Jan 19, 2022
नारीवादी

सासू सून सेम टू सेम

Read Later
सासू सून सेम टू सेम

 

 

 

 

 

 

 

नीरज आणि नुपूरचा प्रेम विवाह. एकमेकांना साजेल शोभेल अशी जोडी. लग्ना आधी तीन वर्ष एकमेकांना ओळखत भेटत होते दोघे. एकाच ऑफिस मध्ये नोकरी करत असल्याने भेट झाली, पुढे मैत्री, प्रेम आणि आत्ता घरच्यांच्या समत्तीने लग्नं देखील झालं!

नीरज, हा सुषमा आणि विजय ह्यांचा एकुलता एक मुलगा. नुपूरच्या रूपाने घरात मुलगी आली ह्या आनंदाने  सुषमा खूप खुश होती. नूपुरसाठी काय करू अन् काय नको असं झालं होतं! लग्ना आधी पासून नूपुरचे घरी येणं जाणं असल्याने तिला सासर, तिथली इन मीन दोन माणसं, सासू सासरे काही परके नव्हते. घरात नुपूर सहज रुळली.

नुपूरमध्ये सुषमा आपल्या मुलीला पहात होती. तिला नेहेमी वाटे आपल्याला दुसरी मुलगी व्हावी. पण सुष्माच्या सासूबाईंनी ऐकवलं होत तिला, "हवयं कशाला दुसरं मुल? एक मुलगा झाला, चांगलं आहे की, अजून जबाबदारी दुसऱ्या मुलाचा खर्च झेपणारे विजयला? तुझी देखील तब्येत नाजुक! झाल ते बास आहे सुषमे".

घरात मुलगी असावी ही सुषमाची इच्छा, नुपुरच्या रूपाने पुर्ण झाली! नुपूर सुधा, सुषमाला हक्काने, प्रेमाने 'ए आई ' हाक मारायची. सासू सून जोडी छानच जमली होती. त्या दोघीच कधी शॉपिंगला, कधी पाणीपुरी खायला, कधी सिनेमाला जात! महिन्यातून एक दोन वेळा सासुसून स्पेशल वीकेंड असायचा.

नुपूर सुषमा खरेदीला गेल्या की येताना हमखास एक सेम सेम ड्रेस/ कुर्ता विकत घ्यायच्या. घरी आल्या की मग काय, ड्रेस घालून फोटो सेशन असायचे. सासू सून मॉडेल तयार होऊन, निरजला फोटो काढण्याचे काम असायचे. धमाल करत दोघी! ह्या कार्यक्रमाची सांगता मग सोशल मीडिया वर फोटो टाकून होत.

सुरवातीला नुपूरला खूप मज्जा वाटत होती. सासू बरोबर छान सुर जुळलेत ह्या पेक्षा दुसरं सुख ते काय! तिच्या सगळ्या लग्नं झालेल्या मैत्रिणींना नुपुरचा हेवा वाटायचा.नुपूर हे सगळं खूप एन्जॉय करत होती. पण काही महिन्यांनी तिला वाटू लागले,' सारखं काय सासूबाई मला कॉपी करता, सेम ड्रेस एखाद्या वेळेस बरा वाटतो, पण आता झाले चार पाच सेम ड्रेस, बास आता !'

नुपूर निरजच्या लग्नात देखील सुषमानी, नुपूर सारखी पिवळी नऊवारी नेसली. तेव्हा नुपुरला वाटलं 'मी नवरी आहे, माझ्या सारखं काय पोशाख परिधान करायचा?' अर्थात नवरी ती नवरी असते! लग्ना सगळ्यांत सुंदर, उठून नुपुरच दिसत होती. लग्नात नुपूरच्या काही मैत्रिणी म्हटल्या होत्या  "काय सासू सून ट्विनिंग केलय"! (ट्विनिंग म्हणजे सेम पोशाख घालणं) तेव्हाच तिला चिडवत होत्या, पण नुपूरने तेव्हा दुर्लक्ष केले.

आता जेव्हा नुपूर सोशल मीडिया वर तिचे आणि सुशमाचे सेम ड्रेसचे फोटो टाकायची तेव्हा देखील मैत्रिणी तिला चिडवायच्या! तिने हळू हळू फोटो पोस्ट करणे बंद केले!सासू बरोबर खरेदीला देली तरी सेम ड्रेस घेणं ती आता टाळू लागली. तिला आता मज्जा वाटण्या ऐवजी ह्याचा त्रास होऊ लागला! तिला वाटू लागले सासूबाई जरा जास्तच करतात! सारखे काय सेम ड्रेस घायाचे! माझ्याशी कसली बरोबरी करत आहेत.  'नशीब मी जीन्स टॉप, स्कर्ट , फ्रॉक घालते तसं नाही काही घालत ह्या'ती मनाशी पुटपुटली!

