Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

सासू जोमात सून कोमात

Read Later
सासू जोमात सून कोमात


कथेचे शिर्षक: सासू जोमात सून कोमात
विषय:- आणि ती हसली
फेरी:- राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

"अगं तुला सांगते मेघा, मी काल ऑफिसमधून दमून आले, तर आमच्या सासूबाई बोलल्या की, "दुपारी भाजीत मीठचं नव्हतं बाई. ऑफिसला जायचं म्हणून घाईघाईने तू कशीपण भाजी करुन खाऊ घालतेस."
असला राग आला ना त्यांचा मला. कारण तीच भाजी खाऊन माझ्या मैत्रिणी आज ब्रेकमध्ये खूप खुश झाल्या होत्या. त्या बोलल्या की, इतक्या लवकर सकाळी उठून ,सगळं आवरुन तू इतकी मस्त भाजी बनवतेस कमाल आहे पल्लवी" पल्लवीने सांगितले.

यावर मेघा म्हणाली,
"ओहो. अगं हे तर काहीच नाही.तुला माझी हालत काय सांगू, गेला आठवडाभर मी लय सहन करतेय गं."

"काय गं काय झालं ? तुझी सासूबाई तर लय मॉडर्न आहे तरीही ती तुला छळते का ?" पल्लवीने विचारले.

"अगं स सासूचा असतो, छळ केल्याशिवाय त्यांना पूर्णत्व नाही." मेघा म्हणाली.

"पण झालं काय नक्की ?" पल्लवीने विचारलं.

"मागच्या आठवड्याची गोष्ट आहे, त्यांना काही काम नव्हतं म्हणून कपाटातील त्यांनी फक्त एकदाच घातलेला ड्रेस शोधत होत्या ,तीन चार सलवार आणि त्यांना टॉप्स मिळाले.पण एक टॉप असा होता की, तो त्यांना खूपच फिट बसत होता. एकदम आवळून गेलेला अंगाला ,झालं हे एकच कारण पुरेसं होतं मला वनवासातील सीता बनवायला."मेघाने सांगितले.

"म्हणजे?" पल्लवीने पुन्हा विचारले.
मेघा म्हणाली,
"मेघा ...मेघा ..असं मोठमोठ्याने आवाज देत मला त्यांनी खोलीत बोलावलं. घरातील कोणी बघू नये, म्हणून लगेच दार लावून घेतलं आणि त्या रडून सांगू लागल्या.
"अगं माझ्या ताईने आणि मी सेम दोन टॉप्स मागच्या वर्षी घेतले होते, हा टॉप मला एकदम मस्त दिसत होता. मी एकदाच घातलाय, पण बघ ना गं आता कसा फिट झालाय.. मी खूपच जाड झालेय.आता माझं कसं गं होणार.लोकं सहज म्हणतील, ती पहा निशाची आज्जी चालली..मागे वळून वळून बघणारे आपल्या सोसायटीतील मुलं मला डुंकूनही पाहणार नाहीत आता. मैत्रिणी तर किट्टी पार्टीला बोलावतील की नाही याचीच शंका येतेय."

"अहो आई ,इतकं मनाला लावून घेऊ नका." मी सांगितले.

यावर सासूबाई म्हणाल्या,
"तुला कितीवेळा सांगितलं की, मला प्रीती मॉम म्हणत जा म्हणून."

"हो सॉरी प्रीती मॉम, तुम्ही एक काम करा ना हा टॉप घालूच नका ना." मी सुचवलं.

"आर यू मॅड मेघा? इथे मी बारीक होण्यासाठी विचार करतेय आणि तू मला भलतेच उपाय सुचवतेय. ते काही नाही एका महिन्याने मला हा टॉप आलाच पाहिजे. मी आजचं आपला डाएट प्लॅन बनवून टाकते." सासूबाईंनी सांगितले.

"आपलं डाएट?" मी प्रश्न विचारला.

"हो मग ? जरा नीट बघ आरशात तुझं पोट बघ हे आणि वजन पण चेक कर, एका मुलीची आई पेक्षा तिची तू आज्जी वाटत आहेस. उद्यापासून तुही मी जे खाईल तेच खायचं,मी जो व्यायाम करेल तोच करायचा.मग बघ एक महिन्याने आपण दोघी एकमेकींच्या बहिणी बहिणी दिसू." सासूबाई म्हणाल्या.

