सरपंच असावा तर असा..

सामजिक कथा...
सरपंच असावा तर असा...
जेव्हा बापाचा मुलावर..मुलाचा बापावर ..भावाचा भावावर ..आणि मित्राचा मित्रावर.... विश्वास राहत नाही.तेव्हा कलयुग आले अस नाही तर गावात ग्रामपंचायत निवडणुक आली असे समजावे.
हो! सध्या चंद्रपूर गावात देखिल अशीच परस्थिती होती. कोणी बापा समोर कोणी आई समोर कोणी खास मित्रा समोर कोणी भावा समोर पंचायत निवडणूकीत उभा होता.
गाव तसा लहान फक्त अकरा इतकी सदस्य संख्या. सरपंच निवडणुक थेट लोकांमधून होणार होती. त्यामुळे आता बहुमतासाठी सदस्य पळवा- पळवीचा प्रश्नच नव्हता.
विजयने नुकतेच पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते. विजय अतिशय हुशार ,मेहनती व संस्कारी होता. सध्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. नोकरी लागे पर्यंत आपण देखिल निवडणुकीत भाग घेऊ असे त्याने ठरवले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने त्याला स्थानिक व वरच्या राजकारणाची बऱ्यापैकी कल्पना होती.
खरंतर त्याला या कुरघोडीच्या राजकारणात काहीच रस नव्हता. आपल्या शिक्षणाचा उपयोग गावाच्या विकासासाठी व्हावा अशी त्याची मनोमन इच्छा होती ...पण काय करणार ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे राजकारणाची बालवाडीच इथे सगळे धडे मिळतात.
विजयकडे पर्याय नसल्याने त्याने देखिल निवडणूकी पुरती राजकारण केले..त्याच्या विरुध्द त्याचे दोन जिवलग मित्र व माजी सरपंच हे सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होते.
सुरवातीला विजयने दोन्ही मित्रांना एका निवांत ठिकाणी बोलवले .त्या दोघांना समजवत विजय म्हणाला बघा मित्रांनो! आपण तिघंही सरपंच पदासाठी उभे राहून तिघांचेही नुकसान करत आहोत. दोघांचे तर नक्कीच नक्की!.. बघा आपल्यातला कोणीतरी एकच निवडून येईल म्हणजे झाल दोघांचे नुकसान आणि चुकून.. आणि चुकून जर माजी सरपंच निवडून आले तर आपण तिघंही गेलो बाराच्या भावात! त्यामुळे तुम्ही दोघं सरपंच पदासाठी फॉर्म रद्द करुन आप -आपल्या वार्डात सदस्य म्हणुन फॉर्म भरा म्हणजे आपण तिघंही निवडून येऊ त्यामुळे आपल्या पंचायतीला तरुण तडफदार नेतृत्व लाभेल... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय मी परीक्षा पास होऊन पाच सहा महिन्यात किंव्हा वर्षभरात नोकरीला लागेन नंतर सरपंच पद तुमच दोघंचच!.. आणखी आहे कोण ? गावात तुमच्या शिवाय मित्रांनो! मग तुम्ही छापा काटा करुन घ्या दोन- दोन वर्ष वाटून सरपंचपद काय पटतंय का? विजय आत्मविश्वासाने म्हणाला.
दोघांनीही होकारार्थी मान हलवली ते सरपंच पदावरून माघार घेऊन सदस्यसाठी फॉर्म भरायला तयार झाले.विजयने ही गोष्ट तिघांमध्येच ठेवायला सांगीतली.विजयच अर्ध काम झाले.आता माजी सरपंचाना माघार घ्यायला लावायची होती. पण हे काम इतके सोपे नव्हते याची जाणीव विजयला देखिल होती.
संध्याकाळी तो माजी सरपंचाना घरी भेटायला गेला. माजी सरपंच मुरलेलले राजकारणी होते.. तसं ते स्वभाव आणि कामालाही चांगले होते. म्हणुन तर सलग तीन वेळा सरपंच पदी निवडून आले होते.. मागच्या दोन वर्षात मात्र अंतर्गत राजकारणामुळे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले होते.. त्यामुळे कधी नव्हे ती बदनामी होऊन त्यांची प्रतिमा मलीन झाली होती..