त्या दिवशी तिने निरज कडे विषय काढला,
"निरज, तू आईला समजाव प्लीज, मला ते सेम सेम बोर झालं, काय सारखं तेच! बाहेर भटकणे, खाणे पिणे ठीके, पण माझ्या सारख्या ड्रेस उप होऊन आई काय तरुण दिसणारे का? "

" अरे मला वाटलं तुला आवडतं हे सगळं"

" आवडत होतं, आता नाही....."

"का ग....आता का नाही?"

" मैत्रिणी काय काय बोलतात मला ...सारख्या चिडवतात"

" चिडवतात... अगं मग चिडवून देत, त्यांना असं सगळं कुठे त्यांच्या सासू बरोबर करता येतं, त्या तुझ्या मैत्रिणी जळतात ग राणी तुझ्या आणि तुझ्या सासूच्या नात्यावर!"

"ते मला नाही माहित, तू बोल आईशी प्लीज"!

"अगं, तू पण हे सगळं बोलू शकतेस, सांग आईला त्यात काय एवढं. तुमची चांगली गट्टी जमलीये मग तूच बोल की...."

" नाही नको. मी नाही सांगत, आईला कसं वाटेल,....नको नको....तूच सांग"

"ओ के.... मी करतो काहीतरी...."

निरजने बाबांशी बोलायचे ठरवले. आईशी बोललो तर तिला वाईट वाटेल. निरजला आईला दुखवायचे नव्हते. त्याने बाबांना सांगायचे ठरवले. त्या दिवशी बाबा आणि तो घरात असताना सगळा प्रकार त्याने खुलेपणाने बाबांना सांगितला. नुपुरच म्हणणं निरजने बाबांना सांगितलं, दोघांनी त्यावर सविस्तर चर्चा केली!

विजय ह्यांना एका बाजूने नुपूरचे म्हणणे पटत होत, पण आपल्या पत्नीची, सुषमाची बाजू देखील त्यांना चांगलीच माहीत होती! नाण्याला नेहेमी दोन बाजू असतात, आणि नुपूरला एकदा तरी सुषमाची बाजू सांगायची असं त्यांना वाटत होते. त्यावर नुपूर काय म्हणले, ह्या वरून आपण सुषमाशी बोलायचे त्यांनी ठरवलं!

त्या दिवशी नीरज, आईला घेऊन बाजारात गेला असताना,नुपूरशी बोलायची हीच योग्य वेळ आहे असं विजयरावांना वाटले. त्यांनी नुपूरला आवाज दिला....

" बेटा, तुला वेळ असेल तर मला जरा महत्वाचं बोलायच आहे...."

" हो ... बोलाना बाबा....काय झालं?"

" अगं,मला निरज बोलला, तुला काही वेळा सुषमाच वागणं पटत नाही, तिचं ते तुझ्या सारखं ड्रेस, कपडे घेणं तुला पसंत नाही ते...."

" हो,...म्हणजे मला...ते...."

" अगं बरोबरच आहे पोरी तुझं, तुला वाटतं त्यात काही गैर नाही. मी सुषमाशी बोलेन ह्या बद्दल, आणि समजावे हो तिला ,पण त्याआधी मला, तुला काही सांगायचं आहे"


"कसं आहे ना बेटा, तुला वाटत असेल, ही तुझी सासू, तुला कॉपी करते किंवा तुझ्याशी स्पर्धा करते. पण तसं नाहीये ग. खरं तर सुषमाच ना स्वतःची आवडी निवडी जपण, मनमुराद कुठल्या गोष्टींचा आनंद घेण, ते पंजाबी ड्रेस, कुर्ता घालणं, हे सगळं राहूनच गेलं ग!"

"माझ्या आईला, म्हणजे सुषमाच्या सासूला हे असं सगळं आवडत नसे, तिला सासुरवास असायचा माझ्या आईचा. माझ्या आई समोर मी तेव्हा सुषमासाठी काही बोलू शकलो नाही, पण आत्ता मला माझ्या पत्नीची बाजू मांडायची आहे! "

" सुषमाला मुलीची खूप हौस, तिला दुसर बाळ हवं होतं.पण खरं सांगतो माझ्या तेव्हाच्या बेताच्या पगारात, हम दो, हुमरा एकच परवडणार होत. तिने आपलं मन मारून माझा अन् माझ्या आईचा निर्णय मान्य केला. आहे त्या परिस्थितीत सुखाने माझ्याशी संसार केला! कधी कुठली किर किर - कट कट नाही की वाद नाही!"

" कायम मला साथ दिली. घर, सासू, निरज सगळ व्यवस्थित सांभाळलं! कधी कुठली तक्रार नाही.ह्या सगळ्यात तिच्या आवडी निवडी, मौज मजा सगळं बाजूला पडत गेलं.माझ्या वृध्द आईचं आजारपण, तिची सेवा मनोभावे सुषमाने  केली. आई काही वर्षांनी देवा घरी गेली. निरज मोठा झाला, आम्हाला थोडा वेळ मिळाला आमच्या साठी."

" आमचं नवीन लग्न झालं, तेव्हा असं बाहेर फिरणं, खाण, नाटक- सिनेमा बघायला जाणं वगैरे माझ्या खिशाला परवडणार नव्हतं. माझ्या आईच्या सांगण्यावरून कायम सुनेने साडी नेसावी, म्हणून सुषमाचे पंजाबी ड्रेस घालणं बंद झालं. अगं एक मोग्र्याच्या गाजाऱ्यावर देखील सुषमा खुश होत असे! पण तेव्हा मलाच फार वाईट वाटायचं, मी सुषमाची कसलीच अपेक्षा, इच्छा पूर्ण करू शकलो नाही "

"कालांतराने परिस्थिती बदलली, घरात पैसा आला, पण आता दोधांनीच कुठे जावं, तर नीरजचे शिक्षणाची महत्त्वाची वर्षे होती. त्यामुळे तेव्हा राहून गेलं.तू सून म्हणून लग्नं करून घरात आली, आणि तिची मुलगी असावी ही ईच्छा पुर्ण झाली.तू तिची मुलगी, तिची बहीण, तिची सखी, सगळच झालीस. तुझ्यावर खूप जीव आहे सुषमाचा, अगं निरज पेक्षा जास्त तुझ्या वर प्रेम आहे तिचं. ती बाहेर जेव्हा नातेवाईकांनकडे तुझ्या बद्दल भरभरून बोलत असते तेव्हा तिच्या चेहर्यावरील भाव मी पाहतो, खूप सुख समाधान असतं ग! ती तुझी स्तुती करताना कधी दमतच नाही!"

" तुझ्या बरोबर बाहेर जाणं, खरेदी करणं, ते सेम सेम ड्रेस घेणे, मग तुमचं फोटो सेशन, तो दिवस म्हणजे सगळ्यात आनंदी दिवस सुषमाच्या आयुष्यातला. मी तिच्या चेहर्यावर पाहतो ना, ते सुख असं ओसंडून वाहताना...."

सासऱ्यांचे हे बोलणे ऐकत असताना नुपूरच्या तोंडून शब्द फुटत नव्हता पण डोळ्यांतून अश्रू मात्र ओघळत होते.....तिला मनोमन तिची चूक उमगली.....सेम सेम ड्रेस घालून, आई लेकीचे फोटो सेशन, सहज गप्पा, खरेदी, पाणीपुरी , सिनेमा कित्ती लहान सहान गोष्टी ह्या,पण कित्ती सुखावून जात सासूबाई हे तिला पटलं....

" बाबा, तुम्ही आईशी नका काही बोलू. मला आई बरोबर खुप आवडत हे सगळं करायला, आम्ही सासू सून सेम सेम छान आहेत! लोकं काय उगाच बोलतात! निरजच म्हणणं बरोबर होत,ज्या माझ्या मैत्रिणींना माझ्या सारखी गोड प्रेमळ सासू नाही, त्यांना माझा आणि आईचा फोटो पाहून, आमचं नातं पाहून हेवा वाटतो.... जळतात त्या माझ्यावर!"

तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली, माय लेक बाजारातून घरी आले. दुपारची जेवणं आटोपली आणि नुपूर सुषमाला बोलली...
" अगं आई , तू आता थोडा आराम कर. एक मस्त झोप काढ आणि फ्रेश हो. आज आपण सासू सून डे सेलिब्रेट करूया! संध्याकाळी पाचला चहा घेऊया अन् निघू भटकायला. आणि अग, किती दिवस झाले आपण सेम सेम कुर्ता घेतला नाही.....आज हो जये शॉपिंग! चालेल ना?"

" चालेल....धावेल....जाऊ की! तुझ्या सोबत ते ट्विंनिग मला नेहेमीच आवडतं! आणि आपलं फोटो सेशन देखील. माझी लेक माझ्या सारखी दिसते हे त्या सेम ड्रेस घातला की मला वाटतं. काय सांगू मला कसं वाटतं ते...."

" मला माहितीये आई, आपण दोघी जगात भारी आहोत ग! आपण दोघी सासू सून सेम टू सेम!!
~~~~~~~~~~~~समाप्त~~~~~~~~~~~~

©तेजल मनिष ताम्हणे

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Tejal Manish Tamhane

Home maker and Private Tutor.

Fun loving , Happy go Lucky person. Likes to write short stories and poems. Best friend of my daughters and a caring person at heart.