Jan 19, 2022
नारीवादी

सासरची श्रीमंती (अंतिम)

Read Later
सासरची श्रीमंती (अंतिम)

नमस्कार, माझी सासरची श्रीमंती ही कथा काहींना अपूर्ण आहे असे वाटले... तर रेवा परत सासरी गेल्यावर काय?.. असा प्रश्न काहींना पडला आहे. तर त्याच्या पुढे लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे.. तर रेवाचे पुढे काय होते हे आपण या भागात पाहू...

रेवा सासूच्या विरोधात जाऊन माहेरी गेली. माहेरी गेल्यावर तिचे खूप कौतुक झाले. तिने पण खूप दिवसांनी माहेरपण अनुभवले. मस्त मजेत तिने दोन दिवस माहेरी घालवले.

इकडे रेवा माहेरी गेल्यावर सासूबाईंना तिचा खूप राग येतो. "मी नको म्हणत असताना ही गेलीच कशी. येऊ दे परत तिला बघूनच घेते." असा तिच्या मनात राग वाढत होता.

संध्याकाळी मयंक ऑफिसमधून घरी आल्यावर रेवाच्या सासूने मयंकला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि वर जास्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. कारण तिच्या मनात रेवाविषयी राग जो भरला होता.

मयंकने लगेच रेवाला फोन केला आणि आत्ताच्या आत्ता परत यायला सांगितले. रेवाने लगेच येण्यास नकार दिला. मयंकचाही राग वाढला.

दोन दिवसांनी रेवा परत येते. मयंक आणि रेवाची सासू तिला नाही नाही ते बोलतात. तिच्यासोबत अबोला धरतात. तरिही रेवा तिकडे लक्ष देत नाही.

त्याच संध्याकाळी सोनालीचा म्हणजेच मयंकच्या बहिणीचा मयंकच्या आईला फोन येतो.
"अगं आई यावेळी मला सुट्टीला यायला मिळणार नाही. सासूबाईंनी जायचं नाही म्हणून सांगितले आहे." सोनाली फोनवर तिच्या आईसोबत बोलत असते.

"अगं असे कसे जायचे नाही. हे तुझं माहेर आहे आणि तू माहेरी जायच नाही म्हणजे काय? तुझा तो अधिकार आहे. त्या असं कसं करू शकतात?" रेवाची सासू.

"काय माहित? मला तर यायचं आहे आणि हे बघ ना काहीतरी नवीनच." सोनाली.

"दे तुझ्या सासूकडे फोन दे. मी बोलून बघते." रेवाची सासू. सोनाली लगेच तिच्या सासूबाईंना फोन देते.

"हॅलो, ताई कसे आहात?" रेवाची सासू.

"मी मस्त. तुम्ही कसे आहात?" सोनालीची सासू.

"मी पण मस्त." रेवाची सासू.

"बोला असं अचानक काय काम काढलंत आमच्याकडे?" सोनालीची सासू.

"अहो अचानक नाही. आमची सोनू म्हणत होती की तुम्ही तिला सुट्टीला जायचं नाही म्हणालात म्हणून?" रेवाची सासू.

"हो. काय गरज आहे सारखं माहेरी जायची? इथे सगळं तर मिळत. काय कमी आहे का तिला इथे?" सोनालीची सासू.

"अहो काही कमी असतं म्हणून जातात का माहेरी? माहेरी गेल्यावर सगळे भेटतात. खुशाली समजते. सुखाच्या चार गोष्टी कळतात. मुलींना निवांतपणा मिळतो. माहेर हेच तर त्यांच्या हक्काची जागा असते. जिथे त्या बिनधास्त बागडू शकतात. मनमोकळ्या वागू शकतात आणि तुम्ही माहेरी जायला नको म्हणत आहात? असे का बरं?" रेवाची सासू.

"अहो तुम्हाला इतकं सगळं माहित असूनही तुम्ही तुमच्या रेवाला लग्न झाल्यापासून एकदाही माहेरी जाऊ दिलं नाही आणि मी एकदाच सोनालीला नको म्हणाले तर तुम्हाला इतकं वाईट वाटलं. मग तुम्हीच कल्पना करा की रेवाच्या माहेरच्यांना किती वाईट वाटत असेल?" सोनालीची सासू.

"होय. तुमचं बरोबर आहे. मला कळत होतं पण वळत नव्हतं. आता मी तिला माहेरी जायला नाही अडवणार." रेवाची सासू.

"आता कसं. अहो पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची आणि विचारांची श्रीमंतीच श्रेष्ठ असते." सोनालीची सासू.

"हो अगदी खरं आहे." असे म्हणून रेवाची फोन बंद करते आणि रेवाची माफी मागते.

मग दोन दिवसांनी रेवा सोनालीच्या सासूला थॅन्क्यू म्हणण्यासाठी फोन करते. तेव्हा तिला समजते की हा सगळा प्लॅन तिच्या सासर्यांचा आहे. मग ती सासर्यांचे आभार मानते आणि तिच्या मनात सासर्यांच्या विषयी आदर खूपच वाढतो.

ही कथा काल्पनिक आहे. यातून कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही. कथा समजून वाचा आणि आनंद घ्या.

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..