साथ दे तू मला..

साथ दे तू मला..

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
पहिली फेरी :- लघुकथा
कथेचे नाव :- साथ दे तू मला..


“मैथिली, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.”

त्याच्या शब्दांनी ती व्यथित झाली.

“अरे पण का? तुझं माझ्यावर प्रेम नाही? की आता तुला माझा कंटाळा आलाय? की दुसरी कोणी आवडलीय तुला? सांग ना.”

“नाही गं. तसं काही नाही. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.”

“का? काय झालं? तुझ्या घरच्यांना माझा प्रॉब्लेम आहे का?”

मैथिली डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

“नाही, घरी काहीच प्रॉब्लेम नाही. आईला तू पसंत आहेस.”

अनिकेत अगदी कळवळून म्हणाला.

“अरे राजा, जर आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुझ्या आईला, घरच्यांना मी पसंत आहे आणि माझ्या आईबाबांना तू.. मग प्रॉब्लेम कुठेय? सांग ना? अँनी, मला फार टेन्शन येतंय रे! असा नको ना वागू? मी खरंच तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत. ”

मैथिलीच्या डोळ्यातलं तळं रितं होऊ लागलं. तिचे पाण्याने डबडबलेले डोळे पाहून अनिकेतला गलबलून आलं. त्याने पटकन आपली नजर उधाणलेल्या समुद्राच्या दिशेने फिरवली. सूर्य केशरी रंगाची उधळण करत निघाला होता. सोनेरी किरणे समुद्राच्या पाण्यावर पसरली होती. आणि त्याच्या मनाचे वारू भूतकाळाच्या दिशेने चौफेर उधळले जाऊ लागले. उन्हातान्हात कष्ट करणारी त्याची आई नजरेसमोर येऊ लागली. तिच्या आठवणीने अनिकेतच्या डोळ्यांत पाणी दाटू लागलं.

अनिकेत एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. त्याच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे बाबा अकस्मात हे जग सोडून गेले. वडिलांच्या माघारी त्याच्या आईने एकटीने मोठ्या हिंमतीने संसाराचा गाडा ओढला. मोठ्या कष्टाने मुलाला शिकवलं, मोठं केलं. समाजात उठण्या-बसण्यायोग्य बनवलं. अनिकेतला लहानपणापासूनच घरच्या परिस्थितीची जाणीव झाली होती. छोट्या मोठ्या अर्धवेळ नोकऱ्या करून त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि आज तो एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम पाहत होता. उंचपुरा, व्यायामाने कमावलेलं पिळदार शरीर, हसमुख प्रसन्न चेहरा, सावळा रंग, धारदार नाक, ओठांवर मिशीची छान महिरप. ऑफिसमधल्या बऱ्याच मुली त्याच्यावर फिदा असायच्या पण अनिकेत मात्र त्यांच्याकडे पहातही नसे. अनिकेत कामात अत्यंत हुशार, कंपनीने अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर त्याची निवड केली होती आणि त्यानेही जीवतोड मेहनत करून यश संपादन केलं होतं. त्यामुळे फार कमी अवधीत अनिकेत साऱ्या वरिष्ठ लोकांच्या गळ्यातला ताईत बनला होता.

चार वर्षांपूर्वी त्याच्याच कंपनीत मैथिलीची मार्केटिंग हेड म्हणून निवड झाली. मैथिली दिसायला अतिशय देखणी, बिनधास्त स्वभावाची, मनात जे असेल तर निडरपणे बोलून दाखवणारी, केतकीच्या रंगाची, चाफेकळी नाक, गुलाबी ओठ, पाणीदार डोळे. तिच्या डोळ्यात त्याला नेहमीच एक वेगळा स्पार्क दिसायचा. तिच्या चालण्याबोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास झळकायचा. खरंतर पाहता क्षणी कोणालाही आवडावी अशीच होती ती. मार्केटिंग हेड म्हणून काम करताना तिची अनिकेतशी ओळख झाली. त्यानंतर हळूहळू दोघांत घट्ट मैत्री झाली. रोज ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्तही फोनवर एकमेकांशी बोलणं होऊ लागलं. ऑफिसमध्ये, ऑफिसच्या बाहेर गाठीभेटी वाढल्या. एकमेकांबद्दल जिव्हाळा, ओढ वाटू लागली. मैथिलीला अनिकेत आणि अनिकेतला मैथिली मनापासून आवडू लागली. आणि मग या निर्मळ मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांचं त्यांनाच समजलं नाही. प्रेमात अनिकेतला विचारण्याचा पुढाकारही मैथिलीनेच घेतला होता.

दिवस छान सरत होते. आता त्यांच्या सुंदर नात्याला जवळजवळ चार वर्ष उलटून गेली होती. दोघांत खूप छान नातं फुलत होतं. भावी आयुष्याचा जोडीदार म्हणून मैथिलीच्या मनाने आधीच अनिकेतची निवड केली होती. फक्त लग्नाच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती आणि तो योग लवकरच चालून आला.

एक दिवस मैथिली आणि अनिकेत समुद्र किनारी फिरायला आले होते. दोघेजण समुद्रकिनारी निवांत बसले होते. इतक्यात मैथिलीने लग्नाचा विषय काढला.

“अँनी, बघ ना, आपल्या नात्याला जवळपास चार वर्ष उलटून गेली रे.. किती भरकन दिवस निघून गेले ना? बरं मला सांग, तू पुढे काय विचार केलायस?”

“कसला विचार?”

अस्ताला जाण्याऱ्या सूर्याकडे पाहत अनिकेतने प्रतिप्रश्न केला.

“अरे आपल्या पुढच्या आयुष्याचा, आपल्या भविष्याचा.”

“म्हणजे?”

“आपण लग्न कधी करायचं अँनी?”

लग्नाचा विषय काढताच अनिकेतचा चेहरा पडला.

“काय झालं अँनी? लग्नाचं नाव काढताच असा का उदास झालास? मी माझ्या घरी तुझ्याबद्दल आधीच सांगितलं होतं त्यामुळे माझ्या घरातून सारखी आपल्या लग्नाबद्दल विचारणा होऊ लागलीय. काय सांगू मी?”

मैथिली त्रासिक मुद्रा करत म्हणाली.

“नाही मैथिली, मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही.”

“अरे पण का? आज मला तुझ्याकडून तू लग्न का करणार नाहीस ते कळलंच पाहिजे. कारण ऐकल्याशिवाय मी तुला सोडणारच नाही. सांग मला काय कारण आहे?”

“मैथिली, त्यामागचं कारण फार भयानक आहे. नको नं हट्ट करू यार..”

“नाही, सांग मला ऐकायचं.”

अखेर अनिकेतचा नाईलाज झाला आणि त्याने सांगायला सुरुवात केली.

“मैथिली, मी कॉलेजला असतानाची गोष्ट. मी शेवटच्या वर्षाला होतो. लास्ट इयरच्या परीक्षा झाल्या. सुट्ट्या लागणार होत्या. सर्वजण म्हणाले की, आपण परत कधी भेटू माहित नाही. सर्वजण मिळून कुठेतरी फिरायला जाऊ. आढेवेढे घेत नाही, हो करता करता अखेर मी ट्रिपला जायला तयार झालो. आम्ही सर्व मित्रमैत्रिणी श्रीवर्धनला फिरायला गेलो. मित्राची मोठी कार होती. आम्ही पाच सहाजण आरामात बसू शकत होतो. खरं सांगू मैथिली! ट्रिप इतकी छान झाली होती की ती ट्रिप मी कधीच विसरू शकलो नाही. आम्ही खूप धमाल केली होती. दोन दिवसांनी परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीची वेळ होती. सर्वत्र अंधार पसरला होता. आणि मध्येच पावसाची रिमझिम सुरू झाली. वळणावळणाचा नागमोडी रस्ता.. त्यात वाट निसरडी झाली होती. अचानक काय झालं कोणास ठाऊक! आम्हाला काही समजण्याच्या आत समोरून भरधाव वेगाने एक ट्रक येऊन आमच्या कारवर आदळला आणि आमची कार कोलंट्या उड्या घेत रस्त्याच्या बाजूला छोट्या दरीत जाऊन कोसळली. एक आर्त किंकाळी! रक्ताचा सडा..”

“ओह्ह माय गॉड! मग रे, पुढे काय झालं?”

मैथिलीच्या चेहऱ्यावर भीती आणि वेदना पसरली. अनिकेत पुढे सांगू लागला.

“रात्रीची वेळ असल्याने रहदारीही कमी होती. आम्ही तसेच गाडीत अडकलो होतो. पुढच्या सीटवर बसलो होतो त्यामुळे मला आणि ड्राईव्हरच्या सीटवर बसलेल्या माझ्या मित्राला बराच मार लागला होता. तो आणि मी जागीच बेशुद्ध झालो. सारे जण वेदनेने विव्हळत होते. बऱ्याच वेळाने तिथे वाहतूक पोलिसांची गाडी आली. आणि कोसळलेल्या अवस्थेत असलेली गाडी त्यांना दिसली. त्यांनी पटकन अँब्युलन्स बोलवून आम्हाला तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आमच्यावर उपचार सुरू केले. पोलिसांनी आमच्या बॅगेत सापडलेल्या ओळखपत्रावरून सर्वांच्या घरच्यांना कळवलं तसे सर्वजण लगेच हॉस्पिटलमध्ये हजर झाले. सारे घाबरून गेले होते. या अपघातात माझा जवळचे दोन मित्र जागीच दगावले होते. मला खूप वाईट वाटत होतं.”

