Sarthak (Team Marava)

Sarthak- A Short Story by Sunil Gobure from Team Marava.

'सार्थक'

"युनायटेड एअरलाईन्स की कोलंबस जानेवाले यात्रीयोंसे निवेदन है की वे बोर्डींग के लिये गेट नंबर ३ की तरफ प्रस्थान करे.."

वरील उद्घोषना झाली आणि आपली हँडबॕग घेउन स्वप्नाली उठली. आपल्या कडेवरच्या स्वराला तिने राजीवकडे दिले. तोंडावर हात धरुन ती राजीवकडे पहात त्याच्या मिठीत शिरली.

'राज..बोल ना रे मला..जाउ नकोस म्हणून..!! स्वराची शपथ मी ईथून परत तुझ्याबरोबर परत येईन..'

राजीव ने तिचे डोळे पुसले..
'स्वप्स..काय हे..वेडी आहेस का तू? आता कच खाल्लीस तर जन्मभर तुला आणि मला रिग्रेट राहील.  नाही स्वप्नु, आता माघार घेउ नको. तुझ्या विमानाचा नाही, करिआरचा टेकआॕफ आहे हा. ही संधी अशी लाथाडू नको. तु येइपर्यंत स्वरासाठी मी आता आई बाबा दोन्ही असेन. प्लीज, तिचं टेन्शन घेउ नको.'

शेवटची बोर्डींग उद्घोषणा झाली आणि स्वप्नालीने पुन्हा एकदा स्वराला जवळ घेतले. तिचे पापे घेतले.  शेवटी पुन्हा राजीवचा हात हातात घट्ट धरला आणि मग सटकन वळून गेट नं ३ कडे चालू लागली. तिने गेट क्राॕस करताना एकदा वळून पाहिले व हात केला. राजीव व स्वराने तिला पुन्हा बाय केले. ती दिसेनाशी होइपर्यंत ते तिकडे पहात राहिले. 

दोन वर्षे स्वप्नाली आता त्यांना भेटणार नव्हती. 

दोन दिवसानी पहाटे स्वरा जागी झाली तशी तिने सवयीने डाव्या बाजूला पाहिले. तिला तिथे उशी दिसली, पण आई नाही. 

तिने बाबाला हलवले. राजीवने डोळे उघडले तसे तिने  विचारले 
'आई...?'

राजीव चटकन उठून बसला. त्याने स्वराला जवळ घेतले व म्हणाला 
'स्वरा, बेटा आई भूरर गेलीय ना..विमानातून? आपण नाही का परवा रात्री तिला बाय बाय करायला गेलो होतो?'

'बाय बाय..! आई,  बाय बाय...!' असे म्हणत तिने  हात हलवून दाखवले, अगदी तसेच जसे तिने तिच्या आईला निरोप दिला होता दोन दिवसापूर्वी.

राजीवच्या घशात अवंढा आला. त्याचे डोळे भरुन आले. त्याने स्वराला जवळ घेतले व पुन्हा झोपवले.
तिला थोपटता थोपटता गेल्या दोन महिन्यातल्या सा-या घटना त्याच्या डोळ्या समोरुन तरळून गेल्या. 

स्वप्नाली ही पुण्यात एका इंजिन बनवणा-या मल्टीनॕशनल कंपनीत युनीट डिजाइन हेड तर राजीव प्रायव्हेट बँकेत ब्रँच बँकीगचा क्लस्टर मॕनेजर. वयाच्या तिशीत, अंमळ उशीराच दोघांचे झालेले लग्न.. राजीव आणि स्वप्नाली दोघे करियर माइंडेड असल्याने मुल होउ द्यायचा उशीरा घेतलेला निर्णय..त्यामुळे तब्बल दोघांच्या वयाच्या पस्तिशीत झालेली मुलगी..दोघांच्या नावाच्या अद्याक्षराने ठेवलेले 'स्वरा' हे  नाव..थोडीशी प्रिमॕच्युअर जन्मल्याने  नाजूक झालेली स्वरा.. सहा महिन्यांची मॕटर्निटी लिव्ह संपवून स्वप्नालीने पुन्हा काम सुरु केल्यावर तिची उडालेली तारांबळ..पण तरीही वर्क फ्राॕम होम आणि मावशी ठेवून जिद्दीने स्वप्नालीने स्वरासाठी केलेली सारी धडपड..सगळं राजीवच्या डोळ्यासमोरुन झटकन सरकून गेलं. 

