Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

सर सुखाची (भाग-८)

Read Later
सर सुखाची (भाग-८)


सर सुखाची (भाग-८)

लग्न होऊन गौरी सासरी आली. हसरी, खेळकर, खोडकर गौरी अचानक शांत, अबोल झालं होती. कदाचित गौरीचा स्वभाव मुळातच अबोल असेल असं स्वप्नीलला वाटत राहायचं. तो त्याच्या परीने गौरीची काळजी घेत होता, तिला समजून घेत होता. गौरीनेही मल्हारवर, त्याच्या प्रेमावर पडदा टाकला. मल्हार नावाची प्रेमाची भळभळती जखम तिने हृदयाच्या कप्प्यात दडवून ठेवली होती.

आज जवळपास बारा वर्षांनंतर मल्हार गौरीसमोर आला होता.


गौरी आठवणींच्या गंभीर सूरात हरवली होती. डोळ्यातलं पाणी तिने मोठ्या प्रयासाने अडवून ठेवलं होतं.

"गौरी, आपल्या प्रोजेक्टवर आतापर्यंत आपण किती काम केलंय त्याचं प्रेझेंटेशन रेडी आहे ना?" विकासच्या बोलण्याने गौरी भानावर आली.

"हो सर, सगळं तयारच आहे. प्रेझेन्टेशन तुम्ही दिलं तर बरं होईल." गौरी

"हो ते मी देईन; पण तुला काय झालं? मॅक्सिमम काम तूच केलंस म्हणून मी प्रेझेंटेशन तुला दे म्हटलं होतं." विकास

"नवीन बॉस खूप रागीट आहे म्हणतात म्हणून मग…" गौरीने उगीचच काहीतरी उत्तर दिलं. विकासबरोबर ती मीटिंग रूममध्ये गेली. तिथे मल्हारचं लक्ष गौरीवर गेलं. एका क्षणापूरतं त्याचंसुद्धा मन थोडं गहिवरलं पण त्याने लगेचच स्वतःला सावरलं. सगळं लक्ष मीटिंगकडे फोकस केलं. कंपनीच्या पडत्या ग्राफवरून त्याने पहिल्याच दिवशी ऑफिसमधल्या सर्वांना फैलावर घेतलं होतं. गौरीसाठी मल्हारचं हे रूप अगदीच नवीन होतं. मल्हारने कंपनीच्या कामात बऱ्याच चुका काढल्या होत्या. त्या दुरुस्त करून सगळं नव्याने परत सुरू करायचं होतं त्यामुळे कंपनीतल्या सगळ्यांवरच कामाचा ताण वाढला होता. अपेक्षेप्रमाणे गौरीला घरी जायला उशीर झाला होता.

"गौरी आलीस होय, पटकन हात पाय धुवून ये. मी तोपर्यंत पानं घेते." सुमनताई आतून येत बोलल्या. गौरी फ्रेश होऊन आली. तिने सुमनताईंना मदत केली. मुलांची जेवण आधीच झालेली होती. सुमनताई, सतीशराव, स्वप्नील आणि गौरी जेवायला बसले होते. दिवसभराच्या सगळ्या घडामोडींमुळे गौरीच्या गळ्याखालून घास उतरत नव्हता. ताटातलं अन्न तिने कसंबसं संपवलं आणि कोणाशी काहीच न बोलता झोपायला निघून गेली.

"काय झालं रे हिला? अगदीच शांत होती आज." सुमनताई काळजीने स्वप्नीलला म्हणाल्या.

"आज नवीन बॉस येणार होता, तो खूप चिडका आणि रागीट स्वभावाचा आहे असं गौरी सांगत होती. त्याचाच काही इश्यू असेल. तू काळजी करू नको. सकाळी तिचा मूड चांगला असेल बघ. तू झोप आता." स्वप्नील सुमनताईंना बोलून बेडरूममध्ये गेला. गौरी बेडवर पडून होती. कसल्याश्या विचारात हरवलेली वाटत होती.

"विचारू का काय झालं ते? की राहू देऊ? जाऊ दे, मी काही विचारत नाही. कधी कधी काही न विचारणंही चांगलं असतं. तिला तिचा वेळ देतो म्हणजे तिलाही बरं वाटेल." स्वप्नील बेडच्या दुसऱ्या बाजूने झोपून गौरीबद्दल विचार करत होता. त्याच विचारात त्याचा डोळा लागला. गौरी मात्र रात्री बराच वेळपर्यंत जागी होती. मल्हारचं असं तिच्या आयुष्यात अचानक परत येणं हा तिच्यासाठी एक मोठा धक्का होता.

दुसऱ्यादिवशी सकाळी गौरी नेहमीप्रमाणे उठली. तिने घरातलं, मुलांचं सगळं आवरलं आणि ऑफिसमध्ये जायला निघाली. खरंतर ऑफिसमध्ये जाण्याची तिची बिलकुल इच्छा नव्हती तरी स्वतःला सावरलं.
"जॉब सोडावा का? रोज रोज मल्हारला कसं फेस करणार? काय करावं, काहीच कळत नाहीये." विचारांच्या व्दंव्दात ती ऑफिसमध्ये पोहोचली. कोणासोबत काहीच न बोलता तिच्या डेस्कवर गेली. तिने फाईल काढण्यासाठी ड्रॉवर उघडलं आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला.

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//