सर सुखाची (भाग -१)

एक छोटीशी प्रेमकथा


सर सुखाची (भाग-१)


"मम्मा… हे पेस्ट बघ ना… निघतच नाहीये." सहा वर्षांची सान्वी वॉशबेसिनजवळ स्टुलवर उभी राहून ओरडत होती.


"आले गं… थांब जरा." गौरी स्वयंपाक घरात सकाळची आवराआवर करत होती. तिने नळाखाली हात धुतले आणि नॅपकिनला हात पुसत ती वॉशबेसिनजवळ आली.


"सानू, आण इकडे. मी काढून देते. नीट दात घासायचे आणि नंतर डायनिंग टेबलवर दूध ठेवलंय ते पिऊन घे." गौरी सान्वीला पेस्ट काढून देत होती.


"आई… माझी ड्रॉइंग बूक कुठे ठेवलीये? आज मला स्कूलमध्ये न्यायची आहे ना… ड्रॉईंगचा क्लास असतो ना आज…" दहा वर्षाचा शर्विल पुस्तकांच्या कपाटात वही शोधत गौरीला आवाज देत होता.


"अरे तिथेच आहे… नीट बघत जा जरा." गौरी त्याच्या रुममध्ये जात बोलली.


"हे बघ… इथेच तर होती ना…" गौरीने शर्विलला वही काढून दिली.


"गौरी…अगं, माझा तो आकाशी रंगाचा शर्ट कुठेय? मला आज घालून जायचा होता ना…" स्वप्नीलचा बेडरूमधून आवाज आला आणि गौरी बेडरूममध्ये गेली.


"हे काय… तूच काढून ठेवलेस ना पलंगावर… उगीचच माझ्या नावाने का ओरडत होतास मग? आणि हे काय, ते गाणं बंद कर बरं आधी. तुला माहितीये ना मला गाणी आवडत नाही." गौरीने चिडून मोबाईवरचं गाणं बंद केलं.


"ठीक आहे बाबा... बंद गाणं... आणि मला एक सांग मी तुझ्या नावाने ओरडलो नसतो तर तू अशी इथे आली असतीस का?" स्वप्नीलने गौरीला अलगद जवळ ओढलं.


"पुरे पुरे… चल, नाश्ता करून घे पटकन. मला आवरायचंय अजून." गौरी त्याच्या बाहूपाशातून स्वतःला सोडवत म्हणाली.


"पण सकाळची सुरूवात थोडी गोड झाली असती तर…" स्वप्नीलने गौरीला परत जवळ ओढलं.


"गौरी…" बाहेरून सुमनताईंनी आवाज दिला आणि गौरी पटकन बाहेर पळाली.


"काय आई? काय झालं?" गौरी


"इथे बस आणि नाश्ता करून घे. पुन्हा ऑफिसच्या कामात गुंतून जाशील आणि जेवायला कधी वेळ मिळेल काय माहीत." सुमनताईंनी गौरीला जबरदस्ती डायनिंग टेबलवर बसवलं. शर्विल आणि सान्वी आधीच बसलेले होते.


"बरं का गौरी, दोन घास कमी खा हवं तर; पण तुझ्या सासूसोबत थोड्या गप्पा कर. तुम्ही सगळे घराबाहेर पडलात की ही माझं डोकं विटवून टाकते अगदी." सतीशराव पेपरमधून डोकं बाहेर काढत बोलले.


"जरा तो पेपर बाजूला ठेवा आणि समोरच्या प्लेटमधलं पोटात ढकला; म्हणे मी बडबड करते! तुम्हाला एक गोष्ट दहा वेळा सांगावी लागते त्याचं काय?" सुमनताई म्हणाल्या.


"सगळे लाड सुनेचेच का? आम्हालाही नाश्तापाणी आहे की तसंच जायचं आम्ही?" स्वप्नील आतून येत बोलला.


"ती सकाळपासून तुमच्या मागे पुढे तर करत असते रे. तिलाही ऑफिस, कामं असतातच ना." सुमनताई गौरीची बाजू घेत बोलल्या.


"हो गं माझी माय… समजलं… थट्टेत बोललो होतो मी. बरं गौरी, आज शुक्रवार आहे तर रात्री बाहेरच जाऊ जेवायला म्हणजे उद्या उठायला उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही." स्वप्नील


"स्वप्नील आज जमणार नाही बहुतेक. ऑफिसमध्ये आमचा नवीन बॉस येणार आहेत आज… तुला सांगितलं होतं ना आमची कंपनी एका ग्रुपने टेकओव्हर केलीये. तेच बॉस आजपासून ऑफिसमध्ये येणार आहेत. खूपच चिडका आणि रागीट माणूस आहे म्हणतात… आणि आज त्यांचा पहिला दिवस म्हणजे ते सगळं डिटेलमध्ये बघणार… आज कदाचित उशीर होईल घरी यायला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, पुढच्या आठवड्यात मुलांची परीक्षा आहे. उगी बाहेरचं खाणं निमित्त होईल. बाकी काही नाही." गौरी प्लेटमधलं अक्षरशः तोंडात कोंबत बोलली. तिने चटकनच नाश्ता उरकला आणि मुलांची शाळेची तयारी करून ती ऑफिसमध्ये जायची तयारी करू लागली. सतीशराव शर्विलला स्कूलबसमध्ये बसवायला गेले.


"सानू, आजीला त्रास देऊ नको हां. पटकन आंघोळ करून घे आणि शाळेची तयारी कर." ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघता निघता गौरीने सानूचा लाड करत सांगितलं आणि पार्किंगमध्ये पोहोचली.


"चल, मी सोडतो तुला. उगीचच लवकर पोहोचण्याच्या घाईत गाडी स्पीडने नेशील." स्वप्नील मागून येत बोलला.


"जाते रे मी. गाडी असली की आपलं काम झालं की पटकन सटकता येतं." गौरीने बोलता बोलता गाडीला चावी लावली. स्वप्नीलचा निरोप घेऊन गौरी ऑफिससाठी निघाली. वेळेच्या दहा मिनिट आधीच ती ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसच्या बाहेर सर्वजण बुके वगैरे घेऊन उभे होते.


"विकास सर आज बुके वगैरे घेऊन! आणि सगळे वेळेत हजर." गौरी तिच्या टीमलीडरच्या, विकासच्या बाजूला उभी राहत बोलली.


"हो… एम्.डी. सर वेळेचे खूप पक्के आहेत. त्यांना सेकंदभरही उशीर चालत नाही म्हणे." विकास


"त्यांची पोस्ट माहीत आहे बरं मला." गौरी


"हो… पण त्यांचे इनिशिअल्स एम्. डी. च आहेत आणि त्यांना त्याच नावाने हाक मारावी लागते." विकास


"तुम्ही तर बऱ्यापैकी होमवर्क करून आलात." गौरी विकासला चिडवत होती. तेवढ्यात एम्.डी. सरांची कार येऊन थांबली. विकास आणि बाकी ऑफिसमधली सिनिअर मंडळी त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेली. 


"चिडकू बॉस… दिसतो तरी कसा ते बघूया." गौरी नव्या बॉसचा चेहरा बघायचा प्रयत्न करत होती. त्यांच्या स्वागतासाठी बाकी लोक पण पुढे पुढे जात होते. त्यामुळे गौरीला त्याचा चेहरा दिसत नव्हता. सगळ्यांचं स्वागत स्विकारून एम्.डी. आत जायला निघाले. सगळी गर्दी बाजूला झाली. गौरीची आणि त्यांची नजरानजर झाली.


" मल्हार…!" गौरी त्याला बघून एकाच जागी थिजून उभी राहिली. भूतकाळाने आपल्या संगीताची तार परत छेडली होती.


क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

(सुरेशराव, सुमनताई, स्वप्नील, गौरी, शर्विल आणि सान्वी. एक हसतं खेळतं कुटुंब. मग हा मल्हार नेमका कोण? मल्हारमुळं गौरीच्या आयुष्यात काही वादळ तर येणार नाही की एखादी सर सुखाची येईल? जाणून घेण्यासाठी वाचत राहा सर सुखाची.)

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all