सर सुखाची (भाग -५)

सर सुखाची




सर सुखाची (भाग-५) 

"ए मल्हार…" मल्हारच्या मित्राने मल्हारला आवाज दिला.


"हे बघ, मला मॅडी म्हणायचं… मल्हार फक्त गौरी म्हणणार.. कळलं?" मल्हार त्याच्या मित्रावर ओरडला. मल्हार आणि गौरीच्या प्रेमाबद्दल त्यांच्या मित्रपरिवारात सर्वांना कळलं होतं. मल्हार आणि गौरी कॉलेज सुटल्यावर रोजच भेटायचे. मल्हार त्याने तयार केलेली गाणी गौरीला गाऊन दाखवायचा. गौरीही अगदी तल्लीन होऊन ऐकायची. गिटारवर त्याची अलवार फिरणारी बोटे आणि त्यातून निघणाऱ्या सूरांच्या जादूत गौरी अगदी हरवून जायची.


दिवस सरत होते. कॉलेजच्या रंगीबेरंगी दिवसांसोबत दोघांचे प्रेमही बहरत होते. बघता बघता मल्हारचं कॉलेजचं शेवटचं वर्ष आणि गौरीचं दुसरं वर्ष संपत आलं होतं. फायनल परीक्षेच्या आधी दोघेजण ठरल्या ठिकाणी भेटणार होते. नेहमीप्रमाणे गौरी वेळेवर पोहोचली होती आणि मल्हारला यायला नेहमीसारखाच उशीर झाला होता.


"सॉरी, आजंही उशीर झाला." मल्हार बोलला त्यावर गौरी अगदी शांत बसून होती.


"काय झालं? आज चिडली नाहीस!" नेहमी हक्काने चिडणाऱ्या गौरीला असं शांत बघून मल्हारला आश्चर्य वाटलं. गौरी त्याच्या गळ्यात पडून मात्र लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडायला लागली.


"गौरी काय झालं? कुणी त्रास दिला का? की कुणी काही बोललं?" मल्हार काळजीने विचारत होता. 


"नाही रे. तसं काही नाही." गौरी रडत रडतच बोलत होती.


"मग… मग काय झालं? सांग ना. असा जीव नको टांगणीला लावू." मल्हार


"मल्हार… तुझं कॉलेज संपणार ना आता… मग आपण कसे भेटणार?" गौरी


"एवढुश्या कारणासाठी इतकी रडतेयस होय… वेडी कुणीकडची! मी येत जाईल ना तुला भेटायला. तू जेव्हा म्हणशील तेव्हा, जिथे म्हणशील तिथे, रोज म्हणशील तर अगदी रोजही." मल्हार म्हणाला.


"खरंच… " गौरीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.


"तुझ्यासाठी एक गाणं तयार केलंय, ऐकशील?" मल्हारने विचारलं.


"तुझं गाणं मी ऐकणार नाही असं होईल का?" गौरी म्हणाली. गौरी नाराज होती म्हणून मल्हारने मुद्दामच तिच्या आवडीचं गाणं म्हटलं. त्याच्या गाण्याने गौरीची नाराजी कुठल्या कुठे पळाली.



दिवस भर्रकन् पुढे गेले. मल्हारच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षाही संपल्या. मल्हार परीक्षेत पास झाला होता.


"मल्हार, आता पुढे काय करणार आहेस तू?" गौरी मल्हारला भेटायला आली होती. आल्या आल्या तिने त्याला प्रश्न विचारला.


"काय करणार म्हणजे? गाणी गाणार, माझा म्युझीक अल्बम काढणार… जमलं तर स्टेज शो किंवा बॉलिवूडमध्ये प्रयत्न करून बघणार." मल्हार


"ते होईल तेव्हा होईल रे; पण पोटापाण्याचं काय?" गौरी


"पोटापाण्याचं… म्हणजे?" मल्हार


"अरे म्हणजे नोकरी वगैरे…" गौरी


"मी कशाला नोकरी करू? माझा बाबांचा एवढा मोठा बिझनेस आहे… एवढी मोठी संपत्ती मलाच मिळणार ना…" मल्हार थोडा बेफिकीरपणे बोलला.


"मग घरचाच बिझनेस जॉईन कर ना." गौरी


"हे बघ गौरी, तू ना टिपिकल माझ्या आई-बाबांसारखं बोलू नकोस. मला बिझनेस, नोकरी वगैरे या असल्या गोष्टीत बिलकुल रस नाहीये. आणि आज तुझ्या डोक्यात हे कसलं खुळ आलंय?" मल्हार थोडा चिडून बोलला.


"खुळ नाही; दोन वर्षांनी माझंही इंजिनिअरिंग संपेल… आपल्या लग्नाचं घरी बोलावं लागेल ना." गौरी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती.


"कमॉन गौरी… अजून दोन वर्षं बाकी आहेत तुझे… सध्या तू अभ्यास, परीक्षा यांवर फोकस केला पाहिजे… त्यानंतरच्या गोष्टीचं टेन्शन आता का घेते? पुढचं पुढे बघू यार… मी एवढा पुढचा विचार करत नाही. एक सुंदर धून बसवली होती आज; तुला भेटल्यावर ऐकवेन असं वाटलं होतं पण तू आज… जाऊ दे माझा आता मूडच गेलाय… आपण नंतर भेटू. येतो मी." मल्हार उद्विग्नपणे बोलून तिथून निघाला. गौरी मात्र त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत तिथेच उभी होती.



क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all