"उचल रे देवा उचल,अशी सासू माझ्याच नशिबी का टाकलीस?" मी मनातल्या मनात म्हणाले.


दुसऱ्या दिवशी "मेघा... मेघा" माझ्या नावाने सासूबाई ओरडत होत्या.

मी धावत धावत गेले, पाहिलं तर काय सासूबाईंनी खूप सारी शॉपिंग केलेली, मला वाटलं चला एकदाचं डोक्यातून डाएटचं खूळ गेलं. पण त्यांनी पिशव्यांमधून काय बाहेर काढलं माहितीय? कांद्याची पात, मेथी, ग्रीन टी, कडधान्य,मुळा, गाजर.
मी लगेच विचारलं,
"प्रीती मॉम हे सगळं कोणासाठी?"

"अगं कोणासाठी काय वेडे ? हे सगळं आपल्या दोघींसाठी." सासूबाई बोलल्या.

"नाही आ प्रीती मॉम मी हे खाणार नाही.मला नाही जाणार हे सगळं." मी सांगितले.

"गुपचूप खावं लागणार, अगं बघ तू जरा कशी सुटत चालली आहेस. सतत आपलं चीज टाकून मला सगळे पदार्थ देत असते. मॅगीत चीज, पोह्यात चीज ,तुझ्या मनात आलं तर तू पाण्यातही चीज टाकून खाशील. हे बघ हे ग्रीन टी आपण उद्यापासून दोघी रोज पिऊया."
सासूबाई म्हणाल्या.

"अहो त्याने कॅन्सर होतो.लोकं मरतात हल्ली या ग्रीनटी मुळे." मी म्हणाले.

"काहीही हा,करीना कपूर पण पिते, बघ ती कशी सडपातळ आहे." सासूबाई म्हणाल्या.

"ती गोलमाल थ्री मध्ये होती, तुम्ही होता का?तिचा नवरा नवाब आहे आणि आपला?" मी विचारले.

"हे बघ सुवासिनीची सत्वपरिक्षा मधील सासू बनायला मला लावू नकोस. गुपचूप डाएट फॉलोवकरायचं." सासूबाई म्हणाल्या.

"मला वाटलं नव्हतं की, ह्यांना घरगुती भांडणामुळे मला काडीमोड द्यावा लागेल." मी तोंडातल्या तोंडात पुटपुटले.

"काय बोललीस?" सासूबाईंनी विचारले.

"अ.. काही नाही, काही नाही." मी सांगितले.

त्या दिवसानंतर सतत मी डाएट सूप, डाएट सॅलड, डाएट फूडवर होते, सगळं कसं डाएट होऊन बसलं होतं माझ्या आयुष्यात.


हे असं आठवड्याभर चाललं मग कोणास ठाऊक काय झालं पुन्हा \"मेघा मेघा \" ..असा मोठमोठ्याने आवाज माझ्या लाडक्या प्रीती मॉम परत देऊ लागल्या, म्हटलं आता कोणतं नवीन धर्मसंकट येतंय. मी घाबरत घाबरत त्यांच्या रुममध्ये गेले, पाहते तर काय त्या एकदम आनंदाने बागडत होत्या, गोल गोल फिरत होत्या आणि मोबाईल मध्ये सेल्फी काढत होत्या.मी दारात उभी राहिलेली बघून त्या मला म्हणाल्या,
"मेघा हा बघ माझा टॉप कसा अजूनही एकदम मस्त येतोय. खरंतर त्या दिवशी जो टॉप घातलेला तो तर माझ्या ताईचा होता ती इथेच विसरुन गेलेली बहुतेक, मी वेडी तिचाच टॉप घालून इतकं डाएट करत बसलेले.चला आजपासून आपल्या डाएटला सुट्टी."


"तुला काय सांगू पल्ले, मी लगेच धावत पळत किचनमध्ये गेले आणि मस्तपैकी पुऱ्या तळल्या, चहा पुऱ्याचा पहिलाच घास घेतला आणि माझ्या तोंडून "वाह" शब्द निघाला जणू मी खूप दिवसांची भुकेली होते आणि आज मला अमृत सापडलं. माझ्या लाडक्या सासूबाईंनी माझा तो क्षण फोनमध्ये टिपून घेतला आणि खुदकन हसल्या" मेघाने सांगितले.


समाप्त.
©® मित्र रिषभ

टीम: अहमदनगर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

मित्र रिषभ

Writer

Like to write fictional stories

//