सर सुखाची (भाग-७)

सर सुखाची


सर सुखाची(भाग-७)

"घरी पोहोचल्यावर मीच आईबाबांना सगळं सांगून टाकेन. जे होईल ते होईल. पुन्हा मला आयुष्यभर वाटायला नको की मी प्रयत्न केले नाहीत." विचारातच गौरी घरी पोहोचली तेव्हा तिच्या बाबांना नुकतंच हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. गौरीने हातातली बॅग घरात ठेवली आणि हॉस्पिटल गाठलं. गौरीच्या बाबांना, प्रभाकररावांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला होता. त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले होते.

"प्रभाकररावांच्या तब्येतीत आता चांगली सुधारणा आहे; पण पुढेही काळजी घ्यावी लागेल. त्यांना कोणत्याच प्रकारचा मानसिक ताण येऊ देऊ नका. दिलेली औषधी वेळेवर द्या. तिसरा हार्ट अटॅक मात्र धोक्याचा ठरू शकतो." डॉक्टरांनी प्रभाकररावांना हॉस्पिटलमधून सुट्टी देताना गौरी आणि सुलभाताईंना समजावून सांगितलं.

गौरीच्या बाबांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळून दोन दिवस झाले होते. तेव्हा गौरीची आत्या त्यांना भेटायला घरी आली होती. गौरीच्या आत्याने बोलता बोलता स्वप्नीलचं स्थळ सुचवलं. स्वप्नील इंजिनिअरिंग झालेला, चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याच्या घरी थोडीफार शेतीवाडी होती आणि तो एकतुलता एक मुलगा होता. प्रभाकराव आणि सुलभाताईंना हे स्थळ पटलं होतं. आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ स्वतःहून सांगून आलं म्हणून प्रभाकरराव खूप आनंदात होते.

"गौरी, किती पटकन मोठी झालीस गं. बघता बघता तुझ्या लग्नाचं वय झालं… गौरी, तुझ्या मनात कोणी असेल तर सांग. नाहीतर मग आत्याने एक स्थळ सुचवलंय, आपण त्याचा विचार करू शकतो." प्रभाकरराव गौरीला म्हणाले. पण वडिलांच्या तब्येतीचा विचार करून गौरीने मल्हारबद्दल घरी न सांगण्याचा निर्णय घेतला. स्वप्नीलच्या घरातल्या लोकांसोबत बोलून प्रभाकररावांनी भेटण्याची तारीखही ठरवली. आता मात्र गौरीच्या मनाची चलबिचल वाढली होती. तिने मल्हारला संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्याच्यासोबत काहीच संपर्क होत नव्हता. गौरीने प्राचीला याबद्दल सांगितलं. प्राचीने त्याच्या मित्रांसोबत बोलण केलं पण मल्हारचा थांगपत्ता कोणालाच माहीत नव्हता.

स्वप्नील आणि त्याच्या घरातली मंडळी गौरीला बघायला आली. गौरीने सर्वांना चहा पोहे दिले. तिचं लक्ष स्वप्नीलकडे गेलं. स्वप्नील दिसायला अगदीच साधारण होता. गौरीच्या आत्याच्या ओळखीमुळे सगळ्यांच्या गप्पा अगदी रंगल्या होत्या. गौरी अगदीच शांत बसून होती. स्वप्नीलच्या घरचे लोकं गौरीला बघून गेले. त्यांनी काही दिवसांत गौरीला पसंती कळवली. प्रभाकरराव अतिशय आनंदित होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून गौरी पुढे काहीच बोलली नाही.

"ज्याच्यासाठी ह्या स्थळाला नकार द्यावा त्याचा कुठेच पत्ता नाहीये." गौरी स्वतःवरच चिडली होती.

साखरपुडा वगैरे या भानगडीत न पडता लग्नाचीच तारीख काढण्यात आली होती. लग्नाआधी स्वप्नील आणि गौरीचं विशेष काही बोलणंही झालं नव्हतं. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. त्या दिवसापर्यंत गौरीने मल्हारसोबत संपर्क करायचा प्रयत्न केला होता पण मल्हार कुठे होता कोणालाच माहीत नव्हतं.

"प्रेम वगैरे काही नसतंच. प्रेम असतं तर मल्हार असा मला सोडून गेलाच नसता. हे प्रेम वगैरे ना सगळं थोतांड असतं, खोटं असतं हे प्रेम वगैरे… आयुष्यात खरी असते ती फक्त तडजोड. आता हीच तडजोड निभवायची आहे… आईसाठी… बाबांसाठी…
प्रेमावर विश्वास ठेवणारी, मल्हारवर स्वतःला विसरून प्रेम करणारी गौरी आता असणार नाही. आता फक्त तडजोड करणारी गौरी असेल. आज मी माझ्या सगळ्या भावनांचा गळा घोटला आहे. आजपासून सगळ्यांना एक नवीन गौरी भेटेल, जिचं स्वतःच असं काहीच नसेल…मल्हार खरं तर ही शिक्षा तुला द्यायला हवी; पण ही शिक्षा मीच मला करतेय, तुझ्यावर प्रेम केलं म्हणूनच." गौरीच्या डोक्यावर अक्षता पडत होत्या आणि डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं, डोळ्यातून उष्ण पाणी वाहत होतं, त्या क्षणापासून गौरीने स्वतःला पुरतं बदलून टाकलं होतं…

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all