सासू माझी नवसाची.. अंतिम भाग

कथा नवसाने मिळालेल्या सासूची


सासू माझी नवसाची.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की मंगलाताई प्राचीशी फार प्रेमाने वागतात. त्यामुळे प्राची खुश होते. प्राची आणि पार्थचे लग्न ठरते. आता बघू पुढे काय होते ते.


"आई, आम्ही ना आज तुमच्यासाठी या साड्या घेतल्या." प्राची कौतुकाने मंगलाताईंसाठी घेतलेल्या साड्या त्यांना दाखवायला आली होती.

""कोणी सांगितलं होतं हा नसता उद्योग करायला?" मंगलाताई कडाडल्या. तो आवाज ऐकून प्राची घाबरली.

" ते.. ते.."

" बोलती बंद झाली का तुझी? बोट दिलं म्हणून हात धरायला गेलीस. तुझी खरेदी करायची संधी तुला दिली होती ना. मग माझ्या गोष्टीत नाक खुपसायला कोणी सांगितले होते." इतके दिवस छान बोलणार्‍या मंगलाताई अचानक का अशा बोलायला लागल्या तेच प्राचीला समजेना. तिने अपेक्षेने पार्थकडे बघितले. तो मान खाली घालून उभा होता. काहीच न बोलता त्या साड्या उचलून प्राची घरी गेली.

" मी हे लग्न करणार नाही.." प्राचीने रडत बोलायला सुरुवात केली. रूखवताची तयारी करत असलेली तिची आई घाबरली.

" अग, पत्रिका वाटून झाल्या. सगळी खरेदी झाली. मग अचानक? कोण काही बोललं का?"

" आई, त्या मला खूप बोलल्या." प्राचीच्या डोळ्याला धार लागली होती.

"अग पण म्हणून कोणी लग्न मोडतं का?" आई समजावत होती.

"त्या कश्या बोलल्या माझ्याशी. मी तर देवाला नवस केला होता चांगली सासू मिळावी म्हणून. तरिही हे असं?" प्राचीचे रडू संपत नव्हते.

" कारण असं नवस करून किंवा बोलून आपल्याला हवी तशी माणसे मिळाली असती तर आयुष्यात अजून काय हवे होते?" मंगलाताईंचा आवाज आला. ते ऐकून प्राची आणि तिची आई पटकन उठल्या.

" तुम्ही इथे? अजून काय बोलायचे आहे?" प्राचीने विचारले.

" प्राची.." आईने आवाज दिला.

" बोलू दे तिला स्मिता. चिडली असेल ती." मंगलाताईंचा आवाज परत सौम्य झाला होता.

" अग पण मंगला.." आईने बोलायचा प्रयत्न केला.

" एक मिनिट.. तुम्ही एकमेकींना ओळखता?" मंगलाताईंसोबत आलेल्या पार्थने विचारले.

" हो.. तुमच्याच कृपेने.." स्मिताताई बोलल्या.

" समजेल असं सांगा ना.." प्राची गोंधळून बोलली.

"आमच्या दोघींची ओळख झाली ती मागच्या वधूवरसूचक मंडळाच्या मेळाव्यात. आम्ही दोघीच अशा होतो ज्यांची मुले सोबत नव्हती. नाईलाज म्हणून बोलू लागलो. त्यातून एकमेकींचा स्वभाव आवडला. मग मैत्रीच झाली. तिने मला प्राचीचा फोटो दाखवला. मी तिला पार्थचा. इतकी सुंदर, गुणी मुलगी असून लग्न न जुळण्याचे कारण म्हणजे तिच्या सासूबद्दलच्या अटी.. हे ऐकून मला हसू आले." मंगलाताई सांगत होत्या.

" हो ना.. त्यात प्राचीचे मनाजोगती सासू मिळावी म्हणून उपवास काय, नवस काय. तिला यातून कसे काढावे तेच सुचत नव्हते. म्हणून मग मंगलानेच मला ही आयडिया दिली. तिने मुद्दाम पार्थला मंदिरात पाठवले. तुम्ही एकमेकांशी बोललात तिथेच आमचे अर्धे काम झाले. नाहीतर आम्हाला तुमची भेट होण्यासाठी दुसरी युक्ती शोधावी लागली असती." स्मिताताई सांगू लागल्या.

" तुम्ही आम्हाला फसवलं?" पार्थने अविश्वासाने विचारले.

" नाही.. पण तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढायचा प्रयत्न केला. मला सांग प्राची, एखादी बाई तुझ्याशी आधी खूप छान वागली आणि नंतर वाईट वागली असती तर तू काय केले असतेस?"

" त्यासाठी तर नवस करत होते." प्राची मान खाली घालून म्हणाली.

" माणसं असतात ना ती परिस्थितीनुसार बदलतात. मलाच बघ ना. लग्नाआधी नटायची, थटायची, फिरायची फार आवड होती मला. पण लग्नानंतर यांना त्यांच्या भागीदाराने फसवले आणि यांचा काम करण्याचा आत्मविश्वासच गेला. हातात पैसा नाही. घरातल्यांनी तोंड फिरवलेले. अशावेळेस मी पदर खोचून कामाला लागले. कामे करताना सगळी हौसमौज गुंडाळून ठेवली. आणि अशी कडक झाले आहे. मी शोधत होते माझ्यानंतर माझ्या लेकाच्या खांद्याला खांदा लावून माझी कंपनी चालवणारी सून. पण जेवढी स्थळं येत होती ती माझा आवाज ऐकूनच नाही म्हणायची किंवा पार्थला वेगळं रहायला सांगायची. तूच त्यातल्या त्यात धीराची दिसलीस. पण.." बोलताना मंगलाताईंचा घसा दाटून आला.

" सॉरी आई.." प्राची म्हणाली.

" सॉरी कशासाठी.. पण एक सांगू.. सासू आणि सून हे नातेच थोडे वेगळे आहे. पूर्ण कुटुंबाचे भविष्य या नात्यावर ठरते. या नात्याची वीण बरोबर जमली ना,तर सगळे कुटुंब सुखी होते.. जर नाही जमली तर ती टोचत राहते सतत.."

मंगलाताईंचे बोलणे ऐकून प्राची काही न बोलता त्यांच्या कुशीत शिरली.. मंगलाताईंनी पार्थलाही मिठीत घेतले.

ते दृश्य पाहून स्मिताताईंनी त्यांची अलाबला काढली.



कथा कशी वाटली ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all