सर सुखाची (भाग-१२ अंतिम)

सर सुखाची... प्रेमाची


सर सुखाची (भाग -१२ अंतिम)

गौरीचा हात स्वप्नीलच्या हातात होता. ती त्याच्याकडेच बघत होती. मल्हार तिथे उभा होता याकडे तिचं लक्ष नव्हतं.

"गौरी…" मल्हारच्या आवाजाने ती भानावर आली. मल्हारला तिथे बघून तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती थोडी सैरभैर झाली. एकदा स्वप्नीलकडे आणि एकदा मल्हारकडे बघत होती.

"खरं तर तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. स्वतःला नशीबवान समजत होतो की तुझ्यासारखी बायको मला मिळाली. तू पण सांभाळलंस घराला पण कुठेतरी तू आनंदी नव्हतीस, खूपदा विचारावं वाटलं तुला पण मी विचारलं नाही. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा संबंध तुझ्या या अबोल्याशी जोडत गेलो. तू म्हणतेस ते अगदी खरं, कधी तुझ्या आवडीनिवडी विचारल्या नाही. पण तू तरी कधी सांगितल्या गं… मला चहा आवडतो म्हणून मी चहाच घ्यायचो पण तू ब्लॅक कॉफी आवडते हे कधीच सांगितलं नाहीस. मी मात्र आपल्या आवडीनिवडी सारख्याच या भ्रमात आतापर्यंत होतो. तुला गृहीत धरत गेलो असं नाही पण तू कधीच तुला न पटलेलं सांगितलं नाहीस… खूप गोष्टी आहेत अशा… पण या सगळ्यांत एवढं मात्र नक्की होतं… माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं… अजूनही आहे… म्हणूनच आज तुझ्या आनंदात मी माझा आनंद शोधतोय… माझ्यासाठी हे सगळंच अवघड आहे पण तू आनंदी राहशील यातच समाधान आहे. आता चार दिवस मी घरी नव्हतो, तेव्हा मल्हारची सगळी माहिती काढली, कॉलेजपासून तुमचं एकमेकांवर प्रेम होतं हे कळलं. आपलं प्रेम असं दुसऱ्याच्या स्वाधीन करणं सोपं नसतं म्हणूनच मल्हारची नीट चौकशी केली आणि तो तुला साथ द्यायला अगदी योग्य आहे हे लक्षात आलं… लवकरच कायदेशीर बाबी पूर्ण करून देतो… आनंदात राहा… येतो मी." बोलता बोलता स्वप्नीलचा कंठ दाटून आला होता. मल्हारच्या हातात गौरीचा हात देऊन स्वप्नील तिथून निघाला. गौरीच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होते.

"प्रेमाचा श्रावण माझ्याजवळच होता… मी मात्र सुखाच्या सरी शोधत बसले… मल्हार वाहवत आले रे मी… आता कळतंय… एक तप लागलं रे त्याला ओळखायला… खरंतर मी प्रयत्नच नव्हता केला आधी… पण आता मला त्याला गमवायचं नाहीये. थँक्यू मल्हार! तू पुन्हा आयुष्यात आला नसता तर कदाचित याची जाणीव झाली नसती… आणि सॉरी…" मल्हारच्या हातातून हात सोडवून गौरी स्वप्नीलच्या मागे धावत गेली. तिने स्वप्नीलला आवाज दिला. तो थांबला. गौरीने त्याला कडाडून मिठी मारली. कुठुनतरी एक पावसाचा ढग आला आणि अगदी मनमुराद बरसून गेला.

"स्वप्नील…" गौरी त्याच्यासोबत बोलू लागली. त्याने तिच्या ओठांवर अलगद आपलं बोट ठेवलं.

"सगळ्याच गोष्टी बोलायची गरज नसतेच… त्या आपोआप कळतात... स्पर्शातून… नजरेतून." स्वप्नीलने तिच्या डोळ्यांतलं पाणी अलगद टिपलं…


एका वर्षानंतर

मल्हारने एम् डी. ग्रुप ऑफ कंपनीझ् च्या यशाची पार्टी ठेवली होती. गौरी आणि स्वप्नील दोघे त्या पार्टीसाठी गेले होते. दोघे मल्हारला भेटले.

"आमच्याकडून तुझ्यासाठी एक छोटीशी भेट." गौरीने एक भला मोठा बॉक्स मल्हारला दिला. त्याने तो लगेचच उघडला.

"गिटार!" मल्हारला आश्चर्य वाटलं.

"आयुष्य हे थांबण्यासाठी नसतंच आणि थांबतं ते आयुष्य नसतं… तू तुझं संगीत परत सुरू केलं तरच मी स्वतःला माफ करू शकेल." गौरी म्हणाली. मल्हारची बोटं अलगद गिटरवरून फिरली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

"मी नेहमी स्वतःचीच गाणी गातो पण आज इतक्या वर्षांनंतर काही सुचत नाहीये… माझ्या आवडीचंच एक गाण गातो… "

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा ।।


मल्हारने गाणं गायलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. गौरीच्या डोळ्यांत मात्र पाणी होतं. स्वप्नीलने तिच्याकडे पाहिलं.
"आज खऱ्या अर्थाने खूप मोकळं वाटतंय… मनावरचं खूप मोठं ओझं हलक झालंय." गौरीने स्वप्नीलच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

पार्टी रंगात आली होती. गौरी, स्वप्नील आणि मल्हार तिघे बोलत होते. मल्हारचं गाणं ऐकून एक सुंदर मुलगी त्याच्याजवळ आली. त्याच्या गाण्याची भरभरून कौतुक करत होती. मल्हारही तिच्यासोबत बोलण्यात हरवून गेला होता.

"एवढं बोललो आपण… पण तुझं नाव नाही विचारलं मी." मल्हार तिला म्हणाला.

"भैरवी…"

तिचं नाव ऐकून तिघांच्या चेहर्‍यावर एक गोड हसू आलं होतं… आज मल्हारलाही गवसली होती सर सुखाची!

पूर्णविराम!

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all