सासूचं बाळ.. अंतिम भाग

आईच्या अतिप्रेमाचा सुनेला होणारा त्रास
सासूचे बाळ... नको रे बाबा.. भाग ३


त्या दिवशी संध्याकाळी सानिका लवकर घरी आली.. तिने घरीच मस्त असे कँडल लाईट डिनर प्लॅन केले होते.. सौरभ येईपर्यंत सगळी तयारी करून झाली होती..सुंदरशी काळ्या रंगाची साडी.. मोकळे सोडलेले केस, जाणवेल न जाणवेल असा मेकअप.. हे पाहूनच सौरभ फ्लॅट झाला.. सानिकाने त्याचे आवरून होईपर्यंत टेबलवर चहा नाश्ता मांडून ठेवला होता.. एका डिशमध्ये वडे, दुसर्‍या डिशमध्ये ढोकळा.. ढोकळा बघून सौरभने नाक मुरडले..
"मला नाही आवडत ढोकळा.."
" पण मला आवडतो ना.."
" मग तूच खा.. मी नाही खाणार.." सौरभ तोंड फुगवून म्हणाला..
" अरे बापरे , एक बाळ चिडले वाटते.. आता बाबाच असा चिडायला लागला तर बाळाने आणि त्याच्या आईने काय करायचे?" चेहरा निरागस ठेवत सानिकाने विचारले..
" काय म्हणालीस?"
" मी म्हटले.. बाबाच जर सतत हट्ट करत असेल तर बाळाचे हट्ट कोणी पुरवायचे.."
ते ऐकून सौरभने सानिकाला उचलून घेतले.. "बाबा हट्ट करायला लहान नाहीये आता.. आता फक्त तुम्ही दोघांनी हट्ट करायचे आणि मी पुरवणार.." सानिकाने लाजून सौरभच्या खांद्यावर डोके ठेवले..
आठ दिवसानंतर वृंदाताई आणि सुधाकरराव मस्त ताजेतवाने होऊन आले.. रात्री उशीरा आल्यामुळे येताच झोपायला गेले.. दुसर्‍या दिवशी सकाळी एका बाजूला वृंदाताईंची पूजा सुरू होती.. तर सुधाकरराव सकाळची फेरी मारायला गेले होते. वृंदाताईंचा एक कान सौरभकडे होता..
" दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी..
सौरभ चहा घेतलास का?"
" हो आई.." स्वयंपाकघरातून आवाज आला..
"अनाथ नाथे अंबे करूणा विस्तारी..
सानिका कुठे गेली?"
"आई पूजा करून घे.. नंतर बोलू.."
कशीतरी वृंदाताईंनी पूजा संपवली तोवर सुधाकररावही आले..
" काय ग सानिका, चार दिवस आम्ही नव्हतो तर माझ्या मुलाला कामाला लावलेस?" वृंदाताई चिडून म्हणाल्या.. "किती लाडाकोडात वाढवले आहे आम्ही त्याला.. इकडची काडी कधी तिकडे करू दिली नाही.. आणि तू.."
" आई जरा शांत होतेस का आता? तिने मला कामाला लावले नाही.. आणि आता माझे लाड करण्याऐवजी येणाऱ्या नातवंडाच्या लाडाची तयारी कर.."
" काय? कसली गोड बातमी.. तुला काय खावेसे वाटते? मळमळत तर नाही ना? तू बाई आरामच कर.. इकडची काडी तिकडे करू नकोस.. डॉक्टरकडे जाऊन आलीस का?"
वृंदाताईंची सरबत्ती सुरू झाली...

आता सानिकाला वेगळेच टेन्शन आले.. तिच्या सासूचे बाळ तिने सुधारले, आता तिचे बाळ बिघडले तर कोण सुधारणार?


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all