ससा आणि कासव.. गोष्ट जुनीच पण नव्याने २

Story
गेली सहा वर्षे गळेकापू स्पर्धा असणार्‍या या जाहिरात व्यवसायात अविनाश कार्यरत होता. प्रतिस्पर्धी एजन्सींच्या तोंडातून अक्षरशः हिसकावून तो जाहिराती मिळवत आलेला होता. रात्र रात्र जागून, अविरतपणे काम करून या एजन्सीचं नाव मोठं करण्यासाठी त्याने हातभार लावलेला होता. एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याने आपल्या कंपनीसाठी इतकं झोकून देऊन काम करण्याचं कार्पोरेट क्षेत्रातील हे दुर्मिळ उदाहरण असावं. या एजन्सीत अंतर्गत स्पर्धा सुरू झाली होती. कुठल्याही संस्थेत अंतर्गत स्पर्धा असावी पण ती अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी असावी. एकमेकांच्या पायात पाय घालणं, कुरघोड्या करणं आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणं हे नेहमीच घातक असतं. अविनाश बराचवेळ शांतपणे बसुन विचार करत होता.

सहा वर्षांपूर्वी तो जेव्हा इथे आला तेव्हा खूप काही करून दाखवण्याची उर्मी त्याच्यात होती. ही नोकरी केवळ नोकरी म्हणून न स्वीकारता एक आव्हान म्हणून त्याने स्वीकारली होती. या क्षेत्रात खूप मोठी मजल मारायची महत्वाकांक्षा त्याने बाळगलेली होती. त्याची ही तडफ, हा आत्मविश्वास बर्वे साहेब जाणून होते. त्यामुळे त्यांनी अविनाशला आपल्या चाळीस वर्षांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा मिळवून दिला. त्याला बारीकसारीक गोष्टी शिकवल्या. केवळ क्रिएटिव्हिटी नव्हे तर एकूणच व्यवसाय कसा असावा, त्याचा विकास, त्याचं व्यवस्थापन या सर्व बाबी त्यांनी अविनाशला शिकवल्या. त्यांच्या कथेतील कासव नेहमीच जिंकत आलेलं होतं. मेहनतीवर आणि सचोटीच्या बळावर बर्वेसाहेबांनी ही संस्था भरभराटीला आणली होती. अविनाशचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी रूजवलेली मूल्य जपण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत होता. बर्वे निघून गेले त्यानंतर या संस्थेचे स्वरूप बदलत गेले. जुन्या विचारांच्या लोकांना नवीन व्यवस्थापन पटत नव्हतं. खूप बदल घडले. कामाच्या पद्धतीत बदल झाले. वेतनश्रेणीत बदल झाले. कामाच्या वेळा बदलल्या. नवीन लोक आले. नवीन उतरंड येणारच होती. निष्ठा बदलल्या. वरिष्ठांना नावाने हाक मारण्याची परंपरा रूजू झाली. चहा कॉफीसोबत अवांतर गप्पा मारणारे वरिष्ठ आणि कनिष्ठ एकत्रच दिसू लागले. सर्वात मोठा बदल झाला तो काम मिळवण्यात. आजवर ही संस्था कौशल्य आणि मूल्यांचा आधार घेऊन सचोटीने व्यवसाय करत होती. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा एका मोठ्या संस्थेचं कंत्राट मिळवण्यासाठी खूप मोठी रक्कम अॅड द रेकॉर्ड सँक्शन केली गेली आणि टक्केवारीची भाषा आली तेव्हा अविनाश मनातून अस्वस्थ झाला. अशी वेळ आयुष्यात कधीही आली नव्हती. हाताखाली व्यक्तीने नवीन अॉर्डर मिळवली तर सर्वात आधी अविनाश सिनियर असून त्याचं अभिनंदन करीत होता. आज चित्र बदललं होतं. हाताखालचा माणूस मोठी अॉर्डर मिळवतो तेव्हा त्याला प्रमोशन देऊन डोक्यावर बसवण्याची भाषा व्यवस्थापनाकडून येऊ लागली. संघर्ष अटळ होता. तरीदेखील संयम बाळगत अविनाश या परिस्थितीवर मात करण्याची धडपड करत होता.

