सप्तपदी संजनाची.. अंतिम भाग

Stories Of Married Couples
सप्तपदी कि तप्तपदी.. संजना कथा अंतीम भाग..


आधीच्या भागात आपण संजनाचे झालेले लग्न पाहिले, त्यात तिला अचानक तिच्या प्रियकराचा आलेला मॅसेज, आता पुढे काय होते ते या भागात..


त्यात अचानक तिला इक्बालचा मेसेज दिसला. मिस्ड कॉलहि दिसत होता. तिने मुद्दामच जुन्या ऑफिसमधल्या कोणालाच लग्नाची कल्पना दिली नव्हती. मग अचानक कसा? तिने उत्सुकतेनेच पाहिले आणि वाचून ती सुन्न झाली मॅसेज होता.. " फायनली मी जीव देण्याची धमकी देऊन माझ्या घरातल्यांना इमोशनल ब्लॅकमेल केले आणि ते घाबरून आज आपल्या लग्नाला हो म्हणाले. तुला सरप्राईज द्यायचे म्हणून इतके दिवस काही बोललो नाही. पण तू तर आज माझा फोनही उचलला नाहीस. सो बि रेडी फॉर अवर वेडिंग."
काय करावे तेच तिला सुचेना. इतका वेळ लांबून तिच्याकडे लक्ष ठेवणारा विवेक तिला घाबरलेली पाहून तिच्या जवळ आला आणि काय झाले असे विचारू लागला. त्याचा प्रेमळ आवाज ऐकून तिला रडू फुटले. तिला घरच्यांची आठवण आली असे वाटून तो म्हणाला, " तुला घरची खूप आठवण येतेय का? घरी फोन करुन बोलून घेतेस का? दादा म्हणाला होता मला कि तू खूप हळवी आहेस म्हणून. पण एवढी हळवी असशील असे वाटले नव्हते." संजनाला यावर काय बोलावे तेच सुचेना, तसेही इक्बालचा मेसेज वाचून तिला धक्का बसला होता. म्हणून खूप दमले आहे या सबबीखाली तिने विवेकला कसे तरी खोलीबाहेर काढले.
दुसर्‍या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेला संजना काही न बोलता विवेकसोबत जोडीने पूजेला बसली खरी, पण तिचे काही तरी बिनसले आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे विवेकच्या घरचे सगळेच तिच्याशी थोडे जपून बोलत होते. पूजा होताहोताच कुंदाताई कुटुंबियांसमवेत आल्या. पूजा संपल्या संपल्या लगेच संजना कुंदाताईंना बिलगली, हे बघून नाही म्हटले तरी विवेकच्या घरच्या वडिलधार्या स्त्रियांनी नाके मुरडली. पण सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा संजनाने घरी जायचा हट्ट केला. आता मात्र विवेक वैतागला. "संजना, अग परवाची आपली सिमल्याची तिकिटे आहेत विमानाची. तिथे जाऊन आल्यावर गेलीस तर नाही का चालणार?"
पण हे ऐकून संजनाने रडायलाच सुरुवात केली. सगळ्यांचीच परिस्थिती ऑकवर्ड झाली. कोणालाच काय बोलावे ते सुचेना. शेवटी विवेकच्या आईच बोलल्या," जाऊ दे तिला विवेक. उद्या वाटल्यास तू तिला घ्यायला जा."
हा त्यांचा समजूतदारपणा पाहून कुंदाताईंना हायसे वाटले. त्यांनी आत जाऊन त्यांचे आभार मानले. संजना तशीच निघाली. हे सगळे विवेकच्या घरातल्यांना खूपच खटकले. विवेकचा तर चेहराच पडला होता. त्याच्या मित्रांनी खोली सजवायला घेतली होती त्यांना फोन करून त्याने काम थांबवायला सांगितले. लग्न घरातून नवरीच निघून गेल्यामुळे घराला सुतकी कळा आली होती.
