सासू माझी नवसाची.. भाग ३

कथा नवसाने मिळालेल्या सासूची


सासू माझी नवसाची.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की प्राचीच्या अपेक्षा या नवर्‍यासाठी नसून सासूबाईंसाठी आहेत. ते ऐकून पार्थ आपल्या आईशी बोलायला जातो. आता बघू पुढे काय होते ते.


" माझे तुझ्यावर प्रेम आहे , हे दाखवून द्यायला लागते?" मंगलाताईंनी रोखून बघत पार्थला विचारले. त्या नजरेने तो घाबरला.

" आई, तसं नाही.. पण तू काही दिवस रीमा लागू होशील?"

" रीमा लागू म्हणजे?" मंगलाताईंना आश्चर्य वाटले.

" म्हणजे त्या कशा गोड सासू आहेत.. तशा. म्हणजे तू गोड आहेच. पण लोकं तुला घाबरतात ना.."

" काय हवं आहे नक्की आणि का?" मंगलाताईंनी थोड्या कडक आवाजात विचारले. मग पार्थने ही आढेवेढे न घेता प्राचीबद्दल सगळे सांगून टाकले. मंगलाताई हसल्या.

" बसं एवढंच.. तिला दे आमंत्रण रविवारचे. आपण बोलू तिच्याशी." हे ऐकून पार्थ आईला मिठी मारणार होता पण त्याने मोह आवरला. त्याने लगेचच फोन करून प्राचीला ही बातमी दिली. तिचेही ऑफिसमध्ये कुठे मन लागत होते? तिनेही मग तिच्या आईबाबांना तयार केले. ते बिचारे तर असेही हिच्या अटींनी त्रासलेले होते. स्थळ सुखवस्तू आणि सुसंस्कृत असावे एवढीच त्यांची अपेक्षा होती. त्यात प्राची स्वतः सांगते आहे म्हणून त्यांनी रविवारी पार्थकडे जायचे कबूल केले. पण त्याआधी त्याची पूर्ण माहिती काढून घे हे सांगायला विसरले नाही.

ठरल्या दिवशी , ठरल्या वेळी प्राची तिच्या आईवडीलांसोबत पार्थच्या घरी पोहोचली. घरात पाऊल ठेवताच तिला प्रसन्नता जाणवली. साधी आणि उच्च अभिरुची जिथेतिथे दिसून येत होती. पार्थचे प्राचीच्या चेहर्‍याकडे लक्ष होते. तिचा खुलणारा चेहरा बघून याच्याही चेहर्‍यावर गुलाब फुलत होते.

" या, बसा.. अजिबात संकोच करू नका." पार्थचे बाबा श्रीधरराव बोलले.

" हो हो.." प्राचीचे आईबाबा काही बोलायच्या आत मंगलाताई आतून पाणी घेऊन आल्या.

"ही माझी आई आणि हे बाबा.." पार्थने ओळख करून दिली. प्राचीने लगेच पुढे होऊन नमस्कार केला.

" अग, राहू दे.. किती वाकशील? " प्रेमळ आवाजात मंगलाताई बोलल्या. ते बघून पार्थची ट्यूबपण पेटली. त्यानेही प्राचीच्या आईबाबांना नमस्कार केला. जुजबी बोलण्यांना सुरूवात झाली.

" माझ्यामते मुलांची पसंती झालीच आहे. मलाही काही अडचण वाटत नाही. असे असेल तर पुढची बोलणी करायची का? बरोबर ना पार्थ आणि प्राची?" सौम्यपणे मंगलाताईंनी विचारले. दोघांनीही लाजून आपला होकार सांगितला.

" देण्याघेण्याचे कसे काय करायचे?" प्राचीच्या वडिलांनी सुधाकररावांनी विचारले.

" तुमचे मानपान तुम्ही करा, आमचे आम्ही. त्यातूनही मला वाटते आपण लग्नावर खर्च करण्यापेक्षा, लग्न साधेपणाने करून ती रक्कम सामाजिक संस्थांना दान देऊ. काय वाटतं?" मंगलाताई प्राचीच्या मनातले बोलून गेल्या.

" चालेल मला आई.." प्राची खूपच प्रभावित झाली होती. ते ऐकून तिचे आईबाबा हसले..

" म्हणजे काकू.." प्राची सावरत बोलली.

" नाही आईच म्हण. म्हणजे आता ऑफिशियली लग्न ठरले असे मानायचे का?" प्राचीला जवळ घेत मंगलाताईंनी विचारले.

पार्थ आणि प्राची दोघांनीही भेटायच्या आधी एकमेकांचे शिक्षण, नोकरी, पगार याची चाचपणी केली होतीच. त्यामुळे त्या आघाडीवर होकार होताच. उरले होते एकमेकांचे कुटुंब बघणे, ते ही ओके होते मग लग्नाची गाडी पुढे सरकली. महिन्यानंतरचाच मुहूर्त निघाला होता. त्यामुळे खरेदीची लगबग सुरू होती. खरेदीच्या निमित्ताने पार्थ आणि प्राची एकमेकांसोबत वेळ घालवत होते. आपली निवड किती योग्य आहे याची दोघांनाही जाणीव होत होती. फक्त आपल्या आईच्या स्वभावाची भिती अधूनमधून पार्थच्या मनाला वाटत होती. त्याचवेळेस आपल्याला अगदी हवी तशी सासू मिळाली याचा आनंद प्राचीला होत होता. कारण त्यांचे प्रेमळ वागणे, बोलणे, लग्नाच्या खरेदीला हवे ते स्वातंत्र्य देणे तिच्या मनात घर करून बसले होते.


शेवटी काय होईल? प्राचीचा आनंद खरा ठरेल की पार्थची भिती? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all