Jan 26, 2022
नारीवादी

सासूबाई ऐका न..

Read Later
सासूबाई ऐका न..

 

सासूबाई.. ऐका ना..!

 

आज देशमुखांच्या बंगल्यावर जणू आनंदाला उधाण आलं होतं. देशमुखांचा बंगला छान सजला होता. बंगल्याला विद्युत रोषणाई करण्यात आली. कुटुंबातल्या जवळच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना आमंत्रित केलं. पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. टेरिसच्या एका बाजूला मधुर संगीत सुरू होतं. तर दुसऱ्या बाजूला पाहुण्यांसाठी बुफे जेवणाची सोय केली होती. देशमुख आपल्या पत्नीसमवेत स्वतः सर्व पाहुण्यांची सोय पाहत होते. 

 

त्यांच्या लाडक्या एकुलत्या एका लेकीचं, शाल्मलीचं लग्न चार दिवसांवर येऊन ठेपलं होतं. कामात दिरंगाई करून चालणार नव्हतं. 

 

शाल्मली दिसायला अगदी नक्षत्रासारखी, अगदी रूपाची खाण जणू..! तिला पाहताक्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच होती ती.,कायम हसतमुख असणारी, आईवडिलांची लाडकी एकुलती मुलगी. शाल्मली विवाहयोग्य झाली अन आईबाबांना तिच्या लग्नाचे वेध लागले. शाल्मली मुळातच दिसायला देखणी असल्यामुळे स्थळं स्वतःहून सांगून येत होती.

 

एक दिवस  पुण्यात वास्तव्य असणाऱ्या  स्वप्नील केळकर या युवकाचं स्थळ सांगून आलं. स्वप्नील  दिसायला देखणा, रुबाबदार, चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर आय टी. इंजिनियर म्हणून मोठ्या हुद्यावर. पुण्यात कोथरूड सारख्या उच्चभ्रू सोसायटीत स्वतःचा फ्लॅट, गावाकडे, वडिलोपार्जित गडगंज संपत्ती. आईवडिलांच्या पोटी एकुलता एक मुलगा.. दूषण लावण्यासारखं एकही वाईट गोष्ट शाल्मलीच्या आईबाबांना जाणवली नव्हती. स्वप्नील पहाताक्षणी तिच्या आईबाबांना आवडला होता. आणि खरंतर शाल्मलीला सुद्धा.. मग काय! फार जास्त लांबण न लावता  लग्नाची तारीख ठरवण्यात आली. 

 

लग्नाची गडबड सुरू झाली. शाल्मलीचा मेहंदीचा कार्यक्रम बंगल्याच्या टेरिसवर आयोजित केला होता. चार दिवसांनी आपली मुलगी परकी होणार म्हणून एक बापाचं मन व्यथित होत होतं. मोठ्या मुश्किलीने स्वतःच्या डोळ्यातलं पाणी त्यांनी अडवून धरलं होतं. 

 

शाल्मलीच्या मैत्रिणी तिच्या हातावर मेहंदी काढत बसल्या.  संगीताचा कार्यक्रम असल्याने काहीजण आपले नृत्याविष्कार दाखवत होते. शाल्मलीच्या मैत्रिणी स्वप्नीलवरून तिला चिडवत होत्या. वडीलधारी बायका तिला सासरी गेल्यावर कसं वागायचं हें  समजावून सांगत होत्या. प्रत्येकजण आपापले अनुभव सांगत होते. तिला सल्ले देत होते. शाल्मलीची काकू म्हणाली 

 

“नवऱ्याच्या सुखाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो ग बाई!! चांगला स्वयंपाक यायला हवा. त्याला चांगलं  खाऊपिऊ घाल.” 

 

शाल्मलीची आजी म्हणाली,

 

“पाहुण्यांची ऊठबस कर, सासु-सासऱ्यांची सेवा कर.”

 

शाल्मलीची  जिवलग मैत्रीण,कल्पना तिला म्हणाली,

 

“नवऱ्याला मुठीत ठेवण्याची एक आयडिया सांगते तुला. नवऱ्याच्या आईवर खूप प्रेम करायचं.  का विचार? 