इथे कारमध्ये राजेश आणि कुंदाताई दोघेही खोदून खोदून संजनाला विचारत होते , पण संजना तोंडही उघडत नव्हती. शेवटी सीमाने त्यांना गप्प बसवले. पण घरी येईपर्यंत संजनाचा निर्णय झाला होता. तिने घरी आल्या आल्या विवेककडे परत जाणार नाही हे सांगितले. हे ऐकून सगळेच शॉक झाले. "अग तू मूर्ख आहेस का? लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटला का? आणि बारा तासात असे काय झाले कि तू जाणार नाहीस तिथे. आम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आणि विवेकचे काय? त्याच्या घरातल्यांना काय सांगू?" राजेश संजनावर हात उगारायला गेला पण त्याला सीमाने थांबवले. तोपर्यंत संजनाचा अतार्किक निर्णय ऐकून आणि राजेशचा उद्रेक पाहून कुंदाताईंना जोरात ह्रदयविकाराचा झटका आला. ह्यांनी धावपळ करून दवाखान्यात नेले पण तोपर्यंत त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते..
संजनाला आई गेल्याचे दुःख तर झाले होतेच , पण त्यासोबत विवेकला लगेच काही सांगायला लागणार नाही म्हणून थोडेसे हायसेही वाटले होते. तेवढ्यात तिने इक्बालला फक्त आई गेल्याचे कळवले पण तू भेटायला येऊ नकोस असे ही सांगितले. इकडे विवेकने सिमल्याचे सगळे बुकिंग , सुटी कॅन्सल केली आणि ऑफिसला जाणे सुरू केले. ऑफिस मधून घरी जाताना तो न चुकता संजनाच्या घरी जायचा. तिथे राजेश , सीमा त्याच्याशी नीट बोलायचे पण संजना जेवढ्यास तेवढे. आईच्या जाण्याचे तिला दुःख झाले असावे म्हणून अशी वागत असेल कदाचित अशी तो स्वतःच्या मनाची समजूत घालत होता. पंधरा दिवसानंतर ती परत घरी येईल तेव्हा बघू . खरेतर लग्न ठरल्यापासून त्याला संजनाशी नीट बोलताच आले नव्हते. आणि आता हे कुंदाताईंचे असे झालेले. त्याला संजना मनापासून आवडली होती. त्यामुळे तिच्याशी बोलायला तो उत्सुक होता. पण सध्यातरी तो फक्त तिची वाट पहात होता.
कुंदाताईंचे दिवस झाल्या झाल्या राजेश आणि सीमा दोघेही संजनाला समजवायचा प्रयत्न करत होते. शेवटी संजनाने इक्बालबद्दल त्यांना सगळे सांगून टाकले. " मग हे तू आम्हाला लग्नाच्या आधी का नाही सांगितलेस? किती तरी दिवस आम्ही विचारत होतो ना ?" राजेशला संताप आवरत नव्हता.
" हो, पण तेव्हा इक्बालचे काहीच ठरत नव्हते." एवढ्यात , "काका तुम्ही इथे उभे राहून काय करताय? आणि माझे चॉकलेट कुठे आहे ?", असा काव्याचा आवाज आला. घराचा दरवाजा उघडून ती कधी बाहेर गेली हे कोणालाच कळले नव्हते. दरवाजात पाहिले तर विवेक रोजच्या सारखा आला होता. त्याने हे ऐकले कि नाही काहीच कळत नव्हते.
" विवेक ये बस ना, ऑफिसमधून थेट आला असशील ना? सीमा चहा टाकशील का पटकन?" राजेश म्हणाला..
"दादा, प्लीज काही फॉर्मलिटी नको. मी सगळे ऐकले आहे. मला संजनाला फक्त एवढेच विचारायचे आहे कि हेच जर मी वागलो असतो तर? कसे वाटले असते तुला? मी तर तुझ्यावर प्रेमही करायला लागलो होतो. माझ्या भावनांचे काय? आणि माझ्या घरातल्यांचे काय? लग्न मोडले कि दोष आधी मुलावर येतो त्याचे काय? पण अजून एक गोष्ट मी तुला माझ्याशी तुझी इच्छा नसताना बांधून ठेवणार नाही. पण कोणाच्याही भावनांशी खेळताना जरा विचार कर. मी लवकरात लवकर घटस्फोटाचे पेपर्स तुझ्याकडे पाठवून देतो."
