सर सुखाची (भाग-९)

सर सुखाची


सर सुखाची (भाग-९)

गौरी ऑफिसमध्ये पोहोचली. फाईल काढण्यासाठी तिने तिच्या डेस्कवरचं ड्रॉवर उघडलं.

"पिवळं गुलाबाचं फुल!" गौरीला आश्चर्याचा धक्का बसला. तिने मल्हारच्या केबिनकडे पाहिलं, मल्हार फाईल्सचा ढीग घेऊन बसला होता.

"माने…" तिने तिथुन जाणाऱ्या पीयुनला आवाज दिला. त्याआधी ते गुलाबाचं फुल आठवणीने परत ड्रॉवरमध्ये ठेवलं.

"गौरी मॅडम, एक मिनिट, या फाईली तेवढ्या सरच्या टेबलवर ठेवून येतो." माने तिथून गेला. फाईल ठेवून परत आला.

"ते नवे सर सगळ्यांच्या आधीच आले का?" गौरीने मानेला हळूच विचारलं.

"सात वाजताच टपकलेत. घरदार, बायको, लेकरं बाळं आहेत की नाही देव जाणे. हा माणूस रोजच असा लवकर टपकायला लागला तर आम्ही कसं करायचं. साहेब इथं आल्यावर नाईटवाल्या गार्डने मला फोन केला आणि मी पण मग लगेच आलो." मानेने त्रागा करत सांगितलं आणि तिथून निघून गेला.

"खरंच, मल्हारचं लग्न झालंय की नाही? इतके दिवस कुठे होता हा? त्याने गुलाबाचं फुल का ठेवलं असावं?" गौरीच्या मनात मल्हारबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल निर्माण होत होतं पण तिने तिच्या विचारांना बाजूला सारलं. ऑफिसच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून टाकलं.

थोड्यावेळाने माने तिथे आला.

"गौरी मॅडम, जा आतमध्ये… बोलवणं आलंय… एकेकाला फैलावर घेणं सुरू आहे, आता तुमची बारी आहे." मानेने गौरीला निरोप दिला. अनिच्छेने गौरी तिथून उठली आणि मल्हारच्या केबिनमध्ये गेली.

"मे आय कम इन सर?" गौरीने दारातूनच विचारलं.

" येस… पण एक सांग, तुला आत यायला खरंच परमिशनची गरज आहे?" मल्हार

"हो, कारण आता तुम्ही बॉस आहात." गौरी

"आणि बॉस नसतो तर?" मल्हार

"काय काम होतं ते सांगितलं तर बरं होईल." गौरी

"ऑफिसचं तर काम आहेच, पण सोबतच अजून थोडं बोलायचं होतं." मल्हार

"हे बघा सर, मला तुमच्यासोबत बाकी काही बोलण्यात अजिबातच इंटरेस्ट नाहीये. काम नसेल तर येते मी." गौरी तिथून निघाली.

दिवसभर ऑफिसमधली कामं आटोपून गौरी घरी गेली. घरी गेल्यावरही ती फारशी कुणासोबत काही बोलली नाही. दुसऱ्यादिवशीही ती ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिच्या डेस्कवर गुलाबाचं फुल ठेवलेलं होत. तिने रागाने ते फुल कचऱ्याच्या डब्ब्यात टाकलं. मल्हारने त्याच्या केबीनमधून ते पाहिलं. गौरीसोबत बोलण्याचा तो बराच प्रयत्न करत होता. पण गौरी त्याला काही रिसपॉन्स देत नव्हती.

एक दिवस मल्हारने गौरीला केबिनमध्ये बोलावून घेतलं. गौरी त्याच्या केबिनमध्ये गेली.

"स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी घेशील का?" मल्हारने तिला विचारलं.

"सर काय काम ते सांगितलं तर बरं होईल. आणि तसंही मी ब्लॅक कॉफी घेत नाही." गौरी तुसडेपणाने म्हणाली.

"गौरी, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे." मल्हार

"हे बघा सर, माझं लग्न झालेलं आहे आणि उगी इथे तुमच्यासोबत बोलत बसून मला लोकांना आयता विषय द्यायचा नाहीये चर्चेला." गौरी

"मग आपण बाहेर कुठंतरी भेटू, चालेल का?" मल्हारने विचारलं त्यावर गौरी काहीच बोलली नाही आणि तडक केबिनच्या बाहेर निघून गेली.


अगदी रोजच मल्हार गौरीला भेटण्यासाठी खूप गळ घालत होता.
"एकदाचं भेटून काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा." गौरी मनातच पुटपुटली आणि तिने मल्हारला भेटण्यासाठी होकार दिला. मल्हारने ऑफिस संपल्यानंतर एका कॅफेमध्ये तिला भेटायला बोलवलं होतं. गौरी ऑफिस सुटल्यावर त्याने कळवलेल्या पत्त्यावर गेली. मल्हार तिथे आधीच हजर होता. गौरी मल्हार समोर बसली.

"अ रोझ फॉर अ रोझ!" मल्हारने तिच्यासमोर तिचं आवडतं गुलाबाचं फुल धरलं.

"तुला काय वाटतं, ह्या फुलाने काय होणार आहे?" गौरी

"अगं, तुला आवडतं म्हणून दिलं मी." मल्हार

"हे बघ मल्हार, जे बोलायचं ते लवकर बोल. मला घरी जायला उशीर होतोय." गौरी त्रासिकपणे म्हणाली. तेव्हढ्यात एका वेटरने दोन स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी आणि व्हेज चीझ ग्रील्ड सॅण्डवीच आणून दिले.

"मी ब्लॅक कॉफी घेत नाही." गौरी म्हणाली.

"कधीपासून?" मल्हारने आश्चर्याने विचारलं.

"काही गोष्टी मी काळासोबत मागेच ठेवून आलेय." गौरीने एक मोठा उसासा टाकाला.

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all