सर सुखाची (भाग - ६)
"प्राची, मल्हार असा का गं बोलला असेल?" मल्हारला भेटून होस्टेलवर आल्यावर गौरी प्राचीसोबत बोलत होती.
"घरी काही वाद झाला असेल. तसंही बघ ना बारावी झाल्यावर लोकं लगेच मागे लागतात. पुढे काय शिकायचं या प्रश्नाने अगदी भांडावून सोडतात. तसंच डिग्री हातात आली की लगेच सगळ्यांना वाटतं चांगला जॉब लागला पाहिजे. सगळ्यांचे तेच तेच प्रश्न ऐकून टेंशन आलं असेल ना त्याला. तुला भेटायला आला आणि तूही तेच विचारलं. सहाजिकच, सगळा राग तुझ्यावर निघाला." प्राची
"तसंही असेल पण मी काही चुकीचा मुद्दा मांडला नाहीये." गौरी
"मुद्दा चुकीचा नव्हता, वेळ चुकीची होती. मला तरी वाटतं आता तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. तू पास होईपर्यंत तो काही ना काही तरी करेल. दोन वर्षं आहेत… भरपूर वेळ आहे आणि मला एक सांग, तू आज पास झाली आणि लगेच तुझं उद्या लग्न असं होणार आहे का? नाही ना… मग तू नको काळजी करू." प्राचीने गौरीला समजावलं आणि गौरीलाही ते पटलं. तिने मल्हारला त्याचा वेळ दिला.
सगळ्यांना मोठा वाटणारा दोन वर्षाचा कालावधी झरझर संपून गेला. गौरीचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला होता. गौरी निकाल घ्यायला आणि बाकीच्या कॉलेज सोडायच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये आली होती. दिवसभर तिने सगळी कामं उरकली. संध्याकाळी ती मल्हारला भेटायला गेली. परीक्षा संपल्यापासून दोघे आताच भेटले होते.
"अभिनंदन!" मल्हारने गौरीच्या आवडत्या पिवळ्या गुलाबांचा बुके तिला दिला.
"थँक्स!" गौरीने हसतच बुके घेतला.
"सो… कशा गेल्या सुट्ट्या?" मल्हार
"मस्त… मजेतच." गौरी म्हणाली. बराच वेळ शांततेत गेला.
"मल्हार, आपण घरी कधी सांगायचं?" गौरी
"काय सांगायचयं?" मल्हार
"तुझं शिक्षण झालं, माझंही झालंय. माझ्या घरचे आता लग्नाच्या मागे लागतील तर त्यांना आपल्याबद्दल सांगायला नको." गौरी
"अच्छा लग्नाबद्दल… सांगू की, त्यात काय एवढं." मल्हार
"तू पुढे नोकरी, बिझनेस वगैरे काही करणार नाही का?" गौरी
"गौरी, मी तुला आधीच सांगितलं होतं, मी संगीत सोडणार नाही." मल्हार
"मी कुठे म्हणतेय तुला की तू संगीत सोड. पण नुसत्या संगीताने काय होणार आहे? त्याचं काय आज तुला काम मिळेल उद्या मिळणार नाही. आयुष्यात काही स्थीरता हवी की नाही? सगळी सोंगं आणता येतात मल्हार, पैशाचं सोंग आणता येत नसतं… आज तू आणि मी आहोत, उद्या आपली मुलं-बाळं होतील, त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काही करावं लागेल ना." गौरी
"काय पैसा-पैसा करतेय तू… एवढा मोठा आहे माझ्या बापाजवळ… शेवटी ते सगळं मलाच मिळणार ना." मल्हार
"समजा नाही मिळालं तर… मग कसं? तुझ्या मते, तुझ्या आई बाबांच्या खांद्यावर माझंही ओझं आणि नंतर आपल्या मुलांचंही… तुला तुझं असं काही करावं वाटत नाही का?" गौरी
"माझं आहेच की… संगीत आहे." मल्हार
"मल्हार, तुला समजत कसं नाहीये… तुझ्या नुसत्या संगीताने आपलं काहीच होणार नाहीये." गौरी खूप चिडली होती.
"हे बघ गौरी, मी पण माझं संगीत बंद करणार नाहीये. तुझ्या घरच्यांना माझ्याबद्दल सांग, त्यांना पटलं तर…" मल्हार
"काय सांगू? श्रीमंत घरचा मुलगा आहे. तो गाणं म्हणतो पण त्याचे काही त्याला फारसे पैसे वगैरे मिळत नाहीत. कधी कधी तर मिळतही नाहीत. त्याच्या घरी भरपूर पैसा आहे. तो पुरेपर्यंत आम्हाला टेंशन नाही." गौरी खूप चिडली होती.
"गौरी…" मल्हार अक्षरश: तिच्यावर ओरडला.
"हे बघ मल्हार, मी रात्रीच्या बसने घरी जातेय. घरी माझ्या लग्नाचा विषय तसाही सुरू होता, आता मी काही त्या गोष्टीला नकार देणार नाही. मला वाटतं तू या गोष्टीचा सिरियसली विचार करावा. तुझा विचार झाला तर तुझ्या घरी सांग आणि माझ्या बाबांसोबत बोल. मी तुझी वाट बघणार नाही, या वेळेत मला घरच्यांनी लग्नासाठी म्हटलं तर मी त्यांना नकार देणार नाही. द बॉल इज इन युअर कोर्ट… येते मी…" गौरी रडतच तिथून निघाली. मल्हारने तिला अडवलं देखील नाही.
गौरी रात्री बसमध्ये बसली. मल्हार बस स्थानकावर तिला भेटायला येईल अशी तिची वेडी आशा फोल ठरली होती. गौरीची बस पुढे जात होती आणि मल्हारच्या आठवणी मागे मागे जात होत्या. रात्रभर रडून रडून गौरीचे डोळे सुजले होते. ती घरी पोहोचली तेव्हा घरी वेगळीच गडबड सुरू होती.
क्रमश:
© डॉ. किमया मुळावकर
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा