू नकोस !" 

प्रवीणला हे समजले होते कि संयूला स्वयंपाक येत नाही. आता त्यालाच तिची शिकवणी घ्यावी लागणार होती.

संयूलाही हळूहळू प्रवीण आता समजायला लागला होता.

संयु-" मला स्वयंपाक येत नाही हे कळल्यावर तुम्हाला माझा राग नाही आला का?" तुम्हाला असं वाटलं नाही का कि मी आणि माझ्या भावाने तुम्हाला फसवले आहे?"

प्रवीण-"नाही ! मला राग नाही आला ! आणि राहिला प्रश्न फसवण्याचा तर तुझ्या भावाने मला फसवलं नाही. माझी पण एक बहीण आहे म्हणून मी पण समजू शकतो कि एका भावासाठी त्याच्या बहिणीचे  सुख किती महत्वाचे असते. मला पण वाटते माझ्या बहिणीचे प्रगतीचे लग्न एका चांगल्या घरात व्हावे. ती नेहमी सुखात राहावी. कदाचित त्यावेळची परिस्थितीच तशी असेल म्हणून तुमच्या भावाने हा निर्णय घेतला असेल !

संयूला प्रवीणचे म्हणणे पटले होते.

विकास - "माई मला बोलवलं का तू?"

माई- "व्हय, तू घरखर्चाला पैसे नाही दिले ह्या महिन्यात !"

विकास- " अगं माई पगारच नाही झाला , पगार झाला कि देतो ना !"

माई- "पर आठवणीने दे, तेव्हडाच तुझ्या दादाचा भार हलका होईल !"

    विकास आणि माधुरीला नवी गाडी घ्यायची असते.

माधुरी- "आता गणपतीमध्ये बघाना काही ऑफर असतील तर यंदा तरी आपण नवी गाडी घेऊ !"

विकास- "अगं बाई, आधीच या करोनामुळ पगार होतोय का नाही याची गेरंटी नाही... आणि माईंनी पण घरखर्चाला पैसे मागितले ते पण दिले नाहीत मी !

त्यात नवी गाडी आणली तर माईला वाटायचं माझ्याकडं लै पैसे हाय !"

माधुरी- "काहीही करा पण नवी गाडी घ्याच तुम्ही!"

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच........

माधुरी- "माई.... लवकर  सगळ्यांनी बाहेर या....!

यांची गाडी नाहीये बाहेर ! कोणीतरी घेऊन गेलं !

आता आपण काय करायचं?"

विकास- "मी आता कामावर कसा जाणार?"

प्रवीण -" अरे विकास तू टेन्शन नको घेऊ ! होईल काहीतरी !"

माई- "पण अशी कशी नेली कुणी ! किल्ली कुठं ठेवली होती गाडीची?"

विकास-" हे काय इथंच तर ठेवली होती दाराच्या मागे !"

माधुरी- "पण तिथं किल्ली नाहीये आता!"

 संयु - "पण मग चोराने घरात घुसून किल्ली घेतली असेल तर घरातल्या बाकीच्या वस्तू पण तर चोरीला गेल्या असत्या! हे असं कस शक्य आहे?"

माई- "तू कुठं बाहेर गाडीची किल्ली विसरला होतास का?"

विकास- "नाही ग माई!"

संयु- "जर चोरांनी घराच्या पार्किंगमधून गाडी नेली असलं तर गाडी चालू करताना आवाज पण ऐकू आला नाही!"

माई-"अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ!"

संयु- आपण ताबडतोब पोलिसात तक्रार करू! त्या गाडीचा गैरवापरदेखील होऊ शकतो!

          माधुरी आणि विकास पोलिसांचे नाव घेताच घाबरतात. न एकमेकांकडे बघतात. माधुरी तर पुरतीच घाबरली असते आणि रडकुंडीला आलेली असते!

माधुरी-"पप... पुलिस.... पोलीस कशाला?"

          सगळे माधुरीकडे बघतात. विकास तर डोक्यालाच हात लावतो.. तिला नजरेनेच खुणावून तोंड बंद ठेवायला सांगतो.

माधुरी- म्हणजे मला म्हणायचं होतं कि आता यात पोलीस काय करणार... ते थोडीना आपली गेलेली गाडी परत आणून देणारेत....!

संयु- "आपल्याला यात पोलिसांची मदत घ्यावीच लागणार आहे!"

प्रवीण-" पण पोलीस आपल्यालाच चार गोष्टी ऐकवतील !"

संयु-"भाऊजी, गाडी कोणाच्या नावावर आहे?"

विकास-" माझ्याच नावावर आहे, पण कागदपत्रे गाडीतच होती !गेली ती पण ! "

माई-" सुनबाई तू यात लक्ष देऊ नकोस! आपल्या घरच्यांनी आतापर्यन्त पोलीस स्टेशनची पायरी पण चढली नाही आणि चढणार पण नाही!"

 "तेव्हा हा विषय इथंच संपला... "

" तू जा जरा प्रवीण ला शेतात मदत कर!"

प्रवीण आणि संयु शेतात जातात. संयु आज पहिल्यांदाच बाईकवर प्रवीणसोबत चालली असते. प्रवीण तर खूप खुश असतो. पण संयुच्या डोक्यात गाडीच्या चोरीचा विषय फिरत असतो.

मैना तर खूप टेन्शन आलेलं असत. एवढी मोठी चोरी झाली हे नुकसान आता कस भरून काढायचं?

शेतावर पोहचल्यावर संयु प्रवीणला म्हणते , "अहो, आपण जवळच्या RTO  ऑफिसला जाऊन तरी बघूया का?"

प्रवीण- "तुम्हाला तर बरीच माहिती आहे कि!"

संयु काहीच बोलत नाही.

प्रवीण - "ठीक आहे शेतातलं काम उरकलं कि जाऊया!"

शेतातली काम उरकायला बराच उशीर झाला...त्यामुळं त्याचं जाण काही झालं नाही.. संयु आणि प्रवीण  संध्याकाळी घरी येतात.

प्रवीणच्या हाताला थोड्या जखमा झाल्या होत्या. संयुला ते पाहवत नाही ती त्याला मलम लावते..

संयुला आपली काळजी वाटतेय हि भावना प्रवीणच्या सगळ्या वेदना दूर करते...

           दोन दिवसांनी संयु प्रवीण बरोबर RTO  ऑफिस ला जाते..त्यांना कळत कि गाडी दुसऱ्याच कोणी शिंदेच्या नावावर आहे. दोघेही शॉक होतात. ते शिंदेंचा फोन नंबर मिळवतात. आणि प्रवीण त्यांना फोन करतो.

प्रवीण-" हा शिंदे पी. एस. यांचा नंबर आहे का?"

शिंदे -"हो बोलतोय !"

प्रवीण गाडीचा नंबर सांगतो...

प्रवीण-" हि गाडी तुम्ही कधी घेतली?"

शिंदे- "झाले दोन महिने ! पण ताब्यात कालच मिळाली ! हि गाडी मी विकासकडून सेकंड हॅन्ड खरेदी केली...!

प्रवीण आणि संयु शॉक झाले होते.त्यांना कळलं होत कि विकास आणि माधुरी दोघे खोटं बोलतात.

संयु-"हे सगळं खोटं असलं तर बरं होईल ! जर माईंना हे सगळं कळलं तर त्यांना अजिबात सहन होणार नाही ! "

काय प्रवीण आणि संयु घरी सगळ्यांना विकास आणि माधुरीचं सत्य सांगतील का?

🎭 Series Post

View all