सप्तपदी कि तप्तपदी भाग२

Story Of A Married Couple
सप्तपदी कि तप्तपदी
निशा एकटक कोसळणाऱ्या पावसाकडे बघत बसली होती. एवढ्यात तिचा मोठा मुलगा चंदन आत आला.
"मां बाबा आला आहे."
"येऊ दे. त्याला गेस्टरूम मध्येच राहू दे , त्याला जेवणही तिकडेच नेऊन दे आणि सांग खोली बाहेर यायची गरज नाही म्हणून."
" तू ओके आहेस का मां? नाहीतर मी त्याला जायला सांगतो."
" मी ओके आहे. आणि एवढ्या पावसात तो तरी कुठे जाणार. राहू दे त्याला."
पाठमोर्‍या चंदनला पाहून निशाला वाटले कि \"किती समजूतदार आहे माझे पोर. किती व्यवस्थित परिस्थिती हाताळतो आहे.मी तरी एवढी समंजस होते कधी? छे...उलट मी घरातले शेंडेफळ. त्यामुळे भरपूर लाडावलेले ताई आणि दादापेक्षाही माझे लाड खूप झाले. ते दोघेही असल्यामुळे ना कधी कामाची जबाबदारी अंगावर पडली ना कधी कोणत्या महत्त्वाच्या कामाची. आधीच अवखळ स्वभाव आणि होत असलेले लाड खूपच स्वच्छंदी होते मी. सुदैवाने बाबांची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होती. त्यामुळे कसलीच चिंता नव्हती.
म्हणूनच कदाचित मी जेव्हा इंजिनिअरिंग जाते म्हणाले तेव्हा कोणीच अडवले नाही. साधारण तीस एक वर्षांपूर्वी आधीच कमी विद्यार्थी संख्या असलेल्या कॉलेज मध्ये मिळालेली ॲडमिशन. तिथे असलेल्या आम्ही दोघीच मुली.. तिथेच भेटलेला तो शशांक , शशांक अय्यर.\"

निशाचा एक छानसा ग्रुप तयार झाला होता. सगळेच एकत्र फिरायचे, मस्ती करायचे. तेव्हाच बहुतेक सुरुवात झाली होती शशांकची निशाकडे बघण्याची. तिच्या जवळच्या मैत्रिणीने तिला सांगितले सुद्धा पण निशाने तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण शशांकने नाही केले, आता तर तो लेक्चर चालू असताना सुद्धा तिच्याकडे बघत राहायचा आणि हे सगळ्यांना कळले होते. निशाच्या काहीच न बोलण्याचा तो फायदा घेत होता. एक दिवस त्याने निशाला त्याने थेट लग्नाबद्दलच विचारले आणि या सगळ्याचे थ्रील वाटून तिने सुद्धा त्याला होकार दिला.
कसे कोण जाणे पण हे सगळे निशाच्या घरी कळले. तिचे वडील, तिने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला म्हणून चिडले होते, आई आपल्या संस्कारांना दोष देत होती. बहिण भाऊ काहीच बोलत नव्हते. शेवटी तिच्या घरच्यांनी तिचा हट्ट मान्य केला आणि तिच्या लग्नाला मान्यता दिली. पण लग्न लगेच करायची हि अट घातली. दोघांचेही लग्न झाले. लग्नानंतर शिक्षण पूर्ण केले. आणि दोघांनीही नोकरी करण्याऐवजी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. क्लास छान चालू होते. संसारात दोन मुलांचे आगमन झाले होते. निशाचे आईवडील पण खूश होते. पण का कुणास ठाऊक निशाच्या वडिलांनी मरण्याआधी तिला एक घर घेऊन दिले आणि तिला ते कधीही कोणत्याही परिस्थितीत विकायचे नाही किंवा शशांकच्या नावे करायचे नाही, असे सांगितले. हो म्हणण्याखेरीज ती दुसरे काय करू शकत होती.
बघता बघता दिवस पटापट सरले.. मुले मोठी झाली आणि त्यांनी आईवडिलांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस जोरात साजरा करायचे ठरविले. क्लासच्या सगळ्याच स्टाफला बोलावले होते. सगळे मस्त मजा करत होते. तेव्हाचे शशांकचे प्रियासोबतचे वागणे तिला थोडे खटकले होते. पण दोघेही दारूच्या नशेत असे वागत असतील अशी मनाची समजूत घालून तिने कानाडोळा केला. पार्टी झाली आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी शशांकला ब्रेन हॅमरेजचा ॲटॅक आला आणि त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागले.
रात्रंदिवस निशा त्याच्या उशाशी बसून होती.
"आई, असे अचानक कसे ग झाले? बाबा होतील ना बरे? " धाकटा वंदन निशाला विचारत होता.
"हो रे बाळा, डॉक्टर काका सांगून गेलेत कि आज शुद्धीवर येतील ते. तू आता मावशीसोबत घरी जा. उद्या ये परत".
"निशा, ऐक माझे, थोडा वेळ घरी चल , फ्रेश हो , मग ये परत."
"ताई , तो इथे बेशुद्ध असताना मला काहीच सुचत नाहीये... तू फक्त मुलांकडे लक्ष देशील का? मोठे आहेत ,पण घाबरलेत थोडे."
"ठिक आहे. काही लागले तर कळव. मी उद्या सकाळी परत येते चहा नाश्ता घेऊन. "
सगळे घरी गेल्यावर निशा एकटीच शशांकचा हात हातात घेऊन बसली होती. एवढ्यात तिला शशांकचे ओठ हलताना दिसले. तिला खूप आनंद झाला. ती डॉक्टरांना बोलवणार इतक्यात तिच्या कानावर शब्द पडले "

निशाला काय ऐकू आले , हे पाहू पुढील भागात.
कथा कशी वाटली, हे सांगायला विसरू नका.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all