अनिकेत दीर्घ श्वास घेत म्हणाला,

“मैथिली, जवळ जवळ एक आठवडाभर मी बेशुद्ध होतो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा समोर आई रडत उभी होती. दोन महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर मी बरा झालो आणि घरी आलो. डॉक्टरांनी परत पंधरा दिवसांनी मला फॉलोअपसाठी बोलवलं होतं म्हणून मी चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मग त्यानंतर मला जे समजलं त्याने मी पुरता हादरून गेलो. डॉक्टरांनी मला असं काही सांगितलं की मी पूर्णपणे कोसळलो गं. जगणं नकोसं वाटू लागलं पण फक्त आईसाठी जिवंत राहिलो गं. नाहीतर कधीच..”

“अँनी, प्लिज असं बोलू नकोस रे. डॉक्टरांनी तूला काय सांगितलं की तू इतका मुळासकट उन्मळून पडलास?”

“मैथिली, मी त्या अपघातात वाचलो खरा; पण तो अपघात इतका भयानक होता की मला खूप मोठी शारीरिक इजा झाली. त्यामुळे मी कधीच बाबा होऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं.”

तो लहानमुलांसारखा तिच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागला. मैथिली त्याच्या केसांवरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होती. त्याचा रडण्याचा आवेग ओसरल्यावर तो उठून बसला आणि पुन्हा बोलू लागला.

“आता तूच सांग शोना, मी तुझ्याशी कसं लग्न करू? तुझं आयुष्य कसं उध्वस्त करू? मी कधीच बाबा होणार नाही. मी तुला कधीच मातृत्वाचं सुख देऊ शकणार नाही. तूझ्या मानसिक, शारीरिक कोणत्याच गरजा पूर्ण करू शकणार नाही.”

अनिकेत अजूनही रडत होता. मैथिली शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली,

“अँनी, माझ्याशी लग्न न करण्याचं फक्त हेच कारण आहे? यासाठी तू माझ्याशी लग्न करणार नाहीस?”

त्याने खजिल होऊन खाली मान घातली.

“अँनी, एक सांगशील? शारीरिकदृष्टया मूल जन्मास घालण्यास असमर्थ असलेले लोक लग्न करत नाहीत? त्या भीषण अपघातात तुला इजा झाली आणि तू कधीही बाबा होणार नाही म्हणून तुला दुःख वाटतंय आणि समज तुझ्या जागी मी असते तर मला तू सोडून दिलं असतंस? नाही ना?”

अनिकेतने नकारार्थी मान हलवली. मैथिली त्याचा हात हातात घेत म्हणाली,

“अँनी, जे वैवाहिक सुख मला तू देऊ शकत नाहीस असं म्हणतोयस, त्या वैवाहिक सुखाची नेमकी व्याख्या काय रे? शरीराच्या गरजा खरंच इतक्या महत्वाच्या? सांगशील मला? अँनी, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मग ते तुझ्या फक्त दिसण्यावरच आहे? तुला काय वाटलं, प्रेम फक्त दिसण्यावर, सौन्दर्यावर, या हाडामासांच्या शरीरावर असतं? नाही रे राजा, माझं तुझ्यावर, तुझ्या निरागस मनावर प्रेम आहे. एकमेकांना गुणादोषासकट स्विकारल्यानंतर शरीर दुय्यम ठरत नाही का? तू मला बाळ देऊ शकणार नाही. म्हणून काय झालं? आपण कधीच आईबाबा होऊ शकणार नाही? नक्कीच होऊ.. कदाचित एक दिवस चमत्कार घडेल आणि कोण्या एका अनाथ बाळाचे आईबाबा होण्याचं भाग्य आपल्याला मिळेल. त्याचं चांगलं भविष्य आपल्या हातून घडेल.”

अनिकेत तिचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाला. मैथिलीने त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याच्या कुशीत शिरत ती म्हणाली,

“अँनी, मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय. आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करेन. तुला मी माझ्या आयुष्याचा जोडीदार कधीच मानलाय; आता सात जन्म तुझी माझ्या तावडीतून सुटका नाही बरं. आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलंय मी तुला. मग तुझा हात मी असा कसा सोडून जाऊ? आयुष्यभर तुलाच साथ देईन. समजलं?”

अनिकेत अवाक होऊन मैथिलीकडे पाहत होता. त्याच्या सोलमेटने त्याचा हात घट्ट धरला होता कधीही न सोडून जाण्यासाठी. आयुष्यभर त्याला साथ देण्यासाठी..

समाप्त
© निशा थोरे (अनुप्रिया