या! या!! गावचे तरुण तडफदार नेतृत्व.त्यांनी विजय चे स्वागत केले... बसा विजय साहेब!.. काय थट्टा करता सरपंच साहेब! विजय अदबीने म्हणाला.
बोला!.काय काम काढले बरं आज तरुण तडफदार भावी सरपंच साहेबांनी आमच्याकडे ?.. माजी सरपंचानी विचारले.. काही नाही साहेब सहजच ...एक छोटासा प्रस्ताव घेऊन आलोय विजय म्हणाला.
सरपंच साहेब आपण एक चांगल व्यक्तीमत्व आहात तरी गेल्या दोन वर्षात घरकुल घोटाळा तसेच वित्त आयोगात अफरातफर असे आरोप आपल्यावर करण्यात आले.. . मला खात्री आहे की, आपण अस काही केले नाही पण विरोधकांची तोंडे कोण धरणार हो! तेव्हा आपण या निवडणूकीतुन तात्पुरती माघार घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करायला आलोय. विजयच्या या प्रस्तावावर माजी सरपंचाच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव दिसले नाही. वास्तविक विजयला अपेक्षा होती या प्रस्तावावर ते हसतील किंव्हा चिडतिल मात्र अस काहीच घडले नाही. विजयच्या प्रस्तावावर ते कमालीचे शांत राहिले. याचे विजयला आश्चर्य वाटले.
अस!.. पण यांत माझा फायदा काय? माजी सरपंचानी अस्सल राजकीय प्रश्न विचारला. फायदा म्हणजे फायदाच आहे साहेब! बघा मी स्पर्धा परीक्षा देतोय त्यामुळे मी निवडून आलो तर फार -फार तर पाच -सहा सरपंच राहीन मग मला नोकरी लागली की, माझा पत्ता कट आणि तुमचा रस्ता मोकळा.. मग सरपंचपद तुमचेच..तुमच्या शिवाय गावात दुसरे आहेच कोण हो!.. विजय ने आपल्या मित्रांना मारलेला डायलॉग जसा च्या तस्साच माजी सरपंचाना चीपकवला आणि अजुन एक फायद्या म्हणजे.यांत तुमची मलीन झालेली प्रतिमा उजळ होईल... लोकांना तुम्ही सांगा.. आम्ही आता तरुण रक्ताला संधी देतोय त्यामुळे आता पर्यंत मलीन झालेली जनमानसातील आपली प्रतिमा उंचावेल.. काय साहेब पटतंय का?
माजी सरपंचानी बराच वेळ विचार करुन तो प्रस्ताव मान्य केला. कारण गावात विजयची प्रतिमा चांगली होती. त्याने गावांतील तरुणांना एकत्र करुन एक मंडळ स्थापन केले होते. आणि त्या मंडळामार्फत त्याने गावाच्या विकासासाठी अनेक चांगले चांगले उपक्रम राबवले होते. पदावर असताना माजी सरपंचाना देखिल विजयने बरेच सहकार्य केले होते.. विजयची एक गोष्ट त्यांना पटली ती म्हणजे नोकरी लागल्यावर तो जाणारच होता. माजी सरपंचानीं माघार घेण्याचा प्रस्ताव तर मानलाच वरून निवडणूकीत जी काही मदत लागेल ती देण्याचे आश्वासन देखिल दिले. विजय त्यांचे आभार मानून आनंदाने परतला.
दुसऱ्या दिवशी दोन्ही मित्रांनी माघार घेऊन सदस्य पदासाठी फॉर्म भरले.तर माजी सरपंचांनी देखिल तरुण रक्ताला संधी मिळावी अस सांगुन माघार घेतली.त्यामुळे विजयाची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. राजकारणाच्या मॅच मध्ये विजयने पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता. सगळ्या गावाने त्याचा सत्कार करुन अभिनंदन केले. त्याच बरोबर माजी सरपंच यांनी तरुण रक्ताला संधी दिल्याबद्ल ग्रामस्थांनी त्यांचे देखिल शाल श्रीफळ देवून सत्कार व अभिनंदन केले. आपली राजकीय खेळी यशस्वी झाली म्हणून माजी सरपंच मनोमन आनंदी होते तर दुसरीकडे आपली खेळी यशस्वी झाली म्हणुन विजय मनोमन खूष होता.
