सासुआई...#लघुकथा लेखन स्पर्धा -कौटुंबिक कथा

Gayatri tuzi maitrin aali g

“गायत्री तुझी मैत्रीण आली ग.” सासूबाईंच्या आवाजाने गायत्री  बेडरूममधून बाहेर आली.


“कोण आलंय आई?.”


“ स्मिता आलीय ग.”


गायत्री जायला निघाली तसच सासूबाईंनी थांबवलं.
“गायत्री..ऐक ना..अग मला ना ती थोडी उदास वाटली,चेहरा उतरला दिसतोय. बघ जरा सांभाळून घे, तिनी काही सांगितलं नाही ना तर तूच पुढाकार घे.”

“हो सासूआई तुम्ही काळजी करू नका”
गायत्री हॉलमध्ये गेली


“हाय स्मिता..कशी आहेस?.”
“मी बरी आहे, तू कशी आहेस?.”


“बघ, तुझ्यासमोर उभी आहे अगदी मजेत”
हसत हसत गायत्री बोलत होती.


गायत्रीने स्मिताला बसायला सांगितलं.
“काय ग चेहरा का पडलाय?.”


“नाही.. काही नाही”
गायत्रीची सासूबाई पाणी घेऊन आली, ती पाणी प्यायली.
“सुनेची मैत्रीण आली तरी तिच्या सासूबाईंनी पाणी आणलं आणि माझ्याइथे सगळं उलट” स्मिता मनातल्या मनात विचार करायला लागली..


“काय ग स्मिता काय विचार करतेस”
“तुझ्या सासूबाई पाणी घेऊन आल्या ना त्याच आश्चर्य वाटलं”
“का ग?”


“हेच जर माझ्याकडे असत ना तर माझ्या सासूबाईंनी नसत केलं”


गायत्रीची सासूबाई नाश्ता घेऊन आल्या आणि त्यांच्या कानावर स्मिताचे शब्द पडले, त्यांनी टिपाय वर ट्रे ठेवला आणि हसून स्मिताच्या हातात प्लेट दिली.


“उदास का होतेस? तू एक पाऊल पुढे टाक”
“म्हणजे?”
“तू तुझ्या सासूबाईंना घेऊन ये”


स्मिता घरी गेली,तिनी ठरवलं सासूबाई कशाही वागल्या तरी आपण एक पाऊल पुढे टाकायचं..


ती सासूबाईशी प्रेमाने वागायला लागली पण सासुमध्ये फरक जाणवत नव्हता, काही दिवसांनी स्मिता तिच्या सासूला घेऊन गायत्री कडे गेली..


छान ओळख झाली, गप्पा सुरु झाल्या, मग विषय निघाला सासू-सून नात्याचा.


गायत्रीच्या सासूबाई बोलता बोलता सगळं बोलून गेल्या.


“सुनेला आपली मुलगीच माना, आपल्या मुलीला आपण लहानपणापासून लाडाने वाढवतो, तिच्यावर एकदम घरकाम सोपवत नाही, तिच्या शिक्षणात आड येत नाही, तिच्या करियर मध्ये तिची साथ देतो, वेळप्रसंगी मतभेद झाले तरी आपण ते मनावर घेत नाही, तिने केलेली एखादी चूक आपण पोटात घेतो, पण हे सगळं आपण सुनेच्या बाबतीत करतो का, तर नाही..आपण भेदभाव करतो, तिच्या करियरच्या आड येतो.. तिला मुलगी मानलं तर अस घडणारच नाही..


ती आपल्या मुलाची सहचारिणी असते, जस आपल्याला वाटतं आपल्या मुलीला सासरी त्रास होऊ नये तसच सुनेच्याही आई बाबांना वाटतच असेल ना..ती आपल्या घरात नवीन असते म्हणून एक पाऊल आपण पुढे यायचं..”


“ती आपल्या घरात नवीन असते, त्यामुळे सुरवातीला घाबरलेली असते, आपण तिला विश्वासात घेऊन सांगायचं की हे घर तुझच आहे, तुला हवं तसं कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत.. प्रेमाची एक थाप तिच्या पाठीवरून गेली ना मने जुळायला वेळ लागणार नाही”


“सुनेमध्ये जर दोष असतील तर त्या दोषासकट तिचा स्वीकार करा, उगीच नातेवाईकांमध्ये तिची उणीव दाखवून तीचा अपमान करू नका” तिचा स्तर खालावू नका,कारण कुणीही सर्वगुणसंपन्न नसत..ती चुकत असेल तर तिला न रागावता समजावून सांगा, तिच्या कामात तिला मदत करा, तीही या घरासाठी महत्वाची आहे,हे तिला कळू द्या..”

“जिथे शक्य आहे तिथे न भांडता सबुरीने घ्या, मुलगा – सुनेचे भांडण होत असेल तर तुम्ही मधात पडूच नका, त्यांना त्यांचं निस्तरु द्या, उगाच मधात पडून विलन बनू नका, सून घरात आली म्हणून सासुपणाला जागवू नका..ती घरात आल्यावर थोडेफार बदल होतील तर ते स्वीकारा कारण पुढे जाऊन तिलाच हे घर सांभाळायचं आहे, तिची सासू न बनता आई किंवा मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करा, कितीही वादविवाद झाले तरी नात्यात दुरावा येऊ देऊ नका.”


“चार भांडे एकत्र आहेत म्हणजे ते वाजणारच,पण त्याचा विस्फोट होऊ देऊ नका, भांडण झाली तर त्याच्यातून मार्ग काढा, सुनेचे गाऱ्हाणे लोकांसमोर आणू नका, त्यातून त्रास स्वतःलाच होईल..


