Jan 26, 2022
नारीवादी

दुसरं माहेर

Read Later
दुसरं माहेर

"नेहा, आवरलीस का? बाहेर सगळे वाट पाहत आहेत ग."

"हो आई, झालं. आलेच हं." नेहा

थोड्या वेळाने नेहा बाहेर आली. लाल रंगाची साडी तिच्या अंगावर खूपच खुलून दिसत होती, केसात माळलेला तो गजरा त्याचा सुगंध दरवळत होता, गळ्यात हार शोभून दिसत होता, हातातील हिरव्या बांगड्यांचा चुडा तिचे सौंदर्य खुलवत होता, कपाळावरील टिकलीने तर तिचा चेहरा उजळून दिसत होता. नेहाचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. सगळे खूप दिवसांनी नेहाला असे पाहत होते. नेहा देखील खूप दिवसांनी इतकी आनंदी दिसत होती, इतकी सुंदर नटली होती. तिचा चेहरा खूपच खुलला होता. सर्वजण फक्त तिच्याकडेच पाहत होते.

नेहा आईबाबांची एकुलती एक मुलगी. तिचा नवरा मनीषला जाऊन आत्ता कुठे आठ महिने झाले होते. मनीष आणि नेहाचा चार वर्षाचा संसार. त्यांच्या संसारवेलीवर स्वरा ही मुलगी जन्माला आली होती. अगदी दृष्ट लागावा असा त्यांचा संसार सुरू होता, पण खरंच कुणाची दृष्ट लागली. एक दिवस अचानक मनीषचा अॅक्सिडेंन्ट झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. नेहा आणि मनीषच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नेहाचे अगदी कोवळे वय, त्यात तिला लहान मुलगी. अशा कठीण परिस्थितीत ते काय करणार? या जगात एकट्या बाईने राहणे म्हणजे वाघाच्या जबड्यात अडकल्यासारखेच असे एक ना अनेक विचार तिच्या आईबाबांच्या मनात येत होते. मुलीला आपल्या घरी घेऊन यावे तर आपण किती दिवसाचे सोबती? आपल्यानंतर आपली लेक कुठे जाईल? अशा विचाराने तिचे आईबाबा दुःखी होते.

मुलीला घेवून नेहा तिच्या सासरी राहत होती. नेहाचे सासू-सासरे नेहा आणि स्वराला खूप जीव लावत होते, त्यांचा सांभाळ करत होते. नेहाचे वय लहान असल्याने तिची आणि स्वराची सुद्धा त्या दोघांना काळजी लागून राहिली होती. आपल्यानंतर नेहाचे काय होईल? याची चिंता ते सतत करत होते. एकट्या स्त्रीने राहणे खूप अवघड आहे त्यात नेहाचे फारसे शिक्षण देखील झाले नव्हते, नोकरी करायची म्हटले तर शिक्षण देखील अपुरे होते, म्हणून नेहाचे दुसरे लग्न करायचे असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. नेहाच्या सासूबाई नेहाच्या सासऱ्यांना सांगण्यासाठी गेल्या.

"अहो ऐकलं का? आपली नेहा किती दिवस अशी एकटी राहणार? त्यापेक्षा माझ्या मनात एक विचार येऊ लागला आहे. आपण तिचे लग्न लावून दिले तर, उगीच आपल्यासाठी तिच्या आयुष्याची फरफट कशाला करायची? त्यापेक्षा ती लग्न करून सुखी राहिली तर बरंच आहे ना? तुम्हाला काय वाटतं?" नेहाची सासू

"अहो, पण लोकं काय म्हणतील? हे चुकीचे आहे." नेहाचे सासरे

"लोकं काय? असेही म्हणतात नि तसेही म्हणतात. आपण फक्त आपलं बघायचं. आपल्या मुलीचा म्हणजेच नेहाचा विचार करायचा. तिला आयुष्यात सगळी सुखं मिळायला हवीत यासाठी प्रयत्न करायचे. या काट्याकुट्यातून चालताना तिच्या आयुष्यात फक्त अंधार दिसणार आहे. तिचे आयुष्य सुखकर करण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवा ना?" नेहाची सासू नेहाच्या सासऱ्यांना समजावून सांगत होती.

"तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मलाही नेहाचीच चिंता लागली होती. पण मला सांग स्वराचे काय करायचे? तिच्यावर आपला खूप जीव आहे, तसा नेहावरही खूप जीव आहे पण स्वरासहीत नेहाचा कोणी स्वीकार करेल का?" नेहाचे सासरे

"जर स्वराला स्विकारले नाही तर आपण तिचा सांभाळ करू आणि योग्य वयानंतर तिचेही लग्न करू." नेहाची सासू

"खरंच, एक सासू असूनही तू खूप चांगला विचार करतेस. आजकाल सगळे स्वार्थी झालेत ग, फक्त आपलाच विचार करणारे. तू तर सुनेच लग्नच लावून द्यायला निघालीस. तुझ्या विचारांना माझा सलाम." नेहाच्या सासऱ्यांचे हे वाक्य ऐकून तिच्या सासूबाईंना भरून आले.

"अहो, ती सुद्धा कुणाची तरी लेकच आहे ना? तिला सुध्दा मन आहे, तिलाही वाटत असेल आपला संसार छान खुलावा, आपली सुख दुःख आपल्या जोडीदारासोबत शेयर करावीत, असे तर प्रत्येकालाच वाटते. आता आपला मनीष असा अर्ध्यावर सोडून गेला यात तिची काय चूक?" मनीषच्या आईने लगेच तोंडावर पदर धरला आणि ती हमसून हमसून रडू लागली.

"शांत व्हा. तुमचा विचार मला पटला आहे. आपण तिच्यासाठी योग्य वर शोधू. जेणेकरून तिचे आयुष्य मार्गी लागेल." नेहाचे सासरे

"अहो, मी एक मुलगा शोधालाय. आपला रोहन आहे ना." नेहाची सासू

रोहन मनीषच्या मामाचा एकुलता एक मुलगा. दोन वर्षापूर्वी त्याचेही लग्न झाले होते, पण वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला होता. रोहन एका मोठ्या कंपनीत जाॅब करत होता. त्याच्या घरी त्याचे आईबाबा आणि तो असे तिघे राहत होते. रोहनसाठी त्याच्या घरचे योग्य वधूच्या शोधात होते. मनीषच्या मृत्यूनंतर तेच रोहनसाठी नेहाला मागणी घालायला येणार होते, पण नेहाच्या घरचे काय म्हणतील? या विचाराने ते शांत होते.

अखेर नेहाच्या सासू सासऱ्यांनी नेहाच्या आईबाबांना सगळी हकीकत सांगितली. त्यांना देखील खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. "नक्कीच आम्ही कोणत्यातरी जन्मी भरपूर पुण्यकर्म केले आहे. म्हणून आमच्या मुलीला इतके चांगले सासूसासरे मिळाले. खरंच त्यांचे उपकार मानावे तितके थोडेच आहे." असे ते म्हणत होते.

नेहाचे सासूसासरे रोहनच्या आईबाबांना भेटले. त्यांना ही गोष्ट समजताच खूप आनंद झाला. रोहनच्या आईने तर लगेच देवापुढे साखर ठेवली. सगळ्यांच्या डोक्यावरचा भार हलका झाला. सगळी बोलणी झाल्यावर लग्नाची तारीख ठरली. लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्याचे ठरले. अगदी जवळचे नातलग बोलावण्यात आले होते. तेवढेच साधेसे पण रितसर लग्न लावण्यात आले.

आता कन्यादानाचा विधी आला. तेव्हा नेहाची आई पुढे येवून नेहाच्या सासूबाईंपुढे हात जोडत म्हणाली, "ताई, हा मान तुमचा आहे. तुम्ही आमच्यापेक्षा जास्त केलंत. तुमची मुलगी म्हणून तुम्ही सारं काही केलंत. आता हा विधी करून तुमचे कर्तव्य पूर्ण करा." हे ऐकून नेहाच्या सासू सासऱ्यांनी नेहाचे कन्यादान केले.

हे सगळे पाहून नेहाला खूप धन्यता वाटली. खरंच इतके सुंदर सासर मिळाले हेच माझे भाग्यच असे तिला वाटू लागले. तिच्या मनात येऊ लागले खरंच माझे सासर खूप सुरेख आहे. असेच सासर प्रत्येक स्त्रीला मिळायला हवे.
धन्यवाद

प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..