विजय सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्याने विशेष ग्रामसभा घेतली. त्यांत विजयने वेळेवर घरपट्टी भरण्याचे आवाहन केले. तसेच त्याने अभ्यास करुन गावचा विकास आराखडा तयार करुन अनेक नवीन संकल्पना मांडल्या. ग्रामस्थांना त्या आवडल्या यासाठी सर्व सदस्य व गावकऱ्यांनी पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
काही काळातच त्याने लोकसहभाग आणि श्रमदानातुन छोटा बंधारा, तळे,विहिरी व रस्ते बांधले.सरकारच्या अनुदानातून वाचनालय, व्यायामशाळा तसेच स्वच्छता अभियाना अंतर्गत घरोघरी शौचालय बांधून चंद्रपूर गाव हागंदारीमुक्त केले. अशीअनेक विकासकामे करुन त्याने गावाचा कायापालट करुन राज्याचा आदर्शगाव पुरस्कारही मिळवला...
चंद्रपूर गावात सगळे सुरळीत असताना गावात एक बातमी येऊन धडकली ती, चीन देशातून करोना नावाचा भयंकर आजार आता आपल्या देशात आला आहे. या बातमीने गावात आणि देशांत सगळीकडे दहशतीचे वातावरण पसरले. बातमी समजताच विजयने इंटरनेट वर या विषयी अधिक माहिती मिळवली.विषय गंभीर होता लगेचच दवंडी देऊन त्याने दुसऱ्या दिवशी ग्रामसभा बोलावली.
विजयने ग्रामसभेत करोना आजाराविषयी संपुर्ण माहिती दिली. तसेच काय - काय काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन केले. गावातील कोणी बाहेर जाणार नाही तसेच बाहेरचे कोणी गावात येणार नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी गावातील तरुणांची एक कमिटी तयार केली. आपत्कालीन परिस्थीतीत कोणाला गावच्या बाहेर किंव्हा कोणाला गावात यावे लागले तर त्यासाठी जि.प.शाळेत कोरंटाइन सेंटर तयार केले.
सरकारने लॉकडाऊन जाहीर केले.लॉकडाऊन मध्ये विजयने प्रत्येकाला मास्क व घरोघरी सेनिटायझर चे वाटप करुन करोना विषयी गावात जनजागृती करुन परिस्थिती व्यवस्थित हाताळली याचा परीणाम म्हणजे
चंद्रपूर गावात करोना मुळे एकही म्रुत्यु झाला नाही. याची दखल घेत सरकारने चंद्रपुरला करोना मुक्त गाव हा विशेष पुरस्कार देऊन सरपंच या नात्याने विजयचा सत्कार केला तेव्हा त्याने याचे सर्व श्रेय गावकऱ्यांना दिले. कारण त्यांच्याच स्वयंशिस्त व सहकार्यामुळे हे शक्य झाले अस तो म्हणाला.
करोना संकट आता निवळले होते. मात्र करोनामुळे बरेच लोकांचे रोजगार गेले. त्यावर काय उपाय करता येईल याचा विचार करता करता त्याला एक उपाय सुचला त्यासाठी विजयने तातडीची ग्रामसभा बोलावली.
विजयाच्या आत्ता पर्यंत केलेल्या कामांमुळे गावात त्याची अतिशय चांगली प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळे ग्रामसभेत भरपुर गर्दी होती.
विजयने सर्वाना प्रणाम करुन बोलायला सुरवात केली...आपल्या चंद्रपूर मध्ये तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे करोना आजार गावात आला नाही. या बद्दल सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन व आभार.. पण या आजारामुळे देशाची अर्थव्यवस्था पार ढासळली आहे. त्याला आपले चंद्रपुर देखिल अपवाद नाही. बरेच लोकांचे रोजगार गेले काहींचे व्यवसाय ठप्प झाले. याची पुर्ण कल्पना मला आहे. गेलेले रोजगार आणि ठप्प झालेले व्यवसाय सुरळीत करण्यासाठी माझ्या कडे एक उपाय आहे. मात्र हा उपाय आपल्या सहकार्या शिवाय शक्य नाही. म्हणून आपण सर्वानी सहकार्य करावे अशी विनंती मी चंद्रपूरचा सरपंच या नात्याने आपल्या सर्वाना करत आहे. विजयवर ग्रामस्थांचा इतका विश्वास होता की, उपाय न ऐकताच सगळ्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तुम्ही फक्त उपाय आणि आम्ही काय करायचे हे फक्त सांगा. सभेतून आवाज आला.
आपले गाव निसर्गरम्य आहे आपल्या गावाला विस्तृत समुद्र किनारा लाभला आहे.. देवीचे लोकमान्य जागृत मंदिर आहे. समुद्र किनारी पेशवे कालीन किल्ला आहे. हे सगळ पाहण्यासाठी दररोज कितीतरी भाविक व पर्यटक येतात.या सगळ्या पर्यटन स्थळां बरोबर आपल्या गावात किल्ल्या शेजारी गावठाण जागेत सोन्याचे घर आहे. या सोन्याच्या घराविषयी फक्त आपल्या गावातील लोकांना माहिती आहे. या घराबद्दलची माहिती जर प्रसार माध्यमानीं दाखवली तर हे घर पाहण्यासाठी पर्यटक नक्कीच येतील. त्यामुळे आपल्या गावच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. मी आजच आपल्या पंचायतीच्या फेसबुक पेजवर ही माहिती टाकतो. ती माहिती वाचुन उद्या नक्कीच चॅनल वाले बातमी कवर करण्यसाठी येतील अशी मला खात्री आहे.त्यामुळे उद्या कोणी काय - काय करायचे काय बोलायचे याची संपुर्ण माहिती त्यांने ग्रामसभेत दिली. उद्याचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. सगळ्याना सहकार्याचे आवाहन करुन त्याने आपले भाषण संपवले..तसा टाळ्यांचा गडगडाट झाला. विजयने संध्याकाळी सोन्याच्या घराची पोस्ट ग्रामपंचायतच्या पेजवर टाकली. काही वेळातच त्या पोस्ट वर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडून रात्रीतच ही पोस्ट प्रचंड वायरल झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाची गर्दी चंद्रपूर मध्ये झाली.विजयच्या नियोजनाप्रमाणे रात्रीच ज्या प्रमाणे नवीन इमारत बांधताना ती झाकून घेतली जाते त्या प्रमाणे.सोन्याचे घर गावकऱ्यांनी पडद्यांनी पुर्ण झाकून घेतले होते. आतमध्ये प्रवेश करण्या साठी फक्त समोर एक लहान गेट ठेवले.त्या गेटवर गावांतील तरुण मुलांचा लाट्या काटया घेऊन कडा पाहरा होता.बाजुला पंचायतीचा बोर्ड लावला होता... सुरक्षा कारणांमुळे सोन्याचे घर पहायला प्रवेश निषेध .
- आदेशावरून
(सरपंच-ग्रामपंचायत चंद्रपूर)
काही वेळाने विजय तेथे आला त्याच्या सोबत सदस्य व काही ग्रामस्थ होते. विजयला पाहताक्षणी मिडीयाने त्याला गराडा घटाला.... सरपंच साहेब हे घर खरच सोन्याचे आहे का?.. सर इस घर को इस तरहसे क्यों ढका हुवा है?इस घर की इतनी सुरक्षा क्यों की जा रही है? बोलीये सर? सरपंच साहेब नक्की हे काय प्रकरण आहे?..
हे पहा! सदर घर हे सोन्याचेच आहे यात काही शंका नाही.. आणि सुरक्षेच म्हणाल तर कालच या घरातुन सोन्याची बकरी चोरीला गेली आहे. या घरातून अजुन आणखी कोणतीही सोन्याची वस्तु चोरीला जाऊ नये म्हणून आमचे ग्रामस्थ या घराचे रक्षण करत आहेत. सुरक्षा कारणांमुळे आत इतर कोणालाही प्रवेश नाही... तरी येथे येणाऱ्या तमाम पर्यटकांच्या विनंती वरून एक गाईड वजा स्वयंसेवक बरोबर देऊन..आम्ही परिस्थीती सामान्य झाल्यानंतर विशिष्ट शुल्क घेऊन पर्यटकांना प्रवेश देणार आहोत. मात्र त्या वेळेस पर्यटकांना सुरक्षा कारणामुळे आतमध्ये मोबाईल किंव्हा कॅमेरा सारखी वस्तु नेता येणार नाही...कारण सोन्याच्या घराचे फोटो जर चोर, डाकू,गुंड, किंव्हा शत्रूने पाहिले तर अडचण येऊ शकते. या घराची सुरक्षा गावकरी कश्या प्रकारे करत त्यांना काही अडचण तर नाही हेच पहायला मी आलो होतो. इतक्यात आपण सगळे पत्रकार मित्र भेटलात. धन्यवाद.. विजय पत्रकारांना उतरे देऊन गेट जवळ गेला काही पत्रकार त्याच्या मागे माईक घेऊन प्रश्न विचारत येत होते मात्र गेटवर तरुणांनी त्यांना अडवले..
बडी खबर! बडी खबर!! इस वक्त की सबसे बडी खबर!!! अभी अभी इस गांव के सरपंच इस घर की सुरक्षा का जयजा लेने पहुंचे हुए है? अभी -अभी उन्होंने बताया की, कल इस घरसे बकरी चोरी हुयी है। चलीये आधिक जानकारी के लिये गावं के लोगों से पुछते है।.. तो बताईये भाईसाब..क्या ये घर सोने का है। और चोरी हुयी बकरी वाकई सोनेकी थी?.. आरडा -ओरड करुन बातमी सांगणाऱ्या रिपोर्टर मुलीने बाजुला उभ्या असणाऱ्या काही ग्रामस्थांना विचारले..अहो! मॅडम हे घर सोन्याचे आहे आणि काल चोरलेली बकरी देखिल सोन्याची होती.....तो दर्शको देखा आपने.. फिलहाल इस गांव में बोहत ही अफरातफरी माहौल बना हुवा है।.. बिरो रिपोर्ट.. में अभी चंद्रपूरी.. सॉरी चंद्रपूर. में हूं और यहां के लोग बोहोती घाबराये हुए है। उन्हे डर है इस बकरी चुराने के पीछे कही विदेशी ताकते तो नही।.. तुम्ही माझ्या मागे पाहु शकता ते सोन्याचे घर सुरक्षा कारणांमुळे पुर्ण झाकले आहे... सदर सोन्याची बकरी चोरीच्या घटनेमुळे येथील ग्रामस्थ फार भयभीत झाले आहेत. ... कॅमेरामन मोहन सह मी राधिका..
त्या गेट समोर ह्या रिपोर्टर लोकांचा अक्षरशः धिंगाणा चालु होता. प्रादेशिक आणि राष्ट्रीय जवळपास सर्वच चॅनलनीं ही बेकिंग नूज बनवली होती. त्यांची हेडिंग पण एक से एक होती..
हे सगळे पाहुन शेवटी स्वतः पर्यटन मंत्र्याना तातडीने चंद्रपुरला ते सोन्याचे घर पहाण्या साठी भेट दिली.गावचा सरपंच म्हणून विजय त्यांना सोन्याचे घर दाखवायला गेटवर ऊभा होता. मंत्र्यांनी सुरक्षा सक्षकाचा लवाजमा गेटवरच ठेऊन ते विजय सोबत आत गेले.आणि आत येऊन पाहतात तर काय एक साधे विटा मातीचे घर होते.. ..त्यांनी विजयला विचारले सरपंच काय आहे हे? हे घर सोन्याचे आहे?..त्यावर विजय म्हणाला होय साहेब हे खरच सोन्याचे घर आहे... सोन्या महादू पवार याचे घर आहे हे! आपल्याला खोटं वाटत असेल तर ही पहा त्याची घरपट्टी! विजय ने कागद पुढे केला.आणि हो!..