Login

सासू सून..भाग ४

काय लिहिलं असेल चिठ्ठीत?


"उगाच चिडचिड करू नको. आईने बोलावलं म्हणजे काहीतरी काम असेल. तुला का एवढा त्रागा करून घ्यायचा असतो प्रत्येक वेळी! तू काय करतेस आणि कशी वागतेस ते बघ आधी आणि मग इतरांना विचारण्याआधी स्वतः ला विचार आपण कुठे चुकतो ते. सारखं आपल मी पणा घेऊन बसायचं!" प्रकाश मैथिली वर चिडून बोलला तशी मौथिली गप्प बसली..पण डोक्यातला संशयाचा किडा काही थांबेना. भरभर आवरून ती सासूच्या खोलीकडे निघाली तेवढ्यात तीच लक्ष सासूच्या खोलीकडे जाणाऱ्या श्वेता कडे गेलं.

हुश््श..अजून ही गेली नव्हती..म्हणजे यांचं काय बोलण होईल ते आता ऐकता येईल मी गुपचूप सासूबाईंच्या खोलीबाहेर जाऊन उभी राहते. मैथिली छातीवर हात ठेऊन दीर्घ श्वास घेत स्वतःशीच पुटपुटते आणि साडीच्या निऱ्या एका हातात वर उचलून पटकन सूनंदा ताईंच्या खोलीबाहेर जाऊन उभी राहते.

"आई..बोलावलं होत तुम्ही..म्हणजे..काही काम होत का?" श्वेता विचारते.

"हो,काम खूप महत्वाचं आहे. सकाळी जे सामान आलय त्या सामानात दोन पेट्या आहेत. पेट्या खूप महत्वाच्या आहेत. तश्या त्या मी तळघरात व्यवस्थित ठेवल्या आहेत पण त्याबद्दल कुणाला कळू नये म्हणून सगळ्यात शेवटी आपल्या दोन विश्वासू गड्यांकडूनच त्या ठेऊन घेतल्यात. त्यांची संपूर्ण जबाबदारी ही तुझ्यावर सोपवायची आहे म्हणून तुला इथे बोलावलं. ह्या घे चाव्या...त्या दोन पेट्यांच्या." हातातल्या चाव्यांचा गुच्छा श्वेता कडे देत सुनंदा ताई बोलल्या.


"अहो आई..पण मला का? नाही म्हणजे..ते.. मैथीली ताई पुन्हा चिडतील आणि विनाकारण माझ्यावर कोणी आरोप केले की मला नाही आवडत ते" श्वेता थोडी नाराजितच बोलली.

"तू तेवढी जबाबदार आणि समजदार आहेस म्हणून तुझ्यावर हे काम सोपवते आहे. बाकी कुणाला काय वाटते याच्याशी मला घेणं देणं नाही." सुनंदा ताई हातातल्या किल्ल्या श्वेताच्या हातात देऊन तिच्या हातावर हात ठेवत बोलल्या.

"अं..आई..एक विचारू का? नाही म्हणजे..त्या पेट्यांमधे काय आहे? " श्वेता.

"त्यात आपले पिढीजात दागदागिने आहेत. हिरे.. मोती..जुन्या घडणावळीचे पारंपरिक दागिने.. ते पण अस्सल सोन्याचे. काही पाचूचे दागिने पण आहेत त्यात.

सुनंदा ताई बोलता बोलता तिच्या हातात एक चिठ्ठी देतात आणि दाराकडे नजर करून हळू आवाजात मैथिली असल्याचं सांगतात.

श्वेता पण काहीही न बोलता हातातली चिठ्ठी मुठीत पकडते आणि काहीही न बोलता तिच्या खोलीत जायला उठते. तशी मैथिली लगेच मोठ्या नक्षीदार खांबापाठी लपते.

"हिऱ्या मोत्यांचे दागिने?आणि सोन्याचे पारंपारीक दागिने? हे सगळ सासूबाई फक्त श्वेताला देणार की काय? नाही..अजिबात नाही..अस नाही होऊ देणार मी. भले आम्हाला मूलबाळ नाही पण तरी आमच्या वाटणीचा हिस्सा आम्हाला मिळालाच पाहिजे. मी आताच वन्स ना सांगते याबद्दल सगळ." मैथिली स्वतःशीच बडबड करत होती आणि सुनंदा ताई त्यांच्या खोलीतूनच मैथिलीचे बदलणारे भाव बघून एकट्याच हसत होत्या.

इकडे श्वेता खोलीत येऊन आधी दार लावून घेते आणि बेडवर बसून चिठ्ठी खोलते. चिठ्ठी वाचता वाचता तिचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि ती एकदमच हसू लागते; कधी चावी कडे बघून तर कधी.. हातातल्या चिठ्ठी कडे बघून .
(चिठ्ठी वाचून श्वेताला एवढं हसू का आल असेल?काय असेल चिठ्ठीमधे? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे...

🎭 Series Post

View all