Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

सार्थक

Read Later
सार्थक

लघु कथा नाव-सार्थक

विषय-आणि ती हसली

फेरी-राज्यस्तरीय लेख/लघुकथा स्पर्धा


       लहानपणापासूनच समीरला गाड्यांचे

फार वेड होते. तसेच अभ्यासापेक्षा बाहेर

खेळण्यात त्याचा जास्तीत जास्त वेळ

जायचा. खेळताना सुद्धा गाल फुगवून

गाड्यांचे आवाज काढीत तो पळत

असायचा. रस्त्याच्या कडेला पडलेल्या

रिकाम्या गाड्यांमध्ये दिवसभर 

चाक फिरवत असायचा. पण  बाबांची 

शिस्त व जरब ही तशीच असल्यामुळे

वेळच्या वेळी घरी येणे, गृहपाठ, शाळेत

जाणे, इतरांशी वागताना नम्रता, आदर,

विनयशीलता हे संस्कार घडत गेले.


           समीरची आई मीनाची तगमग मात्र वाढतच होती. याचे कसे होईल? आईचे स्वप्न होते त्याने खूप शिकावे . 


                शिक्षणामध्ये असे क्षेत्र निवडावे 

ज्यामध्ये त्याचा वेगळा ठसा उमटेल.

त्याची बुद्धिमत्ता दिसेल. त्याने काही

वेगळेच करावे, तो चमकावा असं तिला

वाटायचं. माध्यमिक शाळेत गेल्यानंतर

मित्रांमध्ये सुद्धा समीर खूप प्रिय होता. पण 

आता त्याला क्रिकेटचे वेड लागले.

      मीनाचे कॉलेजमधून आल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरून त्याला घरी आणणे सुरू झाले.

             मात्र आईवर तो  कधीच रागावला नाही. मीनाची काळजी वाढतच होती.

कुशाग्र बुद्धिमत्ता व चौकस विचारसरणीमुळे

सर्व प्रकारच्या उठाठेवी करूनही दहावीला

समीर चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला.


         क्षमा ही त्याची मोठी बहीण. शांत, गंभीर व अतिशय सात्विक वृत्तीची मीनाला तिची मुळीच काळजी नव्हती.


         तिला ध्यास लागला होता तो समीरच्या भवितव्याचा. सरळ मार्गी, भाबडा, प्रेमळ समीर सगळ्यांचाच लाडका होता.


             अकरावी व बारावी मध्ये त्याची कोणताही विषय स्वतःच्या पद्धतीने सोडविण्याची तयारी तिला दिसत होती. त्यामुळे तिची अपेक्षा वाढत होती. बारावीच्या शिकवणी वर्गामध्ये सरांनी काही कारणास्तव गणित विषयाचा एक भाग शिकवला नव्हता. पुन्हा तिची काळजी वाढली. कारण बारावीच्या रिझल्टवर त्याचे पुढचे भवितव्य निश्चित होणार होते.


         मनातील प्रत्येक गोष्ट तो आईला सांगायचा. त्यामुळे त्याच्या मित्रांची 

नावे, त्यांचे स्वभाव, वर्गात घडलेल्या घटना

या सर्व गोष्टी तिला माहीत होत्या.

समीरच्या चेहऱ्यावरून त्याच्या अंतरंगातील

अस्वस्थता ती ओळखत होती. मात्र आईला

त्रास होईल अशा घटना तो सांगत नसे.

चाचणी परीक्षेत मिळणारे गुण समाधानकारक नसले की तिला समीरचे

प्राध्यापक सांगायचे. 

      " कसं रे समीर? " या तिच्या प्रश्नावर समीर चे उत्तर असायचे,

"आई, तू काळजी करू नकोस. मी करतो

सगळं बरोबर."


