Feb 28, 2024
मनोरंजन

सासूबाई नाही घरा. (लघुकथा)

Read Later
सासूबाई नाही घरा. (लघुकथा)

सासूबाई नाही घरा. (लघुकथा.)

(सदर कथा काल्पनिक आहे. तरी कोणाला त्यात तथ्य जाणवले तर केवळ एक योगायोग समजावा.)


"नेहाऽऽ, अगं ऊठ ना. दहा वाजलेत." नवरोबाने आवाज दिला तसे नेहाने पुन्हा आपली कड बदलवली.

"काय रे नवरोबा झोपू दे ना." ती आळसावलेल्या आवाजात बोलत होती.

रविवारची मोरपंखी सकाळ, त्यात सासूबाई अगदी सकाळीच बाहेरगावी गेलेल्या. सासूबाई नाही घरा, तोचि दिवाळी दसरा!' असे वाटून तिने आणखी मस्त स्वतःला ताणून दिले. तसेही दहा वाजले नसणार याची तिला खात्री होती. 'उठा रे. सहा वाजलेत. शाळेला उशीर होईल नाहीतर.' पाच वाजतापासून सहा वाजलेत हा धोशा लाऊन मुलांना साडेपाच पर्यंत उठवायची तिची कला आता नवऱ्याला अवगत झालीये हे तिला ठाऊक होतं.

दहा पंधरा मिनिटे लोळून झाल्याचा आनंद लुटल्यावर तिने मिटल्या डोळ्यांनी हाताने चाचपडून मोबाईल घेतला आणि मग डोळे उघडले.
'नऊच तर वाजलेत.' तिने स्वतःला समजावत व्हाट्सअप मेसेज उघडले.

"हाय! गुडमॉर्निंग." दुबईच्या मैत्रिणीचा मेसेज आला. तिनेही लगेच तिला रिप्लाय दिला.

"काय सुरुये?" मैत्रिणीच्या मेसेजची टिक टिक.

"जस्ट उठलेय. लोळतेय." नेहाचा अभिमानस्पद रिप्लाय.

"मी पण आत्ताच उठलेय. कॉफी घेतेय." मैत्रीण.

"अगं बये, तू तिकडं दुबईत म्हणजे सात साडेसात वाजले असतील. मी नऊ वाजता उठले, मारला की नाही तीर." हिचे मनात चालले होते.

"इतक्या उशीरा उठलीस. सासूबाई घरी नाहीत वाटतं?" मैत्रिणीने बरोबर नस पकडली.

हिचे हसण्याचे इमोजी. "कसली हुशार गं तू? सकाळीच सासूबाई त्यांच्या फ्रेंड्सग्रुप बरोबर सहलीला गेल्यात." मैत्रिणीच्या हुशारीने नेहाचा ऊर दाटून आला.


अर्धा तास मग व्हाट्सअप, फेसबुक हिंडून आल्यावर निवांत आळस देऊन ती उठून बसली.
तीच पेंगाळलेली होती. तिची मुलंही इतका वेळ आडवे तिडवे पाय टाकून शवासनात होती.

'आपलीच कार्टी. झोपू दे जरा निवांत. बिचाऱ्यांना रोज शाळेमुळे असं कुठे झोपायला मिळते?' तिने पोरांकडे एक कारुण्यपूर्ण कटाक्ष टाकला आणि ती बेडवरून खाली उतरली.

बाहेर हॉलमध्ये नवरा पेपर वाचत बसला होता. सासूबाईंना सकाळी सोडून द्यायचे होते म्हणून तो लवकर उठला होता. नणंदेच्या खोलीत तिने डोकावले. सकाळी आईला झोपेत दोन चपात्या टाकून देण्याचे पुण्यकर्म करून तिनेही मस्त ताणून दिले होते.

नेहाने फ्रेश होऊन गुणगुणत स्वतःसाठी आणि नवऱ्यासाठी कॉफी केली. निवांत कॉफी पिताना तिला काय स्वर्गसुख लाभत होते. सासूबाई घरी असत्या तर इतकावेळ झोपायला कुठे मिळालं असतं? दहा वाजले होते. आत्तापर्यंत तर त्यांची आंघोळ आणि देवपूजाही झाली असती. ती प्रत्येक क्षण सासूबाईंशी तोलत होती. मनोमन किती खूष होती ती. कित्येक दिवसांनी असे दडपणाशिवाय जगायला मिळत होते.

कॉफीचा कप ठेवायला ती सिंक जवळ आली आणि कॉफीच्या चवीने आसमंतात उडालेली ती खाडकन जमिनीवर आपटली.
सिंक मधील रात्रीची खरकटी भांडी तिच्याकडे बघून वाकुल्या दाखवत चिडवत होती. 'आई असत्या तर आत्तापर्यंत सगळी भांडी त्यांनी धुवून ठेवली असती.' तिला लगेच सासूबाईच्या चांगुलपणाची आठवण झाली. तशी भांडी घासायला बाई यायची पण सासूबाई आवरून ठेवायच्या. 'चल नेहा, लग जा काम पे.'

म्हणत  तिने नाकात तो खरकटा गंध भरला आणि भांडी विसळायला सुरुवात केली.

ते आवरल्यावर स्वयंपाकघरात पाऊल टाकला. कॉफी करताना मोर बनून नाचणारे मन आता थंडावले होते. तिचे स्वयंपाकघर ती आता काय बनवणार आहे यासाठी आसूसले होते. 'अकरा वाजत आलेत. आता काय नाश्ता बनवायचा?' असा विचार करून तिने वरणभाताचा कुकर लावला. रोज एव्हाना तिचा स्वयंपाक झालेला असायचा. नवरा, मुलांचे टिफिन करून ती थकली की सासूबाई कधीकधी उरलेल्या कणकेच्या पोळ्या न सांगता स्वतःच टाकायच्या. स्वयंपाक करताना तिला पुन्हा त्यांची आठवण आली.

घरातील केर काढताना ती मुलांवर खेकसून त्यांना उठवत होती. मुलं तिचीच. 'थांब ना गं' म्हणून पुन्हा लोळत होती. लादी पुसताना तिने नवऱ्याकडे एक नजर टाकली. तो बापुडा काय समजायचं ते समजून गेला आणि पोरांना प्रेमाने उठवून स्वतः गिझर सुरू करून आंघोळीला गेला.
'आई घरात नाहीत तरी यांची काही मदत नाही.' कामं करता करता ती आता नणंदेच्या नावाने मनात खडे फोडत होती.

नणंदबाई तिच्याहून हुशार. मस्त आळसावून उठत फ्रेश होऊन गरम गरम वरणभात गिळला आणि मोबाईलमध्ये डोकं खुपसणार तोच हिने प्रेमळ साद घातली.
"वन्स, कणिक मळवून ठेवलीये. वाईच तीनचार पोळ्या टाकता का? म्हणजे मला नकोय तुमचेच भाऊ आणि भाचे खातील. त्यांच्यासाठी."

नणंदेने नाक मुरडले पण टाकल्या पोळ्या.

'हुश!केली बाई थोडी मदत. फुल नाहीतर फुलाची पाकळी तरी.' नेहाला थोडे बरे वाटले.

हे सर्व आटोपेपर्यंत बारा वाजले होते. "आंघोळी करा रे पटापट. कपडे सुकायला हवेत." तिने पोरांच्या मागे धोशा लावला.

"मम्मा, आत्ताच तर उठले गं. काय इतक्यात आंघोळ कर म्हणतेस?" मुलगी तिला अक्कल शिकवत होती.

इतरांच्या आंघोळी आटोपल्यावर नेहाने कपड्यांचे मशीन लावली मनात बडबड सुरूच होती. रोज बारा वाजता कपडे दोरीवर सुकत पडलेले असतात. आज आत्ता लावलीये. आई असत्या तर? " मनातला प्रश्न बाजूला ठेवून तिने जेवणासाठी पानं घेतली.
जेवण झाल्यावर आठवले, अरे मुलीचे कपडे तर बकेटमध्येच राहिलेत. तिने मशीन पॉज करून मुलीच्या नावाने बडबड करत कपडे मशीनमध्ये कोंबले आणि त्याच रागात मशीन रीस्टार्ट करण्याऐवजी ऑफची बटण दाबली.

"देवा पुन्हा मशीन सुरू करावी लागणार. दिड वाजलाय. परत पुढचे सव्वा तास. काय ताप आहे डोक्याला." तिने मशीन पुन्हा सुरू केली. थोड्यावेळाने नणंद तिथे आली. एक तास झालाय. मशीनचे आकडे तिथेच कसे थांबलेत म्हणून तिने पुन्हा मशीन बंद करून पुन्हा सूरु केली. पुन्हा पुढच्या सव्वा तासाची प्रतीक्षा!

'आई तुम्ही हव्या होतात हो. आपली कामं सोडून इथेच मी गुंतलीय.' तिने मनापासून त्यांना साद घातली.
त्या असल्या की कपडे मशीनजवळ आणून ती आपल्या जॉबसाठी फुर्र करून निघून जायची. सुट्टीचा दिवस म्हणून मनात आज काय काय कामं करायची याची लिस्ट तिने कालपासून करून ठेवली होती पण सासूबाई सकाळीच गेल्या आणि रोजच्या रुटीन कामामुळे तिची कामं राहूनच गेली.

