सासूबाई, प्लिज ऐका ना.. भाग १
आज देशमुखांच्या बंगल्यावर जणू आनंदाला उधाण आलं होतं. देशमुखांचा बंगला छान सजला होता. बंगल्याला विद्युत रोषणाई करण्यात आली. कुटुंबातल्या जवळच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना आमंत्रित केलं. पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. टेरिसच्या एका बाजूला मधुर संगीत सुरू होतं. तर दुसऱ्या बाजूला पाहुण्यांसाठी बुफे जेवणाची सोय केली होती. देशमुख आपल्या पत्नीसमवेत स्वतः सर्व पाहुण्यांची सोय पाहत होते.
त्यांच्या लाडक्या एकुलत्या एका लेकीचं, शाल्मलीचं लग्न चार दिवसांवर येऊन ठेपलं होतं. कामात दिरंगाई करून चालणार नव्हतं.
शाल्मली दिसायला अगदी नक्षत्रासारखी, अगदी रूपाची खाण जणू..! तिला पाहताक्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच होती ती.,कायम हसतमुख असणारी, आईवडिलांची लाडकी एकुलती मुलगी. शाल्मली विवाहयोग्य झाली अन आईबाबांना तिच्या लग्नाचे वेध लागले. शाल्मली मुळातच दिसायला देखणी असल्यामुळे स्थळं स्वतःहून सांगून येत होती.
एक दिवस पुण्यात वास्तव्य असणाऱ्या स्वप्नील केळकर या युवकाचं स्थळ सांगून आलं. स्वप्नील दिसायला देखणा, रुबाबदार, चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर आय टी. इंजिनियर म्हणून मोठ्या हुद्यावर. पुण्यात कोथरूड सारख्या उच्चभ्रू सोसायटीत स्वतःचा फ्लॅट, गावाकडे, वडिलोपार्जित गडगंज संपत्ती. आईवडिलांच्या पोटी एकुलता एक मुलगा.. दूषण लावण्यासारखं एकही वाईट गोष्ट शाल्मलीच्या आईबाबांना जाणवली नव्हती. स्वप्नील पहाताक्षणी तिच्या आईबाबांना आवडला होता. आणि खरंतर शाल्मलीला सुद्धा.. मग काय! फार जास्त लांबण न लावता लग्नाची तारीख ठरवण्यात आली.
लग्नाची गडबड सुरू झाली. शाल्मलीचा मेहंदीचा कार्यक्रम बंगल्याच्या टेरिसवर आयोजित केला होता. चार दिवसांनी आपली मुलगी परकी होणार म्हणून एक बापाचं मन व्यथित होत होतं. मोठ्या मुश्किलीने स्वतःच्या डोळ्यातलं पाणी त्यांनी अडवून धरलं होतं.
शाल्मलीच्या मैत्रिणी तिच्या हातावर मेहंदी काढत बसल्या. संगीताचा कार्यक्रम असल्याने काहीजण आपले नृत्याविष्कार दाखवत होते. शाल्मलीच्या मैत्रिणी स्वप्नीलवरून तिला चिडवत होत्या. वडीलधारी बायका तिला सासरी गेल्यावर कसं वागायचं हें समजावून सांगत होत्या. प्रत्येकजण आपापले अनुभव सांगत होते. तिला सल्ले देत होते. शाल्मलीची काकू म्हणाली
“नवऱ्याच्या सुखाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो ग बाई!! चांगला स्वयंपाक यायला हवा. त्याला चांगलं खाऊपिऊ घाल.”
शाल्मलीची आजी म्हणाली,
“पाहुण्यांची ऊठबस कर, सासु-सासऱ्यांची सेवा कर.”
शाल्मलीची जिवलग मैत्रीण,कल्पना तिला म्हणाली,
“नवऱ्याला मुठीत ठेवण्याची एक आयडिया सांगते तुला. नवऱ्याच्या आईवर खूप प्रेम करायचं. का विचार?
“का..”
सगळ्याजणी एकदम ओरडल्या.
कानावर हात ठेवत कल्पना म्हणाली,
“सांगते, सांगते.. त्याचं काय आहे.. नवऱ्याचं त्याच्या आईवर आधीपासूनच प्रेम असतं. आणि जी मुलगी त्याच्या आईवर प्रेम करते. त्याला ती आवडू लागते आणि मग तोही तिच्यावर मनापासून प्रेम करू लागतो. तुला सांगते शाल्मली, तू एकदा का त्याच्या आईला जिंकलंस की त्याला जिंकलं म्हणूनच समज. मग त्याचं त्यालाच कळणार नाही की,तो तिच्या मिठीतुन मुठीत कधी गेला”
तिच्या या वाक्यावर साऱ्या मैत्रिणी खळखळून हसल्या. इतक्यात प्रिया म्हणाली,
आता तुझं तूच ठरवं बाई.. मिठीत ठेवायचं का मुठीत?”
पुन्हा एकदा हास्याचे कारंजे उडाले. शाल्मली लाजून चूर झाली.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा