सर सुखाची (भाग-४)
"कधी सागराला विचार किनाऱ्याशिवाय त्याचं अस्तित्व आहे का, चंद्राला विचार चांदण्यांशिवाय त्याचं अस्तित्व आहे का, ढगाला विचार पावसाशिवाय त्याचं अस्तित्व आहे का, फुलांना विचार सुगंधाशिवाय त्यांचं अस्तित्व आहे का, कधी सूर्याला विचार प्रकाशाशिवाय त्याचं अस्तित्व आहे का, कधी संगीताला विचार सूरांशिवाय त्याचं अस्तित्व आहे का? मी एक गिटार आहे आणि त्या गिटारची तार तू आहेस. ह्या तारेमुळेच तर ह्या गिटारमधून सूर निघतात. ही तार असेपर्यंतच ह्या गिटारच अस्तित्व. जेव्हा ही तार नसेल ह्या गिटारला, संगीताला काहीच अर्थ नसेल. माझ्यासोबत अशीच राहशील ना; माझ्या गिटारची तार बनून, माझ्या आयुष्यातलं संगीत बनून, माझ्या संगीतातले सूर बनून… आय लव्ह यू!" मल्हार गौरीच्या डोळ्यांत बघून बोलत होता. गौरीही त्याच्या डोळ्यांत हरवून गेली होती. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि दोघे भानावर आले. पडदा पडला. दोघे स्टेजच्या मागे आले.
"नाटकात शेवटी फक्त दोन वाक्य होती. दोनाची चार कुणी केली रे…?" मल्हारची मित्रमंडळी त्याला चिडवत होती. मल्हारच्या मनातल्या गोष्टी नकळतच त्याच्या ओठांवर आल्या होत्या.
एक दिवस कॉलेजमध्ये आल्यावर मल्हारने गौरीला संध्याकाळी कॉलेजच्या बाहेर भेटायला बोलावलं.
"गौरी, कॉलेज सुटल्यावर बाहेर भेटशील का? पार्कमध्ये?" मल्हारने थोडं घाबरतच विचारलं. गौरीने हसून होकारार्थी मान हलवली.
"पाच वाजता येशील." मल्हार गौरीचा निरोप घेऊन निघाला. शेवटचं लेक्चर संपल्यावर गौरी घाईघाईने पार्कमध्ये पोहोचली.
"अजून कसा आला नाही हा." गौरी मनगटला बांधलेल्या घड्याळात बघत बोलली. पाच वाजायला पाच मिनिटं बाकी होते.
"मीच लवकर पोहोचले…" गौरीला स्वतःवरच हसू आलं. गौरी बागेतल्या झाडाखाली टाकलेल्या बाकड्यावर जाऊन बसली. तिने पुन्हा घड्याळ्यात पाहिलं. फक्त पाचच मिनिटं झाली होती.
"पाच-दहा मिनिटं इकडचे तिकडे एवढं तर होतंच असतं." गौरीने स्वतःचीच समजूत काढली. बराच वेळ गेला.
"प्राची पण ना, सोबत चल म्हटलं तर आली नाही. इथे भी एकटीच भूतासारखी बसून आहे… प्राची सोबत असती तर गप्पा तरी केल्या असत्या." गौरी अस्वस्थपणे तिथे फेऱ्या मारत होती. तिने परत मनगटावरच्या घड्याळात पाहिलं, पावणे सहा वाजले होते. गौरी चिडून तिथून निघाली होती. तेवढ्यात मल्हार तिथे पोहोचला.
"सॉरी सॉरी… जरा उशीर झाला." मल्हार
"जरा?" गौरी नाक फुगवत बोलली.
"जरा नाही… बराच." मल्हार एका हाताने स्वतःचा कान धरत बोलला. त्याचा दुसरा हात त्याने पाठीमागे केलेला होता. गौरी मल्हारच्या बोलण्यावर काहीच बोलली नाही.
"आय लव्ह यू!" मल्हार गौरीसमोर दोन्ही गुडघे टेकवून बसला. त्याने पिवळ्या गुलाबाच्या फुलांचा बुके गौरीसमोर धरला. पिवळ्या गुलाबांचा बुके बघून गौरीच्या चेहर्यावर एकदम हसू उमटलं.
"मल्हार… हे काय आहे? उठ… सगळे बघताय तुझ्याकडे…" गौरी
"ज्यांना बघायचं त्यांना बघू दे… गौरी त्यादिवशी आपल्या नाटकातला एक अन् एक शब्द खरा आहे. माझ तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे गौरी… अगदी तुला पहिल्यांदा पाहिलं त्या क्षणापासूनच… तू पहिल्यांदा स्वतःहून माझ्यासोबत बोलली होतीस तेव्हा काय आनंद झाला होता म्हणून सांगू… गौरी… तू आयुष्यात आलीस आणि एक सुरेल लय सापडली गं. संगीत होतंच आधीपासून… पण त्याला आता एक दिशा सापडली… तू अशीच माझ्या सोबत राहशील ना?" मल्हार गुडघ्यावर बसूनच बोलत होता.
"मल्हार… उठ… सगळे बघताय… प्लीज उठ…" गौरी मंद हसत होती.
"ते तुझ्याच हातात आहे… आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे." मल्हार म्हणाला. गौरीने त्याच्या हातातला बुके घेतला आणि मानेनेच होकार भरून बुकेच्या मागे चेहरा लपवला.
"किती नशीबवान आहेत ती फुलं… आणि मॅडमची आवडही काय… पिवळी गुलाबाची फुलं! तुला सांगू, किती दुकानं फिरलो मी, बुके कुठेच नव्हता. मग प्रत्येक दुकानात जेवढे पिवळे गुलाब होते तेवढे घेतले आणि एका दुकानदाराकडून बुके तयार करून घेतला. म्हणून उशीर झाला यायला. मला येताना भीती वाटत होती, कदाचित तू वाट बघून निघून तर गेली नाही ना; पण थँक गॉड तू इथे होतीस." मल्हार
"निघालेच होते, तेवढ्यात तू आलास." गौरी म्हणाली. दोघे तिथल्या बाकड्यावर बसले होते.
"तुला माहितीये गौरी, गौरी हा एक राग आहे संगीतातला." मल्हार
"हो का, मला माहीत नव्हतं. तसंही संगीत, गाणे वगैरे मला आवडत नव्हते; पण तुझं गाणं ऐकल्यापासून आता गाणं आवडतं पण फक्त तू गायलेलंच." गौरी
"भारी आहेस तू… जगा वेगळी… गुलाब आवडतो, तोही पिवळा… सगळ्या मुलींना आवडणारी पाणीपुरी तुला बिलकुल आवडत नाही…" मल्हार बोलत होता आणि गौरी कौतुकाने त्याच्याकडे बघत होती.
"काय बघतेय?" मल्हार
"माझ्याबद्दल सगळंच माहितीये तुला तर…" गौरी
"ज्याच्यावर प्रेम असतं ना त्याच्या आवडी निवडी जपाव्या लागतात… कळलं?" मल्हारने गौरीचा हात हातात घेतला. दोघे मावळत्या सूर्याकडे बघत होते… सूर्यही मावळताना पिवळा रंग उधळून गेला होता…
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा