Jan 28, 2022
प्रेम

सासूआई

Read Later
सासूआई
लग्न व्हायच्या आधी बाकी सगळी चौकशी करताना ‘सासू कशी आहे?’ किंवा ‘सासूबाईंचा स्वभाव कसा आहे?’ या विषयीसुद्धा माहिती घेतली जाते. याचे कारण आपला समाज आणि पूर्वीपासून चालत आलेले सासू सुनेचे तथाकथित वैर... तुम्हाला वाटते का हो, सासू आणि सून या कायम भांडणार्‍या किंवा एकमेकींना त्रास देणार्‍या अशाच असतात??? माझ्या मते त्या होत्या... आत्ता जसा काळ बदलत आहे तसतसे सासू - सून हे समीकरणसुद्धा बदलत आहे. आता सुनांना सांभाळून घेणार्‍या सासवा तसेच सासूला ‘आई’सारखा मान-सन्मान अन् आदर देणार्‍या सुना दिसत आहेत.
या बदलला कारण म्हणजे स्वभाव आणि आत्ताची परिस्थिती. एकमेकींना समजून घेण्याची वृत्ती. माझे लव्ह मॅरेज. नुसते लव्ह मॅरेज असते तर ते एवढे कुणी सिरीयसली घेतलेसुद्धा नसते. किंवा त्याबद्दल चर्चा केली नसती. पण आमच्या गावात इंटर कास्ट लव्ह मॅरेज करणे म्हणजे खूप मोठी चूक असे वाटत होते. त्यामुळे मला ‘तू हे लग्न करू नको’ यासाठी अनेक उदाहरणे देताना ‘तुझी सासू ङ्गार कडक आहे, खाष्ट आहे’ असे सांगूनसुद्धा बघितले होते. पण त्यावेळी त्यांनी मला दागिने घेण्यासाठी आपल्या जवळ असलेला सोन्याचा मणी स्वतःहून दिला होता. त्यावेळी त्या खाष्ट कशा काय असू शकतील... असा विचार माझ्या मनात आला. माझे लव्ह मॅरेज असल्यामुळे त्या आणि मी आधीपासून एकमेकींना ओळखत होतो. पण ती ओळख जेव्हा नात्यात बदलली, तेव्हा त्या किती चांगल्या आहेत याचा अनुभव हळुहळू यायला लागला. माझा नवरा, त्याची बहीण घरात त्यांना ‘मम्मी’च म्हणत असल्यामुळे लग्न झाल्यावर त्यांना मी ‘मम्मी’ अशीच हाक मारू लागले. त्यामुळे सुरुवातीपासून त्या माझ्या ‘सासूबाई’ आहेत असे कधी वाटलेच नाही.

जेव्हा कधी मी सकाळी कामासाठी कुठेतरी बाहेर जाणार असेन, त्या दिवशी माझ्यासाठी त्यांनी स्वतः लवकर उठून डबा करून दिला आहे. कामावर जाताना खायला खाल्ले की उपाशी जातेय, यावर त्यांचे बारीक लक्ष असते. मी काही न खाता जात असेन तर मला ओरडून (प्रेमाने) खायला लावणार. स्वतःला बरं नसतानासुद्धा माझ्या साध्याशा खोकल्यावर ‘घरात औषध असून पण हिला औषध घ्यायला नको’ असे म्हणून माझ्यावर नाराजी व्यक्त करत मला औषध घ्यायला लावणार्‍या माझ्या सासूबाई म्हणजे ‘मम्मी’ आहेत.
लग्नाआधी काहीशी दडपणाखाली असणारी मी, आता मात्र व्यवस्थितपणे वावरत आहे. (दडपण यायची कारणे वेगवेगळ्या प्रकारची आहेत.) हल्ली त्या आजारी असतात. त्यामुळे दवाखान्यासाठी त्यांना कोल्हापूरला रहावे लागते. तेव्हा त्यांना ङ्गोन नाही केला की चैन पडत नाही. माझा दिवसभरात जर ङ्गोन नाही आला, तर संध्याकाळी ‘काय गं, आज कुठे आहेस...’ असे म्हणत मला त्यांचा फोन नक्की येणार.
मी कुठेतरी वाचले होते, की लग्नानंतर सासू आणि सून यांचे जर गुळपीठ जमले, तर त्या घरात आनंद असतो आणि जर ते नाही जमले, तर कायमचा त्रास. अन् हे गुळपीठ जमून येणासाठी दोघींनीही तडजोड करणे हे आवश्यक. माझ्या बाबतीत विचाराल, तर मी यासाठी काही वेगळी तडजोड केली किंवा त्यांना खुश करण्यासाठी मी काही वेगळी युक्ती, ट्रीक केली असे काही नाही. आमच्या नात्यातला ताळमेळ हा आपोआप साधला गेला. त्यासाठी काही वेगळे करावे नाही लागले.
लग्न झाल्यानंतर इथल्या पद्धतीचा स्वयंपाक करणे मी त्यांच्याकडून शिकले. काही गोष्टी मला येत होत्या. पण त्यात सुधारणा त्यांनी केली. कधी स्वयंपाक बिघडला, की ओरडण्यापेक्षा ‘आम्ही पण करत करत, चुकत चुकत शिकलो’ असे म्हणून मला समजावून सांगितले. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, लग्नाआधी मला आईच्या हातची गरम भाकरी आणि त्यावर लोणी घेऊन खायची सवय होती. लग्न झाल्यावर ते खूप मी मिस करत होते. पण एके दिवशी आयती गरम गरम भाकरी आणि त्यावर लोणी खायची माझी इच्छा मम्मीने पूर्ण केली. मला कधी कापले किंवा भाजले, तर स्वतः माझी काळजी करणार्‍या माझ्या सासूबाई आहेत.

माहेरी असताना माझ्या केसांना आई तेल लावून द्यायची. तेलाची बाटली घ्यायची आणि आईच्या पुढ्यात बसून चंपी करून घ्यायची सवय होती. पण लग्न झाल्यानंतर मी असे माझ्या सासूबाईंसमोर बसू शकेन का? असा विचार का कुणास ठाऊक मनात येत होता आणि एकदा तेल मम्मीकडून लावून घेतलेच. जर मी त्यांना त्यावेळी ‘त्या माझ्या सासू आहेत’ हा विचार केला असता, तर कदाचित मी त्यांच्या पुढे तेलाची बाटली घेऊन बसले नसते. पण त्यावेळी त्या मम्मी आहेत म्हणजे आई आहेत असा विचार करून मी त्यांच्या पुढे जाऊन बसले.
मला लग्नाआधी साडी नेसायला येत नव्हती. लग्न झाल्यावर मी साडी नेसायला त्यांच्याकडूनच शिकले. एरवी साडी नेसत नाही म्हणून सासवा ओरडतात. किंवा टोमणे मारतात, असे चित्र असते. पण आमच्याकडे उलट आहे. त्यांचे कायम एकच म्हणणे असते, ‘तुला झेपते ते कर.’
‘घरोघरी मातीच्या चुली असतात’ किंवा ‘भांड्याला भांडे लागते’ असे आपण सारखे ऐकतो. त्याप्रमाणे कधी तरी चुकूनच अशी वेळ येते, की आमच्यात काही रुसवा ङ्गुगवा झाला आहे किंवा त्यांनी मला काही म्हटले आहे. मला त्यांचा खूप आधार वाटतो. त्या नसताना घरात चैतन्य नसते. म्हणतात ना, आईशिवाय माहेराला आणि सासूशिवाय सासरला शोभा नाही, ते खरंच आहे.
आपण टी.व्हीमध्ये बघतो, मुलगा म्हणजे नवरा आणि सासू हे दोघे मिळून सुनेला टोमणे मारतात, किंवा ओरडत असतात, किंवा काही म्हणत असतात. पण आमच्या घरी काहीसे वेगळे चित्र आहे. काही गोष्टींमध्ये मी आणि मम्मी एकत्र होऊन माझ्या नवर्‍याला ओरडत असतो. त्यांच्याविषयी किंवा आमच्या नात्याविषयी अजूनही खूप काही लिहता येईल. पण शब्द शोधणे कठीण जाईल. मला तर हल्ली ‘सासूबाई’पेक्षा ‘सासूआई’ असा शब्द असता तर बरेचसे प्रश्न सुटले असते, किंवा फारसा गुंता झाला नसता, असे वाटते.

अजूनही खूप काही लिहता आलं असत पण दुर्दैवाने सासुआई ला बापा ने लवकर बोलावून घेतलं...

मिस यू मम्मी!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vrushali Walake

Tutor

I am vrushali and I like to read and write the blogs