Login

सर सुखाची (भाग-२)

सर सुखाची




सर सुखाची (भाग-२)


मल्हारला बघून गौरीच्या डोळ्यांसमोर भूतकाळाची तार छेडली होती.



जी.टी. इंजिनिअरींग कॉलेजचा परिसर अगदी गजबजून गेलेला होता. तसं पहिल्या वर्षाचं कॉलेज सुरू होऊन जवळपास पंधरा-वीस दिवस झाले होते; पण गौरीचा कॉलेजचा पहिला दिवस होता. कॉलेजमधल्या प्रवेश प्रक्रियेतल्या शेवटच्या राऊंडमधली गौरीची ॲडमिशन ही शेवटची ॲडमिशन होती. ॲडमिशन झाली आणि गौरीच्या बाबांची, प्रभाकररावांची तब्येत अचानक खराब झाली होती. त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे गौरीला कॉलेज जॉईन करायला जरा उशीर झाला होता. गौरी प्रभाकरराव आणि सुलभाताईंची जेष्ठ कन्या होती. गौरीच्या पाठीवर दोन बहिणी आणि एक भाऊ होता. प्रभाकरराव शाळेत मुख्याध्यापक होते तर सुलभाताई एक आदर्श गृहिणी होत्या.


गौरी दिसायला अतिशय सुंदर होती आणि तितकीच अभ्यासात हुशारही होती. खरं तर बारावी विज्ञान शाखेतून ती उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. महाराष्ट्रातल्या कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला असता; पण महाराष्ट्रात टॉप वर असलेल्या जी. टी. कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं हे गौरीच स्वप्न होतं. आणि त्यासाठी तिने प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या राऊंडपर्यंत प्रयत्न केले होते आणि तिच्या प्रयत्नांना यश मिळालं होतं.


आनंद, भीती या संमिश्र भावनेत गौरी कॉलेजमध्ये आली होती. आधीच्या मैत्रिणींकडून कॉलेजमध्ये चालणाऱ्या रॅगिंग या प्रकाराबद्दलही तिला कळलं होतं. गौरी घाबरतच आपल्या वर्गाकडे चालली होती. तेवढ्यात एका मुलीने तिला अडवलं.


"काय गं, नाव काय? नवीनच दिसतेय कॉलेजमध्ये." ती मुलगी म्हणाली.


"हो, फर्स्ट इअर… गौरी… गौरी आहे माझं नाव…" गौरीने घाबरतच उत्तर दिलं.


"गौरी का? सिनिअर सोबत कसं बोलायचं माहीत नाही का तुला?" ती मुलगी थोडी उंच आवाजात बोलली.


"सॉरी, आजचा माझा पहिलाच दिवस आहे ना, मला माहीत नव्हतं." गौरीचा आवाज एकदम रडवेला झाला होता.


"अगं बाई, आता रडशील की काय? अगं मी प्राची, मी पण फर्स्ट इअरलाच आहे. हवं तर हे बघ माझं आय कार्ड… तू आज कॉलेजमध्ये पहिल्यांदा दिसली ना म्हणून फिरकी घेतली तुझी." प्राची स्वतःचं आय कार्ड दाखवत बोलली. गौरीच्या डोळ्यांत मात्र पाणी आलं होतं. प्राचीने तिची समजूत काढली आणि दोघी वर्गात जाऊन बसल्या. संध्याकाळी फ्रेशर्स पार्टी असल्यामुळे कॉलेज पूर्णवेळ झालं नव्हतं. दुपारी दोघी होस्टेलवर परत आल्या. प्राचीने या पंधरा-वीस दिवसातल्या सर्व घडामोडी, गमती-जमती गौरीला सांगितल्या. प्राची मुळातच बोलकी असल्याने तिच्यासोबत गौरीची पटकन मैत्री झाली. गौरीला प्राचीची रूम मिळाली होती. गौरी तिच्या बॅगमधलं सामान कपाटात ठेवत होती.


"गौरी, संध्याकाळच्या पार्टीसाठी आपला ड्रेसकोड साडी आहे बरं." प्राची


"साडी! माझ्याकडे नाहीये. आणि तसंही होस्टेलवर येताना कोणी साडी घेऊन येत असतं का? मी नाही नेसणार साडी." गौरी


"ही घे, तू ही साडी नेस." प्राचीने तिच्यासमोर एक साडी ठेवली.


"तू काय साड्या पण घेऊन आलीस का घरून?" "गौरी आश्चर्याने म्हणाली.


"अगं, दोन-तीन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं ना पार्टीचं. माझ्या आईची मैत्रीण याच शहरात राहते, मग कालच तिच्याकडून या दोन साड्या घेऊन आले. एकच आणणार होते पण त्या मावशी म्हणाल्या, राहू दे जास्तीची सोबत, एखाद्या मुलीजवळ नसली तर कामी येईल." प्राची म्हणाली.


संध्याकाळी दोघीजणी छानपैकी तयार होऊन फ्रेशर्स पार्टीसाठी गेल्या. कॉलेजच्या ऑडिटोरीयम हॉलमध्ये पार्टी होती. सगळीकडे रंगीबेरंगी लाईट लावले होते. स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. फर्स्ट इअरच्या सगळ्या मुली साडी नेसून आल्या होत्या तर मुलं सूटबूट घालून होते. कॉलेजमधले जवळपास सगळे सिनिअर पार्टीसाठी हजर होते. सिनिअरनी सांगितल्या प्रमाणे गेम्स, फॅशन शो सारखा राऊंड, स्वतःच परिचय देणे वगैरे सुरू होतं. गौरी मात्र या सगळ्या गोष्टींना त्रासली होती.


"प्राची, या मोठ्या आवाजातल्या गाण्यांमुळे माझं डोकं दुखतंय, मी थोडावेळ हॉलच्या बाहेर जाऊन थांबते गं." प्राचीच्या कानात गौरी ओरडून म्हणाली.


"बरं, जा… दूर जाऊ नको खूप, इथेच थांब बाहेर." प्राची म्हणाली. 


"मॅडी… मॅडी…मॅडी…" तेवढ्यात सर्वजण मोठ्याने ओरडायला लागले.


"हा मॅडी कोण गं?" गौरी परत प्राचीच्या कानात बोलली.


"आपला सिनिअर आहे, थर्ड इअरला आहे… काय हॅन्डसम दिसतो आणि त्याहीपेक्षा काय गातो! रॉकस्टरसारखाच!" प्राचीच्या बोलण्यात एकदम उत्साह होता.


"अच्छा, तू ऐक गाणं… मी थोडं बाहेरून येते. माझा ना जीव गुदमरतोय इथे आणि तसंही मला गाणं बिलकुल आवडत नाही." गौरी प्राचीसोबत बोलली आणि तिथून निघाली. 


मॅडी… मॅडी… म्हणत सुरू असलेला गोंधळ अचानक थांबला आणि कोणीतरी गिटारची तार छेडली. गौरी दोन क्षणांसाठी थांबली आणि परत पुढे जाऊ लागली. पुन्हा गिटारवर सुरेल संगीत वाजायला सुरुवात झाली. गौरी मात्र तिथेच थांबली. त्या संगीतात जणू एक जादू होती जी गौरीला आकर्षित करत होती. गौरीने मागे वळून पाहिलं, स्टेजवर मॅडी होता. त्याने गाणं गायलं सुरूवात केली आणि सर्वजण अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखे गाणं ऐकायला लागले… अगदी गाणं न आवडणारी गौरीसुद्धा अगदी तल्लीन झाली होती…