❤️ सारे काही तुझ्याचसाठी ❤️

पुष्पा

" नील , आणखी किती प्रेम करणार आहेस माझ्यावर ??? खरंच ऐक रे माझं, जीवनसंगिनी म्हणून खरंच माझी साथ तुला कितीशी अशी मिळणार आहे??? मी ही अशी अपंग , तुझं सगळं आयुष्य माझी काठी बनुनच जाईल रे राजा ...." ...पुष्पा नीलच्या मिठीमध्ये विसावत बोलत होती. 

" तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही तुला माहिती आहे , का माझ्या मागे लागते आहेस?? . " ....नील पुष्पाला आपल्या मिठीत तिच्या डोक्यातून हात फिरवत कुरवाळत बोलत होता. 

" प्रेमात वेडा झाला आहे तू , व्यवहारिक आयुष्य असे नसते रे राजा . तुझ्या आईवडिलांची पण काही स्वप्न आहेत , तुझ्यासाठी, त्यांच्या सूनेसाठी . त्यांची स्वप्न कशी तोडू शकतो तू ?" ... पुष्पा 

" काय कमी आहे राणी तुझ्यामध्ये , सगळंच व्यवस्थित आहे. सुंदर आहेस, शिकली आहेस , स्वतःच्या पायावर उभी आहेस , सुस्वभावी आहेस , खूप गोड मनाची आहे . " ... नील 

" तुझ्यापुढे हे सगळंच खूप कमी आहे . तू इतक्या मोठ्या बिझनेसमनचा श्रीमंत घरचा मुलगा , एका मोठ्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहेस. सगळे म्हणतात दिसायला पण खूप हँडसम आहेस. You deserves much more better than me dear . सोड हा हट्टीपणा . " ..... पुष्पा 

" तू सोड हा हट्टीपणा, नी लवकरच लग्नासाठी होकार दे. किती वाट बघायला लावणार आहेस ?? आणि हे जे काही मी आज आहो हे सगळं तुझ्यामुळे , तू माझ्या आयुष्यात आली आणि माझे आयुष्यच बदलले. " ... नील 

" अरे तो फक्त एक योगायोग आहे . मी नसते आले तुझ्या आयुष्यात , तरीसुद्धा हे सगळं तू अचीव करणारच होता. तू हुशार आहेस , मेहनती आहेस, हे सगळं तुला मिळणारच होते. उगाच माझे नाव घेऊन मला मोठेपणा देऊ नकोस . " ...पुष्पा 

" तुझ्यामुळेच तर बदललो आहे ग मी . मी तर बिघडलेला, उद्धट , वाईट सवयींने पुरेपूर वाया गेलेला असा मुलगा होतो . ती रात्र माझ्या आयुष्यात उजेड देऊन गेली मात्र तुझ्या आयुष्यात पुरेपूर अंधक्कार पसरवून गेली. " .... नील मनातच बोलत होता, त्याच्या डोळ्यांसमोर ती रात्र जशीच्या तशी तरळून गेली. आणि ते सगळे आठवून त्याच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या कपाळावर किस करत त्याने पुष्पाभोवतीची त्याची मिठी आणखीच घट्ट केली. 

नील राजे, वय 28, दिसायला एकदम राजबिंडा, बिजनेसमन यशवंत राजे यांचा लहान मुलगा. त्यांच्या ग्रुप ऑफ कंपनी मधल्या एका कंपनीचा MD होता. चार वर्षापासून तो 25 वर्षीय , सुंदर सुस्वभावी पुष्पाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. गेल्या दोन वर्षांपासून त्या दोघांमध्ये अश्याच पद्धतीचे बोलणे होत होते. तो तिला लग्नासाठी मागणी घालत होता, आणि ती नकार देत होती. पुष्पाचे पण त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम होते, पण आपलं अपंगत्व बघता ती त्याला नकार देत होती. 

*****

सहा महिन्यांनी .....

" नील घाबरु नकोस, अरे सगळं ठीक होईल " ....पुष्पा एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचरवर झोपली होती. नीलने तिचा हात आपल्या हातात पकडून ठेवला होता. तिला ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात होते. त्याच्या हाताच्या कंपणावरून तिला जाणवले होते की तो किती घाबरला आहे. 

" नील बाळा, नको काळजी करू सगळं नीट होईल ." .... पुष्पाची आई . 

" ह्मम, its fine.....all the best sweetheart , come back soon " .... नीलने तिच्या कपाळावर किस केले नि तिचा हात सोडला. त्याच्या किस केल्याने पुष्पाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटले. नर्स, वॉर्डबोय तिला ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये घेऊन गेले. बऱ्याच वेळ आतमध्ये सर्जरी सुरू होती. नील बाहेर एकटक ऑपरेशनचा थिएटरच्या बाहेर वरती लागलेल्या लाल लाईटकडे बघत होता. तो आतून खूप घाबरलेला होता. आज त्याला त्याच्या प्रेमाला गमवायची भीती वाटत होती. पाच वर्षापासून त्याने त्याचा मनामध्ये एक रहस्य दडवून ठेवले होते . आज जर तिची सर्जरी सक्सेसफुल झाली तर ते रहस्य उलगडणार होते. तिला न सांगताच सगळे कळणार होते, ज्यामुळे त्याला त्याचे प्रेम दुरावण्याची खूप भीती वाटत होती. पण या सर्जरीमुळे तिला नवीन आयुष्य मिळणार होते. त्याला बरेचदा सगळं खरं खरं तिला सांगावे वाटत होते . खरे ऐकून ती थांबणार नाही, त्याला सोडून जाईल ,याची त्याला भीती वाटत होती. आणि वारंवार ठरवून सुद्धा तो तिला काहीच सांगू शकला नव्हता. 