         त्यानुसार तो करायचा पण. अलीकडे

त्याचे क्रिकेटचे वेड पण वाढलेले होते. मीना 

आपल्या मुलाच्या काळजी मध्ये पूर्णपणे 

गुरफटलेली होती. तिचे विश्व होते समीरचे

पुढील करियर. त्याच्या पुढील कर्तबगारी 

सोबतच तो सर्व बाबतीत आदर्श ठरावा

याविषयी ती ठाम होती. त्यात कुठलीही..

तडजोड करायची तिची तयारी नव्हती.

नीतिमत्तेच्या बाबतीत ती आग्रही होती.

तसे संस्कार मुलांना तिने लहानपणापासूनच

दिले होते. ध्येय जसे उच्च तसाच ध्येयापर्यंत

जाणारा मार्गही सोचोटीचा असावा. खोट्या

मार्गाने काहीच मिळवू नये हे तिचे आणि

मिस्टरांचे मत होते. मुलंही तशीच घडत 

होती. 


             समीरला बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले. बालपणापासून त्याला 

गाड्यांचे तसेच त्यांच्या मेकॅनिझमचे

अतिशय वेड होतेच. इतर वर्गमित्र

संगणक शास्त्राकडे वळले असताना

त्याने अतिशय कठीण असे मेकॅनिकल

इंजीनियरिंग निवडले. मात्र मीनाची तगमग

व चिंता वाढत होती कारण ही तसेच होते.

समीर क्रिकेटच्या मॅचेस पाहताना

देहभान विसरत असे. थोडक्यात क्रिकेटचे..

वेड तसेच वाढलेले होते.


       इंजीनियरिंग चे पहिले वर्ष मुलांना खूप

कठीण जाते हे तिला माहीत होते. त्यामुळे

मीना पुन्हा चिंताग्रस्त झाली.

एक दिवस दूरदर्शनवर तो क्रिकेट मॅच

पहात असताना नेहमीप्रमाणे मीनाने त्याला

विरोध केला. मात्र त्याने जे उत्तर दिले,

ते ऐकून तिला धक्का बसला. तिचे

अवसान गळाले . समीर शांतपणे म्हणाला "आई शिवाय मी राहू शकत नाही ग ".

मीनाच्या डोळ्यापुढे अंधकार पसरला.

म्हणजे आता क्रिकेटचे वेळ त्याच्या 

अभ्यासामध्ये घातक ठरणार होते. 

झाले ही तसेच. समीर काही विषयांमध्ये

उत्तीर्ण होऊ शकला नाही. मीना आता

धास्तावली होती. माझा मुलगा इंजिनीयर

होणार की नाही ही काळजी तिला लागली.

पुढे समीरला आपली चूक कळली. आपण

कुठे कमी पडलो याचा त्याने अभ्यास केला.

क्रिकेटचा छंद आता त्याने बाजूला ठेवला.

व जोमाने अभ्यास करू लागला.

त्याची बुद्धिमत्ता व स्वभाव यामुळे तो

सर्वांचा प्रिय झाला.


      त्याचे परिणाम जसे चांगले तसे आईच्या...दृष्टीने थोडे काळजी वाढविणारेही होते.

           अभ्यासाचा वेळ वाया जाऊ नये,

अभ्यासामध्ये कोणताही अडथळा येऊ नये..

हा घरातील सर्वांचा आटोकाट प्रयत्न 

असताना असे व्हायला लागले की

त्याच्या अभ्यासाच्या वेळी काही वर्गमित्र

त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन यायचे. मनःपूर्वक

तो त्यांचे प्रॉब्लेम सोडवायचा. अतिशय

समाधानाने ती मुलं परत जायची.

समीरचे तसे वागणे योग्यही होते पण

मीनाची धाकधूक वाढत होती. त्याचा 

अभ्यास तो कसा पूर्ण करेल असं तिला

वाटायचं. तसे तिने त्याला बोलूनही दाखवले.

तेव्हा समीरने आईला  सांगितले..


