सासू नावाचा चष्मा

A Short Story Of Newly Married Woman And Her Mother In Law
सासू नावाचा चष्मा


ऑफिसचा लंच टाईम सुरू होता. समिधा आणि तिच्या मैत्रिणी कॅन्टीनमध्ये डब्बे खात गप्पा करत बसल्या होत्या. सगळ्यांचा आवडता "सासू" नावाचा विषय सुरू होता.


"माझी सासू तर सारखी किरकिर करत असते, हे केलं नाही, ते केलं नाही, हे असंच केलं, हे तसंच केलं." एकजण म्हणाली.


"हो नाही तर काय, माझ्या घरी तर सतत सुरू असतं... आमच्या काळी आम्ही असं नव्हतो करत, तसं नव्हतो करत, पहाटेच उठायचो, सगळी कामं आवरायचो, तुमच्यासारखं नाही उठलं की निघाले बाहेर." दुसरी स्वतःचं सांगत होती.


"आपण कितीही मरमर करून काम केलं ना तरी या सासवांना त्याची किंमत नसते. यांना आपल्या मुलाचंच कौतुक. तो ऑफिसला जातो, किती काम करतो, थकतो… आपण काय इथे येऊन झोपा काढतो का?" तिसरी नाक मुरडत बोलली.


"आमच्या इथे तर घरातली इकडची वस्तू तिकडं केली की लगेच कपाळावर आठ्या येतात. स्वयंपाक घरातले तेच जुने-पुराने डब्बे आहेत त्याच ओळीने ठेवायचे. जरा इकडचा डब्बा तिकडं झाला की सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो. काही नवीन घ्यावं म्हटलं की लगे काटकसरीचे धडे मिळतात… जीन्स नाही घालायची… इकडून-तिकडून घातलीच तर लगेच टिकली नाही लावली मंगळसूत्र नाही घातलं म्हणून बडबड सुरू होते." चौथी त्रासिकपणे बोलत होती.


"हो ना गं, आमच्याकडेही तसंच. माझ्या नवऱ्याने कधी मला मदत करायचा प्रयत्न जरी केला तर लगेच बायकोचा बैल झाला का म्हणून बोलणं सुरू होतं. माझे सासू सासरे तर साधं संध्याकाळचा चहासुद्धा बनवून घेत नाहीत. आपण एवढं थकून भागून घरी जा आणि घरी गेल्यावर यांच्या हातात गरम चहाचा कप द्या." पहिलीचं दुःख जरा जास्तच होतं. समिधा सगळं केविलवाण तोंड करून ऐकत होती.


"का गं समिधा, तुझा चेहरा का पडलाय?" दुसरीनं तिला विचारलंच.


"समिधाचं काय बॉ…! मज्जा आहे… मस्त राजा राणीचा संसार! वाटलं तेव्हा हिंडायला फिरायला जा, स्वयंपाक करायचा कंटाळा आला की हॉटेलमध्ये जेवायला जा. नाही तर आमच्याकडे! बाहेर जेवायला जायचं म्हटलं की सासू सासरे येणार नाहीत… मग काय… मेलं घरात स्वयंपाक करा अन् बाहेर जेवायला जा… जरा एखाद्या वेळेस पोळ्या करा म्हटलं तर लगे यांचे गुडघे दुखतात… पण भजन कीर्तन करायला, संध्याकाळी जोडीनं गार्डन मध्ये हिंडायला, तेव्हा गुडघे नाही दुखत… सगळं मरमर करून आपणच खपायचं अन् पुन्हा यांचेच उपदेशाचे डोस ऐकायचे… एक कामवाली नाही टिकू देत घरात… अन् मग मदत करायला जोरही नसतो अंगात…" पहिली जरा जास्त सासुरवाशीण होती.


लंच टाईम संपला, पुन्हा सगळ्या आपापल्या कामाला लागल्या. सगळ्यांच बोलणं ऐकून समिधाच्या डोक्यात विचारांचा भुंगा गुणगुणत होता. ऑफिसमध्ये कामात लक्षच लागत नव्हतं तिचं, त्यामुळं ऑफिसचा वेळ कसा संपला हे तिला कळलंच नाही.


"सहाच तर महिने झालेत लग्नाला. लग्न झाल्यावर सुरुवातीचे दोन-चार दिवस रीती-रिवाज, पूजा- देवदर्शन यात गेले. नंतरचा आठवडा हनिमून आणि त्यानंतर अजितचं प्रोजेक्ट सुरू होणार होत म्हणून लगेच इकडे आलो राहायला. सासूबाईंचा सहवास तसा काही मिळालाच नाही. या सगळ्या बोलत होत्या त्याप्रमाणे जर खरंच असेल तर कसं होईल? त्यात उद्या सासूबाई- सासरे इकडे येणार! किती दिवस राहतील काय माहिती? त्यात उद्या परवा दोन दिवस सुट्टी! ऑफिसचा बहाणा करून घरातून निघताही येणार नाही." विचारातच समिधा घरी आली. तिच्या डोळ्यावर \"सासू\" नावाच्या व्यक्तीकडे बघायला आज खूप विचारांचे चष्मे लागले होते… ते म्हणतात ना, \"ज्या रंगाचा चष्मा घालू, त्या रंगाची दुनिया दिसते,\" अगदी त्याप्रमाणेच समिधाचं झालं होतं.


घरात आल्या आल्या तिने घरावर एक नजर फिरवली. सगळं घर स्वच्छ आणि टापटीप होतं. लग्नाच्या आधीच अजितने हा फ्लॅट विकत घेतलेला होता. सासूबाई अधून-मधून येऊन जाऊन असायच्या त्यामुळे त्यांनी बरच सामान आधी घेऊन ठेवलं होतं. समिधा घरात आल्यावर तिने या घरात बरेच बदल केले होते. पुष्कळशा नवीन वस्तू आणल्या होत्या. बरचसं आधुनिक पद्धतीने घर सजवलं होतं.


संध्याकाळी अजित ऑफिसमधून आला तर त्याला समिधा थोडी शांत वाटली. ऑफिसचं काही टेंशन असेल म्हणून त्याने खूप खोदून तिला काही विचारलं नाही.


"समिधा, आई-बाबा सकाळी सहा वाजता पोहोचतील. तू सोबत येशील का स्टेशनवर त्यांना घ्यायला?" अजित.


"जाऊन ये ना तू, तोपर्यंत मी माझं आवरून घेईल सकाळी." समिधा.


रात्रीची जेवणं झाली, अजित लॅपटॉपवर काम करत होता. विचारांच्या तंद्रीत समिधाला झोप लागून गेली. सकाळी अलार्मच्या आवाजाने ती उठली. तिने अजितला उठवलं. तो फ्रेश होऊन स्टेशनवर गेला. समिधा पटापट सगळं आवरायला लागली. घर झाडलं, फारशी पुसली, फ्लॅटच्या दारात छोटीशी रांगोळी काढली. अंघोळ वगैरे करून रेडी झाली तोपर्यंत अजित परत आला. तिने दरवाजा उघडला. सासू-सासरे अगदी प्रसन्न मुद्रेने तिच्या कडे बघून गोड हसले, ते पाहून तिच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तिने त्यांच्या हातातल्या बॅग घेतल्या. सासूबाईंनी घरात आल्या आल्या सगळ्या घरावर नजर फिरवली, समाधानाची लकेर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवली. सासू-सासरे दोघेही फ्रेश होत होते, तोपर्यंत समिधाने चहा ठेवला.


"दोन मिनिटात आलो," म्हणत अजित बाहेर जायला निघाला. खरंतर अजितने आता बाहेर जाऊ नये असं समिधाला खूप वाटत होतं; पण ती चूप राहिली. चहा उकळेपर्यंत अजित परत आला.


"हे घे… बाबांच्या आवडीचे ब्रेड… आईच्या आवडीची खारी…" अजित पिशवीतून सामान काढत होता. "श्रावणबाळ... आईवडीलांच सगळं लक्षात राहतं…" समिधाच्या डोक्यात किडा वळवळत होता आणि त्याच विचारांचा चष्मा डोळ्यांवर चढला होता.


"आणि हे तुझ्या आवडीचे टोस्ट…समिधा.. अगं कुठे हरवलीस?" अजितच्या आवाजाने समिधा भानावर आली. समोर टोस्ट बघून तिच्या डोक्यातला विचाराचा एक किडा मरून गेला आणि डोळ्यांसमोरचा एक चष्माही निघून गेला. सगळे चहा घेत गप्पा करत होते, समिधा तेवढी शांत होती. सासूबाईंच्या ते लगेच लक्षात आलं.


"समिधा… घर मस्त सजवलस तू. दारात रांगोळीसुद्धा सुरेख काढलीस. ए… हा फ्लॉवर पॉट कुठून घेतला? आणि गॅलरीत लावलेले ते विंड चिम ? मस्त आहेत दोन्ही. पुढच्या वेळी माझ्यासाठी पण असं वेगळं काही दिसलं की घेत जा." सासूबाई घरातल्या वस्तू न्याहाळत बोलत होत्या, समिधाचं कौतुक करत होत्या; त्यामुळे समिधाच्या मनावरचा ताण बराच कमी झाला होता.


"नाश्त्याला काय बनवू?" समिधाने सासूबाईंना विचारलं.


"नाश्त्याला… ए अजित… ते कोपऱ्यावरच हॉटेल उघडलं असेल ना? मस्त वडा सांबर आण सगळ्यांसाठीच… आणि हो ती खोबऱ्याची चटणी जरा जास्त आण…" सासूबाईंच्या या वाक्याने समिधाला आश्चर्याचा धक्का बसला.


"चालेल ना तुला समिधा? आता वडा सांबर खाऊ मग जेवणाचं बनवता येईल सावकाश." सासूबाई

"हो. चालेल की." समिधा म्हणाली. "जेवणाची टांगती तलवार अजून डोक्यावरच आहे का?" तिच्या डोक्यात विचार येऊन गेला.


सगळ्यांनी मस्त नाश्ता केला.


"जेवायला काय करू?" समिधाने सासूबाईंना विचारलं.


"तुझ्या आवडीने काहीही कर. तुझ्या चवीने भाजी बनव. मी पोळ्या करते." सासूबाईंच्या या उत्तराने समिधाला अजून आश्चर्य वाटलं. तिच्या डोळ्यांवरचा \"सासूबाई\" नावाचा एक चष्मा गळून पडणार होता; पण "आजच आल्या आहेत म्हणून असं म्हणत असतील. दोन-चार दिवसात कळेलच खरं." या विचाराने तिने पुन्हा तो चष्मा वर सरकवला.


समिधा भाजी करत होती, सासूबाई एकीकडे पोळ्या लाटत होत्या.


"समिधा, बरं झालं तू ते जुने डब्बे काढून टाकले. अग मी तात्पुरते घरचेच आणले होते. चहा साखरेचे पण काचेचे घेतलेस ते बरं केलं. मला काचेचे घ्यायचे होते गं; पण म्हटलं अजित एकटा राहतो इथे उगी त्याच्या हातून फुटेल. फुटण्यापेक्षा ते उचलताना हाताला दुखापत करेल ते वेगळं. म्हणून मी नव्हते घेतले बघ." सासूबाई पोळ्या लाटत बोलत होत्या. समिधा आश्चर्याने सासूबाईंकडे बघत होती. समिधाने केलेली वांग्याची भाजी सगळ्यांनी आवडीने खाल्ली. जेवणानंतर सासूबाईंनी तिला सगळं आवरण्यात मदत केली.