ऑपरेशन थिएटरचा लाईट बंद झाला , डॉक्टर बाहेर आले होते , तसे नील आणि पुष्पाची आई धावतच थिएटर जवळ गेले. 

" डॉक्टर , पुष्पा.....??.." .... नील प्रश्नार्थक नजरेने डॉक्टरकडे बघत होता. 

" सर्जरी सक्सेफुल झाली आहे. तीन आठवड्यात त्या रीकवर होतील. थोड्या वेळाने तुम्ही त्यांना भेटू शकता "..... डॉक्टर काही सूचना देऊन निघुन गेले. नील आणि पुष्पाच्या आईला खूप आनंद झाला होता. 

******

तीन आठवड्यांनी.....

" मिस पुष्पा , कोण हवंय तुम्हाला तुमच्या समोर ??" ..... डॉक्टर

" नील ..".....पुष्पा 

" किती प्रेम करते ही माझ्यावर, आज तिला मी हवा आहो, उद्या पण असेच असेल काय ???" .....नील तिच्या पुढे उभा विचार करत तिला बघत होता. डॉक्टर आपले काम करत होते . 

" Open the eyes slowly..... " .... डॉक्टरांनी पुष्पाच्या डोळ्यांवरची पट्टी काढली होती आणि तिला आता हळूहळू डोळे उघडायला सांगत होते. पुष्पा हळूहळू तिचे डोळे उघडत होती. 

" तू ssss ???" ..... पुष्पा जोऱ्यात ओरडली. तिच्या चेहऱ्यावर आता राग जमा होत होता. 

" पुष्पा, शांत हो राणी , विकनेस आहे तुला , प्लीज शांत हो " .... नील तिच्याजवळ जात तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होता. 

" Don't touch me , तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची, दूर हो माझ्यापासून . डॉक्टर , मी तुम्हाला नील पुढे हवा आहे सांगितले होते , तुम्ही या गुन्हेगाराला का माझ्या पुढे आणले. आई ssss , आई ssss " ..... पुष्पा जीवाच्या आकांताने ओरडत होती. तसा नील तिच्या दूर झाला. 

पुष्पा अशी का वागते आहे , डॉक्टरच्या सुद्धा लक्षात येत नव्हते. आतापर्यंत येवढे प्रेमाने वागत होती, आणि आता अचानक नीलला बघून अशी का रिॲक्ट करत आहे , त्यांना कळत नव्हते. 

" पुष्पा , पुष्पा , cool down . तुमच्यासाठी असे वागणे ठीक नाही आहे. तुम्हाला स्ट्रेस अजिबात सहन होणार नाही . प्लीज शांत व्हा. नर्स यांना बघा. ".... डॉक्टर 

नीलला बघून पुष्पाचा जीव घाबराघुबरा झाला होता. तिला घाम सुटायला लागला होता. कासावीस नजरेने ती इकडेतिकडे बघत होती. 

" पुष्पा, काय झाले?? शांत हो पोरी , नाहीतर तब्बेत बिघडेल " .... पुष्पाची आई तिच्याजवळ जात तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत होती. पण ती खूप गोंधळ घालत होती. कोणालाच ती सावराल्या जात नव्हती. शेवटी डॉक्टरने तिला एक इंजेक्शन दिले. हळूहळू ती शांत होत झोपी गेली. 

तिला तसे त्रासात बघून निलचे डोळे पाणावले होते. तिच्या डोक्यावर हात फिरवत तो बऱ्याच वेळ तिला बघत होता. शेवटी व्हायचे तेच झाले होते . भरल्या डोळ्यांनी तो रूमच्या बाहेर आला. आतापर्यंत एकवटून ठेवलेली त्याची सगळी शक्ती गळून पडली. तो मटकन तिथे असलेल्या बेंचवर बसला. पाच वर्षापूर्वीची ती रात्र त्याच्या डोळ्यांपुढून जशीच्या तशी जात होती. 

31 डिसेंबरची रात्र होती. रात्रीचे एक दीड वाजत आले असतील. नील आणि त्याचे मित्र पब मधून पार्टी करून परत येत होते. सगळ्यांनीच खूप दारू, बियर पिलेली होती. नील तसा बड्या बापाचाच मुलगा, कशाचीच कमी नव्हती त्याला. आई बापाचा वेळ सोडून तोंडातून निघेल ते सगळेच मिळत होते त्याला. जसजसा मोठा होत गेला वाईट मुलांच्या संगतीत पडला. सगळ्या वाईट सवयी लागल्या होत्या त्याला. दारू, सिगरेट, जुवा , पार्टीज करणे , मारामारी करणे अशा सगळ्याच सवयी अंगीकारल्या होत्या. मोठ्या बापाचा मुलगा चांगलाच वाया गेला होता. पार्टी करून सगळे परत येत होते. नीलने सगळ्या मित्रांना त्यांच्या घरी सोडले . मित्राच्या घरी परत एक एक बियरची बॉटल त्यांनी घशाखाली ओतली. बाय करत नील एकटाच घरी परत जाण्यासाठी तिथून बाहेर पडला. बारा वाजताच फटाके, न्यू इयरचे सेलिब्रेशन झाले होते. त्यामुळे आता रस्त्यांवर सगळीकडे शुकशुकाट पसरला होता. नीलने सुरू असलेल्या इंग्लिश गाण्याचा आवाज वाढवला, बाजूला असलेली एक बियरची कॅन उघडली , रस्त्यावर कोणी नाही बघून कारची स्पीड वाढवली , बियरचा एक एक घोट घेत आपल्याच तालात तो कार चालवत होता. रस्त्यात एक गद्धढा आला , आणि दचका लागल्यामुळे त्याच्या हातातली कॅन खाली पडली. कॅन उचलायला म्हणून तो खाली वाकला आणि धड्डाम आवाज झाला. त्याने करकचून ब्रेक दाबला. वरती उठून बघतो तर एक व्यक्ती त्याच्या गाडीच्या धक्क्याने हवेत उडत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. ते सगळं बघून त्याला आता घाम फुटला होता. त्याचे अंग थंड पडत होते. पिलेली दारू सगळी क्षणार्धात उतरली होती. तो लगेच कार मधून उतरत बाहेर आला. आजूबाजूला बघितले कोणी नव्हते. घाबरतच तो ती व्यक्ती पडली होती तिथे गेला. एक वीस वर्षाच्या आसपासची तरुणी रक्तांच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या जवळ जाऊ की नको , बऱ्याच वेळ तो विचार करत होता. काही झाले तरी वडील या सगळ्यातून बाहेर काढतील , त्याला विश्वास होता. त्यामुळे त्या मुलीचा जीव वाचवायचा त्याने विचार केला. तो तिच्याजवळ जात खाली वाकला, त्याने हातचे एक बोट तिच्या नाकाजवळ नेत ती जिवंत आहे की नाही तपासले . तिचे डोळे उघडे होते , तिचे श्वास जाणवले तसे त्याने तिला पटकन उचलून घेतले आणि कार मध्ये आणून मागच्या सीटवर झोपवले. तेवढयात एक अंबुलन्स झुं झुं आवाज करत तिथून निघाली. तो सुद्धा त्या अंबुलन्सच्या मागे जाऊ लागला. अंबुलन्स एका हॉस्पिटलजवळ येत थांबली. त्यातून एका पेशंटला घाईतच आतमध्ये नेण्यात आले.  

" Help....." ... नील ओरडला , त्याने अलगद त्या मुलीला आपल्या हातांवर उचलत कारच्या बाहेर घेतेल. लगेच काही नर्स, वॉर्डबॉय स्ट्रेचर घेत धावत आले. नीलने त्या मुलीला स्ट्रेचरवर ठेवले. घाई घाईने सगळे आतमध्ये आले. नीलने आपल्या नावाचा फायदा घेत इमार्जन्सी नोंदवली होती. त्यामुळे ती पोलिस केस असली तरी त्या मुलीवर लवकर उपचार सुरू करायला त्याने सांगितले होते. तिला लगेच ऑपरेशन थिएटरकडे नेत होते. तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असतान एका बाईची तिच्यावर नजर गेली. 

" पुष्पा ssssss....." ....ओरडतच ती बाई तिथे आली, त्या मुलीला असे रक्ताच्या थारोळ्यात बघून जोरजोराने रडायला लागले. तिच्या सोबत असलेले दोन लोकं सुद्धा तिथे आले होते . नील भेदरलेल्या नजरेने ते सगळं बघत होता. 

" क...काय झालं पुष्पाला??? हे कसे झाले???" ...ती बाई रडत रडत बोलत होती. 

" त....ते ....मी जात होतो.... त.....तर.....ती तिथे रस्त्याच्या एका साइडला पडली होती. आजूबाजूला कोणी नव्हते , मला काही सुचले नाही, मी तिला इथे घेऊन आलो ".... नील , बोलता बोलता त्याचा आवाज थरथरत होता. त्याला खूप घाम सुटला होता. 

डॉक्टर, नर्सने तिला आतमध्ये नेले आणि ताबडतोब तिच्यावर उपचार सुरू केले. 

" तुम्ही कोण ??" ... नील खूप धीर एकवटून बोलला. 

" मी आई आहे तिची. नवीन वर्षाची सुरुवातच वाईट झाली. अचानक तिच्या बाबांच्या छातीत दुखायला लागले होते. अंबुलन्सला फोन केला होता, पण अंबुलन्सला यायला उशीर होईल म्हणून ती रस्त्यावर काही ऑटो वैगरे मिळतो काय बघायला गेली आणि इकडे अंबुलन्स आली. तिची वाट बघण्यात वेळ जाईल म्हणून आम्ही घरी निरोप ठेऊन लगेच इथे आलो. पण दुर्दैव माझे, काय माहिती बाप लेक दोघेही इथेच भेटतील. " ....ती बाई जोरजोराने रडत बोलत होती . आजूबाजूच्या बायका तिला समजावत होत्या. 

" कसं करू मी? कशी जगू मी ?? कुठून आणू येवढे पैसे? देवा काय ही परीक्षा बघत आहे माझी ?" .... ती बाई रडत होती. नील दूर उभा सगळं ऐकत होता. नीलला तर पैश्यांची तशी काही कमतरता नव्हती. त्याने लगेच फोन करून पटापट पुष्पा आणि तिच्या वडिलांच्या उपचारासाठी सगळे पैसे भरून उपचार सुरू करायला लावले होते. नील देवासारखा धाऊन आला म्हणून पुष्पाची आई वारंवार त्याचे उपकार मानत होती. त्याला मात्र खूप अपराधीपणा वाटत होता. 

त्या अपघातात पुष्पाने आपले डोळे गमावले होते. पुष्पाच्या वडिलांना सीवेअर हार्ट अटॅक आला होता. खूप प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नव्हते. इकडे पुष्पा आंधळी झाली होती तर तिकडे तिचे बाबा नव्हते राहिले. पुष्पाच्या परिवारावर दुःखाचे डोंगरच कोसळले होते. पुष्पाने त्या मुलाला बघितले होते,पण आता डोळे गेल्यामुळे तिला ते पण सांगता आले नव्हते. बाकी काही पुरावे सापडल्या नसल्यामुळे पुष्पाची अपघाताची केस बंद झाली होती. त्यामुळे नीलने तो अपघात केला आहे कोणालाच कळले नव्हते. अपघाताचा किस्सा जरी बंद झाला होता, तरी त्या दिवसापासून त्याला अपराधीपणाची भावना खात होती. अचानक तो खूप शांत झाला होता. 

पुष्पा गरीब त्यात आता आंधळी झाली होती , आता वडील नाही, घरदार चालवणे तिच्या आईला कठीण होत होते. 

आपल्यामुळे एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले ही भावना नीलला आता जगू देत नव्हती . तिचे आयुष्य थोडेफार तरी सोपे करावे विचार करत तो तिच्या घरी त्यांना मदत करायला गेला होता. चांगले वागून, तो त्यांना आधार देत होता. आता त्याचे तिच्या घरी जाणे येणे वाढले होते. . हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. पुष्पा खूप स्वाभिमानी मुलगी आहे त्याला जाणवले होते . आंधळ्या लोकांसाठी गरज आळलेल्या सगळ्या शिकवण्या त्याने तिच्यासाठी सुरू केल्या होत्या . तिला गायनाची खूप आवड होती. अपघाताच्या आधी ती गायन शिकत होती. त्याने तिला चांगल्या फेमस ठिकाणी क्लासेस लाऊन दिले होते. तिला घेऊन जाणे, आणणे, सगळी जबाबदारी त्याने स्वतः वर घेतली होती. त्याच्या मदतीने ती सावरायला लागली होती. आणि तिच्या सोबतीने तो बदलायला लागला होता. नम्रपणा शिकायला लागला होता. अशातच वर्ष गेले. तिच्या चांगुलपणावर तो भाळत चालला होता. त्याला आता ती आवडायला लागली होती. इकडे घरच्या बिजनेसमध्ये तो लक्ष घालायला लागला. एकंदरीत तिच्या सहवासात त्याच्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला लागले होते. हळूहळू तो पुष्पाच्या प्रेमात पडायला लागला होता. ती पण त्याच्या प्रेमात पडली होती, पण ती ते स्वीकार करत नव्हती. त्याच्या हट्टीपणा पुढे शेवटी तिने त्याच्यावर असलेल्या तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. दिवसेंदिवस त्यांचे प्रेम अजूनच घट्ट होत चालले होते. आता एकमेकांशिवाय जगणे सुद्धा त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचे होते. चार वर्षांपासून ते दोघे सोबत होते. त्याने तिला बरेचदा तो अपघात त्याने केला आहे, सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण ती आपल्यापासून दुरावेल या भीतीने तो गप्प बसत होता. 

नीलच्या अथक परिश्रमानंतर अखेर पुष्पाच्या डोळ्यांसाठी डोनर मिळाला होता. त्यासाठीच तिची सर्जरी झाली होती. आज तिला सगळं स्पष्ट दिसायला लागले होते आणि त्यातच तिने निलला ओळखले होते. 

******

आज तीन महिने होऊन गेले होते पुष्पा नीलचा चेहरा सुद्धा बघायला तयार नव्हती. रोज तो तिच्यासोबत बोलायला येत होता, पण ती त्याला भेटत नव्हती. तिला त्याची पोलीस कंप्लेंट करायची खूप इच्छा होत होती, पण त्याच्यावर असलेले तिचे प्रेम तिला अडवत होते.

*******

" काकी , मला एकदाच तिला भेटायचे आहे, प्लीज तिला सांगा ना ??" ... नील 

" खूप समजावले तिला, पण ती काहीच ऐकायलाच तयार नाही." ... पुष्पाची आई 

" प्लीज एकदा, मी तुम्हाला विनंती करतो ." .... नील काकुळतीने बोलत होता. 

" ती आतमध्ये आहे. बघ बोलते काय , मी बाहेर जाते . " ...बोलून पुष्पाची आई बाहेर निघून गेल्या. 

नीलने दार बंद केले आणि दबल्या पावलांनी आतमध्ये गेला. पुष्पा बेडवर डोळे बंद करत झोपली होती. खूप दिवसांनी आज तो तिला बघत होता. तिचा तो निरागस चेहरा बघून आज त्याचे मन शांत झाले होते. तिला बघता बघता त्याच्या डोळ्यांतून पाणी त्याच्या गालावर ओघळले. अलगद त्याने ते पुसले. नी एकटक तिला बघत उभा होता. 

त्याच्या येण्याची तिला चाहूल लागली होती. तिने डोळे उघडले तर समोर नील दिसला. 

" तू इथे?? इथे काय करतो आहे ??? आई कुठे आहे ??" ... पुष्पा जागेवरच उठून बसत बोलत इकडेतिकडे आईला शोधत होती.

" आई बाहेर गेली आहे ." ... नील शांतपणे बोलला. 

" काय? " ..... पुष्पा जागेवरून उठत उभी होत बोलली.

" मला तुला भेटायचे होते, एकदाच बोलायचे होते , म्हणून काकी बाहेर गेल्या आहेत. " ... नील

" पण मला तुझ्यासोबत एकही शब्द बोलायचा नाही . निघून जा इथून " ... ती

"प्लीज एकदाच ऐकून घे माझं . एक चान्स दे मला बोलायला." ... तो

" मला तुझा चेहरासुद्धा बघायचा नाही आहे. "... ती रागाने बोलत होती. 

" राणी , एकदाच ऐकना ग . नाही जगू शकत आहो तुझ्याशिवाय. मी कबूल करतो माझी चूक झाली आहे. " ...तो

" चूक??" ...ती

" गुन्हा केला आहे मी . एकदाच माफ कर मला. " ...तो

" तुला कळत तरी आहे तू काय केले आहेस ??? तुमच्या सारख्या श्रीमंत मुलांना आम्ही गरीब म्हणजे मुंग्या माकोडे वाटतो ना??? स्वतःच्या एंजोयमेंटसाठी तुम्ही आमचा जीव घेणार काय??? अमाच्यासाखे कितीतरी गरीब लोकं तुमच्यासारख्या लोकांचे बळी पडले आहे. तुमच्या हौशींपोटी तुम्ही अशी हवेत गाडी चालवणार , माहीतच आहे काही झाले तरी आपला श्रीमंत बाप बसला आहे आपल्याला सोडवायला. घरातला तो किंवा ती एकटाच कमावता असतो, तुमचा वाईट व्यसनांचे ते असे बळी पडले आहेत. परिवारचे परिवार उध्वस्त झाले आहेत. कसे तुमच्या गुन्ह्यांना माफ करणार???? लकीली मी मेले नाही " .

" पुष्पा sss ... हे असे काही अपशब्द आपल्या तोंडून काढू नको ".... तो थोडा मोठ्यानेच बोलला.

" का ??? ....त्रास होतोय ???? मग विचार कर ज्यांची मुले तुमच्या व्यसनांना बळी पडतात त्यांच्या घरच्यांचे काय हाल होत असतील?? माझ्या जागेवर दुसरे कोणी असते तर इतकाच दुःखी झाला असता तू ??? तुला माहिती तरी आहे काय , काय केले आहेस तू??? तुझ्यामुळे माझा अपघात झाला. माझे डोळे गेले. शेवटचे मी माझ्या बाबांना बघू शकले नाही. माझ्या आईला जेव्हा सगळ्यात जास्ती माझी गरज होती, मी तिचा आधार बनू शकले नाही . तिलाच तिचे दुःख लपवून मला सावरावे लागले. माझी स्वप्न तुटली. मला माझ्या आयुष्यात काही बनायचे होते , पण मी नाही करू शकले. मी दुसऱ्यांवर अवलंबून होते. तुला माझ्यावर दया आली आणि तू मदतीला धाऊन आला. आम्हाला मदत करत होता, तुझा अपराध लपवण्यासाठी तू आम्हाला मदत करत होता. तू माझ्यासोबत मैत्री केली. तुझ्या खोट्या मैत्रीत , तुझ्या खोट्या प्रेमात तू मला फसवलेस . मला तुझी दया नको , ऐकले तू मला तुझी दया, सिंपथी नको आहे. तू माझ्या हृदयाशी खेळला आहेस. माझ्या प्रेमाशी खेळला आहेस . माझ्या आयुष्यासोबत खेळला आहेस . आणि तू म्हणतोय तुला माफ करू ??? " .... ती रागात बोलत होती. 

" मला माहिती आहे मी तुझा अपराधी आहो . मी तुला सगळं आधीच सांगायला हवे होते. पण मला तुला गमावण्याची भीती वाटत होती. तुला खरे कळले तर तू मला सोडून जाशील , याची मला भीती वाटली होती, म्हणून नाही बोललो. पण माझे प्रेम खोटे नाही आहे. मी तुझ्यावर कोणतीच दया नाही केली आहे. माझं प्रेम खरं आहे. तुला माहिती आहे तू माझं आयुष्य आहे. माझं प्रेम खोटं नाही. प्लीज माझ्या प्रेमाला खोटं नको म्हणू. तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहो , आपलं नातं खरं आहे, पवित्र आहे , प्लीज आपल्याला नात्याला खोटं नको बोलू " ... तो 

" ठीक आहे , मी म्हणेल ते करशील ना ??" ... ती

" हो, तू जी शिक्षा देशील ती मला मान्य असेल " ....तो

" माझ्या आयुष्यातून निघून जायचे , नेहमीसाठी " ...ती शांतपणे बोलली . 

" खूप मोठी शिक्षा आहे ग ही , मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय " ...तो गयावया करत बोलला. 

" खरं प्रेम आहे म्हणतोस ना , मग निघून जा माझ्या आयुष्यातून . "....ती 

" एकदाच तुला जवळ घ्यायचे आहे , मग तू म्हणशील तसेच होईल , प्लीज परमिशन दे " .... तो 

" नाही, आता तुझा माझा काहीच संबंध नाही आहे. मला स्पर्श करण्याचा हक्क तू कधीच गमावला आहे. तू जाऊ शकतो आता ." .... ती

" खुश रहा ......." ..तो 

तिच्या शब्दांनी त्याचा हृदयावर खूप आघात केले होते. त्याला ते सगळे ऐकणे खूप असह्य होत होते. भरल्या डोळ्यांनी , जड पावलांनी तो घराच्या बाहेर पडला. 

