सर सुखाची (भाग-३)

सर सुखाची


सर सुखाची (भाग-३)


गाणी न आवडणारी गौरी मॅडीचं गाणं अगदी तल्लीन होऊन ऐकत होती. फ्रेशर्स पार्टी संपली पण गौरीच्या कानात अजूनही मॅडीच्या गाण्याचे सूर घुमत होते. गौरी तिच्याच नकळत मॅडीने गायलेलं गाणं गुणगुणत होती.


"काय गं, तुला तर गाणी आवडत नव्हती ना? मग आता काय सुरु आहे हां…" प्राचीने गौरीला चिडवलं.


"गप गं, मला गाणी आवडतच नाहीत. पहिल्यांदा असं कुणालातरी गाणं म्हणताना पाहिलं म्हणून ते गाणं तोंडात बसलं असेल." गौरीने काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं.


"असं होय! मला वाटलं…" प्राचीने डोळा मारला. गौरी तिला मारायला तिच्या मागे धावली.


दुसऱ्यादिवशी गौरी कॉलेजमध्ये पोहोचली. प्राची तिच्या सोबतच होती. तेवढ्यात गौरीला मॅडी पार्किंगमध्ये बाईक पार्क करताना दिसला. प्राचीला सोबत घेऊन ती मुद्दाम पार्किंगजवळ गेली. उजव्या हाताच्या बोटात चावी फिरवत मॅडी तिथून निघाला होता.


"एक्सक्यूज् मी मॅडी सर!" गौरी धीर एकवटून बोलली. मॅडी मागे वळून आला.


"काही गरज होती का आवाज द्यायची. अगं, सिनिअर आहे तो आपला… फटकन काही बोलला तर… उगी चार लोकांत हसं होईल आपलं." प्राची गौरीच्या कानात कुजबुजली. गौरीने तिचा हात कचकन दाबला.


 "मॅडी सर, काल फार छान गाणं गायलात तुम्ही." गौरी शब्दांची जुळवाजुळव कसंबसं बोलली.


"फर्स्ट इअर? फ्रेशर्स बॅच?" मॅडीने प्रश्न केला.


"अरे यार… मेलो… आता काही खरं नाही." प्राची पुन्हा गौरीच्या कानात खुसपुसली. गौरीने तिला एक चिमटा काढला.


"हो… मॅडी सर, काल फ्रेशर्स पार्टीमध्ये तुमचं गाणं ऐकलं." गौरी


"व्हाट इस धीस मॅडी सर? ऐकायला तरी चांगलं वाटतं का? मॅडी म्हटलं तरी चालेल." मॅडी


"नको सर, तुम्हाला एकेरी आवाजात बोललो तर बाकी सिनिअर्स अजून रॅगिंग घेतील." प्राचीने बोलली पण लगेचच तिने स्वतःची जीभ चावली.


"कोणी काही म्हणणार नाही. सगळ्यांना माहीत आहे मला मॅडी म्हटलेलं आवडतं ते… आणि माझ्या वाट्याला कोणीच जात नाही." मॅडी म्हणाला त्यावर प्राचीने मान डोलावली.


"पण तुमचं नाव असेल ना काहीतरी? मॅडी हे निकनेम वाटतं म्हणून…" गौरी बोलता बोलता थांबली.


"मल्हार… मल्हार देवकते." मॅडी म्हणाला.


"ते आनंदराव देवकते… मी कॉलेजमध्ये ट्रस्टी बोर्डवर त्यांच नाव वाचलं होतं, तुमचे कोणी नातेवाईक आहेत का?" प्राची परत मध्येच बोलली.


"माझे वडील आहेत. मी मल्हार आनंदराव देवकते. त्याचंच शॉर्टकट मी मॅडी केलंय." मल्हार मोठ्या कौतुकाने सांगत होता.


"पण मग ते मॅड होईल ना, मॅडी कसं?" प्राची गौरीच्या कानात परत खुसपूसली.


"नाईस नेम अँड निकनेम टू. येतो आम्ही." गौरी मल्हारचा निरोप घेऊन निघाली. वर्गामध्ये जाता जाता तिने प्राचीच्या पाठीत दोन-चार गुद्दे घातले. दोघींची मैत्री अगदी पहिल्या दिवसापासून बहरत होती. पण गौरीच्या हृदयात कुठेतरी संगीताची गिटार आपली तार आपोआपच छेडत जात होती.


कॉलेजचे रंगीबेरंगी दिवस मोरपीसासारखे अगदी अलवारपणे जात होते. गौरीचं ते मोहक दिसणं, तिचं हसणं आणि कॉलेजमधल्या प्रत्येक इव्हेंटला सोबत असणं मल्हारला सुखावून जात होतं. गौरी आणि मल्हार फारसं काही बोलत नव्हते; पण एकमेकांसमोर आले की त्यांचे डोळे जणू सर्वकाही सांगून जात होते. दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुटला होता; पण प्रेमाची कबुली मात्र अबोलपणे दिली जात होती.


बघता बघता एक सेमिस्टर संपलं होतं. कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या तयारीने जोर पकडला होता. निरनिराळ्या स्पर्धा, कार्यक्रमांची तालीम, निरनिराळे डेज् या सगळ्याला अगदी आनंदाचं उधाण आलं होतं. मल्हारने संगीतावर आधारित एक छोटीशी नाटिका स्वत: लिहिली होती. त्यात तो स्वतः नायक होता आणि त्याची नायिका होती… गौरी…


क्रमश:

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all