सरीवर सर

Rain

              आज सुट्टी... आज ती खूप निवांत होती रोजच्या धावपळीतून सुटका झाल्यासारखं वाटत होत. सुट्टी म्हणजे फाटलेल्या आयुष्याला रफू करण्याचा दिवस म्हणतात ना अगदी तसं... अशीच आज ती हातात कॉफी चा मग घेऊन खिडकी मध्ये बसलेली अन खिडकीतून दिसत होता मुसळधार पाऊस.. असा पाऊस बघून तिला त्याची आठवण नाही आली तरच नवल. कॉफी चा वाफे सोबत उडत उडत ती पोचली तिच्या भूतकाळात...

              साधारणपणे पाच वर्षांपूर्वी अशीच ती एकदा खरेदीला बाहेर गेलेली अन असाच जोरात पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबली. प्रत्येकजण कुठे ना कुठे आसरा शोधत होता. अन तेवढ्यात तिथे तो आला त्याचं झाडाखाली. आंखो से आँखे टकरायी और सावन में आग लग गयी.. अशीच दोघांच्या मनाची स्थिती. तिला अशी ओलेती पाहून तो ही तिच्या प्रेमात पडला. लव्ह ऍट फर्स्ट साईट म्हणजे काय हे तेव्हा कळालं. तेव्हा तो म्हणला एक चहा घेऊया?? तिनेही होकार दिला. चहा सोबत रंगल्या गप्पा, फोन नंबर घेतले. तेवढ्यात पाऊस ही थांबला. पुन्हा भेटू असं म्हणून दोघेही निघून गेले.

              अशी पावसात सुरवात झालेल्या प्रेमाच्या प्रत्येक भेटीचा पाऊस साक्षीदार होता.. आता तो कामानिम्मित दुसऱ्या शहरांत पण दरवर्षी पावसासोबत तो ही येतो तिला भेटायला. स्वतःच्या प्रेमात तिला चिंब करायला.

               पहिल्या पावसातली भेट, त्यानंतर पावसातली बाईक वरून केलेली पहिली लॉंग ड्राईव्ह, एका कपातून पिलेला चहा, तो अंगावर शहारा आणणारा थंड वारा अन त्याचा स्पर्श, ती पावसातली चिंब ओली मिठी अन त्याच्या विरहात डोळ्यात येणारं पाणी .. सारं काही आठवतं होत तिला आज.. तिनं मोबाईल घेतला त्याचा फोटो बघितला आणि मोबाईल वर गाणं लावल...

         अशा पावसात सख्या व्हावे तुझे येणे-जाणे

              उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे

               जशी ओली हुरहुर थरारते रानभर

          तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर!

              सरीवर सर ... सर ... सरीवर सर ...