 "आई तूच तर म्हणतेस ना की सर्वांना मदत 

करावी."

 "अरे पण तुझा अभ्यास?".

      फायनलला असताना समीर पुढे ध्येय

होते, G ATE एक्झाम देण्याचे.  तसा

त्याने अभ्यासही सुरू केला होता.

ही एक्झाम उत्तीर्ण झाल्यास पुढील प्रगतीचे

सर्व मार्ग उघडले जाणार होते. त्याकरिता

कठीण परिश्रम अनिवार्य होते.


        समीरची तशी तयारीही सुरू झाली होती.मीनाला माहीत होते त्याला यश मिळणारच.

        माझा मुलगा खूप हुशार आहे. हा विश्वास असूनही ती धास्तावलेली असायची. कारण तिच्या कानावर सतत काहींची वाक्य

आदळत असायची." G ATE पास होणे

सोपे नाही."

"त्याला ते शक्य नाही."

मात्र समीर बी. इ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.


         बस आता G ATE साठी खूप अभ्यास करायचा. निर्धार करून B.E. चे यश सेलिब्रेट करण्याकरिता मित्रांसोबत बाहेर जेवायला गेला. दुसऱ्या दिवशी पहाट

उठल्यानंतर त्याला वेगळ्याच संकटाला

सामोरे जावे लागले. तो तापाने फणफणला.

डॉक्टरांचे तापाचे निदान चुकले होते.

त्यामुळे चुकीची तीव्र औषधे देण्यात..

आल्यामुळे समीरचा ताप वाढतच गेला.

अनेक ठिकाणी त्याला उपचाराकरिता नेले.

पण निदान होत नव्हते.


        मीनाला हे सर्व बघवत नव्हते . बाबांनी

त्याची खूप काळजी घेतली. त्याला थोडं

बरं वाटायला लागलं . तो इतका अशक्त

झाला होता की तो स्थिर उभाही राहू शकत

नव्हता. तरीही त्याने निर्णय घेतला. आता

मी पुण्याला जाऊन तिथेच डॉक्टरांची

ट्रीटमेंट घेतो व G ATE चा अभ्यास करतो.

असे ठरवून समीर पुण्याला मित्रांच्या

रूमवर राहायला गेला . मीनाची अवस्था

काळजी करण्यासारखीच होती. पण त्याला

तिने तसे दाखवले नाही. पुण्याहून गावाला 

येणारे त्याचे मित्र सांगायचे की त्याला

परत बोलावून घ्या. त्याची अवस्था

अभ्यास करण्यासारखी नाही. तो बसून

अभ्यास करू शकत नव्हता. त्याला

झोपूनच अभ्यास करावा लागे. मात्र समीरने

अथक परिश्रम घेतले. शेजारी राहणाऱ्या 

काकूंना त्याचे परिश्रम पाहून खूप कौतुक

वाटायचे. मीनाने व समीरच्या बाबांनी

त्याला परत येण्याचा हट्ट धरला नाही.

परीक्षा झाली. रिझल्ट काय असेल

हा विचार करणेही मीनाने सोडून दिले होते.

आणि अशा परिस्थितीत सकाळी 11 

वाजता समीरचा फोन आला. त्याला

बोलताना सुद्धा धाप लागत होती.


      " आई मी G ATE एक्झाम पास झालो.मला अपेक्षित गुण सुद्धा मिळाले. अगं

मी धावत आलो सर्वप्रथम मला ही बातमी

तुला द्यायची होती."


              मीनाला हे सर्व अनपेक्षित होते. हा धक्का निश्चितपणे तिच्यासाठी आनंददायी होता. तिच्या जीवनाचे सार्थक तिच्या बाळाने केले होते.

           तिला हे सर्व सर्वांना ओरडून सांगावेसे वाटत होते. ती जिंकली होती. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आणि ती हसली......


©® सौ मृणाल मधुकर देशमुख 

         टीम - अमरावती..


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//