सासूसून

Sasusoon

सासूसून

सासू डोसे(दोसे) करताना

सुनबाई(प्रकार 1): माझी आई इतके छान डोसे बनवतेना..अगदी उडपी हॉटेलात मिळतात तस्से..कुरकुरीत.

सासूबाई(प्रकार 1): (स्वगत) जेव्हा बघावं तेव्हा म्माज्जी आई म्माजी आई. जसं काय हिची आई फायस्टार हॉटेलची शेफच. किती त्या बाता. बोलबच्चन नुसती. ठाऊकै महिन्यापुर्वी गेलो होतो तेव्हा फ्रिजमधल्या थंडगार पीठाच्या रबरी चपात्या खाऊ घातल्या होत्या.
-----------------------

सासुबाई प्रकार दोन(आक्रमण): हो क्का. एवढी तुझी तुझी आई सुगरण तर तुला का येत नाही गं डोसे काढायला. 
तुला नि तुझ्या नवऱ्याला मी काढून देते तेव्हा गिळता नि कौतुक आईचं. स्वतः करायला शीक मग मार अशा गमजा.

सूनबाई(प्रकार 2): मी फक्त माझी आई डोसे छान करते बोलली तर तुम्हाला कशाला इतकं झोंबलं. खरं ते बोलली आणि मी करेन हो माझे माझे नि खाईन. तुम्ही फक्त तुमच्या बाळराजापुरते करा. बाब्बू करुन ठेवलाय नुसता. काडीची ना अक्कल. कसलं ध्यान गळ्यात पडलंय. गबाळा नुसता.

सासूबाई: हो हो तु मोठी पद्मिनी लागून गेलीस नं. माझ्या मुलाला काय बोलायचं नै सांगून ठेवते बरं.

सूनबाई(दात काढत): मी माझ्या नवऱ्याला बोलतेय.

सासूबाई: तुझा नवरा असला तरी आधी माझा मुलगाय तो.

सूनबाई: थांबा त्यालाच विचारते..तो कुणाचा ते.

ओमी: ओमी तू कुणाचा? माझा की ह्यांचा.
(ओमी गाऊनमधल्या बायकोला नि साडीचा पदर कंबरेला खोचलेल्या आईकडे बघतो नि )
ओमी: अरे बाप रे. माझी मिटींग होती साडेआठची. विसरलोच होतो. मी जातो. तुमचं चालूदे.

सासूबाई: शेळपट कुठचा!

सूनबाई: हो ना,नैतर काय. सगळा भांडणाचा मुड घालवलान. चला डोसे खाऊया. मी कैरीची चटणी केलीय. चटकमटक.

सासूबाई: अगं हो गं,तुमच्याकडची चटणी मस्तच लागते. ओल्या नारळाची विथ लसूण,हिरवी मिरची.
-----------------------

सूनबाई(प्रकार 3): आई,किती छान डोसे बनवता हो. अगदी तांबुससोनेरी..परफेक्ट क्रिस्पी.

सासूबाई(प्रकार 3): घे गं अजून एक. खा पटापट. मी आणते चटाचट. अजून चटणी घे हो थोडीशी. आणि सांबार घे.

सूनबाई: आई,सांबार तर लाजबाब. आई, मला का नाही येत हो तुमच्यासारखे डोसे करता?

सासूबाई: ये इथे. बघ..हे मी तापल्या तव्यावर चमचाभर डोस्याचं ब्याटर टाकेन..तू असं समज की तुझी आठ दहाची लोकल तीन नंबर प्लेटफॉर्मवर आलेय नि तू वर ब्रीजवर..भरभर वेगाने जीना उतरतेस अगदी तसा. डोशाचं पीठ पळीभर घालून फुलस्पीडमधे गोलगोल हात फिरवायचा. हाय काय नि नाय काय.

सूनबाई(पीठ तापत्या तव्यावर घालते,सासूच्या सल्ल्यानुसार हात सटासटा गोलाकार फिरवते आणि दोन सेकंदात ढोसा आपली कडा सोडू लागतो. अगदी कुरकुरीत सोनेरी डोसा.) अय्या आई खरंच की! किती छान समजवलत. हाय काय नि नाय काय.

-----सौ.गीता गजानन गरुड.