प्रेम द्याल तर आपसूकच प्रेम मिळेल, कौतुकाने ज्या मुलीच्या हाती आपल्या मुलाचा हात दिलाय,तिला ही आपलंसं करा.
आई म्हणून खंबीरपणे दोघांच्याही पाठीशी उभे रहा, कोणाचीही एकाची बाजू घेऊन, दुसऱ्याला त्रास देऊ नका, यातलं थोडं तरी आपण केलं ना तरी सासु-सुनेच नात हे सुंदर होईल..”

गायत्रीच्या सासूबाई  बोलता बोलता खूप काही बोलून गेल्या..
“सासुआई जरा दम घ्या, तुमची गीतांजली सुरू झाली.
चौघीही हसल्या.


सासुआई किती सहसपणे तुम्ही सगळं बोलून गेलात ना, मनातल्या सगळया भावनांना बाहेर काढलतं.


स्मिता आणि तिच्या सासूबाईने एकमेकीकडे बघितलं..
स्मिताच्या सासूचे डोळे भरून आले...


त्या उठून काहीही न बोलता निघून गेल्या..तिघीही त्यांच्याकडे बघत राहील्या..


“स्मिता राग आला का ग त्यांना?. सासुआईच बोलणं त्यांना आवडलं नाही बहूतेक..”


“मी बघते.” अस म्हणत स्मिता सासूच्या मागे मागे गेली...
स्मिता घाबरली, सासूबाईला राग आला असेल का, त्या माझ्यावर चिडतील का असे प्रश्न तिच्या मनात आले..
घरी गेल्यानंतर  काही वेळ दोघीही शांत होत्या, कुणीही काही बोललं नाही..


स्मिता तिच्या रूममध्ये गेली, स्मिताची भीती वाढली..
थोडयावेळाने स्मिताची सासू रूममध्ये  गेल्या.


“स्मिता अग मला माफ कर, मी तुझ्याशी  खुप चुकीची वागले, तुला खूप त्रास दिला, प्रत्येक वेळी तुला त्रास कसा होणार याचाच विचार करत राहिले..तुला नको नको ते बोलले..मला माफ कर बेटा”


स्मिताच्या सासूबाई स्मितासमोर  हात जोडून उभ्या राहिल्या, स्मिताला मात्र रडू आलं, ती लगेच त्यांना बिलगून रडायला लागली.


“आई माझ्याकडूनही चुका झाल्यात आई, तुम्ही मला माफ करा...आणि प्लिज तुम्ही माझी माफी मागू नका, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, मी चुकल्यानंतर तुम्हाला मला रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे..”


“नाही बेटा..तू चुकलीस तरी मला तुला समजून घ्यायला हवं होतं”


दोघींनीही एकमेकींना माफी मागून एकमेकींशी प्रेमाने वागण्याचं प्रॉमिस केलं..


दुसऱ्या दिवशी स्मिताने गायत्रीला फोन केला


“हॅलो गायत्री थँक यु..थँक्स अ लॉट..तुझ्यामुळे मला सासरी माझं माहेर मिळालं..”


“स्मिता..अग किती आनंदात आहेस !”


“हो ग, तुझ्या सासूबाईला माझ्याकडून धन्यवाद सांग, आज त्यांच्यामुळे माझ्या सासू बदलल्या, त्यांनी मला यापुढे कोणताही त्रास होणार नाही असं सांगितलंय”


“चला म्हणजे सगळं छान झालं तर, काल त्या अश्या उठुन गेल्या मी तर घाबरलेच होते..”
“ठेवते मी, वन्स अगेन थँक्स”


गायत्रीने फोन ठेवला आणि सासुआईच्या रूममध्ये गेली
“सासुआई स्मिताचा फोन आला होता, तिच्या सासूबाई बदलल्या म्हणे”
“अरे वा..हे तर छानच आहे की..”
“सासुआई थँक यु...स्मिता खूप आनंदीत होती..दोघींनीही एकमेकांना आलिंगन घातलं..


स्मिताच्या घरचे इतर सदस्य पण स्मिताशी चांगलं वागायला लागले..


गायत्री आणि तिच्या सासुमध्ये खूप छान बॉंडिंग होत..गायत्री जेव्हा लग्न होऊन आली, तेव्हाच सासूने सांगितलं होतं की  गायत्री हे घर तुझं आहे आणि या घरातील माणसे सुद्धा तुझीच आहेत, त्यांचा सगळ्यांचा सांभाळ कर, त्यांची मने प्रेमानी जिंक..सगळ्यांना आपलंसं कर, या घराला बांधून ठेव आणि हे सगळं करत असताना तुला काही अडचणी आल्याच तर तुझी ही सासू तुझी आई वेळप्रसंगी तुझी मैत्रीण बनून तुझी साथ देईल..


“मन मोठं असलं की सगळ काही सामावून घेता येते”

हे ऐकलं आणि गायत्री बिनधास्त झाली, आणि आता सासूची सासुआई कधी झाली आणि सुनेची लेक कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही..


तिच सासर तिच माहेर झालं , आता कौतुकाची थाप द्यायला तिला माहेरच्या  माणसांची गरज नाही..
दोघींमध्ये मैत्रीचं नात निर्माण झालं...


असच सुंदर नात जर प्रत्येक सासू-सूनेमध्ये तयार झालं, सगळीकडे आनंदच आनंद असेल.. 

समाप्त:


माझी कौटुंबिक लघुकथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका.. तुमचा एक लाईक लिहिण्यास प्रोत्साहन देते..
धन्यवाद