स्वराला पुन्हा  झोप लागलीये पाहून त्याने स्वराच्या केसातून हळूच हात फिरवला.  तो परत तीन महिने मागे गेला. 

स्वप्नालीच्या कंपनीचे ग्लोबल डिजाईन हेड  डाॕक्टर फ्राॕस्ट भारतात आले होते. भारत-6 मानांकन असलेले ट्रक्ससाठी  कंपनीतर्फे लाॕंच होत असलेल्या नव्या श्रेणीच्या  इंजिन्सच्या पाहणीसाठी जी ग्लोबल टीम आली होती त्यात ते होते. या प्रोजेक्टवर काम करणारी एकमेव महिला स्वप्नाली होती. तिचा अभ्यास, तिने आतापर्यंत कंपनीसाठी अनेक अवघड प्रोजेक्ट्सवर  केलेले काम पाहून अतिशय प्रभावित झालेल्या डाॕ.फ्राॕस्टनी तिला दोन वर्षे अमेरिकेत त्यांच्या ग्लोबल डिजाइन आॕफीसला येउन काम करायची संधी दिली.

ही खूप मोठी संधी होती. सुरवातीला  ही संधी  नाकारणारी  स्वप्नाली नंतर राजीवने खूप समजावल्यावर  तयार झाली.
शेवटपर्यंत स्वरासाठी अडखळणारा तिचा पाय राजीवने मोकळा केला, जेंव्हा त्याने आपला निर्णय तिला सांगितला. 
'पण राजीव...तुझं करियर..??'
'स्वप्स..हे बघ मला नोकरी परत मिळेल, तु परत आल्यावर. तेवढा काॕन्फिडन्स आहे मला. पण ही संधी तु माझ्यामुळे किंवा स्वरामुळे सोडलीस तर मला जन्मभर ती टोचणी  राहील' 
'अरे पण लोक काय म्हणतील राज !! बायकोसाठी राजीव नोकरी सोडून घरी बसला..थिंक आॕफ इट.!'
'स्वप्नू..हे बघ लोक काय म्हणतात., आय डोंट केअर. मी त्यांना जाउन विचारतो का की "का हो,  मुल झाल्यावर तुम्ही बायकोला, सुनेला नोकरी सोडायला का लावलीत?" नाही ना? मग त्यांचा विचार मी कशाला करु..ही तुला मिळालेली संधी आहे आणि ती तु घ्यायचीयेस..Thats final...'

राजीवने नोकरी सोडली व  स्वप्नाली मनावर दगड ठेउन अमेरिकेला गेली.
गेले चौदा वर्षे  अखंड काम करत आलेल्या राजीवला 'आता आपल्याला  घरीच रहायचय, कामाला जायचे नाहीये'  ही भावना  हळूहळू झिरपत होती, त्याला अस्वस्थ करीत होती.

स्वप्नालीने अमेरिकेत पोहोचून त्याला व्हिडिओ काॕल केला त्यात ती सतत रडतच होती. तिला कसेबसे राजीवने शांत केले.  तेंव्हा मात्र राजीवला जाणीव झाली की आपल्याजवळ इथे किमान स्वरा तरी आहे.  नउ हजार मैल दूर तिकडे एकटीच असलेल्या स्वप्नालीची अवस्था काय असेल?  त्यानंतर मात्र राजीवने ठरवले की आपणच खंबीर रहायचं. कारण आपणच स्वप्नालीला धीर देउ शकतो, बळ देउ शकतो.