*******

चार वर्ष नंतर ..... 

" And the best female singer award of the year goes to Ms Pushpa Pradhan . " ...

टीव्हीवर मराठी फिल्म अवॉर्ड सुरू होते. त्यात पुष्पाला एका मराठी गाण्यासाठी बेस्ट फिमेल सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता. 

" Well done My Princess " ..तिला टीव्हीवर बघून , तिची प्रगती बघून नीलला आनंद झाला होता . तो एकटक तिला बघण्यात गुंतला होता. 

बाहेरून कोणीतरी त्याला बघत होते. त्याला तसे बघून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले होते. 

*****

" कोण हवे आहे आपल्याला ??? " ...

" मिस पुष्पा प्रधान ...." ....

" आपले नाव?" .....

" सरिता राजे " .....

" एक मिनिट थांबा, विचारून येते ..."...

" मॅडम, कोणी सरिता राजे आपल्याला भेटायला आल्या आहेत ." ....

" सरिता राजे ??? " ....नाव ऐकून पुष्पा थोडी शॉक झाली. 

" पाठव त्यांना " ...पुष्पा.

सरिता राजे आतमध्ये आल्या. 

"तुम्ही बसा , मॅडम येतीलच " ....

" हो , thank you " .... सरिता तिथे सोफ्यावर बसली. तेवढयात पुष्पा हॉलमध्ये आली . तिने वाकून त्यांना नमस्कार केला. 

" छान, खूप मोठी झाली, पण आपले संस्कार विसरली नाही. खुश रहा . " ....सरिता 

" कश्या आहात तुम्ही??? " ...... पुष्पा 

" मी फार काही घुमावून बोलणार नाही . कसे आहे, काय आहे हे बोलण्यात मला काही इंटरेस्ट सुद्धा नाही. मी मुद्द्याचे बोलते. मला माहिती आहे माझा मुलगा तुझा गुन्हेगार आहे. तुमच्या दोघांत जे झाले त्यात मला अजिबात पडायचे नाही, तो सर्वस्वी तुमचा दोघांचा प्रश्न आहे. पण मी तुझी गुन्हेगार नाही आहे . " ....सरिता 

" म्हणजे??" ...पुष्पा

" मला माझा मुलगा परत दे . मला माझा नील परत दे. ".... सरिता

" मॅडम, तुम्हाला काही गैरसमज होतो आहे. आम्ही कधीच वेगळे झालो आहोत. आता आमचा एकेमकांसोबत काही संबंध नाही आहे. " ....पुष्पा 

" तू त्या नात्यातून वेगळी झाली असेल ग , पण तो नाही झाला तुझ्यापासून वेगळा, रादर त्याला व्हायचेच नाही आहे. तो अजूनही तुझ्यात गुर्फुटलेला आहे. "....सरिता 

" मॅडम , तो त्याचा प्रश्न आहे. मी काही करू शकत नाही " .. पुष्पा 

" तो जगणं विसरला आहे. तो फक्त आयुष्य काढायचे आहे म्हणून श्वास घेतो आहे. या चार वर्षात तो कधी हसला नाही आहे की कधी रडला नाही आहे. यंत्रवत जगतो आहे. प्रेम करायची इतकी मोठी शिक्षा देणार काय तू त्याला??? तो तुझा गुन्हेगार असला तरी खरं प्रेम केलंय त्याने तुझ्यावर. तुझ्यामुळे तो खऱ्या अर्थाने जगायला लागला होता. आम्ही त्याचे आईवडील असून कधीच ते प्रेम, तो वेळ त्याला दिला नाही , ज्याचा तो हकदार होता. आम्ही आमच्याच स्टेटस, बिजनेस मध्ये गुंतलो होतो. मुलांना पाहिजे ते दिले म्हणजे झाले असे वाटत होते. मला हवा आहे माझा मुलगा, मला जगायचं त्याच्यासोबत, हट्ट पुरवायचा त्याचे, त्याला मांडीवर घेऊन झोपवेचे आहे , त्याला आपल्या हातांनी खाऊ घालायचे आहे. प्लीज मला माझा मुलगा परत दे. ".... सरिता 

" मॅडम , त्याने जे केले होते ते माफीलायक नाही . त्याच्या सोबत जे घडत असेल ते त्याच्या कृत्यामुळे, माझ्यामुळे नाही. " ..पुष्पा 

" किती ग , किती शिक्षा देशील माझ्या मुलाला ??? जीव घेशील काय माझ्या मुलाचा??? त्याने त्याच्या केलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित केले आहे, अजूनही करतो आहे. अजून किती अंत बघणार आहेस त्याचा??? त्यानं कबूल केला होता ना त्याचा गुन्हा , मागितली होती ना माफी. . तू जगतेय ग, पण तो क्षण क्षण मरतोय . एका आईचे दुःख कसे समाजशील ??? त्यासाठी आई व्हावं लागते . " ....सरिताचा आता तोल सुटला होता. ती रडायला लागली होती. 

तेवढयात तिथे पुष्पाची आई आली, जी आतापर्यंत आतमधून या दोघींचे बोलणे ऐकत होती.

" पुष्पा , मॅडम बरोबर बोलत आहेत. तू मला तुमच्या दोघांमध्ये बोलू नको म्हणून मी नाही बोलले. पण आता या मॅडमचे बोलणे ऐकून मी शांत नाही राहू शकत. बाळा नीलने त्याचा गुन्हा माझ्यासमोर कबूल केला होता, जेव्हा तो लग्नासाठी तुझा हाथ मागायला माझ्याजवळ आला होता तेव्हाच त्याने मला सगळं खरं खरं सांगितले होते . बघ त्या दिवशी अपघात झाल्यावर खरे तर तुला तसेच सोडून तो पळून सुद्धा जाऊ शकत होता . तेव्हा त्याचा तुझा काही संबंधही नव्हता. पण त्याने असे काही केले नाही. आज तू त्याच्यामुळेच जिवंत आहे. तुझ्या बाबांच्या ट्रीटमेंटसाठी माझ्याजवळ पैसे नव्हते, नीलने तुझी तर जबाबदारी घेतलीच होती, पण सोबत त्याने तुझ्या बाबांची सुद्धा जबाबदारी घेतली होती. काहीही नाते नसतांना सुद्धा तो खंबीरपणे माझ्यासोबत उभा राहिला. मला नोकरी मिळवून दिली. तू जगायचं विसरली होती. तुला जगायला शिकवले त्याने. तुला स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली त्याने. तुझे हिरावलेले डोळे परत आणले त्याने. त्याला तर माहिती होते , तू बघायला लागली की त्याला नक्कीच ओळखशील, पण तरीही तुझ्या आयुष्यातले रंग तुला परत करण्यासाठी स्वतःच्या जीवनात अंधार ओढवून घेतला त्याने. त्याने प्रेम, खरे प्रेम केले होते रे बाळा तुझ्यावर , तुला दिलेले वचन अजूनही तो पाळतो आहे. खऱ्या प्रेमाची इतकी मोठी शिक्षा असेल तर लोकं प्रेमच नाही करणार कधी. एका आईचे मन मी जाणते, मी सुद्धा तुला अशी एकटी जगतांना नाही बघू शकत. मला माहिती , तुझे अजूनही फक्त नीलवर प्रेम आहे. तू सुद्धा त्याच्याशिवाय नाही जगू शकत. अपुरे आहात तुम्ही दोघं एकमेकांशिवाय . जा बाळा , एका आईला तिचे बाळ परत कर . " ..... पुष्पाची आई. 

" तुम्ही दोघी काय बोलत आहात, मला काहीच कळत नाही आहे. " ...म्हणतच ती आतमध्ये जायला वळली, तितक्यात सरिताने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला ओढतच सोबत घेऊन जाऊ लागली. 

" तुला असे नाही कळणार ना, पण मी तुला माझ्या मुलाच्या आयुष्यासोबत खेळू देणार नाही. " ... म्हणतच सरिताने तिला कार मध्ये आणून बसवले. 

" ड्रायव्हर .....हॉस्पिटल "...... सरिता

हॉस्पिटल नाव ऐकून पुष्पाच्या काळजात धस्स झाले. 

कार हॉस्पिटल ' पुष्प केअर ' पुढे येऊन थांबली. तिने ते नाव वाचले. 

" हे मल्टीस्पेशालटी हॉस्पिटल आहे. इथे सगळ्या गरजू लोकांना फ्रीमध्ये उपचार मिळतो, अगदी एकही पैसा न घेता. अपघात झालेल्या प्रत्येक व्यक्तीला इथे वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. " .....सरिता सांगत होती, पुष्पा फक्त ते बघत होती. 

" ड्रायव्हर , आश्रम " ...... सरिता

ड्रायव्हरने कार एका दोन मजली आश्रम पुढे थांबवली. 

" पुष्प " ..... 

" हे एक आश्रम आहे , अपंग लोकांचे आपले स्वतःचे हक्काचे घर . ज्यांना घरच्यांनी बेदखल केले आहे, अनाथ आहेत, अपंग आहेत अश्या सगळ्यांचे त्यांच्या हक्काचे घर. इथे त्यांना पाहिजे ती सगळी ट्रेनिंग मिळते. त्यांना त्यांच्या अपंगत्वावर मात करायला शिकवले जाते , जगायला शिकवले जाते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे व्हायला शिकवले जाते. त्यांना नोकरी, किंवा काम मिळवून दिल्या जाते. त्यांच्यासाठी छोटे छोटे उद्योगांची सोय केल्या जाते. थोडक्यात काय ज्या समाजाने त्यांना नाकारले , त्यांना इथे सन्मानाने स्वीकारल्या जाते. " ...... सरिता  

" यापेक्षा अजून किती मोठे प्रायश्चित कराचे माझ्या नील ने ???? सांग ना ??? हे सगळं सांभाळण्यासाठी तो फक्त यंत्रवत काम करतो. भूक नाही की झोप नाही. दिवस नाही बघत की रात्र नाही. आज चार वर्ष झाले हसला नाही की रडला नाही. त्याच्या डोळ्यांतले पाणी सुद्धा आटले आता तर. दोन दोन महिने घरी येत नाही. कुठले फॅमिली फंक्शनला येत नाही की कोणी मित्र मैत्रिणी सोबत रमत नाही . आई नको, बाप नको की भाऊ भावजय नको . दोन शब्द बोलत नाही. अजून किती शिक्षा भोगायची त्याने??? सांग ना ???? तू तर जगते आहेस,स्वतःची स्वप्न तरी पूर्ण करते आहे. तो तर स्वतःची स्वप्न सुद्धा विसरला. माझा मुलगा जगायला विसरला. " .... सरिता रडत रडत बोलत होत्या. पुष्पा सुन्न मनाने ते सगळं बघत, ऐकत होती. 

