सासरी बाप्पा हवा ग बाई...

माहेरी बाप्पा नाही.म्हणून सासर बाप्पा असणारे हवे असा प्रेमळ हट्ट धरणाऱ्या मुलीची गोड कथा

"सुमे,आग ये सुमे.कुठ उलथली ही पोरगी."आईच्या हाका कानावर येताच सुमन भानावर आली.

गेले जवळपास तीन तास ती शेजारी पाटील काकूंच्या घरी गणपती आरास करताना पहात होती.सुमन म्हणजे जानकी आणि श्रीराम यांची थोरली मुलगी.तरतरीत नाक,पाणीदार डोळे.लांब काळे केस आणि तजेलदार सावळा रंग.सहा वर्षांची सुमन अगदी गोड दिसायची.

शेजारी राहणाऱ्या पाटील काकू आणि सुमीचे भारी गुळपीठ. पाटीलकाकुंचे यजमान गावातील शाळेत मुख्याध्यापक होते.त्यांचा धाकटा सुजय आणि सुमन सारख्याच वयाचे. सुमनला बाप्पा फार आवडायचा.पण आईची हाक कानावर आली तशी सुमन उठली आणि घरी जायला निघाली.


जानकी आणि श्रीराम शेतकरी जोडपे.खाऊन पिऊन सुखी कुटुंब.

सुमन घरी आल्यावर म्हणाली,"आये,आपुन गणपती आणू घरी.लई मजा यील बग."

जानकी तिला समजावत म्हणाली,"सुमे,गणपती कुठून आणणार ग. आपल्याकड पैस कुठंय?पाटील बाईंच्या घरी जात जा."

सुमी मनातून जरा.खट्टू झाली.ती आजीकडे गेली,"आजे,मला पैस दे ना. आपुन बाप्पा आणू घरी."

सुमनची आजी हसली,"जानकी,पोरीला पैस नाय आस खोटं का सांगते. सुमा,आपल्या घरी नाय बसवत गणपती."

सुमन परत म्हणाली,"पण का नाय बसवत?"

आता मात्र जानकी रागावली,"सुमे,बस झालं.जा खेळायला."

तरीही बाप्पवर असलेली श्रद्धा तिला गप्प बसू देत नव्हती.दुसऱ्या दिवशी ती पाटील बाईंकडे गेली.तिने विचारले,"काकू,बाप्पाची मूर्ती कोण बनवत?"

पाटीलबाई हसल्या,"सुमन,आपल्या गावात कुंभार मूर्ती बनवतात.शहरात मूर्तिकार बनवतात ह्या मूर्ती."

सुमन म्हणाली,"काकू गावात फक्त दोन चार घरी बाप्पा हाय.समद्या घरात का नाय बाप्पा."

तिला प्रेमाने जवळ घेत बाई म्हणाल्या,"सुमन बाप्पा सगळीकडे असतो पोरी."


सुमन आणि बाप्पा यांचे असे वेगळे नाते तयार झाले होते.हळूहळू सुमन मोठी होत होती.आता पाटील बाईंच्या घरी आरास,नैवेद्य अशा सगळ्या कामात सुमन मदत करत असे.अचानक सुमन चौथीत असताना पाटील सरांची बदली झाली.

सुमन खूप रडली.पाटीलबाई म्हणाल्या,"सुमन रडू नकोस पोरी.तुला मी भेटायला येत जाईल हो.झालेच तर तू येत जा बाबांबरोबर शहरात."



शाळा सुरू झाली. सुमनचे शाळेत मन लागत नव्हते.तिला आता ह्या वर्षी गणपती बाप्पा कुठे भेटणार याचे वाईट वाटत होते.

सुमन घरी आल्यावर म्हणाली,"आये,आता आपून आणू ना बाप्पाला घरी.काकू तिकड लांब गेल्या रहायला आता कुठ भेटणार मला बाप्पा."

सुमनची समजूत घालता घालता जानकी थकली.शेवटी तिने दरडावून सुमनला गप्प केले.हळूहळू दिवस पुढे सरकत गेले.काळ बदलत गेला.हुशार सुमन डॉक्टर होण्यासाठी पुण्याला आली.


सुमन आता शेवटच्या वर्षाला होती.तिचे गणपती वेड माहित असल्याने मैत्रिणी तिला एकेक दिवस घरी घेऊन जायच्या.तरीही सुमनचे मन भरत नसे.


एक दिवस मिरा तिला म्हणाली,"सुमन माझी मावशी राहते इकडे.तिच्याकडे जायचे आहे.गौरी गणपती दर्शनाला."


सुमन एका पायावर तयार झाली.तिथे गेल्यावर सुमन मिराच्या मावशीला स्वयंपाकात मदत करायला गेली.उकडीचे मोदक मात्र दिसत नव्हते.

सुमन म्हणाली,"मावशी मोदक नाही करायचे का? मी बनवू का?"


मावशी हसत म्हणाली,"अग माझ्या नणंद बाई बनवत असतात दरवर्षी.यंदा त्या मुलाच्या हातून पाठवणार आहेत."

अशा गप्पा चालू असताना मावशी सहज म्हणाली,"सुमन लग्नाचा विचार केलास का? डॉक्टर हवा असेल तर आहे हो पाहण्यात."

मिरा मात्र डोळे मोठे करून म्हणाली,"मावशी,अग काय हे.एम बी बी एस अव्वल येईल ती.पुढे पी जी करेल का लग्न?"


सुमन मात्र म्हणाली,"मावशी डॉक्टर हवा असेच काही नाही.पण एक अट आहे."


मावशी म्हणाली,"सासू सासरे नकोत की काय?"

सुमन म्हणाली,"मुलाच्या घरी गणपती बसवत असले पाहिजेत."


मावशी हसायला लागली.इतक्यात एक मुलगा पळत आला,"काकू,दादा हा डबा देऊन गेला."


मावशी रागवत म्हणाली,"हा पिंट्या पण ना!वर आला असता तर...."


सुमन पिंट्या नाव ऐकून हसू लागली.तेव्हा मिरा चिडली,"सुमन डॉक्टर आहे हो दादा आमचा."


तशी सुमन चिडवत म्हणाली,"हे मस्त आहे, डॉक्टर पिंट्या..."


संध्याकाळी मस्त खेळ रंगले.जेवण खाणे झाले.इतक्यात मावशी ओरडली,"अग बाई, वन्सनी पाठवलेले मोदक वाढायचे राहिलेच.मिरा जा घेऊन ये."


तेव्हा मिराचा मावसभाऊ म्हणाला,"आई,आता पोट फुटतील आमची.त्यापेक्षा तु मिराला दे तो डबा.हॉस्टेलवर खातील सगळ्या."

दुसऱ्या दिवशी मिरा आणि सुमन कॉलेजात परत आल्या.मिरा म्हणाली,"सुमन ते मोदक काढ."

सुमन डबा काढायला गेली त्यातून एक कागद बाहेर पडला.तो उचलून सुमनने परत पिशवीत ठेवला.


मिरा बाहेर आली,"सुमन अग डबा खोल."


सुमन डबा खोलणार इतक्यात मीराला फोन आला,"हॅलो मिरा,अग बाबांना बर नाहीय.तू दोन दिवस सुट्टी टाकून येशील का?"


मिराने फोन ठेवला आणि सुमनकडे वळली,"सुमन दादाचा फोन होता.माझे बाबा दवाखान्यात आहेत.मी निघते लगेच."



घाई गडबडीत मिरा आवरून गेली सुद्धा.खरतर सुमन सुद्धा जरा नाराज झाली पण बाप्पाचा प्रसाद असलेले मोदक वाया जायला नकोत.तिने सगळ्या मुलींना मोदक वाटले.शेवटचा एक मोदक तिने खाल्ला आणि ती चव सुमनला अलगद भूतकाळात घेऊन गेली.


पाटील काकू.हो अगदी तीच चव.हे मोदक काकूंनी केले असतील का?कोणाला विचारावे?


इतक्यात तिला आठवले ह्या पिशवीत काहीतरी कागद होता. सुमन धावत खोलीत आली.तिने पिशवीत असलेला कागद काढला. त्यावर पुढील महिन्यात असलेल्या मेडिकल कॉन्फरन्स मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हायचे निमंत्रण होते.


सुदैवाने त्यावर पत्ता होता.पण नाव मात्र फक्त डॉ.सुजय असे छापले होते.


हा तोच सुजय असेल का?जावे का? पण ह्या पत्त्यावर दुसरे कोणी रहात असतील तर? असे अचानक घरी जावे का? तिथे दुसरेच कोणी असेल तर?


एकीकडे असे प्रश्न मनात येत होते आणि दुसरीकडे काकूंना भेटायचे होते.काय करावे असा प्रश्न सतावत होता.परंतु शेवटी सुमनने ठरवले हे पत्र परत करायच्या निमित्ताने जाऊ.दुसऱ्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर जायचे सुमनने ठरवले होते.


इकडे मीराच्या मावशीला संध्याकाळी सुजयचा फोन आला,"मामी,आईने दिलेला मोदकाचा डबा कुठेय?"

मावशी म्हणाली,"पिंट्या,तुला कशाला पाहिजे डबा?"


सुजय चिडला,"मामी पिंट्या काय ग? गडबडीत त्या डब्याच्या पिशवीत माझे एक पत्र राहिले आहे.ते हवेय."


तशी मावशी किंचाळली,"अरे देवा!तो डबा मिरा घेऊन गेली.पण तू चिडू नकोस.मी उद्या सकाळी हॉस्टेल वर जाऊन घेऊन येते पत्र घरी.तसेही वन्स आजारी आहेत म्हणून येणारच होते मी."


सुजयने फोन ठेवून दिला.सुमन दुसऱ्या दिवशी लवकर उठली.छान कॉटनचा पिस्ता रंगाचा कुर्ता,पाठीवर कमरेपर्यंत रुळणारे केस,पाणीदार डोळे,शिक्षणाने आलेला आत्मविश्वास.खूप सुंदर दिसत होती सुमन.


जाताना बाप्पाची प्रार्थना केली,"तू मला पहिल्यांदा भेटलास तोच काकूमुळे.आज मला काकूंची भेट होऊ दे."


सुमन बाहेर पडली आणि मावशी हॉस्टेलवर पोहोचली.सुमन तिथे नाही म्हंटल्यावर तिने मीराला फोन लावला.मिरा फोन उचलत नव्हती.शेवटी मावशी तशीच निघाली.


सुमन दिलेल्या पत्त्यावर पोहोचली.तिने बेल दाबली.आतून पाटील बाई ओरडल्या,"सुजय अरे दार उघड."


सुजय तसाच वैतागून दार उघडायला गेला. दार उघडले आणि नुसता बनियनवर असणारा सुजय आत पळून गेला.सुमन दारात तशीच उभी.


काकू परत म्हणाल्या,"अरे दरवाजा उघडला का?कोण आलेय?बाई!बाई!काय म्हणावे ह्या मुलाला."


असे बडबडत काकू बाहेर आल्या.दारात उभी असलेली सुंदर तरुण मुलगी पाहून त्या विचारात पडल्या.इतक्यात सुमन पटकन नमस्कार करायला वाकली.


नंतर काकूंनी नीट पाहिले आणि तिला आनंदाने मिठीच मारली,"सुमन तू? अग कसे शोधलेस आम्हाला? अहो!अहो ! बाहेर या लवकर पाहिलेत का कोण आलेय ते?"


पाटील सर धावत बाहेर आले,"राजश्री अग किती ओरडतेस?आजारी आहेस ना तू?कोण आलेय असे?"


पाटील सर सुमनकडे पहातच राहिले.मग भानावर येऊन म्हणाले,"आत ये पोरी.गणपती आले की तुझी आठवण येऊन काकू डोळ्यातून पाणी काढायची.खूपदा यायचे ठरवून पण शक्य होत नसे.बहुतेक बाप्पा आपल्याला असे भेटवणार होता."


सुमन आत आली आणि पटकन बाप्पा समोर गेली,"काकू,अजून तुम्ही तीच मूर्ती आणता?"


तेवढ्यात अनय बाहेर आला,"नाहीतर काय?मी किती भांडलोय यावरून. शेंबडी सुमी आणि तिची मूर्ती नको म्हणून."


सुमन म्हणाली,"दादा,मी शेंबडी काय?"


तेवढ्यात लाजत सुजय बाहेर आला आणि पाठोपाठ मावशी पोहोचली. सुमन आत पाणी आणायला गेली.


मावशीने तिला न पाहताच सुरू केले,"पिंट्या,पत्र नाही मिळाले.खर तर त्या सुमनला घेऊन येणार होते.तुम्हाला सांगते वन्स डॉक्टर असून पोरीच्या हाताला काय चव आहे.वागायला बोलायला सालस आणि सुंदर. पिंट्यासाठी तीच पोरगी करू आपण.तिच्या आई वडिलांची माहिती काढते मिराकडून."


इतक्यात सुमन बाहेर आली,"मावशी पाणी घ्या."


तिला पाहून मावशीने आ वासला.पण अनयने सगळे सांगितले आणि म्हणाला,"मामी,मी मूर्ती वरून भांडण करायचो तीच ही सुमी."


तशा मावशी हसल्या,"बाप्पा तुझी कृपा अगाध आहे रे.ह्या पोरीच्या हातून सेवा घडायची होती तुझी. वन्स आता एका मांडवात उरकून टाकू दोन्ही लग्ने."



सुमन मात्र आनंदाने बाप्पा पुढे बसून रडत होती.तिला आता बाप्पाचे कोडकौतुक हक्काने करता येणार होते.इकडे काकूंनी फोन घेतला आणि जानकीला फोन लावला.


गणपती बाप्पाच्या साक्षीने एक नवे नाते फुलत होते आणि भक्ती परंपरेची ज्योत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अलगद सुपूर्द झाली होती.त्याच्याच कृपेने.

प्रशांत कुंजीर