सप्तपदी ते सहजीवन.......

Letter to dear husband...

प्रिय,

आहो....

             आहो पासून अरे पर्यंतच्या सुखकर प्रवासाचा भांडखोर पण हवाहवासा सोबती असणारा तु.. कसा आहेस..? मजेतच असणार मी माहेरी जी आले आहे...असो, माझ्या अनुपस्थितीत तुझा हक्काचा 'मी' टाइममस्त एन्जॉय कर.. मग आपली टॉम अॅण्ड जेरी वाली जुगलबंदी आहेच.. माहेरी आल्यावर दोन दिवस खूप मजेत गेले तर पण तिसऱ्या दिवसापासून काहीतरी मिस होतय असं जाणवू लागलं..' तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना..' असं आपलं गोड नातं..या नात्याची तिखट,गोड, आंबट, खारट आणि काही प्रसंगी कडू चव या पत्रातून तुझ्यापर्यंत पोहचविण्याचा एक धाडसी प्रयत्न.

            विज्ञानाच्या आकर्षण, प्रतिकर्षण या तत्वाला शास्त्रीयरित्या मान देत विचारांनी भिन्न असलेलो आपण दोन विजातिय विदुषकं कधी एकमेकांकडे आकर्षित झालो कळलेच नाही. तसंही विचार जुळले तर प्रतिकर्षण होतं त्यामुळे ते जुळवून घ्यायच्या भानगडीत सहसा आपण पडतच नाहीत.. पाहणाऱ्यांना आपण आदर्श पती पत्नी वाटतो.. त्याचं खरं कारण आपलं प्रेम त्यांना दिसतं असं मुळीच नाही.. अनावधानाने आपले मॅचिंग होणारे कपडे सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतात.. पण जेव्हा तु ' फक्त कपडेच मॅचिंग बाकी काहीच जुळत नाही आमचं..' असं हसून सांगतोस तळपायाची आग मस्तकात जाते बुवा... पण काय करणार आपलेच दात आणि आपलेच ओठ.. ते काहीही असो पण तु माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुखद पर्व आहेस.. हो तुला पर्वच म्हणेन मी... आयुष्याची ओंजळ सुखाने, सन्मानाने आणि आत्मविश्वासाने भरणारा.. लग्नाआधी लाजरी, बुजरी असणारी मी तुझ्या तालमीत वेल कॉन्फिडन्ट बनले.. लहानपण आणि त्यानंतर तरुणपणही तडजोडीत गेले...आर्थिक आणि त्याचबरोबर मानसिकही.. पण लग्नानंतर परवड थांबली आणि आर्थिक आणि सर्वात महत्त्वाचे मानसिक स्थैर्य प्राप्त झाले.. नव्या नवलाईने भारलेले आपल्या लग्नानंतरचे कोवळे क्षण एकमेकांच्या आश्वासक साथीने तेजोमय झाले आणि प्रेमाच्या प्रकाशाने उजळून निघाले.. आजही आठवते लग्नानंतर माहेर सोडून आलेली मी किती रडवेली झाले होते.. माणसांनी भरलेल्या घरातही, कोण काय बोलेल याची पर्वा न करता माझ्या रडण्यावर लक्ष ठेवून असायचास.. किचनमध्ये काम करत असतांना 'घाबरू नकोस मी आहे..' असं नजरेनेच सांगायचास..माझ्या सोबत आलेली मोठी ताई किती चिडवायची मला....आताही तसाच येतोस तु किचनमध्ये.. फक्त माझ्या रडण्याची जागा रागावण्याने घेतली आहे आणि तुझ्या 'घाबरू नकोस' या शब्दांची जागा ' अगं अशी बघू नकोस मी घाबरतो..' या शब्दांनी घेतली आहे.... थोडक्यात आपल्या नात्यात प्रगती झाली आठ वर्षांत सांगायला हरकत नाही.. 

             बापरे पाहता पाहता आठ वर्षे झाली आपल्या भातुकलीच्या खेळाला.. पण अजूनही मोस्ट रोमॅण्टिक कपल आहोत आपण आपल्या 'बिझी फॅमिलीचे' हेच आपले वैशिष्ट्य...' फॅमिली' कसली २५-३० अतरंगी माणसांचा सप्तरंगी गोतावळाच तो.. 'बिझी' फक्त टायटल पुरतं बाकी सारी मंडळी फॅमिली गेट टुगेदरसाठी महिन्यातून दोनदाही तयार असतात.. सगळीच जीवाभावाची माणसं... ती माझी आणि मी त्यांची कधी झाले कळलेच नाही.. आता भलेही तु लांबचा मी त्यांच्या जवळची झाली आहे पण तरीही माझ्या माणसाल आनंदाचं ऑलक्रेडिट गोज टु यू... मी जसं तुझं घर आपलं केलं तसच माझ्याविना रुसलेल्या माझ्या माहेराचा तु ही आधार झालास.. एकल पालकत्व अनुभवलेल्या माझ्या त्या घराचा तु भक्कम आधार झालास..एवढा की 'जावयाची' ओळख 'मुलगा' या शाश्वत नात्यात रुपांतरित झाली... मग मी ही भूतकाळात हरवले..'बापाचं' नातं तुझ्यात शोधू लागले होते..'मला नवराच राहू दे गं.. नवराही बायकोचा तिच्या वडिलांप्रमाणे हक्काचा आभाळ बनतो.. नात्याचा गुंता नको.. माझी भूमिकाच मला जास्त प्रिय.' किती कळकळीने म्हणालाच तु..आणि आजतागायत शब्दाला जागलासही.. माझ्या प्रत्येक कठिण प्रसंगात तु हक्काचं आभाळ बनून माझ्या सोबत राहिलास.. मग लग्नानंतर शिक्षण पूर्ण करणं असू दे... वा माझा मातृत्वाचा प्रवास असू दे.. 

            मातृत्वाचा प्रवास... आपण दोघांची सोबत पार केलेला सर्वात आव्हानात्मक प्रवास.. या प्रवासात मात्र 'बापपण' नाकारणारा तु माझी 'आई' झालास.. प्रिमॅच्युअर जुळ्याचं मातृत्व सोपं नव्हतंच पण तुझ्या सहवासात ते सुसह्य झालं.. आपल्या नवजात बाळाला जन्मानंतर आपल्या कुशीत घेणं यासारखं स्वर्गसुख कोणतं एका आईसाठी..? पण माझ्या वाट्याला मातृत्वाचा हा सोहळा आलाच नाही.. प्रिमॅच्युअर असलेल्या आपल्या जुळ्या लेकींना एनआयसी मध्ये दाखल करण्यात आले.. शुद्धीवर आल्यावर खूप रडले मी.. त्यावेळेस तु हक्काचा आधार दिलास एका आईला.. त्यांच्या शरिरावर लावलेल्या मशीन्स..त्यांच्या मांसवजा कातडीला टोचलेल्या सिरिंग पाहून ओक्साबोक्सी रडायचे तेव्हा तु माझी आशा झालास..' अगं जातील हे ही दिवस.. प्रारब्ध कोणाला चुकलय का..?" म्हणत सात्वंन केलस माझं.. पण एनआयसीयु बाहेर हतबल होऊन बसलेला 'बाबा' माझ्या नजरेतून सुटला नाही.... मुलींना एनआयसीयु बाहेर काढल्यानंतर पूर्ण मॅटर्निटी वॉर्डमध्ये मिठाई वाटली होती तु... घरी आणल्यानंतरही रात्रंदिवस एक करून नाजूक जीवांना वाढवण्याच्या अग्नीदिव्यात तु माझी आई झालास.. रात्री मला झोपायला सांगून स्वत: पाळणा गाणारा तु बापाच्या रुपात 'आईपण' जगत होतास.. त्या चिमुकल्यांचही आणि माझंही... या साऱ्या प्रवासात तु माझ्या अंतरीचा हळवा कप्पा बनलास.. सहवासाच्या, शाश्वत साथीच्या सुगंधाने दरवळलेला...

              अनेक चढउतार आले आयुष्यात..आताही येत आहेत पण एक आश्वासक सोबत बनून तु नेहमीच माझ्यासोबत माझी हिंमत बनून उभा राहिलास आणि राहतोस.. भांडणंही होतात आपली पण कपातल्या वादळासारखी.. कपातच विरून जाणारी आणि प्रेम वाढवणारी.. सप्तपदी ते सहजीवन या सुंदर प्रवासाचा तु सुंदर सोबती. कितीही उलगडावं म्हंटला हा प्रवास तरी  शब्दांना मर्यादा आहे पण आपला प्रवास भावनातित आहे तो शब्दांत नाही मांडता येणार.. जाता जाता तुझ्यासाठी एक कविता.. जी तु माझ्यासाठी लिहाविस हे माझं दिवास्वप्न नेहमीच तुझ्या 'नजरेत तुझ्या माझ्या प्रीतीचे मंदिर, पापण्यांची दुलारी त्यावर.." या चारोळीतच संपून जातं.. असो. माझी कविता नक्की वाच आणि माझ्यासाठीही उभ्या आयुष्यात एकदातरी कविता लिहिण्याचा प्रयत्न कर..

"सप्तपदी ते सहजीवन सुंदर प्रवाससप्तपदी

दोन जीव परी एकच श्वास..

वाट तुझ्या सवे चालता आनंदाने मी चिंब झाली

हात हाती तुझा घेता माझी न मी राहिली..

तु असता जवळी अन् सुख ते कसले

जुळून आली रेशीमगाठ सुखही गालात हसले..

चालता सप्तपदी तुझ्यासवे मी नव्याने जन्मले

मंगलाष्टकांच्या पावित्र्याने सातजन्म तुझी झाले..

मने दोन जुळली परि नाती अनेक लाभली

तुझ्या हक्काच्या आशिर्वादाची मी ही भागीदार झाली..

तुझ्या मायेच्या माणसांत मी मलाही विसरले

माझ्याही नात्यांना तुझ्या रुपात सुख नव्याने लाभले..

तुझ्यासवे जगतांना आनंदाचा नवा प्रहर आला

संसाराच्या गुलमोहराला मातृत्वाचा बहर आला...

तु सोबत असतांना तु मी सोबती होऊ

जपून सारी नाती एकमेकांत जिवंत राहू..."❣️❣️❣️

    

                                        तुझीच हक्काची

                                             बायको❣️

पत्रलेखन-©® आर्या पाटील

******************************************

सदर पत्राच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखिव..