सासुबाई नावाची परीक्षा

Sasubai Navachi Priksha
ज्या परीक्षेत सून पास होत नसते ती परीक्षा.

श्रमिका सात्विक दोघे ही लग्न करून काही महिन्यात सासरच्या घरातून दुसऱ्या शहरात स्थायिक होणार होते..

श्रमिका ती ही महत्वकांक्षी मुलगी होती आणि तिचे ही चांगले नावलौकिक होते पण लग्न झाले आणि तिला सात्विकच्या शहरात लग्नानंतर यावे लागले..

सात्विकच्या आई वडिलांना श्रमिका दिसायला आवडली म्हणून त्यांनी ह्या स्थळाला होकार दिला पण होकार दिल्यानंतर सात्विकला ही मुलगी पहायला सांगितले ,तो ही मुलगी पाहून आला ,आणि त्याने तिच्या शिक्षणाला आणि बिझनेसला पाहून ,आणि तिच्या मेहनती स्वभावाला पारखून लगेच होकार दिला ,त्याला जेव्हा कळले की तिने तिचे ह्या शहरात छान नावलौकिक कमावले आहे आणि तिला पुन्हा ह्याच शहरात आपला व्यवसाय असाच वृद्धिंगत करायचा आहे तेव्हा त्याने तिला तिच्या व्यवसायात तो हर प्रकारे साथ देईल असे वचन ही दिले..त्यानुसार त्याला तिच्या शहरात नौकरी करावी लागेल हा विचार आला आणि त्यासाठी ही तो तयार होता..

तो मुलगी बघून आल्यावर त्याने मुलगी पसंत आहे हे कळले आणि सांगितले की तिला तिच्या व्यवसायात मी साथ देईल असे वचन ही देऊन आलो आहे..


सात्विकच्या ह्या बोलण्यावर सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आणि मग कळले की ती एक व्यवसाय ही करते आणि ती तो करण्यासाठी लग्न झाल्यावर तिच्या शहरात परत जाणार आहे ,जाणार तर जाणार पण आपल्या मुलाला ही घेऊन जाणार आहे म्हंटल्यावर सगळ्यांना हे स्थळ नको वाटले ,आणि लगेच त्यांनी नकार ही द्यायला सांगितला..पण आता सात्विक ह्या स्थळाला नकार देणार नव्हता हे त्याने पक्के केले.


पण आता मुलगाच ह्या स्थळाला नकार देरणार नाही म्हंटल्यावर आई वडिलांचे काही चालेना.. नाविलाज होता.. मग लग्न मोडून आपण वाईट का व्हावे म्हणून इतर नातेवाईक ही मागे सरले.. आणि सगळ्यांनी होकार दिला..


लग्न झाल्यावर सात्विक आणि श्रमिका घरी आले ,आणि काही दिवस एकदम छान गेले..मुलगी सून म्हणून सगळ्यांना आवडली तशी ती सगळ्यांच्या मनात घर करून गेली ,फक्त सासूला ती कधीच जिंकू शकली नाही कारण तिने येताच तिचा मुलगा हेरवून घेतला ,त्यात त्याला त्याच्या आई वडिलांपासून दूर केला...


ते दोघे अवघे सहा महिने सात्विकच्या घरी राहणार होते ,आणि मग दोघे तिच्या शहरात कायमस्वरूपी जाणार होते ,तो ही तिकडे नौकरी बघणार होता आणि तो तिच्यामुळे तिकडे जात आहे हे मनात सलत होते..

सासुबाईने एक दिवस तिला घरातील देवासाठी नैवेद्य करायला सांगितले ...आणि ते ही एकटीने ..त्याकरिता भली मोठी लिस्ट दिली..बरेच गोड पदार्थ होते..बऱ्याच भाज्या होत्या.. आणि हे काम सकाळी सकाळी उठून करायचे होते ते ही घरच्या नवीन सुनेने..त्यात 11 वाजेच्या आत हे सगळे करून पूजा करायची होती, शेजारच्या बायका ही येणार होत्या पण बायका जेवायला येणार आहेत हे सासुबाईने सांगितले नव्हते..इथेच त्यांना तिला तोंडघशी पडायचे होते..


बायका येणार होत्या पण त्यांची फजिती करायची होती..ते ही सुनेवर आळ आणायचा होता..


सुनेने नवऱ्याला सांगितले ,आज अशी अशी पूजा आहे घरच्या सुनेने हे सगळे पदार्थ करायचे आहेत, ते ही सकाळी सकाळी लवकर उठून ,तर मला हे करायचे आहे आणि आईचे ह्यावेळी तरी मन जिंकायचे आहे..मी हे नक्की करणार..त्यांना मनात कुठे तरी माझ्यावर भरोसा आहे की मी हे करू शकते...

तो हसला, त्याला काय कळले कोण जाणे पण तिचा सासुवर भरोसा पाहून तिची कीव आली.. त्याला समजले होते आई सहज नाही काही करणार त्यापाठीमागे श्रमिकाला काही तरी धडा शिकवायचा असेल हे नक्की..त्याने श्रमिकाला सांगितले ,तू जे काही करशील ते तिप्पट कर..बाकी चालू दे तुझे...

तिला वाटले त्याचे म्हणे सासुवर भरोसा आणि देवावर जी श्रद्धा आहे ती तिप्पट कर ,आणि जो स्वयंपाक असेल तो तिप्पट कर ज्यामुळे कोणी आले तरी प्रसाद म्हणून जेवून ही जाऊ शकतील..आणि तिने ठरवले जो प्रसाद असेल तो तिप्पट करू..म्हणजे आज येणाऱ्याला जेवण देऊन पाठवू..


तिने सकाळी सकाळी उठून सगळे प्रसाद तयार केले ,त्यात सासुबाईची जरा ही मदत मिळणार नव्हती हे जाहीर केले होते कारण हे सगळे घरच्या सुनेने करायचे होते ,आणि तसेच झाले..सगळी तयारी 11च्या आत झाली...श्रमिका खुश होती..


सासूबाई आल्या आणि त्यांनी सुनेला सर्व तयार केलेले पदार्थ छोट्या वाट्यात आणायला सांगितले आणि देवाची पूजा करायला सांगितली..


तसेच सगळे सुनेने केले ,समोर सगळी फुले ठेवली आणि आरतीला सगळे आले..

सगळयांना घरात छान प्रसन्न वाटत होते ,घरात गोड आणि छान सुवास येत होता ,आज किती दिवसांनी मंगलमय वातावरण झाले होते..नवी सून एकदम सुंदर दिसत होती ,अगदी हसतमुख...मात्र सासूबाईला तिने सोपवलेली जबाबदारी पार पडतांना आंनद झालेला दिसून येत नव्हता...त्यांनी आता गम्मत करायची ठरवली ..ज्या बायकांना बोलावले होते त्या घरी आल्या होत्या..

इकडे सगळे बघत होते ,की ह्या बायकांना का आणि कोणी बोलावले ..

त्यात काकू पुढे गेल्या आणि त्यांचे स्वागत केले आणि त्यांना प्रसाद घेऊन जायला सांगितला..


तितक्यात सुनेने ही पुढे येऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यांना प्रसाद दिला ,तश्या त्यांना बसायला सांगितले..


सासूबाई म्हणाली यांना काय फक्त प्रसादच देणार आहेस का?

सुनबाई लगेच म्हणाली, नाही आई असे कसे होईल मी तर आज ठरवलेच होते जे कोणी येईल त्यांना मी जेवण केल्याशिवाय जाऊ देणार नाही..म्हणून मी खास जास्त स्वयंपाक केला आहे...


आणि सुनेने सगळ्यांना हसतमुखाने वाढायला सुरुवात केली..त्यात सासूबाईचे तोंड पडले..त्यांना वाटले मला एक संधी ही मिळत नाही तिला खाली पडायची..

सगळ्या तृप्त होऊन सुनेचे कौतुक करून निघून गेल्या आणि सासूला जिव्हारी लागले..


इकडे मुलगा दोघींचे ही चेहरे बघत होता ,आईला ही बघत होता आणि बायकोला ही बघत होता..

त्यात सासूबाईचा डाव फसला पण तो आपल्या मुलामुळे हे त्यांना माहीत नव्हते आणि सुनेला ही सासूबाईचा डाव माहीत नव्हता..ती आपल्या नवऱ्याचे आभार मानत होती..न थकता तिने घरच्यांना ही प्रसन्न मनाने जेवू घातले..

इकडे आईने तिला आज खाली दाखवण्याचे ठरवले होतेच तर तिने तिला देवाला लाडूचा प्रसाद नाही ठेवला ह्याचे निम्मित करून बोलायला सुरुवात केली..तेव्हा सगळ्यांना ही चूक झाल्याचे कळले.


सासुबाईने तिचे संस्कार काढले ,जमत नसेल तर देवाची पूजा आर्चा, प्रसाद इथून पुढे करायचे नाही...अशाने देव पावत नसतो..लोकांना खाऊ घालून वा वा मिळवणे सोपे असते पण देवाचे करणे कठीण असते... जबाबदारी अशी काही महिन्यात नाही घेता येत त्यासाठी आयुष्य घालावे लागते...हे तुझ्या आईचे घर नाही की काही करशील..


तितक्यात नवरा खाली आला आणि त्याने श्रमिकाचा हात पकडला ,आणि म्हणाला तुला यापुढे आईच्या समाधानासाठी कोणती ही परीक्षा देण्याची गरज नाही..कारण की तू ह्यात कधीच पास होणार नाहीस.. ती परीक्षा घेणार आणि तुला मुद्दाम नापास करणार ..हे तिचे ठरलेले आहे...तिचा आंनद ठरलेला आहे...तो म्हणजे तुला कमी दाखवण्यात आहे...तीच सांगेन प्रसाद कर , तीच सांगेन लाडू नको करू आणि परत तीच म्हणणार देवाला लाडू दाखवला नाहीस...तीच बायकांना जेवण करायला या आणि परत ती तुला कळू ही देणार नाही की आज जेवायला बायकांना ही बोलावले आहे का तर तुझी फजिती करून गम्मत बघायची आहे..सो तू बंद कर हे आईला खुश करण्याचे नाटक...या आधी वहिनीने ही हेच करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे...पण तिला कधीच कळले नाही की आई नेमकी कश्याने खुश होईल..आणि मग तू आली आहेस तेच गिरवायला...पण आता ते बंद करा ...


सात्विक खूप चिडला होता, त्याने आईला थोडक्यात सांगितले होते की तू मुद्दाम करतेस ,जर तुला खुश व्हायचे नसेल तर तू कोणाची परीक्षा ही घेऊ शकत नाहीस..

आईला कळले की श्रमिकाला यानेच जास्त जेवण तयार करण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे आलेल्या बायकांना ऐनवेळी जेवण कसे देऊ शकली...

बायकोचा बैल झालाच हा पण, म्हणजे आता माझे डाव बाकी कोणाला नाही कळले पण ह्याला कळत आहेत..बाकी कोणी बोलणार नाही पण हा नक्कीच बोलणार ते ही सगळ्यांच्या समोर...आणि ज्यांना तोंडावर पडायला जाते त्या तोंडावर न पडता मी तोंडावर पडणार हे नक्की..


आईने मग उगाच आपले काही चुकले नाही ,मी त्यातली नाही हे दाखवायसाठी नवीन सुनेचे कौतुक केले आणि तिला शाब्बासकी ही दिली..

आणि हळूच येऊन घरच्यांच्या पंगतीत येऊन बसली सुनेच्या हातेचे जेवायला..

©®अनुराधा आंधळे पालवे