"मला माफ करा. मला खरेच या सगळ्याची कल्पना नव्हती.मी तर तुझ्या आईबाबांसमोर जायची हिंमतही करू शकत नाही" राजेश अक्षरशः हात जोडून बोलत होता. पण संजना आत निघून गेली. विवेकही तिथून गेला. जाताना घरी कसे आणि काय सांगायचे हेच विचार त्याच्या डोक्यात होते. त्याच्या आयुष्यातील हे पहिले प्रेम होते. प्रेमभंगाचे दुःखही होतेच. घरी आल्या आल्या आईने विचारले, "काय रे संजनाला आणायला गेला होतास ना? झाले ना सगळे विधी तिच्या आईचे?"
कसाबसा धीर एकवटून विवेक म्हणाला, " आई मी संजनाला घटस्फोट देतो आहे. का,कशासाठी आता मला काही विचारू नका. योग्य वेळ आल्यावर मी नक्की सांगेन. पण आता काही नको. "
विवेक हा अतिशय समजूतदार मुलगा होता म्हणून त्याच्या आईवडिलांनीही संयम बाळगला. दुसर्‍या दिवशी संजना इक्बालला भेटायला गेली. राजेशने तर तिच्याशी बोलणेच सोडले होते. सीमाही जेवढ्यास तेवढे बोलत होती. तिलाच बाहेर जाते असे सांगून निघाली.
" हाय इक्बाल. "
" हाय संजना, सॉरी फॉर युवर मदर. पण असे अचानक? आणि तू मला का नको म्हणालीस?"
" इक्बाल तुला माहित आहे, मला शब्दांशी खेळत बसायला आवडत नाही. म्हणून डायरेक्ट पॉईंटवर येते. तू ज्या दिवशी मला फोन केलास त्या दिवशी माझे लग्न होते. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी मी तुझ्यासाठी परत आले. ते सगळे आईला सहन झाले नाही आणि त्यातच ती गेली. मी आता घटस्फोट घेते आहे, तू सांग कधी करायचे आपण लग्न?"
" आर यू मॅड संजना, तू हे कसे वागू शकतेस? लग्न झाले होते तर सांगायचे ना मला. तुला काय वाटते माझे पॅरेन्टस हो म्हणतील? लग्न एका डिव्होर्सीसोबत? इट्स जस्ट इम्पॉसिबल.. सॉरी मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी."
"ओके.. तू जाऊ शकतोस. मी बघते काय करायचे ते."
म्हटल्याप्रमाणे विवेकने काही दिवसातच पेपर पाठवले. दोघांचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला. विवेक आणि सीमाने तर काही दिवस बाहेर जाणे बंद केले होते.
"दादा , वहिनी मला तुमच्याशी काही बोलायचे आहे?" संजना दोघांनाही म्हणाली.
"अजून काही ऐकवणे बाकी आहे का?" राजेश
" दादा, मला माहीत आहे तू चिडला आहेस माझ्यावर. पण तरिही मी बोलणार आहे. इक्बालने माझ्याशी लग्न करायला नकार दिला आहे. मी इथेही राहू शकत नाही कारण तुला माझ्यामुळे होणारा त्रास मी पाहते आहे. मी नवीन जॉब शोधला आहे दुसर्‍या शहरात.मी उद्याच जायला निघते आहे. कालांतराने तुझा राग शांत होईल अशी अपेक्षा आहे."
यावर न राहवून कधी नव्हे ती सीमा बोललीच, " राग शांत होईलच ग, पण तुझ्या एका दिवसाच्या खेळापायी माझा नवरा कर्जात बुडालाच आणि तो बिचारा विवेक तर आयुष्यातून उठला. हे सगळे कधी विसरता येईल असे वाटते तुला?"
या प्रश्नाचे उत्तर मात्र संजनाकडे नव्हते...



कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all