सासरची परडी...

मराठी कथा

© शुभांगी शिंदे

सासरची परडी...

रमा…. चार वर्षांपूर्वी लग्न करून या घरात आली… साधी सरळ, नोकरी करुन घर सांभाळणारी. मोहन सोबत प्रेम विवाह असला तरी सर्वांच्या संमतीने झाला होता… नवीन नवीन सगळं गोड असत मग हळू हळू खटके उडायला लागतात… मोहन आणि रमाला 3 वर्षाची गोंडस मुलगी होती….

एक दिवस सासूबाईंनी सांगितले रमा उद्या सुट्टी घे, मला देवीची परडी भरायची आहे , घरी बायका येतील पूजेला त्यांना जेवू घालायच आहे, पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. माझ्या एकटीने काही होणार नाही. मी नवस बोलले होते देवीला परडी भरून सात बायकांना स्वतः जेवू घालीन. तेच उद्या फेडायचे आहे….

रमाने अॉफिस ला फोन करून सुट्टीचा निरोप दिला.. सकाळी लवकर उठून तयारीला लागली.. घराची झाडलोट, नैवेद्याचा स्वयंपाक, सकाळचा नाश्ता सगळ आटपून दुपार झाली …


दुपारी 12 ला जोग्तीन आल्या, ठरल्याप्रमाणे बायकाही आल्या…. पुजा झाली, नैवेद्य दाखवून झाला, रमाच्या सासूबाईंनी सर्वांना जेवायला बसवले आणि इथे रमा पोळ्या लाटायला बसली, ताटात पोळ्या गरमागरमच हव्या तशी रमाच्या सासूबाईंनी ताकिदच दिली होती. बायकांना तर रमाच्या हातचा स्वयंपाक खूप आवडला, पोट भरल तरी मन भरल नव्हत. नाही म्हटलं तरी परडीचा नैवेद्य सोडून दहा बायका आणि त्यांच्या सोबत आलेले तीनचार चिल्लेपिल्ली पण जेवले. जवळपास तीस एक पोळ्या तिने केल्या. ताटात एक संपली नाही की दुसरी हजर, वाढायला नणंदबाई हाताशी होत्याच तिच्या पण ते लोकांना दाखवण्यापूरत…. सगळ्याजणी जेवून तृप्त झाल्या…. मग सासूबाईंनी सर्वांची ओटी भरली, रमाच्या नणंदेची म्हणजे स्वतःच्या लेकीची पण ओटी भरली…रमाला वाटलं सासूबाई तिलापण बोलावतील, पण तस काही झाले नाही….. कार्यक्रम संपला आणि सगळे घरी निघून गेले..


तशा सासूबाई म्हणाल्या रमे लवकर जेवण घेऊन ये, उपवास झेपत नाही आपल्याला, आण….. ताईला आधी वाढ, बाबांना पण वाढ खूप उशीर झाला सगळ आटपायला….

सगळे जेवायला बसल्यावर रमा पण जेवायला बसली… जेवणाचा घासही पोटात जात नव्हता, सकाळपासून जाम दमली होती ती …. इतक्यात छोटीने हाक मारली… मम्मा “शी” आलीए ….. एकच घास तोंडात गेला होता … तसाच ताट सोडून उठली आणि आधी लेकीला मोकळी केली…. बाकी सगळे जेवण झाल्यावर मिळेल त्या जागी झोपी गेले…


रमा कशीबशी दोन पोळ्या खाऊन उठली. सगळा पसारा आवरून वामकुक्षी घेणार इतक्यात मोहन आला…..
रमा लवकर जेवण वाढ खूप भूक लागलीये… काय बनवलय ??? रमाने कपाळ्याच्या आठ्या ताट करत मेनू सांगितला ..

एक काम कर दूध पोळी वाढ “मोहन म्हणाला ”

तीने गरमागरम पुरणपोळी लाटली त्यावर साजूक तुपाची धार टाकून दुधाबरोबर त्याला खाण्यास दिली…. पहिला घास पोटात जाताच तो खूप खुश होऊन तिला दाद देउ लागला, “वाहह!! काय मस्त झालीय ग पोळी…..

रमाने मानेनेच होकार देऊन बेडवर झोकून दिले स्वतःला.

ती खूप दमली आहे हे मोहनला बरोबर लक्षात आले. . तो जेवणाच ताट घेऊनच तिच्याजवळ गेला…ती नको म्हणत असतानाही त्याने तिला आपल्या ताटातला एक घास भरवला. ….रमाच्या डोळ्यांत चटकन पाणी आल….

मोहन : सकाळपासून सगळ करून खूप दमलीस ना?? थांब जरा पाठीला बाम लाऊन देतो बर वाटेल…. (पिल्लू तिथेच मस्ती करत होती) पिल्लू मस्ती नको करु, आपली मम्मी दमलीएना ? आराम करू देत तिला…..

जेऊन झाल्यावर मोहन ने रमाला बाम लाऊन दिला… तस रमाला थोडा आराम वाटला…. तिने ओटी भरण्याचा सगळा प्रसंग मोहनला सांगितला….

रमा : मोहन आई मला गिणतीत नाही धरत, घरी आलेल्या सगळ्या बायकांना देवीच रुप माणून सगळ केलं, स्वतःच्या मुलीला सुद्धा सगळं केल, पण मला बसवून माझीही ओटी भरावी अस का नाही वाटलं त्यांना ??? मी माझ्या हळदीकुंकूला पहिला मान त्यांना देते…. पण घरातल्या कोणत्याच गोष्टीत मला विचारलं जात नाही, नेहमी त्यांच्या सासरी असलेल्या मुलीला विचारात घेतात. ..

मोहन ने यावर तिची छान समजूत काढली…

ती तुझी सासू आणि तीची जन्मदाती आई आहे, तिचा कल हा तिच्या लेकिकडेच झुकणार…. त्यामुळे आपण न बोलेलच बर…. आणि आजचा नवस जरी आईचा असला तरी तो फेडण्यासाठी सगळी मेहनत तर खरी तुच घेतलीस, तु म्हणतेस तसा कार्यक्रम पण छान झाला, राहता राहिला प्रश्न ओटी भरण्याचा तर इतका गोड नवरा माझ्या आईनेच तर तुझ्या ओटीत टाकला…. आणि काय पाहिजे तुला…. नशिब लागत!! !
रमाला हसूच आल त्याच्या या बोलण्यावर… तिला हसताना बघून तोही हसला…..

( मोहन सारख समजावणारा नवरा आणि रमा सारखी समजूतदार बायको प्रत्येक जोडीदाराला मिळो)

समाप्त