सासू सून..भाग ५

पेट्या खरच रिकाम्या असतील का?


"हा बोल ग वहिनी!" मधुरा

"बोल नाही..आता बोलाच. नाही.. मी तर म्हणते आता विचाराच तुम्ही!" मैथिली असंबद्ध बडबडत होती.

"अग वहिनी.. बरी आहेस का ग? काहीही काय बडबड करतेस? काय बोलू..काय विचारू? काय बोलतेस?" मधुरा.

"तुमच्या आईंनी..सगळी इस्टेट श्वेताच्या नावावर केली आहे. मी आत्ताच माझ्या डोळ्यांनी ऐकलं आणि कानांनी बघून आलेय." मैथिली.

"काय काय? कशानी बघितल आणि कुठून ऐकलं? वहिनी मला वाटत तू जरा जास्तच श्वेताचा विचार करते आहेस. हे असल काही दादा समोर बोलू नकोस उगाच चिडेल तुझ्यावर आणि डोकं जरा शांत ठेव." मधुरा समजावणीच्या सुरात बोलली.

"मी शांत राहिले तर भिकेला लागू आम्ही..आणि तुम्ही पण.." मैथिलीने पाहिलेला आणि ऐकलेला सगळा इति वृतांत जश्याचा तसा मधुरा ला सांगितला.

"काय..पेटी? आणि एवढे दागिने..नाही वहिनी..तुझ काहीतरी चुकतंय. माझ्या माहितप्रमाणे आपला वाडा जरी जुना पिढीजात असला तरी दागिने वैगरे काही नाही. मला चांगल आठवत मी लहान असताना बाबांनी दारू आणि तमाशा मधे सगळे दाग दागिने घालवले होते इतकंच काय तर वाड्याचे कागदपत्रं पण गहाण ठेवले होते. त्यावेळी आईने बाबांना पट्ट्याने मारलं होत आणि आजोबा या सगळ्यात आईच्या पाठी खंबीरपणे उभे होते. आजोबांनी या सगळ्यानंतर बाबांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. नानाविविध बायकांशी जवळीक साधून साधून त्यांना रोग झाला होता. आजोबांनी मग बाबांना सोडवून आणल आणि घरी आल्यावर काही दिवसातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. दादाला या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या माहीत आहेत कारण दादा तेंव्हा असेल बारा पंधरा वर्षांचा..तेंव्हा पासून तो आईला कारखान्याच्या कामात मदत करत होता आणि मी घरात.. विशाल जेमतेम पाच सहा वर्षांचा असेल तेंव्हा. ज्या दागिन्यांबद्दल तू बोलतेस तस काहीच नसेल कारण एवढे दागिने असते तर आईने त्यातला एखाद दुसरा दागिना माझ्या लग्नात मला माहेरची आठवण म्हणून नक्कीच दिला असता." मधुरा

"हो, पण मग आताच ही पेटी कुठून आली? तीन महिने झाले श्वेताला घरात येऊन आई सारखं तिच्या नावाचा उदो उदो करत असतात आणि विशाल भाऊजी तर त्यांचे किती लाडके आहेत हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरजच नाही! तुम्हाला नसेल हवी तुमची वाटणी पण मी बोलणार एवढं नक्की. मी खर बोलते म्हणून वाईट आहे मला माहित आहे पण मी यावेळी गप्प बसणार नाही." मैथिली

"तू..आणि खर..वहिनी काय बोलतेस..तू कधी पासून खर बोलायला लागलीस आणि गप्प बसणार नाहीस म्हणजे आल्यापासून कधी काही बोलली नाहीस?"मधुरा फोनवरच मैथीलीची खिल्ली उडवत बोलली.

"हे बघा वन्स..तुम्हाला काही बोलायचं नसेल तर नका बोलू..पण मी विचारणार आहे आज." मैथिली.

"हे बघ वहिनी..दोन दिवस थांब. आई याविषयी काही बोलते का ते बघ आणि जर काही नाही बोलली तर विषय काढ. तरी मी बघते माझ्या परीने काही कळतंय का ते. आणि आपल्या गड्यांना पण भेटते. तसे ते आईच्या विश्वासातले आहेत किती काय सांगतील माहीत नाही पण तरी बघू. " मधुरा मैथिली ला समजावते आणि फोन ठेवते.
दागिने नाही हे खात्रीने माहीत असल तरी मधुराच्या मनाला थोडी चुटुक तर लागलेलीच असते की \"आईने एवढे दागदागिने असून कधी विषय कसा काढला नाही.\" कुठेतरी तिच्या मनाला ही गोष्ट लागली होती.

दोन दिवस उलटून जातात पण घरात कोणीच याविषयी काही बोलत नाही. तिसऱ्या दिवशी न राहवून जेवणाच्या ताटावर असताना मधुरा बोलतेच.

"आई..त्यादिवशी सामान आल होत म्हणे..म्हणजे कुणाचं सामान आल होत ते?"

"आपलच सामान होत. का ग? "

"अग..ते..माझ्या कानावर पडलं होत की त्यात दोन पेट्या होत्या. जड होत्या म्हणे खूप. म्हणजे तस दिसत होत."

"तू पाहिल्यास का? जड दिसत होत्या की हलक्या? सासरी राहून इकडे काय येत त्यात जास्त लक्ष नको घालू आणि हे बघ.. जे काही बोलायचं..विचारायचं असेल ते जेवणानंतर..भरल्या ताटावर नाही..समजल.
श्वेता..मधुराच्या ताटात वरण नाही जरा देतेस का? आणि मैथिलीच्या ताटात मिरची पण वाढ..संपली आहे बघ. माधवा.. ए माधवा..तळघरात जाऊन त्या पेट्या घेऊन ये आणि समोर बैठकीत ठेव." सुनंदा ताई करड्या आवाजात बोलल्या.

"पेट्या रिकाम्या कश्या? म्हणजे.. इतक्या हलक्या कशा दिसताहेत? त्यादिवशी मी त्या पेट्या नेताना पाहिलं होत तर जड दिसत होत्या." मैथिली ताडकन उभी राहते आणि न राहवून शेवटी बोलतेच.

(पेट्या खरच रिकाम्या असतील का? पाहूया पुढील भागात.)

क्रमशः..
@श्रावणी लोखंडे..



🎭 Series Post

View all