Jan 19, 2021
सामाजिक

सासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही

Read Later
सासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही

सासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही!

आम्ही मैत्रिणी एकत्र जमलो होतो. असंच जरा गप्पागोष्टी. शालू,मंजू,राणू व मी असा आमचा कॉलेजपासूनचा ग्रुप. वर्षातून चारेक वेळा तरी आम्ही भेटतोच. जाम मजा येते. अशा जीवाभावाच्या मैत्रिणींना भेटून एक सकारात्मक उर्जा मिळते. 

मंजूने आमच्या पुढ्यात पेढ्याचा बॉक्स धरला. आम्ही पेढे घेत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
"ए मंजे,कसले गं पेढे? नवीन घरबीर घेतलस की काय?"
"ते तर घेऊच. बरं का मैत्रिणींनो माझ्या शशांकला नोकरी लागली बजाजमधे. त्याच्या यशाचे पेढे हो."

आम्ही सर्वांनी मंजीचं अभिनंदन केलं व सेलिब्रेशन म्हणून केकही कट केला.

 मंजी मला म्हणाली," सावी,तुझ्या बऱ्याच ओळखी आहेत नं. तू लग्न जमवतेस इतकी वर्ष. माझ्या शशांकसाठीही बघ एखादं स्थळ."

मी तिला म्हंटलं,"मंजे तुझ्या मुलाच्या चांगल्या व वाईट दोन्ही सवयी सांग बरं मला."

"चांगल्या म्हणजे बघ..निरव्यसनी आहे माझा शशी. बीइ,एमबीए डिगरी,मल्टीनेशनल कंपनीत नोकरीला,गोरा वर्ण, उंच,सडपातळ असा."

"बरं त्याला खायला काय आवडतं.?"

"पक्का,गोडू आहे बघ माझा शशी. बासुंदी,आमरस,श्रीखंड,गुळपोळी,खीर असं सगळं मिट्ट गोड आवडतं शशांकला.

"बरं यातलं त्याला स्वतःला काय बनवता येतं?"

"अर्थात काहीच नाही. अगं तुला माहितीय नं इंजिनिअरिंगचा अभ्यास किती असतो. दमून,थकून यायचं पोरगं माझं नंतर एंटरन्स,एमबीएचा अभ्यास..पुढे नोकरीसाठी इंटरव्यूज वगैरे. वेळ तरी कुठे होता त्याला हे सगळं शिकायला पण खायला आवडतं हं."

"बरं घरातली कामं म्हणजे आपली रुम आवरणं,केर काढणं,सिंकमधे भांडी असली तर ती घासणं,वेळ पडल्यास कपडे धुणं."

"अगं ए सावी तू शुद्धीत आहेस नं. एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे माझा शशी. तो गं का ही असली कामं करेल?"

"बरं..बेसिन,बाथरूम,टॉयलेटची साफसफाई."

"त्यासाठी मी आहे नं. मी बरं करु देईन त्याला ही हलकी कामं."

"बरं,मंजे तुझ्या सुनेबद्दलच्या अपेक्षा सांग."

"आता कसं शहाण्यासारखं बोललीस. मघापासून कायच्याकाय बरळत होती ही बया. बरं सांगते हं. मला नं.. मला शोभेल अशी सुनबाई हवी..म्हणजे नाकीडोळी सुंदर,थोडे पिंगट डोळे असले तर अजून उत्तम. जरा मॉडच हवी,ते वेणीचा शेपटाबिपटा नको बाई. शशीसोबत कुठे पार्टीला गेली तर जोडा शोभून दिसला पाहिजे. परमनंट नोकरीवाली हवी. शिवाय तिला उत्तम स्वैंपाक  आला पाहिजे. थोडक्यात सुगरण हवी गं. देवाधर्माचं करणारी हवी. उपासतापास केले पाहिजे तिने निदान मोजके तरी..म्हणजे वटपौर्णिमा,हरतालिका..वगैरे. सणासमारंभाला साडी नेसली पाहिजे. सगळ्यांशी मिळूनमिसळून वागलं पाहिजे. आम्ही कधी अधनंमधनं गेलो तर आमच्याशी गोड बोललं पाहिजे. सासूसासरे दारात दिसल्यावर तोंड फिरवणारी नको हं. निरव्यसनी हवी. खरंच गं आजकालच्या मुली सिगारेट ओढतात,ड्रि़क्स घेतात..कसलं तारतम्य नाही. ते एक बघावं लागेल. अजून एक,बॉयफ्रेंडवाली नको म्हणजे तिचं पास्ट अफेअर थोडक्यात लफडं नसलं पाहिजे नाहीतर काही मुलींचा बॉयफ्रेंड लग्नानंतर पुनश्र भेटतो व सुखी संसारात मीठ कालवतो." 

"मंजे,तुला सून मुलाच्या तोडीसतोड शिकलेली हवी. नोकरी करणारी हवी..पण तिने घरातली सर्व कामं केली पाहिजेत,तिला स्वैंपाक आला पाहिजे बरोबर!"

"अगदी अगदी"

"मग तिने,तिच्या आईने तुझ्या मुलाकडूनही हीच अपेक्षा ठेवली तर बिघडलं कुठे?"

"ते मला माहीत नाही. तू मला माझ्या अपेक्षेनुसार सून शोधून दे."