" नील कुठे आहे ??" ... पुष्पा , तिचा आवाज आता कपरा झाला होता. 

" तू भेटशील त्याला???" ....सरिता

" मला पोहचवून द्या त्याच्याकडे " ..... पुष्पा 

" रात्र झाली आहे " .....सरिता

" आधीच खूप उशीर झाला आहे , मला सांगा तो कुठे आहे , मी जाते " ......पुष्पा 

" त्याच्या ऑफिसमध्ये , बस तुला सोडते तिथे " ....सरिता 

रात्रीचे 10 वाजत आले होते. कार एका मोठ्या नऊ मजली बिल्डिंग पुढे येऊन थांबली.  

" जा ....... "....सरिता 

पुष्पा सुधबुध सगळं विसरून आतमध्ये पळत सुटली. 

" आतमध्ये एक मॅडम येतील, त्यांना कोणीही अडवायचे नाही ." ....सरिता फोनवर बोलत होती.

पुष्पा धावतच आतमध्ये गेली. 

आतमध्ये सगळे अवाक् होत तिच्याकडे बघत होते. कारण कोणती मुलगी त्या ऑफिसमध्ये नीलच्या फ्लोअरवर कधीच नव्हती आली. कोणत्याच मुलीला नीलच्या फ्लोअरवर जायला अनुमती नव्हती . 

" नील ???" ....पुष्पा रिसेप्शनिस्ट जवळ जात बोलली. 

त्याने हात दाखवत कॅबिनकडे इशारा केला. तशी ती पळत त्याच्या कॅबिनकडे गेली. कशाचाही विचार न करता ती दार उघडून आतमध्ये गेली. आता तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. धावल्यामुळे तिचा श्र्वासांची गती सुद्धा वाढली होती. नील तिला पाठमोरा फाईलमध्ये काहीतरी करत उभा होता. पुष्पा पाठमोऱ्या नीलकडे बघत उभी होती.

" रघु, तुला माहिती आहे मी डिनर करत नाही, तरी का घेऊन येत असतो. अन्न वाया घालवणे मला आवडत नाही. " ....नील , दाराचा आवाज आल्यामुळे त्याला रघु आला असे वाटले होते, म्हणून तो बोलत होता. आणि एकदम त्याला काहीतरी जाणवले , त्याच्या लक्षात आले....

" पुष्पा ......" .... झरकन तो मागे वळला. तिला बघून त्याच्या हातातली फाईल खाली पडली. 

पुष्पा आपले दोन्ही कान पकडत उभी होती . तिचे अश्रू गालांवर ओघळत होते. भरल्या डोळ्यांनी ती नीलकडे बघत होती. तिच्या डोळ्यातले पाणी बघत त्याचे सुद्धा डोळे पाणावलेले होते. तो एकटक तिच्याकडे बघत होता. 

राजबिंडा तो, आता तब्बेत खालावली दिसत होती. डोळे आतमध्ये गेले होते. चेहऱ्यावर खूप थकवा दिसत होता, जसेकाही खूप दिवसांपासून तो झोपला नसावा. त्याला तसे बघून तिचे मन खूप दाटून आले. तिला त्याचे शेवटचे शब्द आठवले होते ' एकदाच तुला जवळ घ्यायचे आहे ' आणि क्षणाचाही विलंब न करता पळतच जात त्याला बिलगली . तिला असे जवळ आलेले बघून , तिचा झालेला स्पर्श , त्याच्या हृदयातून एक जोरदार कळ गेली . त्याचे डोळे अलगद मिटल्या गेले. पण तो स्तब्ध तसाच उभा होता. पुष्पा त्याला अजून अजून घट्ट पकडत होती. त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड तिला स्पष्ट जाणवत होती. बऱ्याच वेळाने तिच्या लक्षात आले की तो तिला त्याच्या मिठीमध्ये घेत नाही आहे , नेहमी पकडायचा तसे पकडत नाही आहे. तो तसाच उभा होता. आणि तिला आठवले आपण त्याच्या प्रेमाला खोटं बोलून , त्याचं किती मन दुखावले होते . आपल्याला स्पर्श न करण्याचा त्याचा हक्कसुद्धा आपण त्याचाकडून काढून घेतला होता. तिला ते सगळं आठवत होते. 

" सॉरी , I am sorry.... मला एकदाच माफ कर ..... I am sorry ....." ... ती त्याचा चेहरा आपल्या हातात पकडत त्याच्या डोळ्यात बघत बोलत होती. त्याच्या डोळ्यातून अविरत पाणी बाहेर येत होते. तो एकही शब्द न बोलता फक्त तिच्याकडे बघत होता. 

" I am sorry Nil " .... म्हणतच तिने त्याच्या गालांवर , डोळ्यांवर, कपाळावर किस करायला सुरुवात केली. तरीसुद्धा तो तसाच निर्जीव असल्यासारखा उभा होता. 

" I love you Nil " ......म्हणतच तिने एकदा त्याच्या डोळ्यात बघितले , आणि तिने तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले . तिने जसे I love you म्हटले तशी तिच्या कंबरेभोवती त्याच्या हातांची पकड घट्ट झाली . इतकी घट्ट की आता त्या दोघांमध्ये हवेला सुद्धा जायला जागा नव्हती. त्याला तिच्याकडून फक्त प्रेम हवे होते ,फक्त प्रेम , आता त्याने तिच्यापुढे स्वतःला पूर्णपणे समर्पित केले होते. आज चार वर्षांनी त्याचे मन शांत झाले होते. 

******

समाप्त 

******