सरसेनापती हंबीरराव - चित्रपट अनुभव

एक दोन वर्षांपासून प्रतिक्षा असलेला सरसेनापती हंबीरराव चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. ऑफ?

        एक दोन वर्षांपासून प्रतिक्षा असलेला सरसेनापती हंबीरराव चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. ऑफिसला अर्ध्या दिवसाची दांडी मारत पहिला शो पाहण्याचा आनंद निराळाच. छ. शिवाजी आणि छ. संभाजी महाराज यांच्या कालखंडाची आपल्याला सफर घडवून आणणारा हा चित्रपट. प्रत्येक डायलॉग, प्रत्येक प्रसंग मनाला भिडणारा, रोमारोमात रोमांच उठवणारा. चित्रपटाचा पहिलाच प्रसंग तर डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय आणि हातांच्या मुठी आवळल्या शिवाय राहणार नाही. काय माणसं होती ती, शिवरायांच्या शब्दाखातर हसत हसत प्राण अर्पण करणारी. आणि ते प्रसंग आपल्याला भव्यदिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव तरडे सरांनी आपल्याला या चित्रपटाच्या रूपाने दिला.

        चित्रपटाचं मुख्य पात्र स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते. तरडे सरांच्या उत्कृष्ट अभिनयाने, संवादांनी, आणि प्रसंगांनी हंबीरराव यांचं पात्र त्यांनी जिवंत केलं आहे. गष्मिर महाजनी याने तर छ. शिवराय आणि शंभुराजे यांच्या भूमिका साकारून कमालच केली आहे. त्याची देहबोली, संवाद फेक, चालणं, वागणं दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये छाप पाडून जातं. उपेंद्र लिमये यांनी बहिर्जी नाईक, मोहन जोशी यांनी औरंगजेब, रमेश परदेसी म्हणजे पिट्याभाईने येसाजी कंक साकारले आहेत. महाराणी सोयराबाई यांची भूमिका श्रुती मराठे यांनी जबरदस्त वठवली आहे. देवेंद्र गायकवाड नंदीच्या भूमिकेत हसवून जातो. सर्जा खानच्या भूमिकेत चॉकलेट हिरो राकेश बापट छाप पाडण्यात कुठतरी कमी वाटल्यासारखं वाटतं. क्षितीज दाते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसला होता. त्याने संताजी घोरपडे यांची भूमिका साकारली आहे. इतर कलाकारांनीही त्यांच्या त्यांच्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारलेल्या आहेत.

        चित्रपटातील काही प्रसंग उगाचच आल्यासारखे वाटतात. पण कथेची गरज असल्यामुळे आले असतीलही. असो! तरडे सरांनी चित्रपटातील संवादांवर भरपूर मेहनत केलेली आहे. प्रत्येक पात्राच्या तोंडून निघालेले डायलॉग्ज मनावर ठसतात. एकदम पैसा वसूल!
चित्रपटातील काही आवडलेले डायलॉग्ज -

हंबीररावांच्या भूमिकेला साजेसे असे संवाद.
आज हा भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवयचाय.
परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट.
आरं त्या सर्जा खनाकडं आसं काय आहे? म्हणे आग ओकणाऱ्या तोफा आहेत, कारण मराठ्यांकड आग रोखणाऱ्या नजरा आहेत.

शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो, तो एकच वेळी समद्यांचा असतो.

आरं युध्दात झालेल्या जखामे एवढा देखणा दागिना नाही. पण तो छातीवर पाहिजे. कुठं पाठीवर नाही.

या आणि अशा अनेक संवादांमुळे हंबीरराव आपल्या मावळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा.

गष्मिर महाजनी याने म्हटलेला खालचा डायलॉग तर मनाला भिडला शिवाय राहणार नाही.
संभाजीला समजण्यासाठी तुम्हाला तुमचं काळीज शिवाजीचं करावं लागेल. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो.

या डायलॉग मधून संभाजी महाराजांची कार्यपद्धती कशी असेल ते समजतं. स्वराज्यासाठी कुणी चांगलं काम केलं तर त्याला सोन्याचं कडं देऊन शाबासकी देणारे आणि कामकाजात रोख. आणि कुणी दगाबाजी केलीच तर त्याला थेट टकमक टोक. अशी भूमिका असलेले संभाजी राजे.

     लढाईचे प्रसंग तर अक्षरशः अंगावर येतात. नकळत हाताच्या मुठी आवळल्या जाऊन तोंडातून आपसूक हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी हे शब्द बाहेर पडू लागतात. ज्यांनी पावनखिंड चित्रपट पाहिला असेल त्यांना कदाचित, हा चित्रपट संथ वाटेल. तो फक्त एका ऐतिहासिक प्रसंगावर बेतलेला होता. पण या चित्रपटामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या शेवटच्या लढाई (१६७४) पासून ते हंबीरराव यांच्या मृत्यूपर्यंतचा(१६८७) चौदा पंधरा वर्षांचा कालखंड रेखाटलेला आहे. एवढा मोठा कालखंड अडीच तीन तासांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय, याच्यापेक्षा मोठं आपलं भाग्य ते काय.

        सरसेनपती हंबीरराव मोहिते यांची कारकीर्द तसं पाहिलं तर खूप मोठी आहे. एवढा मोठा जीवनपट तीन तासांमध्ये मांडणं शक्यच नाही. त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग जसे की, पेडगावच्या बहादूरखानाची फजिती, शिवराज्याभिेषेक, पोर्तुगीजांशी झालेली फोंड्याची लढाई, आणि त्यांची वाई पांचगणी नाजिक सर्जा खानाशी झालेली शेवटची लढाई चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतील. सर्व कुटुंबासोबत चित्रपटगृहात जाऊन भव्यदिव्य स्वरूपात पाहावा, अनुभवावा असा हा ऐतिहासिक चित्रपट.

        प्रवीण तरडे सर आणि त्यांच्या सर्व टीमचे मनस्वी आभार आणि रायगडाएवढ्या भव्य शुभेच्छा !