काल खरच त्याची बकरी चोरीला गेली आहे साहेब! आता त्या बकरीचा मालक सोन्या त्यामुळे ती बकरी सोन्याचीच. सरपंच नक्की काय गौडबंगाल आहे हे? मंत्र्यांनी थोड्या रागात विचारले...यांवर विजय ने गावांतील तरुणांच्या रोजगार व गावातील बुडालेले व्यवसाय यामुळे केलेल्या या उपायां विषयी त्याने पर्यटन मंत्र्यांना सगळी हकीकत सविस्तरपणे सांगीतली... या घराला पहायला कितीतरी पर्यटक या गावांत येतील ते मंदिराला भेट देतील किल्ल्याला भेट देतील बीचवर फिरतील त्यामुळे गावातील तरुणांना रोजगार मिळेल आणि स्थानिक लोकांचे बुडालेले व्यवसाय सुरळीत होतील हा शुद्ध हेतु ठेऊन हे सगळे केले साहेब. यांत कोणाची फसवणूक करण्याचा आमचा उद्देश अजिबात नाही. आणि आता तर तुम्ही देखिल पाहिले की हे घर सोन्याचेच आहे. विजयच्या हुशारीवर आणि गावाच्या विकासासाठी असलेल्या तळमळीतुन केलेल्या या उपायावर पर्यटन मंत्री खूष झाले. त्यांनी विजयचे कौतुक केले. गावची अशी काळजी करणारा सरपंच सगळ्या गावांना मिळो अशी प्रार्थना केली. मंत्री अस्सल राजकारणी होते..विजयच्या खांद्यावर हात ठेऊन ते थोड्या गंभीर आवाजात म्हणाले.. सरपंच!.. तुम्ही केलेला हा उपाय गाव विकासासाठी आहे हे मी समजु शकतो.मात्र मी एक मंत्री आहे. त्यामुळे सत्य सांगणे माझे कर्तव्य आहे. बाहेर जाऊन मला मीडिया समोर.. खरे खरे सांगावेच लागेल....पर्यटन मंत्री बाहेर निघाले मागे विजय ,ग्रा. सदस्य व ग्रामस्थ त्यांना विनंती करण्याचा प्रयत्न करणार इतक्यात ते पत्रकांरा जवळ पोचले देखिल.... मी स्वतः हे घर पाहिले हे घर अगदी शंभर टक्के सोन्याचेच आहे यात काही शंका नाही... आणि या चंद्रपुर गावात निसर्गरम्य समुद्र किनारा, देवीचे जागरुक देवस्थान ब्रिटिशकालीन किल्ला अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत म्हणून आम्ही चंद्रपूर गावाला पर्यटन स्थळ म्हणुन घोषित करत आहोत..त्यांची घोषणा व सोन्याच्या घरा विषयीचे वक्तव्य ऐकून विजय शॉक झाला.. त्याला आता समजले की पर्यटन मंत्र्यांनी गुगली टाकुन त्यालाच क्लीन बोल्ट केले होते.... त्याने मनातुनच पर्यटन मंत्र्यांना हसुन सलाम केला.. व त्यांचे मनःपूर्वक आभार मानले..
आता ग्रामपंचायत मार्फत तिकीट आकरून हे सोन्याचे घर गावातील तरूण गाईड बनुन दाखवतात.. सोन्याचे घर पाहुन गेलेला माणूस पुन्हा कधी ते पहायला येत नाही.. पण बाहेर गेल्यावर दहा काय शंभर लोकांना तो सांगतो की, ते घर सोन्याचेच आहे. मी पाहुन आलो तुम्हीही नक्की पहा! त्यामुळे आता पर्यटक संख्या शेकडो वरून हजारो वर पहोचली आहे.. आणि ती पुढे वाढतच जाईल....
सुरक्षा कारणांमुळे सोन्याच्या घराचा फोटो आज प्रसार माध्यमात कुठेच ऊपलब्ध नाही.सोन्याच्या घराचा फक्त एकच फोटो ऊपलब्ध आहे.. तो चंद्रपूरच्या ग्रामपंचायच्या एका फाईल मध्ये आहे.. जेव्हा घरकुल पुर्ण झाल्यावर सोन्या महादू पवार ला त्याच्या घरकुलाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी ग्रामसेवकांनी त्याला घरासमोर ठेऊन फोटो काढला होता तो!.. नशीब याची खबर अजुन मीडियाला नाही... नाहीतर त्याची सुद्दा त्यांनी ब्रेकिंग नूज बनवली असती....

लेखन : चंद्रकांत घाटाळ
संपर्क: 7350131480