राजीवने आपले  रुटीन बनवले. स्वतःचे व स्वराचे आवरुन सकाळी तिला घेउन तो सोसायटीच्या गार्डन एरियात  जायचा. तिचे खेळून झाले की बापलेक तिथेच बाकावर बसायचे. राजीव गोष्टीचे पुस्तक घेउन जायचा व तिला त्यातली चित्रे दाखवत गोष्टी सांगायचा. स्वराला त्या गोष्टी कळायच्या नाहीत पण ती चित्रे मात्र बरोबर लक्षात ठेवायची. 'भूभू..हम्मा..' अशा गोष्टी ती आता ओळखत होती. 

 साडेदहाला तो परत घरी यायचा कारण साधारण त्यावेळी स्वप्नाली त्याला स्काइप वर काॕल करायची. घरात कामवाल्या मावशी यायच्या ज्या सर्व घरकाम व स्वयपाक करायच्या.

दुपारी स्वराला थोडे झोपवून राजीव आपले अवांतर वाचन करायचा. 

संध्याकाळी स्वराला घेउन तो पुन्हा बागेत जायचा.संध्याकाळी सोसायटीतलीही बरीच मुले प्ले एरिया मधे यायची, ती त्यांच्याबरोबर खेळायची. 

स्वरा तीन वर्षाची झाली तशी राजीवने तिला प्ले गृपला घातले. पण अद्याप ती बोलत नव्हती. सोसायटीत खेळतानाही ती खेळायची, बागडायची पण बोलायची नाही. सोसायटीच्या प्ले एरियात येणा-या शमीकाची आई प्राची तिला नेहमी पहायची. 

प्राची स्वप्नालीला ओळखायची. ती एक स्पीच थेरपीस्ट होती. 
तिने एकदा राजीवला बाजूला घेउन विषय काढला..

'राजीव..बरेच दिवस तुझ्याशी हे  बोलायचं होतं..स्वराबद्दल..पण म्हंटलं वेदर यू वूड माइंड..'

'ए..अगं प्राची..असं काय बोलतेस..बोल ना बिनधास्त..' 

'राजीव..मी गेले दोन तीन महिने स्वराला जवळून पाहतेय. तिची स्पिच अद्याप डेव्हलप नाही झालीय...'

राजीवने मान डोलावत दुजोरा दिला..
'हे बघ राजीव..हा कदाचित माझा अंदाज असेल..पण मी अशा मुलांना रोज पाहते त्यामुळे मला मुलांमधे स्पीच डिफिशियन्सी असेल तर लक्षात येते.   मला ही शंका येतेय  की स्वरामधे काही.. डिफिशियन्सी असावी .त्यामुळे ती फार बोलत नाहीये...'

'हम्म..समजलं. पण  यावर उपाय काय आहे प्राची? '

'मला वाटते तु पेडिट्रिशीअन डाॕ.साठेंना कन्सल्ट करावे..मी त्यांच्याशी बोलते..' 

 राजीवने  त्वरीत पेडिट्रिशीअन  डाॕ.प्रसाद साठेंंची भेट घेतली. डाॕ.साठेंनी स्वराची तपासणी केली, तिच्या बोलण्याची तपासणी केली, तिच्या काही टेस्टस घेतल्या. 
दुस-यादिवशी डाॕ.साठेंनी बोलावल्याप्रमाणे राजीव स्वराला स्वप्नालीच्या आई बाबांकडे सोडून  एकटाच त्यांच्या क्लिनीकला आला. 

डाॕ.साठेंनी आदल्या दिवशीचे टेस्ट रिपोर्ट्स समोर ठेउन राजीवला सांगितला..
'स्वराला थोडी स्पीच डिफिशियन्सी आहे. हे एकंदर टेस्टसवरुन दिसते आहे. तिच्या वयाच्या मुलांप्रमाणे शब्द जोडून सलग वाक्य बोलणे तिला जमत नाहीये. आपल्याला आता उशीर न करता तिच्यासाठी  स्पीच थेरपी द्यावी लागेल.  सुदैवाने डाॕ.प्राची तुमच्याच सोसायटीत राहते. तुमच्या सोयीने तुम्ही मुलीसाठी प्राचीची स्पिच थेरपी सुरु करा..'

राजीवने वेळ न दवडता प्राचीशी बोलून स्वराची स्पीच थेरपी सुरु केली. रोज एक तास, आठवड्याचे पाच दिवस, प्राची स्वराच्या बोलण्याच्या समस्येवर काम करु लागली. 

राजीवने  ठरवले यातले काहीही स्वप्नालीला आत्ताच कळू द्यायचे नाही.
स्वप्नाली स्वराशी स्काइपवर बोलायचा प्रयत्न करायची. पण ती फार बोलायची नाही. 'आई..बाय बाय..आई भूर्रर..' एवढंच बोलून ती खोलीतून निघून जायची. स्वप्नालीला खूप वाइट वाटायचे. ती राजीवला म्हणायची
'राजीव, स्वरा माझ्यापासून दुरावतेय का रे?' 
'छे..काहीही काय स्वप्स...दिवसातून दहादा आई आई म्हणून आठवण काढते तुझी..'
'मग ती माझ्याशी बोलत का नाही नीट...'
'अग काही मुलं उशीरा बोलायला शिकतात स्वप्नु..त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखे काही नाहीये..मला वाटतं थोड्या दिवसात ती इतकं बोलेल की आपल्याला म्हणावे लागेल "बास ग बाई आता.." सो डोन्ट यू वरी..!'
या त्याच्या अशा बोलण्याने स्वप्नालीला धीर यायचा.  

बघता बघता स्वप्नालीला अमेरिकेत येउन एक वर्ष झाले होते. कंपनीच्या ग्लोबल HR टीम मधे टॕलेंट रिटेन्शन विभागात तीस एक वर्षीय  मराठी मुलगा विराज होता त्याच्याशी तिची मैत्री झाली होती.  स्वप्नालीला रहायला अपार्टमेंट मिळवून देणे, तिला कंपनीत  सर्वांमधे सामावून घेणे या कामी त्याने स्वप्नालीला खूप मदत केली ज्यामुळे स्वप्नाली या नवख्या ठिकाणी पटकन अॕडजस्ट झाली होती.   

स्वप्नाली एक वर्षानंतर भारतात आठ दिवस येउन जाणार होती. पण विराजने तिला सांगितले, कंपनी पाॕलीसी होती की दोन वर्षाआधी जायचे असेल तर स्वखर्चाने जावे लागेल. 

स्वप्नालीने विचार केला. सध्या तिच्यात आणि राजीवमधे कमावणारी ती एकटीच होती. भारतात जाउन यायचा खर्च हा भाग होताच. पण ती ज्या  टर्बोचार्जर-इंटरकूलर च्या नव्या श्रेणीच्या डिजाईन वर काम करत होती तिच्या ग्लोबल लाँचच्या डेडलाइन खूप जवळ आलेल्या. सर्वच टीम ओवरटाईम काम करीत होती. अशावेळी सुट्टी घेउन भारतात जाउन येणे तिलाही योग्य वाटत नव्हते. 

स्वप्नाली भारतात यायची वाट पाहणारा राजीव थोडा निराश झाला. पण स्वप्नालीने त्याला सारी परिस्थिती  समजावून सांगितली तेंव्हा मात्र त्याने समजून घेतले.   मधल्या काळात विराजनेही राजीवला फोन करुन स्वप्नालीची सारी अडचण सांगितली. राजीवचीही विराजशी अलिकडे मैत्री झाली होती.

तो राजीवशी बोलायचा तेंव्हा  सांगायचा
'राजीव..पंधरा वर्षे मी HR मधे काम करतोय. अनेक टॕलेंटेड मुलींना मी केवळ घरच्या प्रेशरमुळे, किंवा फॕमिली कमिटमेंट्समुळे, भरात असलेली करियर सोडताना पाहिलय..पण तू स्वप्नालीसाठी  जे केले आहेस ते जगावेगळे आहे. हे मी कुठेही पाहिलेली नाहीय. जगभरातले कंपनीचे टॕलेंट आम्ही सांभाळतो,  पण स्वप्नालीसारखे टॕलेंट केवळ तुझ्यामुळे आमच्याबरोबर इथे आहे..हे तुझे श्रेय आहे!' 

स्वराची थेरपी सुरु होउन आता एक वर्ष झालं होतं. डाॕ.साठेंनी पुन्हा केलेल्या टेस्टमधे तिच्या स्पिचमधे  आता ब-याच सुधारणा दिसू लागल्या होत्या. स्वरा प्लेगृपमधै आता गोष्टी आधीपेक्षा जलद शिकत होती.  तिने काढलेली चित्रे तर सर्वांचीच लक्ष वेधून घेत होती. 

लवकरच झालेल्या 'सकाळ चित्रकला स्पर्धेत' राजीवने स्वराला भाग घ्यायला लावला.  तिच्या चित्राला स्पर्धेत चक्क तिसरा क्रमांक मिळाला. स्वप्नालीला आणि विराजला राजीवने तिचे ते  चित्र पाठवले.  विराजने  कंपनीच्या वेबसाइटवर 'टॕलेँट शो-केस' सदरात  'स्वप्नालीज स्वरा' अशा कॕप्शनसहित तिचे चित्र पोस्ट केले. तिच्या या चित्राचे खूप कौतुक झाले. 

स्वप्नालीला अमेरिकेत येउन दोन वर्षे झाली. ती ज्या प्रोजेक्टवर काम करीत होते ते नव्या श्रेणीचे 'टर्बोचार्जर-इंटरकूलर' लाँच झाले. अमेरिकेतल्या व युरोपमधल्या मार्केट्समधे ज्या ज्या ट्रक इंजिनमधे हे ट्रायल्स साठी वापरले गेले त्यांना खूप छान प्रतिसाद मिळू लागला होता. त्यामुळे कंपनीच्या नव्या श्रेणीच्या ट्रक इंजिन्सना डिमांड वाढू लागला. या प्रोजेक्टची डिजाईन हेड म्हणून स्वप्नालीवर अभिनंदनाचा वर्षाव होउ लागला. 

डाॕ.फ्राॕस्टनीही तिला बोलावून तिचे अभिनंदन केले. 
'स्वप्नाली...आम्ही सर्वजण तुझ्या कामावर खूप खुश आहोत. आपले ग्लोबल सिइओ रिचर्ड देखील प्रचंड इम्प्रेस झालेत. त्यांची इच्छा आहे की या पुढेही तू अमेरिकेतच राहून पुढच्या प्रोजेक्ट्सवर काम करावे...'

स्वप्नाली विचारात पडली. पण तिने शांतपणे उत्तर दिले.
'थँक यू सर...खूप शिकलेय मी तुमच्याकडून.. पण आता मला घरी जायचय..माझा नवरा आणि माझी मुलगी डोळ्यात प्राण आणून माझी वाट पहात आहेत'.

डाॕ.फ्राॕस्ट हसले.. म्हणाले
'मी समजू शकतो..तुझ्या नव-याने केले ते धाडस माझ्या कानावर आलय. खूप कमी लोक हे करु शकतात. गो अहेड..मी रिचर्ड ना समजावतो. भारतीय स्त्री ही घारी सारखी असते..कितीही उंच उडाली तरी तिचे आपल्या घरट्याकडेच लक्ष असते.' 

स्वप्नालीने भारतात परतण्यासाठी तयारी सुरु केली. पुढच्या महिन्यात कंपनीचे 'टॕलेंट आॕफ दी इयर' आवार्ड्स जाहीर होणार होते. त्यात  डिजाईन विभागात तिचे नाॕमिनेशन झाले होते.  स्पर्धा तगडी होती. या अवार्ड फंक्शन नंतर ती भारतात परतणार होती.

तिने राजीवला ही गोष्ट सांगितली. स्वप्नाली एक महिन्याने भारतात परत येतेय, शिवाय तिचे कामाची दखल कंपनीच्या ग्लोबल लेवलला घेतली जातेय हे ऐकून तोही खुश झाला. त्याचदिवशी त्याला विराजचाही फोन आला. त्यांच्यात बराच वेळ एका महत्वाच्या विषयावर बोलणे झाले.

एक महिन्यानंतर कोलंबसचा सिटी हाॕल आॕडिटोरीयम,  कंपनीच्या जगभरातून आलेल्या डेलेगेट्सनी भरुन गेला होता. सर्व पुरुष सुट्समधे व लेडीजही छानशा फाॕर्मल वेअर मधे होत्या पण साडी नेसुन आलेली स्वप्नाली सर्वांचं आकर्षण बनली होती. 

दिवसभर कंपनीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगिरीचा आढावा झाल्यावर संध्याकाळी अवार्ड सेरेमनी सुरु झाला. 

सर्व प्रकारातले 'टॕलेंट विनर' घोषीत झाले होते. शेवटचा अवार्ड स्वप्नालीच्या  डिझाइन विभागाचा होता. तिच्याबरोबर चार देशांचे डिझाइन हेड स्पर्धेत होते. 

स्वतः सिइओ रिचर्ड टुली आणि डाॕ.फ्राॕस्टनी नावाची घोषणा केली..
'अँड दी विनर इज,
दी टॕलेंटेड लेडी फ्राॕम इंडिया, 
स्वप्नाली पाटील !!'

स्वप्नालीला आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. ती स्टेजवर रिचर्ड आणि फ्राॕस्ट यांच्यासमोर उभी राहिली. ते दोघे तिला आवार्ड न देता मिष्कीलपणे तिच्याकडे पहात उभे होते.

 स्वप्नालीला काय होतंय कळत नव्हते. 
सिइओ रिचर्ड तिला हसत म्हणाले,
'वेल स्वप्नाली..आम्ही हा अवार्ड फक्त तुला देउ नाही शकत..'
 आणि एक पाॕज घेत ते म्हणाले...'कोणाशी तरी तुला हा अवार्ड शेअर करावा लागणार आहे.. विराज..त्यांना स्टेजवर घेउन ये प्लीज..''

काय होतय कळायच्या आधी विराज बॕकस्टेजवरुन हसत बाहेर आला आणि त्याच्यामागे हसत हसत ते दोघेही बाहेर आले..

राजीव आणि स्वरा...

राजीवच्या डोळ्यात पाणी होते. स्वराच्या चेह-यावर हसु..

स्वप्नाली थरथरत हात तोंडावर धरुन जागीच उभी होती. हे सारे स्वप्नवत होते. कारकिर्दीच्या सर्वोच्च क्षणी तिचा राजीव आणि तिची स्वरा तिच्या समोर होते. 

प्रोटोकाॕल मोडून ती धावत राजीवच्या मिठीत शिरली. राजीवच्या कडेवर असलेल्या स्वराला कवटाळले. टाळ्यांचा कडकडाट झाला.स्वप्नाली एकाचवेळी  हसत अन् रडतही होती. विराजकडे तिने पाहिले तसे विराजने डोळे मिचकावले
'हे' सारे त्यानेच तर घडवून आणले होते.


राजीव, स्वरा, स्वप्नालीने मिळून स्वप्नालीचा 'टॕलेंट आॕफ दी इयर' अवार्ड घेतला. 'त्यांची कहानी' ऐकुन आॕडिटोरियममधील सर्वांनीच उभे राहून त्यांना स्टँडींग ओवेशन दिले.  

शेवटी सर्वांसमोर धीटपणे उभी रहात स्वरा बोलली
'माय आई इज दी बेस्ट...!'
पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. 

राजीवने घेतलेल्या 'त्या' निर्णयाचे आज सार्थक झाले होते..!!


©  सुनिल गोबुरे