सर सुखाची (भाग-११)

सर सुखाची


सर सुखाची (भाग-११)

एक दिवस गौरीला ऑफिसमधून यायला उशीर झाला होता. नेहमीप्रमाणे घरातली मंडळी तिच्यासाठी जेवणाची थांबली होती. सुमनताईंनी मुलांना जेवू घालून झोपवलं होतं.

"गौरी पटकन फ्रेश होऊन ये. सगळे जेवायचे थांबलेत." स्वप्नील गौरी घरात आल्या आल्या तिला म्हणाला.

"मी बाहेरून खाऊन आलेय." गौरी तटस्थपणे बोलली.

"अगं मग फोन करून सांगायचं ना. आई बाबांच्या वयाचा तरी विचार करायचा." स्वप्नील

"मी विचार करायचा! तुमचा! तुम्ही किती विचार केलात माझा, माझ्या भावनांचा, माझ्या आवडी निवडीचा? तुमच्या कोणत्याच गोष्टीला मी नकार दिला नाही याचा अर्थ मला ती गोष्ट पटतेय, आवडतेय असं असतं का? मला काय वाटतं याचा विचार केलात का तुम्ही कधी? घरात सतत सगळं तुमच्याच मनाने होत आलं. मी, माझं मत ह्याला काही किंमत होती का कधी? प्रत्येक गोष्टीत मला गृहीत धरत आलात… पण आता मला मोकळा श्वास घ्यायचाय आणि त्यापासून मला कोणीच अडवू शकणार नाही." गौरी चिडून बेडरूममध्ये निघून गेली. गौरीच्या या वागण्याने, तिने केलेल्या आरोपांमुळे स्वप्नील पुरता खचून गेला. तो रात्रभर झोपला नाही. सकाळी लवकरच उठून तो ऑफिसमध्ये निघून गेला. संध्याकाळी त्याची एका क्लायंट बरोबर एका रेस्टॉरन्टमध्ये मीटिंग होती. स्वप्नील आणि तो क्लायंट तिथे बसून बोलत होते. तेव्हढ्यात त्याला तिथे गौरी दिसली. गौरीसोबत मल्हार होता. गौरीच्या हातात पिवळं गुलाबाचं फुल होतं. गौरीला बघून स्वप्नील जागीच उभा राहिला.

"काय झालं स्वप्नील? काय बघताय?" त्याच्या क्लायंटने त्याला विचारलं आणि तोही त्या दिशेने बघायला लागला.

"अरे हे एम्. डी. ग्रुप ऑफ कंपनीझचे सर्वेसर्वा मल्हार देवकते…. आणि ती त्यांची कलिग… आज काल या दोघांमध्ये काही तरी शिजतंय याची चर्चा आहे ह्यांच्या ऑफिसमध्ये… बचपन का प्यार है असं म्हणतात… माझा एक मित्र काम करतो तिथे, तो सांगत होता." क्लायंट थोडा विचित्र पद्धतीने बोलला.

"बरं, तुमच्या प्रपोजलचे डिटेल्स मला मेल करा." स्वप्नील त्याला बोलून लागलीच तिथून निघाला. तिथून निघून घरी जायची त्याची इच्छाच झाली नाही. रात्री बराच उशीरापर्यंत तो बाहेरच होता. पहाटेच्या सुमारास तो घरी आला. गौरी सकाळी ऑफिसच्या वेळेवर तयार झाली होती.

"गौरी, कुठे जातेय?" स्वप्नीलने तिला विचारलं.

"ऑफिसमध्ये." गौरी

"आज शनिवार, आज ऑफिसला सुट्टी असते ना?" स्वप्नीलने थोडं कडक आवाजात विचारलं.

"ऑफिसमध्ये… ते… तुला म्हटलं नाही का, कामाचा खूप लोड आहे." गौरी अडखळत बोलली आणि चटकन घराबाहेर पडली. स्वप्नीलही तिच्या मागे गेला. गौरी मल्हारला भेटायला गेली होती. ते पाहून स्वप्नीलच्या पायाखालची जमीनच सरकली. तो तसाच घरी आला. ऑफिसचं दोन दिवस अर्जंट काम आहे म्हणून बाहेर गावी निघून गेला. स्वप्नील दोन दिवस म्हणाला पण चार दिवसाने परत घरी आला. नेहमीप्रमाणे तो गौरीसोबत वागत बोलत होता. एक दिवस त्याने सकाळीच गौरीच्या नकळत तिच्या फोनवरून मल्हारला भेटण्याचा मेसेज पाठवला.

"गौरी, पटकन तयारी कर. आपल्याला बाहेर जायचंय." तो स्वतःची तयारी करत म्हणाला.

"बाहेर कुठे?" गौरी

"तू चल पटकन. कळेल तुला." स्वप्नील म्हणाला. त्याने गौरीला गाडीत बसवलं आणि गाडी गावाच्या बाहेरच्या दिशेने नेली.

"स्वप्नील, आपण कुठे जातोय?" गौरीने परत विचारलं. स्वप्नील त्यावर काहीच बोलला नाही. बऱ्याच वेळाने त्याने गाडी थांबवली. समोर टेकडीवर एक मंदिर होतं. त्याने गौरीला गाडीतून खाली उतरायला लावलं.

"स्वप्नील, काय सुरू आहे? काही सांगशील का?" गौरी चिडून तिथेच उभी राहिली.

"चल माझ्यासोबत." स्वप्नील म्हणाला.

"आधी मला सांग, आपण कुठे जातोय?" गौरी तिथेच उभं राहून विचारत होती. स्वप्नीलने तिचा हात पकडला आणि तिला मंदिराच्या दिशेने नेऊ लागला. गौरी एकटक त्याच्याकडे बघत होती. सप्तपदीपासून ते आतापर्यंतचा स्वप्नीलचा सहवास तिच्या डोळ्यांसमोरून जात होता. पहिल्यांदा सप्तपदीवेळी हातात हात पकडलेला स्वप्नील… त्या स्पर्शातही एक विश्वास… शर्विलच्या जन्मानंतरचा तो बापाच्या भूमिकेतला, आपल्या मुलांना जपणारा स्वप्नील, प्रभाकररावांच्या मृत्युनंतर गौरीच्या माहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळणारा धीराचा स्वप्नील, घरातल्या प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक निर्णय घेणारा गंभीर स्वप्नील, स्वतःबद्दल तिच्या डोळ्यांत प्रेम शोधणारा प्रियकर स्वप्नील… गौरीला स्वप्नीलची एक वेगळीच ओळख होत होती… गौरी स्वप्नीलकडे एकटक बघत होती.

दोघे मंदिरात पोहोचले. मल्हार आधीच तिथे उभा होता.

क्रमशः

डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all