मशीनमधून कपडे बाहेर काढले तेव्हा तीन वाजले होते. रोज एव्हाना सुकलेले कपडे काढत असते, आज वाळवायला घालत आहे. तिचे तिलाच हसू आले. बाकीची उरलेली चिल्लर कामं आटोपल्यावर तिने घड्याळ पाहिले चार वाजले होते. मुलं आत खेळत होती. नवरा सकाळी लवकर उठला तो आता झोपला होता. नणंदबाई मोबाईलच्या डफड्यात डोकं खुपसून बसली होती.
बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली. कॉफीचा मग घेऊन नेहा खिडकीतून पाऊस बघत आस्वाद घेत होती. सकाळपासूनचा दिनक्रम तिला आठवत होता. सासूबाई घरी नाहीत म्हणून आनंदाने नऊ वाजेपर्यंत लोळणारी ती. उशीरा उठलेली मुले, कामाचा उडालेला गोंधळ.. सर्व आठवून ती स्फूट हसली.

'आई घरी असतात, तेव्हा त्यांच्याबद्दल काही वाटत नाही फारसं. कधी कधी उगाच बंधनात अडकल्यासारखं वाटतं पण आज त्या नव्हत्या तर प्रत्येक क्षणाला आठवण झाली. रोज त्यांची मला किती मदत होते हे आज जाणवत आहे. घरातील बारीक सारीक कामं त्यांनी स्वतःहून स्वतःवर ओढवून घेतली म्हणून तर बाहेर मी माझा जॉब व्यवस्थित रित्या पार पाडते. आज एका दिवसात किती तारांबळ उडली माझी. आई कसं सगळं सुरळीतपणे सांभाळून घेतात. म्हणावं तितक्या काही वाईट नाहीत आई.'

कधी नव्हे ते आज तिला सासूबाईंच्या चांगल्या गुणांची आठवण येत होती. तिने ठरवले की त्या परत आल्या की त्यांना चांगली मिठी मारायची आणि सांगायचं, 'आई, तुम्हाला ओळखू शकले नाही पण तुमची गरज आहे हो मला. सासूबाईच्या साच्यातून बाहेर पडून तुम्ही तर खरंच माझ्या आई बनून गेलात. आता माझी टर्न, मीही तुम्हाला तुमची मुलगी बनवून दाखवेन.' विचार करताना डोळ्यात पाणी का आले, तिचे तीला कळले नाही.

गेट वाजवल्याच्या आवाजाने ती भानावर आली. दारात परतलेल्या सासूबाईंना बघून थोड्यावेळापूर्वी मिठी मारायच्या आलेल्या विचाराचे अनुकरण करावे म्हणून ती धावतच गेटजवळ आली.

"काय गं सुने, हॉर्नचा आवाज आला नाही का? किती वेळ गेट उघडायला?" आत येताक्षणी त्यांचे तोंड सुरू झाले. "आणि हे काय? पाऊस सुरू आहे म्हणून आज अंगण झाडलेच नाही का? छत्री घेऊन तरी झाडायचे ना? काय बाई ही पोरगी? कसं दिसतंय माझं घर?" त्यांच्या तोंडाचा पट्टा आता थांबणार नव्हता. एरवी हे ऐकून नेहाला राग आला असता पण आज तसे झाले नाही.

"आई ते राहू द्या. पाऊस पडतोय. तुम्ही फ्रेश व्हा मी मस्तपैकी कॉफी करते." त्यांच्या हातातील सामान घेत ती बोलली.
कॉफी पिताना सासू जरा वेगळ्याच नजरेने तिच्याकडे पाहत होत्या. नेहा त्यांच्याकडे बघून मिश्किल हसली. 'सासूबाई असती घरा, तोच योग दुग्धशर्करा!' सासू नावाच्या त्या अजब रसायनाकडे बघून नकळत तिच्या मनात आले.

*****समाप्त *****
घरातल्या कामात सासू नावाच्या प्राण्याची लुडबुड कित्येकदा सून नावाच्या प्राण्याला सहन होत नाही. त्यांना तो सरळ सरळ त्यांच्या संसारातील हस्तक्षेप वाटतो. पण हे अजब रसायन आपल्या दैनंदिन कामात किती मदत करत असते हे ते नसल्यावर जाणवते. घरात त्या असतात म्हणून तर आपण बाहेर खंबीरपणे आपला जॉब, आपले काम करू शकतो. म्हणजे आपल्या नेहाला तरी तसा अनुभव आलाय. तुम्हाला कोणाला आलाय का असा अनुभव?

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//