"आता मात्र मी थोड्यावेळ पडते, तू पण पड गं थोडी. रोज ऑफिस असतं. आराम कर तू पण." सासूबाई असं बोलून थोडावेळ झोपायला गेल्या. समिधासुद्धा सकाळपासूनच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत पडली. पडल्या पडल्या तिचा डोळा लागला. तिला जाग आली ती अद्रक, विलयचीच्या वासाने. ती घाई घाईत स्वयंपाक घरात गेली. सासरेबुवा चहा बनवत होते.


"मी केला असता ना, तुम्ही राहू द्या." समिधा चाचरत बोलली.


"अगं, माझ्या हातचा चहा पिऊन बघ! रिटायर्ड झाल्यापासून रोजच दुपारचा चहा मीच बनवत असतो." सासरेबुवा म्हणाले. समिधासाठी हा अजून एक धक्का होता. सगळे चहा घेत होते.


"आज बाहेर जायचं का जेवायला?" अजितच्या या प्रश्नावर सासूबाई काय उत्तर देतात त्यासाठी समिधाने कान टवकारले.


"हो जाऊ की. चांगलं चायनीज कुठे मिळतं? तिथं जाऊ." सासूबाई म्हणाल्या, समिधा त्यांच्याकडे बघत राहिली.


रात्री जेवायला जायला समिधा तयार होत होती. तिने कपाटातून जीन्स आणि टॉप काढला. "जीन्स टॉप घातला की मग टिकली नाही लावली, बांगड्या नाही घातल्या म्हणून सासवा भणभण करतात" समिधाला कालची चर्चा आठवली. तिने जीन्स ठेऊन दिला आणि लेगिन्स कुर्ता घातला. छानशी तयार होऊन बाहेर आली. समोरच दृश्य तिच्यासाठी अजून एक धक्का होता. तिच्या सासूबाई छान जीन्स, त्यावर लॉंग कॉटनचा टॉप आणि शोभतील असे कानातले आणि नाजूक मंगळसूत्र घालून उभ्या होत्या. समिधा त्यांच्याकडे बघतच राहिली.


"काय… ? मस्त दिसतेय ना…? जैसा देस वैसा भेस… " अस असतं आपलं तर सासूबाई तिच्याकडे डोळे मिचकावत बोलल्या. बाहेर गेल्यावरही सासू- सासऱ्यांचं दिलखुलास वागणं, बोलणं समिधाला अचंबित करणारं होतं.


रात्री समिधा दिवसभराच्या गोष्टींचा विचार करत झोपली. शनिवार- रविवार तर बिना कुरबुरीचे मस्त गेले.


"उद्यापासून ऑफीस, आता खरी कसरत होईल. सकाळी लवकरच उठेन म्हणजे पटापट सगळं आवरलं जाईल. अजित त्याची आई आहे तर काही मदत करणारच नाही. त्यापेक्षा माझं मीच भरभर सगळं आवरून घेईल." समिधाने अगदी दुसऱ्या दिवशी भाजी कोणती बनवायची हा सगळा विचार करून दुसऱ्यादिवशीचा प्लॅन तयार केला आणि झोपून गेली. सकाळचा अलार्म वाजला, दोन मिनिटं झोपते म्हणून तिने परत डोळे बंद केले. जाग आली तेव्हा अर्धा तास होऊन गेला होता. ती हडबडून उठली, पटापट फ्रेश झाली, केस क्लचरमध्ये बांधत स्वयंपाक घरात गेली. सासूबाई कणिक मळत होत्या, सासरेबुवा चहा करत होते आणि अजित भाजी चिरत होता. समिधाला हे सगळं बघून ओशाळल्यागत झालं.


"राहू द्या ना. मी करते सगळं." समिधा चाचरत बोलली. सासूबाई आता खडे बोल बोलतील याची तिच्या मनाने तयारी केली होती.


"उठलीस होय. चला सगळे मिळून चहा घेऊ." सासरेबुवा म्हणाले.