 

“का..”

 

सगळ्याजणी एकदम ओरडल्या. 

 

कानावर हात ठेवत कल्पना म्हणाली,

 

“सांगते, सांगते.. त्याचं काय आहे.. नवऱ्याचं त्याच्या आईवर आधीपासूनच प्रेम असतं.  आणि जी मुलगी त्याच्या आईवर प्रेम करते. त्याला ती आवडू लागते आणि मग  तोही तिच्यावर मनापासून प्रेम करू लागतो. तुला सांगते शाल्मली, तू एकदा का त्याच्या आईला जिंकलंस की त्याला जिंकलं म्हणूनच समज. मग त्याचं त्यालाच कळणार नाही की,तो तिच्या मिठीतुन मुठीत कधी गेला” 

 

तिच्या या वाक्यावर साऱ्या मैत्रिणी खळखळून हसल्या. इतक्यात प्रिया म्हणाली,

 

आता तुझं तूच ठरवं बाई.. मिठीत ठेवायचं का मुठीत?”

 

पुन्हा एकदा हास्याचे कारंजे उडाले. शाल्मली लाजून चूर झाली. 


 

विवाह सोहळ्याचा दिवस उजाडला. शाल्मलीच्या आईवडिलांनी एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने लावून दिला. संपूर्ण पंचक्रोशीत इतका सुंदर विवाह सोहळा कोणाचा झाला नव्हता. विवाह सोहळा संपन्न झाला. आणि शाल्मली देशमुख आता 'शाल्मली स्वप्नील केळकर' झाली. 

 

शाल्मली केळकरांच्या घरचा उंबरठा ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरी आली. लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा, देवदर्शन, जागरण गोंधळ अगदी सर्व विधी साग्रसंगीत पार पडल्या. त्यानंतर स्वप्नील आणि शाल्मली हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला फिरायला गेले. स्वप्नीलच्या सहवासात,त्याच्या प्रेमात शाल्मली सुखाने नाहून निघाली.  ते मंतरलेले दिवस, मोहरलेले क्षण, त्या आठवणी मनात रुजवत शाल्मली स्वप्नीलसमवेत परत घरी, सासरी आली. 

 

शाल्मलीचा संसार सुरू झाला. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे ती सासरी सर्वांची लाडकी झाली. स्वप्नील तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करत होता. तिचे सासुसासरेही तिच्यावर मुलीसारखी माया करत होते. शाल्मली खूप आनंदात होती. पदवीधर झाल्यानंतर शाल्मलीने एम.बी.ए.(फायनान्स) केलं होतं. एका मोठ्या कंपनीत ती नोकरी करत होती. पण लग्नानंतर तिला एक छानसं कौटुंबिक, वैवाहिक आयुष्य जगता यावं, तिच्यामुळे कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून तिने तिची चांगली नोकरी सोडून दिली. किंबहूना एक श्रीमंत, सधन सासर लाभल्याने, घरात सुबत्ता नांदत असल्याने, सर्व सुखसोयी उपलब्ध असल्याने तिला नोकरी करण्याची गरजच वाटली नाही.   शाल्मली आपल्या संसारात रमली. आपल्या वडिलधाऱ्या मंडळींनी आणि मैत्रीणींनी सांगितलेल्या सूचनांचं ती काटेकोरपणे पालन करत होती. सासुसासऱ्यांची सेवा करत होती. साऱ्यांची मनं जपत अगदी सुखासमाधानाने आपला संसार नेटाने करत होती. 

 

सगळं छान सुरळीत सुरू होतं. तिच्या सासूसासऱ्यांनाही आपल्या सुनेचं फार कौतुक वाटायचं. सासूबाई तर घरी येणाऱ्या प्रत्येकाजवळ शाल्मलीचे गोडवे गायच्या. पण त्या दिवसांनंतर मात्र शाल्मलीला सासूबाईंच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवू लागला. रोज मायेने वागणाऱ्या सासूबाई तिच्याशी तुसडेपणाने वागू लागल्या. कारणही तसंच होतं. पण त्यात तिचा काय दोष? तिलाच समजेना.  

रात्री जेवण्याच्या टेबलवर स्वप्नील म्हणाला,

 

“आई बाबा, मी आणि शाल्मली वेगळं राहायचं म्हणतोय. मला इथून माझं ऑफिस दूर पडतं. हिंजवडी जवळच भाड्याने घर घेऊन राहू”

 

आईबाबांना खूप आश्चर्य वाटलं. शाल्मलीही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. 

 

“असं अचानक कसं ठरलं? इथे काय त्रास आहे?”

 

बाबा त्रासिक मुद्रा करत म्हणाले. आई स्वप्नीलला समजावून सांगत होती.

 

“अरे,पण आम्ही इथे तू तिथे. आमची वयं झालेली. तुझ्या बाबांना अस्थमाचा त्रास होतो. मलाही आता काम होत नाही. गुडघे दुखतात. रात्री अपरात्री कधीही डॉक्टरांकडे जावं लागतं. तू जवळ नसशील तर कोणाला सांगू आम्ही? आणि आतापर्यंत तर इथूनच ऑफिसला जातच होतास न! मग आता नेमकं काय झालं?”

 

स्वप्नीलने शाल्मलीकडे एक कटाक्ष टाकला आणि ते शाल्मलीच्या  सासूबाईंनी पाहिलं. सासूबाईनी स्वतःचा काय समज करायचा तो करून घेतला. 

 

रात्री झोपायला गेल्यावर शाल्मलीने स्वप्नीलजवळ विषय काढला.

 

“स्वप्नील, तू वेगळं राहण्याचा निर्णय घेण्याआधी काहीच बोलला नाहीस. अचानक कसं ठरवलंस?”

 

“अग, लग्न झाल्यावर स्वतंत्र व्हायचं असं मी लग्नाआधीच ठरवलं होतं. तुझ्या माझ्यात मला दुसरं कोणी नकोय. खरंच आपल्याला प्रायव्हसी मिळत नाही इथे. बाबांच्या सारख्या सूचना ऐकाव्या लागतात. मला वाटलं तूच बोलशील. पण तू काही बोलेना म्हणून मीच बोललो.”

 

स्वप्नीलने मोबाईलमधून डोकं बाहेर काढत तिला उत्तर दिलं.

 

“अरे पण आईबाबांचं काय? या वयात त्यांना आपली गरज आहे. त्यांना असं एकटं सोडून कसं जायचं?”

 

शाल्मली काकुळतीला येऊन विचारत होती.

 

“हे बघ, आपण काही परदेशी जात नाही आहोत. एकाच शहरात आहोत. हाकेच्या अंतरावर.. काही लागलं त्यांना तर एक फोन कॉल केला की आपण इथे पोहचू. आणि सोड विषय तो. आपण लवकरच शिफ्ट होऊ. तू मोजकंच समान पॅक कर. शिफ्टिंगला त्रास नको आणि झोप आता. उद्या माझं ऑफिस आहे.”

 

असं म्हणत स्वप्नीलने कुस बदलली आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी स्वप्नील ऑफिसला निघुन गेला आणि सासूबाईंच्या सोसायटीमधल्या मैत्रिणी घरी आल्या. सर्वजणी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या. शाल्मलीने सर्वांसाठी कांदापोहे, चहा आणून दिलं. कांदेपोहे खात खात त्यांच्या गप्पा सुरु झाल्या आणि नेमकं त्यांचं ते बोलणं त्यांच्यासाठी पाणी घेऊन येणाऱ्या शाल्मलीच्या कानावर पडलं.शाल्मलीच्या सासूबाई डोळ्याला पदर लावत म्हणत होत्या,

 

“काय सांगू जानकी, माझा स्वप्नील लग्न झाल्यापासून पार बदलला ग! वेगळं राहायचं म्हणतोय.”

 

“काय सांगते! असं अचानक? तुला सांगते, आजकालच्या मुली या, यांना एकत्र कुटुंबात राहायचं नसतं. लग्न झाल्यावर लगेच नवऱ्याला घेऊन वेगळं राहायचं असतं. मी सांगते न, तुझ्या सुनेनेच कान भरले असतील.”

 

जानकी काकू म्हणाल्या. लगेच उमाकाकूं त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या. 

 

“अगदी खरंय पार्वती, आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलांना वाढवायचं आणि यांनी माझा नवरा करत हक्क सांगत यायचं.अग यांना सासुसासरे नकोच असतात ग. आपल्यावेळीस असं नव्हतं बाई..!”

 

“अग, मी म्हणेन माहेरचं वळण असतं हे. तिकडून शिकून येतात ग.. तू इतके तुझ्या सुनेचे गोडवे गात होतीस पाहिलं ना काय केलं तिने? तुझ्यापासून तुझ्या मुलाला तोडलं.”

 

जानकीकाकूंनी अजूनच आगीत तेल ओतलं. आता मात्र शाल्मलीला राहवेना. डोळ्यांत पाणी आलं. ती पटकन आत आली.पाण्याचा ट्रे टेबलवर ठेवला. सासूबाई आणि त्यांच्या मैत्रीणीं जरा चपापल्या. शाल्मली सर्वांकडे एक नजर टाकत म्हणाली,

 

“काय झालं काकू? का थांबलात? बोला न.. पण मग तुमचं बोलून झालं की मलाही माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवीत ते सुद्धा अगदी खरी.. मनापासून”

 

“आता बोलायला, विचारायला बाकी ठेवलंयस का तू? तरीही बोल, पुन्हा नवऱ्याला जाऊन सांगशील मला सासू छळते. बोलण्याची संधीही देत नाही. बोल बाई बोल तू! आता तुझंच ऐकावं लागेल न सगळं”

 

सासूबाईंनी मनातला राग ओकून टाकला. इतक्यात शाल्मलीचे सासरे तिथे आले. शाल्मलीने त्यांना आवाज देऊन बोलावून खुर्चीत बसायला सांगितले. शाल्मली शांत स्वरात म्हणाली,

 

“आई, मी तुम्हां दोघांना माझ्या आईबाबांचा दर्जा दिलाय आणि तो कायम तसाच राहिल. म्हणून सून नाही तर मुलीच्या नात्याने काही प्रश्न विचारतेय. फक्त एकदा शांतपणे विचार करून सांगा.

आई, माझं लग्न ठरलं न, तेंव्हापासून माझ्या घरचे, मैत्रिणी  मला मी  सासरी गेल्यावर कसं वागावं, कशी जबाबदारी घ्यावी  याचं बाळकडू पाजत होत्या. ते वर्षानुवर्षे चालत आलेल्या जबाबदाऱ्यांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून मोकळ्या होत होत्या आणि मीही विनातक्रार मनापासून ते स्वीकारलं. त्यांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालनही करत होते. पण मला सांगा आई, आजवर  कधी  नवऱ्या मुलाला सांगितलं जातं का ओ? की स्वतःचे जन्मदाते,आप्तेष्ट, मित्रमैत्रिणीना,सोडून येणाऱ्या तुझ्या पत्नीला दुःख देऊ नकोस. तिला घरकामात मदत करत जा. जसे तुझ्या आईवडील तिची जबाबदारी आहे तसच मुलीचे आईवडील तुझ्या आईबाबांसारखेच आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी जबाबदारी तुझीच. नाही ना सांगत.! असं माझ्या तरी ऐकीवात नाही.”

 

“आई, जानकीकाकू आणि उमाकाकू म्हणाल्या, तूमच्या सुनेने मुलाला बदलवून टाकलं. तिला सासू सासरे नकोच होते. ती शिकवते मुलाला. सून घरात आली आणि घर विभक्त झालं. हल्ली मुलगा सगळं तिचचं ऐकतो. असं बरच काही. खरंच का ओ असं असेल? इतकं अवलंबून असेल सुनेवर? एक मुलगी आपलं घरदार, आई वडील, आप्तेष्ट सोडून येते. अगदी तीच स्वतःचं नाव1सुध्दा मागे सोडून येते. त्या मुलींमध्ये इतकी शक्ती असेल? म्हणजे ही नववधु नाही तर रणरागिणी जणु.! हे सगळं घडत असताना मुलाची मानसिकता काय असते? याचा कधी विचार केलाय का?  

