सासू माझी नवसाची.. भाग २

कथा नवसाने मिळालेल्या सासूची


सासू माझी नवसाची.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की पार्थ प्राचीला देवाशी भांडताना बघतो. त्याला ती आवडते. आता बघू पुढे काय होते ते.


" बोला.." प्राची पार्थला म्हणाली.

" मला तर फक्त तुमच्या अपेक्षा ऐकायच्या आहेत.." पार्थ तिच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करत बोलला.

" मला प्रेमळ सासूबाई हव्यात.. त्या सुशिक्षित, सुसंस्कृत हव्या. त्या हौशी असाव्यात... सासूबाई..... सासूबाई...... सासूबाई .." प्राची बोलू लागली. पार्थचे डोके गरगरले. त्याने तिला मध्येच थांबवले.

" हॅलो.. तुमच्या सगळ्या अपेक्षा सासूबाईंसाठीच आहेत.. नवर्‍याचे काय?" पार्थने निराश होत विचारले.


" नवर्‍याबद्दल काय अपेक्षा ठेवायच्या? कसं असतं ना सासूबाईंशी पटायला हवं. एकदा त्यांच्याशी नातं जुळलं की नवरा किस घास की मुली है? बरोबर ना?" भोळा चेहरा करून प्राचीने विचारले.

" ते तर आहेच.." पार्थ बोलायला बघत होता.

"ते तर नाही.. तेच आहे. नवर्‍याला काय कसंही मॅनेज करता येते. सासूबाईंना करता आले पाहिजे. माझ्या मैत्रिणी नेहमी रडतात.. सासू अशी छळते, सासू तशी छळते. मी तेव्हाच ठरवलं की नवरा कसाही चालेल.. म्हणजे अगदी कसाही नाही. पण तरिही.. फोकस सासूबाईंवर."

प्राची बोलत होती. तसा पार्थच्या चेहर्‍यावरचा रंग उडू लागला होता. त्याला त्याची आई आठवली. तिचा आवाज म्हणजे.. ती बोलायला लागली की डीजेचा आवाज सौम्य वाटायचा. तिच्यासमोर त्याचे बाबाही बोलायला घाबरायचे. मुलांच्या वाढदिवसाला औक्षण केले की संपली तिची हौस. इतर बायका नटायच्या, थटायच्या. ही आपली एक ड्रेस चढवला की लागली कामाला. त्यांची छोटीशी कंपनी तीच चालवायची. खरे म्हणजे पार्थचेही लग्नाचे वय झाले होते. पण बरीचशी स्थळं त्याच्या आईशी बोलल्यानंतर त्याला नकार द्यायची. काहीजण त्याला वेगळं राहण्याचा पर्याय देत. पण आईवडिलांना सोडून त्याला रहायचे नव्हते. प्राची त्याला पहिल्या भेटीतच आवडली होती. तिने निदान आईवरून तरी नकार देऊ नये, असे त्याला वाटत होते. तिच्या सासूबाईंच्या बाबतीतल्या अटी बघून त्याला निकाल समजलाच होता. पण तरिही शेवटच्या क्षणापर्यंत लढायचे हा विचार करून त्याने हिंमत करून प्राचीला विचारले,

" एखादा मुद्दा कमीजास्त असेल तर चालणार नाही का?" आपल्याच धुंदीत असलेली प्राची त्या प्रश्नाने ब्रेक लागल्यासारखी थांबली. तिलाही आता स्वतःच्याच अटींचा कंटाळा आला होता. घेतला वसा टाकता येत नाही तसेच काहीसे एकदा सांगितलेल्या अटी पाठी घेता येत नव्हत्या. तिचे मन आता कच खाऊ लागले होते. आता समोरूनच विचारणा होत होती. तिनेही या गोष्टीचा फायदा उचलायचा ठरवला.

" मुलगा चांगला असेल तर आईसाठी असलेल्या अटींमधली एखादी कमी होऊ शकते."

" मग या रविवारी तुम्ही माझे घर बघायला याल का?" पार्थने पटकन बोलून टाकले.

" ओ.. मिस्टर.. काहिही काय.. आताच तर भेटलो ना आपण?"

" हो.. आत्ताच भेटलो. पण ते पुरातनकाळी नाही का, राजपुत्राने अडचणीतून सोडविल्या सोडविल्या लगेच त्यांचे लग्न व्हायचे."

" आता काळ बदलला आहे."

" मी कुठे लग्न करायला सांगतो आहे? फक्त भेटू. आपल्या घरातल्यांना पसंत पडले तर पुढे जाऊ. नाहीतर.."

" मी तयार आहे.." प्राचीने हिरवा सिग्नल दिला. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि रविवारी भेटण्याचा प्रयत्न करू असे म्हणत दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. पार्थ त्या आनंदातच ऑफिसला न जाता घरी आला.. समोर त्याची आई, मंगलाताई उभ्या होत्या.

" आज ऑफिसला नाही गेलास?" त्यांनी विचारले.

प्राचीशी बोलून उरलेली सगळी शक्ती त्याने एकवटली आणि आईला विचारले,

" आई , तुझे माझ्यावर प्रेम असेल तर एक गोष्ट करशील माझ्यासाठी?"


कडक स्वभावाच्या मंगलाताई बदलतील का प्राचीसाठी? प्राचीला चालतील का अशा सासूबाई? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all