सासूचे माहेरपण (भाग १)

सासूचे तुटलेले माहेर पुन्हा जोडण्यासाठी सुनेचे सुरू असलेले प्रयत्न..


"आई मी काय म्हणते, ह्यावेळी जा की तुम्हीही तुमच्या माहेरी. तसंही आम्ही तर नेहमीच जातो ना प्रत्येक सणाला. तुम्हाला नाही का ओ तुमच्या माहेरची ओढ?"

सहा महिन्यांपूर्वीच लग्न करुन सासरी आलेली माधवी सासूबाईंना आपुलकीने विचारत होती.

"आमचे दिवस गेले ग आता. आणि तसंही आई वडिलांशिवाय माहेरपण ते कसलं ग. नाही इच्छा होत आता जायची."
सासूबाईंनी देखील सारवासारव करतच उत्तर दिले.

"असं नसतं हो आई. आई वडील नसले म्हणून काय झालं? दादा, वहिनी, भाचे मंडळी ही सगळी जीवाभावाची माणसं आपलीच असतात की, आणि तुमच्याकडे एक नाही दोन नाही तर चक्क तीन तीन भाऊ आहेत. कितीही नाही म्हटले तरी भावांच्या प्रेमातच आई वडिलांची ऊब सामावलेली असते. असं नेहमी माझी आई म्हणत असते."

माधवीचे शब्द ऐकून मालती ताईंना क्षणभर भरूनच आले. माहेरच्या आठवणीत त्यांचे डोळे पाणावले. आई वडिलांनी शून्यातून उभा केलेला सारा डोलारा डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागला.पण माधवीला त्या कसं सांगणार होत्या की, तीनही भावांनी काही शुल्लक कारणांवरून त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते.

"आई काय झालं, माझं चुकलं का ओ काही? तुमच्या डोळ्यांत असं पाणी?"
सासूबाईंचा रडवेला चेहरा पाहून माधवी क्षणभर घाबरलीच.

"काही नाही ग, असते एखाद्याचे नशीब. कितीही झोळी भरलेली असली तरी रीतेपणाची सल मनाला बोचत राहते."

सासूबाईंचे असे कोड्यातले बोलणे माधवीला काही समजेना.

"बरं आवर आता पटपट, असंच गप्पा मारत बसलो तर उपवास घडायचा सर्वांना."
डोळ्यातील आसवे पदराने टिपत हसतच मालती ताईंनी विषय बदलला.

दोघी सासू सूनांनी मिळून स्वयंपाक केला नि जेवणं आटोपून आवरुन सावरुन त्या झोपायला गेल्या.

"माधवीच्या डोक्यातून मात्र सासुचे शब्द जाईनात. आई अशा का  बोलल्या असतील? आईंना तीन तीन भाऊ आहेत असे मला मनोजने सांगितले. पण आमचं लग्न झाल्यापासून तर आईंचा एकही भाऊ इकडे फिरकला देखील नाही. की आई देखील कधी माहेरी जाताना दिसल्या नाहीत. त्यांच्या बोलण्यात तर माहेरचा कधीच साधा उल्लेख पण नसतो."

गळ्यातल्या मंगळसुत्राशी चाळा करत माधवी विचारांत इतकी हरवून गेली होती की मनोज रुममध्ये आलेला देखील तिच्या लक्षात आले नाही.

एरव्ही आतुरतेने आपली वाट पाहणारी आपली बायको, रुममध्ये एंट्री केल्याबरोबर तिची बडबड सुरु होते, तुम्हाला आता मी आवडतच नाही, सहाच महिन्यात तुमचे माझ्यावरचे प्रेमच आटले असे नि तसे..सवयीप्रमाणे माधवीचे ते लाडिक प्रेमाचे भांडण आज मात्र मनोज मिस करत होता.

माधवी शून्यात नजर लावून बसली होती. मनोजने अलगद दार बंद केले नी हलकेच जावून माधवीच्या बाजूला तो टेकला. तरीही मॅडमची तंद्री काही तुटेना.

गालावर आलेली तिची केसांची बट हलकेच बाजूला करण्याचा त्याने प्रयत्न करताच मनोजचा तिच्या गालांना स्पर्श झाला नि माधवी भानावर आली.

" अहो हे काय करताय? केव्हा आलात तुम्ही.?"

"जेव्हा तुझी ही अघोरी तपश्चर्या सुरु होती तेव्हा." गमतीच्या सुरात मनोज उत्तरला.

"काहीही काय?"

" मग काय बोलू आता? मी जोरात दार बंद केले, तुझ्या शेजारी येवून बसलो, बेडचा आवाज झाला, तरीही तुझे तप सुरूच होते. मी सोडून अजूनही तुझ्याकडे इतका खोल विचार करण्यासारखे विषय आहेत म्हणायचं?

"असं काही नाहीये ओ."

क्रमशः

©® कविता सुयोग वायकर
(जलद कथामालिका लेखन स्पर्धा)

🎭 Series Post

View all