#जलदलेखनस्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
विषय:- संसारात नणंदेची भूमिका
शीर्षक:- सासरची जबाबदारी भाग-३(अंतिम)
"तुम्ही?" शनाया डोळे मोठे करून त्या व्यक्तीला बघून म्हणते.
"हो. ताईने मला बोलावले होते आणि तुमच्या दोघींचे बोलणे मी ऐकत होतो." विनय त्यांच्या बाजूला बसून म्हणाला.
"विनय, तू सुद्धा तुझ्या रागाला आवर घाल. तुझ्या भाऊजींनी असे माझ्यासोबत केले तर तुला चालेल का?" भावाचा कान पकडत नभा म्हणते.
तिने असे केल्यावर आजूबाजूचे सर्व त्यांच्याकडे पाहतात. त्यामुळे विनयला ओशाळल्या सारखे होते. तो बहिणीचा
कानावरचा हात बाजूला करतो. नभा आणि शनाया दोघी हसतात.
कानावरचा हात बाजूला करतो. नभा आणि शनाया दोघी हसतात.
"हो ताई, मी रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेन." तो म्हणतो.
थोडावेळ तिघेही इतर गोष्टींवर बोलत राहतात मघ विनय तिथून आधी निघून जातो.
"आपल्याला काहीतरी खरेदी करावे लागेल. नाहीतर आई विचारणार." असे म्हणत नभा कपडे खरेदी करते सोबतच आपल्या वहिनीलाही काही कपडे घेते.
घरी गेल्यावर आई वाट पाहत असते. त्या दोघींनी त्यांना खरेदी दाखवली आणि येताना विनय आणि आईसाठी जेवणाचे पार्सल आणलेले ते दोघेही खातात.
रात्री सर्व आवरून झाल्यावर चौघेही घरात बसून टीव्ही पाहत असतात.
"वहिनी, तुम्ही पुन्हा ऑफिसला कधी जाणार आहात?"
"ती नोकरी सोडणार आहे." शनाया उत्तर द्यायच्या आधीच तिची सासू देते.
"पण का?" नभाला बिल्कुल पटलेले नसते.
"कारण आता लग्नानंतरचे पहिले सणवार येणार आणि त्यात मला आता काही करायला सुधरत नाही. घरची जबाबदारी तिने उचलावी. विनयचा पगार पुष्कळ आहे म्हणून मी तिला नोकरी सोडण्यासाठी सांगितले आहे." नभाची आई जी सासूही होती त्यांनी सांगितले.
शनाया आणि विनयच्या तोंडाकडे एकवार पाहिल्यावर त्यांना हा निर्णय मान्य नाही हे समजत होते पण आईचे मन नको दुखवायला म्हणून दोघेही गप्प होते.
"वहिनी, तुमचे काय मत आहे?"
"तिला काय विचारते? मी तिच्या घरच्यांनाही आधीच बोलून झाले आहे आणि त्यांना ते मान्य आहे." पुन्हा मध्येच त्या बोलल्या.
"मला नोकरी करायची आहे." शनाया ठामपणे बोलली.
"मलाही तेच वाटते कारण एवढे शिक्षण घेऊन तिने घरी का बसावे? तिच्यासाठी तिने करावी नोकरी. बाबांच्या उपचारासाठी आणि आमच्या लग्नातही खर्च खूप झाला त्यामुळे त्याचे आणि ह्या घराचे कर्ज फेडण्यास तिचा हातभार लागणार असेल तर काय हरकत आहे आई ?" विनय वस्तुस्थिती समोर मांडत बोलला.
तिघेही आपल्या विरोधात बोलत आहेत हे बघून रागाने विनयची आई आपल्या खोलीत जाऊन दरवाजा जोरात आपटून बंद करते.
"तुम्ही जास्त विचार नका करू. " नभा त्यांना आश्वस्त करत म्हणते.
रात्री दोघे नवरा-बायको काहीतरी ठरवून झोपतात. सकाळी शनाया उठून सर्व कामे आवरते आणि तयार होऊन ऑफिसला जायला निघणार तर नभा थांबवून तिच्या हातावर दही साखर देते आणि तीही नंतर निघेन असे सांगते.
शनायाला आपली नणंद जाणार म्हणून वाईट वाटते. तिने खूप किचकट वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून दिल्या होत्या. आपल्या संसारात नणंदेची भूमिका अन्य घरातील सदस्यांसारखीच महत्त्वाची आहे आणि तिचे ह्या घरातील मोठी मुलगी असण्याचे स्थान आपण जपायचे हे ती मनोमन ठरवते.
दोन-तीन दिवस धरलेला अबोला सासूबाई सोडून देतात. नभाने त्यांना खूप वेळ फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनाही त्या गोष्टी पटल्या.
सकाळचा नाश्ता त्या स्वतः बनवून सुनेला आणि मुलाला देत होत्या तर डब्बा शनाया बनवायची. संध्याकाळी ऑफिस मधून येईपर्यंत सासूबाईंनी जेवणाची अर्धी तयारी केलेली असायची. रात्रीची भांडी धुणे असो की सकाळचा केर किंवा अन्य कामे विनयही करत होता.
पुढे जेव्हा जमणार नाही तेव्हा त्यांनी मदतनीस घेण्याचा विचारही केला होता.
नभाने शनायाला जाताना समजावले होते की प्रत्येकवेळी ती तिथे आईला समजावण्यासाठी नसेल त्यामुळे तिचे सासर तिलाच सांभाळायचे आहे. त्यामुळे सासरची जबाबदारी शनायाने घ्यावी असे नभाला वाटत होते.
शनाया सुद्धा सुट्टीमध्ये नभाकडे राहायला जायची. त्यामुळे दोघांचे नाते जास्त घट्ट जरी झाले नसले तरी कोणाच्या बोलण्याने तुटेल असेही नव्हते. दोघीही एकमेकींना आदर फक्त बोलण्यातूनच नाही तर वागण्यातूनही देत होत्या.
नभाच्या आईला आपल्या मुलीचे माहेर सुटणार नाही ह्याची आता खात्रीच झाली होती.
मनातील अडी ही काहीवेळा बोलून सोडवली जावू शकते. अबोल राहून चुकीचा विचार आणि गैरसमज निर्माण करण्यात वेळ घालवला तर नात्यात दुरावा यायला वेळ लागत नाही.
समाप्त.
© विद्या कुंभार
कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा