May 15, 2021
Romantic

साडीच्या निऱ्या

Read Later
साडीच्या निऱ्या

#साडीच्या_निऱ्या

राघव व सिया यांचा पहिलावहिला दिवाळसण. आताशी कुठे आठेक महिने झाले होते लग्नाला. त्यात ही गुलाबी थंडी..उफ्फ. दोघं एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून गेली होती. अगदी फेविकॉलचा जोड जशी. पहाटे फटाक्यांच्या आवाजाने सियाला जाग आली. राघव गाढ झोपला होता.  त्याच्या हाताने तिला पुरतं वेढलं होतं. त्याचा मंद लयीत होणारा उष्ण श्वासोच्छ्वास, त्याच्या मिटलेल्या पापण्या आणि एखाद्या निरागस बाळासारखे चेहऱ्यावरील भाव..सिया पहातच राहिली त्याच्याकडे. 

तिची नाजूक बोटं त्याच्या कुरळ्या केसांतून फिरली तशी त्याने मंदशी हालचाल केली व सियाभोवतीची गुलाबी मिठी अजूनच घट्ट केली. इतक्यात फोन वाजला. सियाने एका हाताने उशीशेजारचा फोन घेतला.
राघवची आई बोलत होती.
हेलो आई

हेलो सिया,कसे अहात? मजेत ना. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हा दोघांना. राघव उठलाच नसेल अजून. आळशीच आहे तो. संध्याकाळी दोघं या गं घरी. तुझ्या आजेसासूबाईही आल्यात बरं का गावाहून. सारखी तुझी न् नातवाची आठव काढताहेत.

 बरं ऐक,येताना आजोबांसाठी धोतरजोडी व आजीसाठी बारीक फुलांची दोन नववारी लुगडी आण. खूष होतील दोघं. आणि हो फराळ मी बनवलाय सगळा. तू फक्त बेसनलाडू घेऊन ये झालं. तुझ्या हातची चव गं. बाकी विशेष नाही. चल ठेवते। आवर पटकन आणि त्या राघुला घे मदतीला.

बरं आई. असं म्हणत तिने फोन ठेवला व स्वतःशीच म्हणाली,"राघू..माझा राघू,किती गोड नाव आहे नं. बाकी हा आहेच तसा मोतीचूर लाडवासारखा. मी तर याला लाडूच म्हणेन."

सुर्याची कोवळी किरणं घरात शिरु लागली तशी सिया लगबगीने उठली. पहाटेची थंडी थोडी ओसरली होती. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं,धुक्याचा पडदा हळूहळू दूर होत होता व समोरच्या डोंगरातून सुर्यनारायण वरती येत होता. आकाशात लाजेच्या लालतांबड्या रंगांची उधळण झाली होती. 

सियाने शाम्पूने केस स्वच्छ धुतले. जरा लांब असते तर राघूवर ओलेते केस झटकले असते,ते प्रेमकथेत असतं तसं,ती मनाशीच म्हणाली. इतक्यात दूधवाला आला. तिने दूध घेतलं. दूधवाला शुभ दीपावली म्हणाला. तिनेही त्याला शुभेच्छा दिल्या. बाहेर शेजारणींनी पानाफुलांची रांगोळी काढून दिवे ठेवले होते. 

सियाने दूध तापायला ठेवलं. देवपूजा केली व नवीनच आणलेले रंग,रांगोळी घेऊन बसली. गेरुने इवलीशी जागा सारवली. त्यावर सहा ठिपक्यांची नाजूकशी रांगोळी रेखाटली व रंग भरले. इतक्यात राघवनेही उठून उटणं लावून आंघोळ केली होती. सियाच्या लक्षात आलं,"अरे गडबडीत उटणं लावायलाच विसरले." राघवने तिच्या मनातले विचार ओळखत तिला म्हंटलं,"चल मी तुला उटणं लावून आंघोळ घालतो."
"तू गप रे," ती म्हणाली.
राघवने तिच्या आवडीचं गाणं गुणगुणत चहा केला व टोस्ट बनवले. दोघांनी नाश्ता केला. सियाने नाश्त्ता करताना आईचा फोन आलेला व कायकाय आणायला सांगितलय ते सांगितलं. 

"अरे वा आजीआजोबा आलेत. मज्जा येणार. तू पटकन बेसनलाडू बनवायला घे. माझी काही मदत लागली तर सांग."

"बरं." सियाने बेसन,तूप,पिठीसाखर, वेलचीपूड ..सगळं साहित्य बाहेर काढलं. आधी तिने युट्युबवर रेसिपी नीट पाहून घेतली व कढईत थोडं तूप ओतून बेसन मंद आचेवर भाजू लागली. सगळं मन लावून करूनही बेसन पातळ झालं. काही केल्या आळेना. ते बेसनाचं तळं पाहून सियाच्या डोळ्यातून गंगायमुना वाहू लागल्या. 

राघव दाराला तोरण लावून आत आला. सियाचा रडवेला चेहरा व कढईतलं बेसनाचं तळं पाहून तोही घाबरला. त्याला तरी कुठे काय येत होतं! सियाला गप्प करणार इतक्यात परत आईचा फोन आला. सियाने डोळे पुसतच फोन उचलला. 
"हेलो"

"हेलो,अगं उठला का राघू? कारेटं फोडायला सांग त्याला. नक्की विसरला असणार. उटणं मात्र शोधून लावलं असेल. त्याचा सुगंध फार आवडतो त्याला." 

"हो आई देते कारेटं."

"अगं पण तुझा आवाज का असा येतोय सिया. काय बोलला का राघव तुला? थांब येऊदेत तो. मी त्याला खडसावते चांगली."

"तसं नाही आई. माझाच थोडा घोटाळा झाला आहे. ते बेसन पातळ झालं,आळतच नाहीए."

"अगं एवढंच ना. जरा तूप वाढत्या हाताने घातलं असशील. थोडा वेळ फ्रीजमधे ठेव बघू. मग आपणच वळले जातील आणि नाहीच झाले तर ताटाला तूप लावून पसरव त्यात नी वड्या पाड. शेवटी आपणच खाणार. आपल्याला कुठे दुकानात विकायचचेहेत."

आईंच्या बोलण्याने सियाला धीर आला. तिने तो पँन फ्रीजमधे ठेवला व बाकीची आवराआवर केली. एव्हाना पीठ खरंच आळलं होतं. तिने पटापट लाडू वळले. त्यांवर चारोळी,काजूपाकळी टोचून चेहरे तयार केले. 

कॉटनची शेंदरी रंगाची साडी बाहेर काढली व नेसायला घेतली पण तिचा भोंगाच जास्त होऊ लागला. राघवला निऱ्या धरायला बोलावलं खरं पण ते काम काही त्याच्याने नीट होईना. एक तासभर दोघंजणं त्या साडीतच लुडबुडत होती. परत आईचा फोन. यावेळी मात्र राघवने घेतला.
"हेलो आई"

"अरे राघू,निघा आता. खरेदी करत यायचंय न् तुम्हाला. जेवायलाच या. मी सिताफळ रबडी बनवलेय सियाच्या आवडीची."

"आणि माझ्या?"

"तुझ्या आवडीचे घावण बनवतेय आजी आणि सोबत तुझी फेवरेट बटाट्याची भाजी."

"येस"

"बरं,आता त्या निऱ्यांत लुडबुडलात तेवढं खूप झालं. तिला छानसा ड्रेस घालायला सांग बरं."

"तुला कसं कळलं? सीसीटीव्ही लावलाएस का?" राघव संशयाने इथेतिथे पाहू लागला."

"अरे तुझ्या बाबाला तरी कुठे यायच्या निऱ्या नीट करायला त्या तुला येणार!"

"म्हणजे आई तुम्हालाही साडी नेसता येत नव्हती,"सियाने विचारलं.

"खरंच नव्हती येत. माझ्या सासूने शिकवली मला. फार सांभाळून घेतलं त्यांनी मला. अल्लडच होते मी. तसंच मीही तुला सांभाळून घेईन आणि हो मी तुझ्यासाठी जांभळी इरकल व ऑक्सिडाईजचा ज्वेलरी सेट आणून ठेवलाय. जेवूनखाऊन जरा झोप काढू मग निवांत रांगोळी काढू. तुझ्या हातची फिल्टर कॉफी पिऊ नि मग नेसूया साड्या आणि छान सेल्फी काढूया तिघींचा."

"हो आई येतो लवकर," असं म्हणत सिया मनमोकळी हसली.

"ए चल निऱ्या सोडून देतो,"राघव.खट्याळ डोळ्यांनी म्हणाला.

तो साडीचा भोंगा त्याच्या अंगावर टाकत सिया त्याला म्हणाली,"घडी करून ठेव हिची. मी माझा गुलाबी ड्रेस घालते. सासूबाई जिंदाबाद!"

-----सौ.गीता गजानन गरुड.