Login

सासूबाई प्लिज ऐका ना.. भाग ३

सासूबाई प्लिज ऐका ना.. व्यथा एका सुनेची..
सासूबाई, प्लिज ऐका ना.. भाग ३


“अरे पण आईबाबांचं काय? या वयात त्यांना आपली गरज आहे. त्यांना असं एकटं सोडून कसं जायचं?”

शाल्मली काकुळतीला येऊन विचारत होती.

“हे बघ, आपण काही परदेशी जात नाही आहोत. एकाच शहरात आहोत. हाकेच्या अंतरावर.. काही लागलं त्यांना तर एक फोन कॉल केला की आपण इथे पोहचू. आणि सोड विषय तो. आपण लवकरच शिफ्ट होऊ. तू मोजकंच समान पॅक कर. शिफ्टिंगला त्रास नको आणि झोप आता. उद्या माझं ऑफिस आहे.”

असं म्हणत स्वप्नीलने कुस बदलली आणि झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी स्वप्नील ऑफिसला निघुन गेला आणि सासूबाईंच्या सोसायटीमधल्या मैत्रिणी घरी आल्या. सर्वजणी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या. शाल्मलीने सर्वांसाठी कांदापोहे, चहा आणून दिलं. कांदेपोहे खात खात त्यांच्या गप्पा सुरु झाल्या आणि नेमकं त्यांचं ते बोलणं त्यांच्यासाठी पाणी घेऊन येणाऱ्या शाल्मलीच्या कानावर पडलं.शाल्मलीच्या सासूबाई डोळ्याला पदर लावत म्हणत होत्या,

“काय सांगू जानकी, माझा स्वप्नील लग्न झाल्यापासून पार बदलला ग! वेगळं राहायचं म्हणतोय.”

“काय सांगते! असं अचानक? तुला सांगते, आजकालच्या मुली या, यांना एकत्र कुटुंबात राहायचं नसतं. लग्न झाल्यावर लगेच नवऱ्याला घेऊन वेगळं राहायचं असतं. मी सांगते न, तुझ्या सुनेनेच कान भरले असतील.”

जानकी काकू म्हणाल्या. लगेच उमाकाकूं त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या.

“अगदी खरंय पार्वती, आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलांना वाढवायचं आणि यांनी माझा नवरा करत हक्क सांगत यायचं.अग यांना सासुसासरे नकोच असतात ग. आपल्यावेळीस असं नव्हतं बाई..!”

“अग, मी म्हणेन माहेरचं वळण असतं हे. तिकडून शिकून येतात ग.. तू इतके तुझ्या सुनेचे गोडवे गात होतीस पाहिलं ना काय केलं तिने? तुझ्यापासून तुझ्या मुलाला तोडलं.”

जानकीकाकूंनी अजूनच आगीत तेल ओतलं. आता मात्र शाल्मलीला राहवेना. डोळ्यांत पाणी आलं. ती पटकन आत आली.पाण्याचा ट्रे टेबलवर ठेवला. सासूबाई आणि त्यांच्या मैत्रीणीं जरा चपापल्या. शाल्मली सर्वांकडे एक नजर टाकत म्हणाली,

“काय झालं काकू? का थांबलात? बोला न.. पण मग तुमचं बोलून झालं की मलाही माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवीत ते सुद्धा अगदी खरी.. मनापासून”

“आता बोलायला, विचारायला बाकी ठेवलंयस का तू? तरीही बोल, पुन्हा नवऱ्याला जाऊन सांगशील मला सासू छळते. बोलण्याची संधीही देत नाही. बोल बाई बोल तू! आता तुझंच ऐकावं लागेल न सगळं”

सासूबाईंनी मनातला राग ओकून टाकला. इतक्यात शाल्मलीचे सासरे तिथे आले. शाल्मलीने त्यांना आवाज देऊन बोलावून खुर्चीत बसायला सांगितले. शाल्मली शांत स्वरात म्हणाली,

“आई, मी तुम्हां दोघांना माझ्या आईबाबांचा दर्जा दिलाय आणि तो कायम तसाच राहिल. म्हणून सून नाही तर मुलीच्या नात्याने काही प्रश्न विचारतेय. फक्त एकदा शांतपणे विचार करून सांगा.”

तिने बोलायला सुरुवात केली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..