आज तर कळस झाला. ससा आणि कासवाची प्रतिकात्मक गोष्ट ऐकवून जी एम पुराणिक यांनी आपले मनसुबे जाहीर केले. त्यांना बर्वेंच्या तालमीत तयार झालेल्या अविनाशऐवजी नुकताच आलेला फास्ट फॉरवर्ड सोहेल जास्त जवळचा वाटत होता. अविनाशशी इतरांना देणंघेणं नव्हतं. केवळ समिधा त्याच्या भावना समजू शकत होती. बर्वेंचा सहवास आणि मार्गदर्शन तिलाही मिळालं होतं. संस्थेचं भविष्य अविनाशसारख्या कर्तबगार माणसाच्या हाती विश्वासाने सोपवणारे बर्वेंचे शब्द तिला आठवत होते. एकेकाळी केवळ विश्वासार्हता आणि उत्कृष्ट दर्जा या दोन गुणांच्या बळावर तो कामे मिळवत आलेला. कर्मचाऱ्यांना कामाचं स्वातंत्र्य देऊन हवे ते परिणाम मिळवण्यात तो पटाईत होता पण आजची पिढी फारच फास्ट होती. सोहेलला एका रात्रीत प्रमोशन हवं होतं. त्यासाठी तो समोरील एजन्सीच्या लोकांना लाच देऊन कंत्राटे मिळवत होता. तिलाही या बाबी खटकत होत्या. याची वाच्यता कुठेच करता येत नव्हती.

संध्याकाळी वेळ काढून तिने अविनाशला बाहेर काढलं. जवळच्या कॉफीशॉपमधे नेऊन तिने त्याला बोलतं केलं.

" या ससा आणि कासवाच्या कथेचा शेवट असा नाही. कासवाने जिंकायला हवं. आपली मूल्ये अशी काळानुसार बदलली तर ती मूल्ये नाहीत. तडजोड करून व्यवहार होतो, जगणं नाही. व्यवसायाचा आत्मा हाच मूल्यांची जपणूक असायला हवा. सचोटी हीच पहिली अट असायला हवी. "

अविनाश बोलत राहीला. समिधाने त्याला बोलू दिलं. मनातील गोष्टी बोलून मोकळ्या झाल्यानंतर काही ना काही उपाय शोधता येणार होता. तिला अविनाशवर पूर्ण भरवसा होता. त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ती हरप्रकारे प्रयत्न करणार होती. बराचवेळ अविनाश बोलत राहीला. त्याच्या मनातील खदखद बाहेर येत होती.

"आजवरचा अनुभव आणि इतकं सारं ज्ञान असताना तू स्वतःचा व्यवसाय का सुरू करत नाहीस? तुझा स्वतःचा व्यवसाय उभा केलास तर खूप पुढे जाशील. माझा तुझ्यावर विश्वास आहे. " समिधाने अखेर मनातली गोष्ट बोलून दाखवली. तिचं बोलणं ऐकून अविनाशचे डोळे लकाकले. आपल्या मनातील हीच गोष्ट समिधाला सांगावी याचा तो विचार करत होता. त्यानंतर सुमारे तासभर अविनाश आणि समिधा या विषयावर भरभरून बोलत राहिले. स्वतःची अॅड एजन्सी सुरू करणं ही कल्पना खूपच उत्साहवर्धक होती. त्या रात्री घरी गेल्यावर उशीरा अविनाशच्या मोबाईलवर मेसेज झळकला,

\"तुझ्या स्वप्नातील अॅड एजन्सी हे माझंच स्वप्न आहे. तू ते नक्की पूर्ण करशील... माझा विश्वास आहे! \"

----समिधा

अविनाशला रात्री उशीरापर्यंत झोप आली नाही. पहाटेपर्यंत तो स्वतःच्या व्यवसायाचं स्वप्न रंगवीत जागाच होता.

"पळपुटा आहेस तू! हाताखालचा एक माणूस तुझ्यापेक्षा चांगलं काम करतोय हे पाहून तुझा जळफळाट होतोय. त्याला स्वीकारणं तुला जड जातंय ना? " पुराणिक साहेबांच्या शब्दांचा कसलाही परिणाम अविनाशच्या मनावर होत नव्हता. त्याचा राजीनामा कडवटपणाने स्वीकारत त्यांनी निरोप दिला. समिधाकडे जाऊन तिला भेटून अविनाश तत्काळ बाहेर पडला. इतरांशी त्याला देणंघेणं असण्याचं काहीच कारण नव्हतं.

गोष्टीतील कासवांचं अपील स्वीकारलं गेलं. शर्यतीचे नियम आधी स्पष्ट न करता ऐनवेळी निकाल दिला यासाठी स्पर्धा रद्द ठरवली गेली. आता ती पुन्हा नव्याने घ्यायची सूचना कोर्टाने केली. शिवाय कठोर निकष लावून मूल्यमापन करण्याचा सल्ला दिला. सशांनी यावर नाराजी व्यक्त केली पण जंगलच्या कायद्यानुसार कुणावरही अन्याय व्हायला नको होता. अखेर शर्यतीसाठी तयारी करण्यात दोन्ही पक्ष गुंतले. यावेळी आव्हान अधिक तगडं होतं.


🎭 Series Post

View all