"आम्ही तरी बसल्या बसल्या काय करणार? कामात चांगला वेळ जातो. सगळे कामं सुनेनेच केले पाहिजे असा काही नियम आहे का? घर सगळ्यांचं आहे, सगळ्यांनी त्याला हातभार लावला पाहिजे. तू पण तर अजित इतकंच काम करते ना. मी तर म्हणेल जास्तच करतेस. घरातलं सगळं स्त्री जबाबदारीने करत असेल तर बाकीच्या लोकांनी तिला हातभार लावायला हवा, नाही का?अजितला मी सगळे कामं शिकवलेत बरं. या ठोंब्याला तू काम करू देत जा आणि यानी नाही केलं तर मला सांगत जा. मी चांगले कान पिळेल त्याचे." सासूबाईंच्या वाक्यावर सगळे खळखळून हसले.


समिधाच्या डोळ्यावरचे "सासूबाई" नावाचे सगळे चष्मे गळून पडले होते. सासूबाई आल्यापासून तिला घरात एक नवीन मैत्रीण मिळाली होती. हसत खेळत दिवस जात होते. बघता बघता सासूबाईंच्या जायचा दिवस उजाडला.


"आई, थांबा ना अजून काही दिवस." समिधा.


"अगं, येईल की मी परत. आता गेले तर परत भेटायची मजा अजून वाढेल ना. "सासूबाई बोलल्या आणि समिधा त्यांच्या गळ्यात पडली.


"सासू नावाच्या बागुलबुवाची भीती गेली का मग?" सासूबाईंनी विचारलं तसं समिधा थोडी बावरली.


"तुम्हाला कसं कळलं?" समिधा.


"अगं आम्ही आलो त्याच दिवशी तुझ्या नजरेत जाणवलं. घरात नव्याने आलेल्या स्त्रीला घरातल्या जुन्या स्त्रीनं समजून घेतलं की घराचं गोकुळ होतं बघ, आमच्या सासूबाई म्हणायच्या. मी बस तेच केलं." सासूबाई प्रेमाने समिधाच्या डोक्यावर हात फिरवून निघून गेल्या.


समिधा ऑफिसमध्ये गेली. लंच टाईममध्ये आज पुन्हा \"सासू\" नावाचा विषय सुरू झाला होता.


"मान्य आहे तुमच्या सासवा खराब; पण एक तर चांगला गुण असेल ना त्यांच्यात आज तेवढाच सांगून बघा." समिधा विषय बदलत बोलली.


"ए… हो… खरंच की… सासू सासरे घरात आहेत म्हणून मुलं पाळणाघरात सोडायची गरज नाही." एकजण बोलली.


"हो ना गं… कामवाल्या बाईच्या भरवश्यावर घर सोडायची गरज नाही. कधी बाई आली नाही तर अंगावर एवढं काम पडत नाही." दुसरी म्हणाली.


"माझ्या सासूबाई ना खूप छान विणकाम करतात. ए .. मी तुम्हाला दाखवायला आणेल." तिसरी बोलत होती.


"अगं माझ्या सासूच्या हातची कारल्याची भाजी खाऊन बघा कधी, कडू मुळीच लागत नाही." चौथी बोलत होती. बघता बघता सगळ्याजणी आपापल्या सासवांविषयी चांगलं बोलायला लागल्या.


"अय्या… आपल्या सासवा एवढ्या पण काही वाईट नाहीत की. आपण बाई उगीचच त्यांच्या नावाणे शंख फुकत होतो."

सर्वांचं एकमत झालं.


समिधाच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्याची लकेर उमटली.


( कसं आहे ना, नातं कोणतंही असो, सासू-सुनेचं, नणंद-भावजयीचं, नवरा-बायकोचं, बहिणी-बहिणीचं किंवा भावा-भावाचं वाईट आठवलं की चांगुलपणाचा विसर पडतो आणि वाईट आठवणीच मनात घर करून राहतात. त्यापेक्षा चांगल्या आठवणी जपल्या तर नाती सुदृढ राहतील.)

फोटो-गुगलवरून साभार
(कशी वाटली ही लघुकथा नक्की सांगा. आवडली तर लाईक करायला विसरू नका.)


© डॉ. किमया मुळावकर