 

आई, सुनेने जरी सासुसासऱ्यांचं सगळं मनापासून केलं तरी मुलाला हवे असतात का आईवडील? एक मुलगा म्हणून त्याला स्वतः चे काही मत असेल न? त्याला का येत नाही समतोल साधता? आईवडील आणि पत्नी यात समान वागणूक का नाही? वाईट झालं की सुनेमुळे. चांगले झालं की मुलानं नीट सांभाळून घेतलंय. असं बोलायचं. का आई?

 

आई, तुम्ही तुमच्या मुलाला विचारलं का कधी? त्याला काय हवंय? त्याला स्वातंत्र्य हवंय. शिक्षणासाठी घराबाहेर राहिल्याने एकट राहण्याची सवय झालीय त्याला. आईबाबांचं बोलणं उपदेश वाटू लागलंय. आणि म्हणून  मग विभक्त व्हायचं आहे त्याला. आई, पण दोष मात्र मला. नविन येणाऱ्या सुनेला. काय शोकांतिका.!

 

मला एक कळत नाही जन्मापासून ज्या आईवडिलांनी प्रेम केलं, माया दिली. हे सगळं तुमची पोटची मुलं विसरून जातात?  ते पण सून म्हणून आलेल्या एका मुलीमुळे? कसं काय? त्या मुलाची स्वतःची मतं नसतात का? मुलाची इच्छा आणि खापर का फोडलं जावं सुनेच्या नावाने? 

 

आई, मी पाहिलंय अशा मुलांना जे आई वडील किती वाईट आहेत. किती चिकट आहेत. असं सर्वांना सांगत सुटतात. त्यांची नजर मात्र आईवडिलांच्या संपत्तीवर. संपत्तीत वाटा नाही दिला तर

 

 “जाताना वर घेऊन जाणार आहेत का?”

 

असे प्रश्न मी ऐकलेत. पण तरीही  सासुसासरे, हा समाज मात्र सुनेलाच नावं ठेवणार. परक्या घरून आलेली असते ना..!


 

आई, हल्ली मुलांनाही  आईवडील ओझं वाटू लागलेत. सून बनून आलेल्या मुलीने कितीही मुलगी बनायचा आटापिटा केला तरी तो कोणालाच दिसत नाही. जेंव्हा ”तु यात पडू नकोस’’ असं म्हणून तुमचा मुलगा, तिचा नवराच तिला थांबवत असेल तर तिने काय करावं?  तीही ज्याच्या उपरण्याला पदराची गाठ बांधली गेली त्याचंच ऐकेल ना. सगळ्याच सुना वाईट नसतात हो.! कधी कधी तूमचा मुलगाही चूकु शकतो न? सांगा आई, द्या मला उत्तर.. उमाकाकू, जानकी काकू, सून कधीच मुलगी होऊ शकत नाही का? सासू आईची माया देऊ शकत नाही का?”

 

शाल्मली पोटतिडकीने बोलत होती. तिच्या डोळ्यांतला पाऊस बरसत होता. सासूबाईंसकट सर्वांनाच आपली चूक उमजली होती. 

 

“सुनबाई, शांत हो, आम्हाला आमची चूक समजली. माझी सून गुणांचीच आहे. आमच्याच मुलाला हे कळत नाही त्यात कोण काय करणार.  आम्हाला माफ कर सुनबाई” 

 

असं म्हणत त्यांनी शाल्मलीचे डोळे पुसले. शाल्मली त्यांच्या कुशीत शिरली. मनसोक्त अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. सासूबाई तिला कवेत घेऊन तीच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.

 

पूर्णविराम..

© निशा थोरे..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

निशा थोरे (अनुप्रिया)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.