तितक्यात राणू म्हणाली,"सावी,अजुन दोन वर्षांनी माझी प्रज्ञाही लग्नाला होईल. तिच्यासाठी तुच स्थळ बघायचं बरं."

मग आम्ही गप्पा हाणत पावभाजी खाल्ली.

असेच दोनतीन महिने गेले. मंजू मला अधेमधे फोन करुन मुलीबद्दल विचारायची पण तिला हवी तशी मुलगी भेटणं जरा कठीणच दिसत होतं आणि एकदा मंजूचाच फोन आला,"अगं सावे,काखेत कळसा नि गावाला वळसा तसं झालं बघ. अगं माझ्या मामाच्या मेहुण्याच्या सख्या बहिणीच्या दिराची लेक आहे लग्नाची. आम्ही पाहून आलो मुलगी. लाखात एक आहे. हनुवटीवर बारीक तीळसुद्धा आहे. गोरीपान,पिंगट डोळे नाही पण उतना तो चलता है. आर्किटेक्ट आहे. नामवंत बिल्डरकडे कामाला आहे. आमच्या शशीला आवडली मुलगी."

मी मंजेला शुभेच्छा दिल्या. महिनाभरात लग्न झालं..अगदी थाटामाटात. जोडा शोभून दिसत होता. तमन्ना नाव होतं मुलीचं. मंजी श वरून कोणतं नाव ठेवायचं सुचवू लागली तसं तमन्नाने ठासून सांगितलं की माझं नाव मला फार आवडतं व ते मी बदलू देणार नाही. यावर शशांकही म्हणाला..खरंच छान नाव आहे तुझं. नको बदलायला. मंजीची धुसफूस आम्हा मैत्रिणींना दिसत होती. 

दोन महिन्यांनी आम्ही परत भेटलो. मंजीचा चेहरा उतरला होता. राणूने म्हंटलं,"का गं असा चेहरा पाडून बसलैस? इतकी सुंदर,तुझ्या स्टेटसला साजेशी सून मिळालेय मग चिंता कसली तुला?"

"काय सांगू तुम्हाला..शशांकचं लग्न झाल्यावर पंधराएक दिवस आम्ही त्यांच्यासोबत होतो पण नंतर इअर एंडींग वगैरे म्हणून आम्ही आमच्या कर्मभूमीत गेलो. वाटलं रहातील दोघं लव्हबर्डससारखे पण झालं उलटचं."

"म्हणजे?" राणू बोलली.

"अगं,तमन्नाने फोन केला मला नि असलं झापलन. मला म्हणते कशी..तुमच्या बाळाला पांघरुणाची घडीही मीच घालून द्यायची का? सगळीकडे पसारा करून ठेवतो. तो आवरणार कोण? साधा चहा बनवता येत नाही शशीला कुकर लावणं तर सोडा,कांदाही चिरता येत नाही की पोळी शेकता येत नाही. स्वतःचे कपडेही लाँड्री बेगमधे टाकत नाहीत राजे.  सासूबाई थोडं स्पष्टच बोलते..तुमच्या मुलाला अजिबात शिस्त नाही.
मी म्हंटलं,"अगं शिकेल हळूहळू. तू शिकव त्याला गोडीगुलाबीने. तुझं ऐकेल नक्की" तर म्हणते कशी,"तुमचा मुलगा सत्ताव्वीस वर्षात तुमचं ऐकला नाही आणि आता मी त्याला गोडीगुलाबी लावू म्हणता! किती कचरा करतो घरात. आळशासारखा रहातो नुसता".

 मी म्हंटलं,"अगं लग्न झाल्यावर सुधारतात मुलं."

 यावर म्हणाली,"तुमच्या बाळाला सुधारत बसण्यासाठी मी लग्न नव्हतं केलं. जोडीने संसार करण्याची स्वप्नं रंगवली होती. कधी तो माझ्यासाठी एखादी स्पेशल डिश बनवेल..ते जाऊदे निदान कॉफी तरी बनवेल व मला प्रेमाने देईल असं वाटलं होतं पण कसचं काय तुमचा माठ पडला माझ्या पदरात. " 

मंजू हे सांगून पदराने डोळे पुसू लागली. मी म्हंटलं,"मंजे,वाईट वाटून घेऊ नकोस पण तुझी सून तमन्ना काहीच चुकीचं नाही बोलली. तुम्हाला सुना उच्चशिक्षित, चांगल्या पेकेजची नोकरीवाल्या हव्या पण तुमचा मुलगा मात्र जुन्या परंपरेनुसारच वागणार. अगं पण महाभारतातही भीम बल्लवाचार्य होताच की मग तुझ्या शशीला स्वैंपाक बनवताना लाज कशी वाटते की तू मुद्दामहून वेळेच्या नावाखाली त्याला स्वैंपाक शिकवला नाहीस? 

जसं तमन्ना नोकरी करून घरकाम करते तसंच शशांकनेही नोकरी करुन घरातली कामं ही केलीच पाहिजेत. तमन्नाच काय माझ्याजवळ येणाऱ्या कित्येक मुलींचं मत हेच आहे. सासवांनी सून येणार मग माझ्या लेकाला सुधारणार ही अपेक्षा करणं चूक आहे."

मंजीला माझं म्हणणं पटलं पण आता हातातून वेळ निघून गेली होती व सुनेकडून ओरडा खाण्याशिवाय तिच्याकडे गत्यंतर नव्हतं.

-----सौ.गीता गजानन गरुड.