Feb 22, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

सासूबाई असावी पण?(भाग १)

Read Later
सासूबाई असावी पण?(भाग १)
कथेचे नाव :- सासूबाई असावी पण?
विषय :- कौटुंबिक कथा मालिका
फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

प्राजक्ता,सौदामिनी,अंजली,अनुराधा आणि प्रियंका ह्या लहानपणापासून जिवलग मैत्रिणी म्हणजे ते आपलं म्हणतात ना....लंगोटिया यार अगदी तसं.  लहान होत्या तेव्हापासून शाळेत सोबत होत्या तर कॉलेज पर्यंत. पाच मुलींची मैत्री ही अख्या कॉलनी मध्ये फेमस. त्यांचं बसणं- उठणं, चालणं -बोलणं सगळं हे नेहमी सोबत असायचं. फक्त झोपायला काय त्या एकमेकींना सोडायच्या.

कॉलेज संपले आणि सगळ्यांचे लग्न झाले. प्रियंका आणि प्राजक्ताचं गावातचं लग्न झालं. तर अंजली आणि अनुराधा गावाच्या थोड्या अंतरावर असलेल्या वेगवेगळ्या गावात होत्या. सौदामिनी मात्र त्यांच्या पासून बरीच लांब गेली होती.

आता साधारण लग्न होऊन चार वर्ष झाली होती पण त्या कधीच सर्व जणी एकत्र आल्या नव्हत्या. प्राजक्ता आणि प्रियंका भेटायच्या अधून मधून मात्र जवळ असूनही अंजली आणि अनुराधा कधी भेटल्या नाही.

या वेळी मात्र प्राजक्ताने ठरवलं की वर्षाचा शेवट हा आपण एकत्र येऊन एन्जॉय करायचा म्हणून तिने प्रियंकाला फोन केला.

"हॅलो,  प्रियंका.... ऑफिस सुटलं की येते का जरा भेटायला आपल्या नेहमीच्या ठिकाणी?"


" कधी ? आज का?"

" हो."
"अगं आज नाही जमणार मला."

" प्रियंका तुला कधी जमते गं? फक्त घर, घर आणि घर."

" ए चिडू  नकोस ना!!! ..तुला माहित आहे ना माझी सासू कशी आहे, मग तरीही हे बोलते."

" अगं पण!" म्हणजे तुला आज काय... कधीच जमणार नाही का?"

" तू बोल ना...काही काम होतं का?"

" म्हणजे काम असेल तरच तुला फोन करायचा का? तसं बोलायचं नाही का?"

" प्राजक्ता ,चिडू नको ना यार तु."

" बरं मला असं वाटते ,की आपण पाच जणी मिळून जरा धमाल करू या ना वर्षाच्या शेवटी.अगं आपण कित्येक दिवस झाले बोललो नाही... भेटलो नाही एकमेकींना."

" हो... अगं माझ्या तर मनात कित्येक गोष्टी आहेत ज्या मी साठवून ठेवल्यात .घरात नवऱ्याशी बोलायची हिंमत नाही सासूबाईचं तर भलतच चालते. माहेरी सांगू शकत नाही कारण आईला एक हृदय विकाराचा  झटका येऊन गेला."

" बरं तू नको काळजी करू..आपण करू सगळं नीट. तुला जमेल ना पण."

" मी नक्की नाही सांगत गं... पण प्रयत्न नक्की करेल."

" ओके चल बाय, टेक केअर."


प्राजक्ताच्या मनात असंख्य प्रश्न आले. एवढं का सहन करते ही बाई? लहानपणापासून तिने कधी स्वत:च्या मनाचा विचार केला नाही आणि आता तर काही बोलायला गेलं तर...हे सासर आहे. मग तिने अंजली आणि अनुराधाला फोन केला.

" हाय अंजली..."

" हाय...प्राजक्ता अगं कशी आहेस आणि कुठे आहेस? बऱ्याच दिवसांनी आठवण झाली."

"हो... अगं मला आठवण आली तरी... तुला तर अजिबात येतच नाही."

" तसं नाही गं तुला तर सगळं माहीत आहे घरचं."


"  ते तर चालायच गं...आपण येत्या बुधवारी भेटत आहोत  सगळ्या."

" सगळ्या म्हणजे कोण? आपली गॅग का? कुठे आपण एकमेकींच्या घरी भेटू या का?"


" नको गं उगाच घरी प्रोब्लेम."

" बर तुला जसं योग्य वाटते ते ठरव."

नंतर प्राजक्ताने अनुराधाला फोन केला.

" हाय.... अनु, आपल्याला भेटायचं आहे आणि  यावेळी काही कारण नकोय...तुला यायचं आहे."


" नाही अगं नको वाटते घरातून निघतांना."

"का गं काही प्रॉब्लेम झाला का?

" अगं संसार म्हणजे प्रॉब्लेम होऊन बसलाय माझ्यासाठी."

"बरं बरं काळजी घे.."

"हो ...भेटू तेव्हा बोलू."

आता फक्त सौदामिनी राहिली तिला फोन लावणार तोच  तिला सौदामिनी दिसली.


" हाय सौदामिनी!!! अगं इकडे कधी आली तू. तुला एकदा पण सांगावं नाही वाटलं का? किंवा आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना भेटावं."


"अगं वाटलं ना...असं होईल का कधी? तुम्ही दोघी इकडे आहात म्हणून  मी आले इकडे आणि तुमची साथ मिळावी म्हणून."


सौदामिनीच्या डोळ्यात पाणी आलं.


" अगं काय झालं?


"काही नाही!!! ...या ना घरी.खूप बोलायचं आहे, खूप मनात आहे, तुझ्याजवळ व्यक्त करायचं आहे."


"अगं म्हणून या वर्षी मी ठरवलं सगळ्यांना एकत्र आणायचे.हो नक्की येईल."

एवढं बोलून प्राजक्ता निघून गेली.


प्राजक्ताने यावेळी एक ग्रुप बनवला. त्यावर तिने  पोस्ट केलं....
या गुरुवारी सगळ्यांनी सौदामिनीच्या घरी जायचं आहे. कुणालाही काही हरकत नाही असं मी समजते आणि वेळेवर या म्हणजे बोलणं होईल."
सगळ्यांनी अंगठे दाखून होकार कळवला.

खरं तर सौदामिनी आता गेली महिनाभरापासून इकडेच शिफ्ट झाली होती.

गुरुवार आला परत प्राजक्ताने  मॅसेज टाकला,

" मी निघते आहे तुम्ही पण निघाला असाल."

फक्त प्रियंकाचा  मॅसेज आला की,

"हो मी आलेच, पण मला लवकर निघायला लागेल घरी सासूबाई आहेत ना."


"अगं तू आधी निघ मग बघू."


बाकी दोघी अंजली आणि अनुराधा ह्या दोघींचं कॅन्सल झालं.


प्रियंका आणि प्राजक्ता दोघी बाहेरच भेटल्या आणि मग सौदामिनीच्या घरी पोहचल्या. दरवाजावरची बेल वाजली, तोच आतून सौदामिनीची सासूबाई पळतच आल्या आणि दरवाजा उघडला.

दरवाजा उघडल्या बरोबर सासूबाई म्हणाल्या,...

"या गं पोरींनो आत."

दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि आत गेल्या.आत जाताबरोबर समोर भिंतीवर सौदामिनीच्या नवऱ्याचा फोटो दिसला, त्याला हार घातलेला होता.दोघींना खूप वाईट वाटले.

" पोरीनो बसा‌ तुम्ही....मी पाणी आणते."


" नको मावशी ..राहू द्या."

" अगं असं कसं... सौदामिनीच्या मैत्रिणी तुम्ही तिला बहिणी सारख्याच.आता तिला तुम्हीच सांभाळून घ्या.


क्रमशः

©®कल्पना सावळे
जिल्हा :- पुणे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kalpana Sawale

Business

Like to write Blog, story,poem,charoli and like to make Rangoli designs

//